Thursday, February 25, 2010

विठठला....



प्रिय सचिन, काल तू द्विशतक काढलंस आणि आपल्या घरातला कोणी बोर्डात आल्यावर जसा आनंद होईल तसं झालं अगदी, अटकेपार झेंडा लावल्यावर तेव्हा मराठ्यांना वाटलं असेल ना तस्सच.. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची आणि ’सचिनने आता निवृत्त’ व्हायला हवं’ म्हणणाया ढुढ्ढाचार्यांची एकाच वेळी पिसं काढत ज्या कमालीच्या एकाग्रतेने तू २०० काढलेस नतमस्तक तुझ्यापुढे राजा. तुझी ती नजर, बॊलवर तुटून पडणं, रनिंग बिट्विन विकेट्स, फूटवर्क, टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन म्या पामराने काय बोलावं ह्या सगळ्याबद्दल. काल पुन्हा पुन्हा हायलाईट्स पाहिले आणि डोळ्यांचं पारणं फिटलं अगदी कडा ओलावल्या सुद्धा. कालचा दिवस तुझा होता असं म्हणून मी अन्याय करणार नाही तुझ्यावर, तू म्हणशील तो दिवस तुझा हे सगळ्यांनाच माहित झालय आता. २४ तारीख काल (तुझी जन्म तारीखही २४ च, संख्याशास्त्रीय अनुकूलता असणार म्हणजे :) आणि आज नुकतच वाचलं की, विनोद बरोबर शारदाश्रम मध्ये बरोबर २२ वर्षापूर्वी, म्हणजे २४ फेब्रु. १९८८ रोजी ६६४ धावांची जगप्रसिद्ध भागीदारी केली होतीस. असो, मागे ऒस्ट्रेलियाविरुद्ध १७५* काढताना तू रीटायर्ड हर्ट झालास, न्यूझीलंड विरुद्ध १८६* पेक्षा जास्त करायची संधीच मिळाली नाही पण मला माहितेय तू त्या दोन्ही खेळीतून बरच शिकलास (आणि तू असं अनुभवातून शिकत खेळाची पातळी उंचवू शकतोस म्हणून तू तू आहेस). त्यागोष्टींची तू पुनरावृत्ती होऊन दिली नाहीस हे लगेच जाणवलं. सईद अन्वरने काढलेले ते १९४ आठवतायत.. मे महिना होता आणि खोटं कशाला बोला सॊलिड जळली होती, निम्म्याहून अधिक डाव तर रनर घेऊन खेळला तो. असो, पण स्टॆमिना काय असतो हे तू काल दाखवून दिलस. तुझ्या पहिल्या शभर धावात एकही षटकार नसावा ह्यात संयम म्हणजे काय ते दाखवलस आणि इतकं करुन स्ट्राईक रेट आठ आणि नऊ? तुला महान हे विशेषणसुद्धा तोकडं पडावं. अगदी दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज सुद्धा तुझ्या वादळापुढे काल नतमस्तक झाले असतील.

तुझं कौतुक काय करावं महाराजा, स्टेनची बॊलिंग बघितली मी, कॆलिस सुद्धा जीव तोडून टाकत होता. अशा बॊलिंगची लिलया पिसं काढणं आणि समोरच्या कार्तिक, पठाण, धोनीला प्रोत्साहन देत राहाणं तुलाच जमणार. बॊलरच्या डोक्यावरुन उलट टोलवलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बायसेक्ट करत जाणारा चेंडू खासा मेजवानी होती काल. स्टेनचा ऒफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तू ऒफला शफल होत फ्लिक करुन लेग ला टोलवलास, कसं काय जमतं तुला इतकं अतर्क्य टायमिंग, स्टेन सारख्या फास्ट बॊलरपासून निघालेला चेंडू तुझ्या पर्यंत पोहोचेपर्यंत हे सगळं करायला वेळ आणतोस कुठून? इतकं पदलालित्य, ठेका तुला जमतं कस? आणि ते ही ह्या वयात?? १९९* वर असताना धोनीने तुला नॊन स्ट्रायकींग एन्ड वरुन परत पाठवलं ना तेव्हा सांगतो, ठोका चुकला होता.. अंग ठणकत असणार ना इतक्या झटपट हालचाली करत असताना.. पण २०० च्या सिंहासनावर तुलाच विराजमान झालेलं बघायचं होतं.. तू ’छ्त्रपती’ आहेस, दुसया कोणी तिथे जाण्याआधी तू तिथे जाणंच आम्ही स्विकारु शकतो. २०० हा जॆकपॊट असूच शकत नाही तो फक्त एक क्लास आहे. काल रात्री भारतातला प्रत्येक गरिब श्रीमंत ज्याची क्रिकेटवर श्रद्धा आहे, तो तृप्त झाला असेल, दोन घास जास्तीचे जेवला असेल. दिवाळी, गणपती दरवर्षी येतात पण तुझं असं येण आणि बरसणं त्यात न्हाऊन चिंब होणं ह्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं बाबा. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे!! तसं आहे हे..
असाच खेळत राहा, मनमुराद! गावस्करने घेतलेली ती १०००० वी धाव आणि तुझी २०० वी, भारत काय करु शकतो हे जगाला दिलेलं एक सणसणीत उत्तर.. आमचं भाग्य की आम्ही तुझ्या पिढीत जन्मलो आणि तू भारतात, तुझ्याबरोबर मोठं होत तुझा प्रत्येक चौकार, षटकार उपभोगण्याचा निर्भेळ आनंद दिलास, त्या आनंदाने कित्येक दु:ख, प्रसंगी एकाकीपण विसरायला लावलय.. तुझ्या आणि तुझ्या खेळाच्या त्रृणात राहाण्यातच धन्यता बाबा.. आज तुझ्या खेळाचं वर्णन इथे अमेरिकन, पाकिस्तानी आणि जमैकाच्या मित्रांमध्ये बसून करताना कसं वाटतय काय सांगणार, माझीच कॊलर ताठ. भारतीय आणि मुंबईकर असल्याचा यथार्थ अभिमान वाटतोय आणि तू.... मॆच नंतर तुझं नेहमीचच, dinesh, pathan & Dhoni played well, ball was coming on to the bat.. वगैरे वगैरे.. किती हा विनम्रपणा, बाबा रे, बॊल सगळ्यांच्या बॆटवर येत होते पण त्यांना अचूक दिशा देणं, टायमिंग साधणं, क्षेत्ररक्षकांच्या मधून किंवा डोक्यावरुन भिरकावणं आणि २०० धावा जमवणं, हे फक्त तुझ्या बॆटला आणि थंड डोक्याने खेळणाया तुलाच जमणार ना! कसे रे राहातात तुझे पाय इतके घट्ट जमिनीवर, कोणती वीट पायी घेतलेयस.. विठ्ठला.. ’तुझाच झेंडा माझ्या हाती...........’

एक साठवण:
पंधराव्यावर्षी मुंबईतल्या आझाद मैदानावर टॊम अल्टरने घेतलेली सच्च्याची कटींग पिताना घेतलेली अनौपचारीक मुलाखत..
http://www.youtube.com/watch?v=oez4TSdZvJI

- गेल्या २८ वर्षांपासूनचा तुझा भक्त

Friday, January 22, 2010

कुण्या देशांचं पाखरू...

बयाच दिवसांनी लिहितोय, घरात लहान मूल असलं की वेळ कसा जातो कळत नाही, ह्याचा प्रत्यय घेतोय, ’बाप’ होण्याचा सुखद अनुभव आणि वाढत्या जबाबदायाही.. :-)

तसे बरेच विषय डोक्यात आहेत लिहिण्यासाठी पण सद्ध्या सगळ्यात जोरात विचार चाल्लेत ते "For here or to go?" चे :-) अपर्णा वेलणकर च्या ह्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी ह्या ब्लॊगवर लिहिलं होतं आणि त्यातलं नेमकं पुढे कुठे जायचं त्या दृष्टीने पावलं टाकायची वेळ आता आली आहे असं वाटायला लागलय, आम्हाला सगळ्यांनाच. योगायोगाने हे डोक्यात घोळत असतानाच मायबोलीवर रैनाने ’परतोनि पाहे’ हा बीबी सुरु केला आणि मग ह्या प्रत्येक भारतीय इमिग्रेंट्सच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सखोल लिहावसं वाटलं. ह्या अनुषंगाने येणारे मुद्दे, उपमुद्दे ह्यांची सविस्तर चर्चा घरातील सगळ्यांबरोबर बरेचदा झालेय शिवाय समकालीन, समवयीन आणि समस्थितीतिल मित्रमंडळींमध्येही झालेय. प्रत्येकाने आपापल्या परिने "For here or to go?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलय, शोधायला घेतलय किंवा नंतर बघू म्हणून चक्क पुढे ढकल्लय. तर ह्या ब्लॊग मध्ये माझ्या मायबोलीवरच्या लेखातले मुद्दे उचलून ’अमेरिकेत थांबायचं कि भारतात परतायचं?’ ह्याचं उत्तर शोधताना एखाद्यास कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो आणि कशी तयारी करावी लागते ह्याबद्दल लिहीणार आहे. हे वाचणायास अमेरिकेतल्या आयुष्याची कल्पना नसेल तर थोडी माहिती मिळेल पण माझ्यासारख्याच X = X + 1 सिंड्रोम (ह्या बद्दल पुढे लिहीलय) मधल्या कुटुंबास मुद्देसूद विचार करण्यास चालना मिळेल.

हे लिहिताना माझी थोडक्यात पार्श्वभूमी अशी की मी सध्या अमेरिकेत आयटी मध्ये आहे, व्यावसायिक आयुष्याला भारतात सुरुवात केली मग दोन वर्षे भारतीय कंपनीतर्फे अमेरिकेत काम केले, पुन्हा भारतात जाऊन भारतीय़ कंपनीत वर्षभर काम केले. त्यानंतर पुन्हा अमेरिकेत येऊन गेले पाच वर्ष इथे काम करतोय. हे सगळं सांगायचा उद्देश असा की, भारतात तसेच अमेरिकेत (प्रॊग्रेमर लेव्हलपासून प्रॊजेक्ट मॆनेजर, आर्कीटेक्ट लेव्हलवर) काम करण्याची आणि करुन घेण्याची पद्धत, दोन्हीकडचे बदलते जीवनमान, राहाणीमान, सामाजिक प्रश्न अशा संक्रमणातून एकापेक्षा अधिक वेळा गेल्यामुळे काही गोष्टी खूप जवळून अनुभवल्यात. एक महत्त्वाचे म्हणजे माझे व्यावसायिक अनुभव अमेरिका आणि भारत ह्या दोन देशांपर्यंतच आणि सांसारिक अनुभव फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादीत आहेत. तसेच सुदैवाने भाषा हया महत्वाच्या माध्यमाचा मोठा प्रश्न (जो जपान, चायना मध्ये काम करणायांना अपरिहार्यपणे येतो) आपोआपच नाहीये.

मूळातून विचार करण्यासाठी ’जाओनी किंवा राहोनी पाहे’ या अनुषंगाने आधी मुद्दे माडतोय म्हणजे परतण्याचा विचार त्या त्या गटात वेगळा कसा हे लक्षात येईल. आपले प्रश्न त्याची उत्तर वैयक्तीक पातळीवर बदलतात पण मग जी कारण असतात निर्णय प्रक्रीयेमागे (परतण्याच्या किंवा न परतण्याच्या) ती कोणती ह्यांच्या अभ्यासाचा (analysis) जेव्हा विचार होतो तेव्हा ज्या मुद्द्यांवर एखादा निर्णय घेतला जाईल ते मुद्दे कोणते, प्रत्येक मुद्द्याचं (त्या व्यक्ती/कुटुंबसापेक्ष) महत्त्व काय [म्हणजे तो मुद्दा घडेल ह्याची शक्यता (probability) किती आणि त्याचा परिणाम (impact) किती] ह्या सगळ्यांचा आपल्या अनुभव आणि सदसदविवेकबुद्धीला अनुसरून एकत्रित विचार केला गेला पाहिजे. हे एकदा समजलं की मग उकल काढण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय बैठक मिळू शकते.

असो, तर अमेरिकेत येणारा प्रत्येक जण एकाच सारख्या मार्गाने येत नाही, शिवाय येणाया प्रत्येकाचे उद्दीष्ट ’अमेरीकन ड्रीम’ हेच असते, असेही नाही उलट बरेचदा ते बदलत असते मृगजळासारखे, तर ढोबळमानाने इथे भारतातून आलेल्यांपैकी काही महत्त्वाचे गट -
१. अमरिकेत एम एस किंवा एम बी ए किंवा पीएचडी करू म्हणून उच्च शिक्षणासाठी आलेले लोक
२. भारतात शिकून अमेरिकेत नोकरीसाठी म्हणजे पैसा कमवण्यासाठी आलेले लोक
२.अ. एल १ म्हणजे कंपनी ट्रान्सफर वर आलेले जे इथे नोकरी बदलू शकत नाहीत आणि कंपनीच्या इशायावर केव्हाही परत जावे लागू शकते
२.ब. एच १ म्हणजे जे इथे नोकरी बदलू शकतात आणि नोकरी सुटल्यास व दुसरी न मिळाल्यास काही एक दिवसात परत जावे लागण्याची शक्यता असते
३. भारतातून येनकेनप्रकारेण नातेसंबंधातून इथे ग्रीनकार्ड घेऊन आलेले लोक (उदा. बरेचसे पटेल आपण बघतो..)
४. अमेरिकेत असणाया वरील पहिल्या दोन प्रकारच्या भारतीयांबरोबर लग्न करून आलेले डीपेंन्ड्ट व्हिसावरचे लोक
५. इमिग्रेशनची अडथळा शर्यत पार करून आलेले लोक - जीसी किंवा सिटीझनशिप असलेले

आता ह्या गटांच्या ढोबळ आर्थिक स्थैर्य आणि साधारण अपेक्षांचा आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर (कौटुंबिक पातळीवर थोडं नंतर पाहू) परतीच्या शक्यतेवर होणाया परिणामाचा थोडक्यात विचार करु -

गट १.
ह्यातील बयाचशा लोकांनी इथे येऊन शिकण्यासाठी पदरमोड केलेय अगदी स्कॊलरशिपवर आला असाल तरी किमान दोन वर्षे वेळेची गुंतवणूक केलेय. शिवाय, स्टुडंट लाईफ मधे कॊलेज फुटबॊलपासून एक वेगळी अमेरिका अनुभवलेय, त्यांची अमेरिकेशी थोडी वेगळीच नाळ जुळलेय. शिवाय, वैयक्तीक पातळीवर व्यावसायिक आयुष्यात त्यांना अमेरिकेत शिकल्याने प्रचंड संधी आहे, मागणी आहे. त्यामुळे रीटर्न ऒन इन्व्हेस्ट्मेंट तसेच ऒनर ऒफ टेलेंट ह्या दोन्हीवर विचार करता अशी लोक अमेरिकेत पटकन स्थिरावू शकतात, बरेचदा ह्याच गटातला जोडीदार ते निवडतात. आर्थिक प्रॊब्लेम सुटलेले असतील तर परतण्याचे विचार मनात येऊ शकतात किंवा अमेरिकन ड्रीमच्या दिशेने वेगात वाटचाल तरी करू शकतात. अर्थात, इथे शिकूनही नोकरी मिळत नसेल, ओपीटी नंतर एच वन आणि एच वन नंतर जीसी होत नसेल तर शिक्षणावरचा खर्च, लग्नाचे वय ह्यातून बरीच ओढाताण होऊन परतीच्या शक्यता सक्तीच्या होऊ शकतात. अर्थात ह्या गटातील लोकही गट २ बच्या माध्यमातूनच इमिग्रेशन मधून जात असल्याने त्यांना बयाच सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

गट २.
ह्यातील २.अ. लोकांना अमेरिकेत कायम राहाणे तसे फार शक्य नसल्याने त्यांना कधी ना कधी परतायचेच आहे हे लक्षात ठेवावेच लागते.
२.ब. अमेरिकेतले मार्केट, तुमच्या व्यावसायिक निपुतणतेला इथे असलेली मागणी, तुमचा अनुभव आणि मुख्य म्हणजे इमिग्रेशनचे नियम ह्या सगळ्या कचाट्यात ही लोक व्यवस्थित भरडून निघत आहेत. लग्नाची समस्या होऊ नये किंवा नक्की काय करायचे हे ठरत नाही किंवा कंपनी तयार होत नाही अशा विविध कारणांनी जीसी लांबणीवर पडले की मग एक चक्र सुरु होते. वर्षानुवर्षे जीसीची वाट पहाणे आणि त्याअनुषंगाने येणारे निर्वासिताचे जीवन चालू होते. बद्लती प्रोजेक्ट्स, जीसी फाईल केलेल्या कंपनीकडून होणारी अडवणूक, ऒनसाईट ऒफशोअर मॊडेल असेल तर कामाचे विचित्र तास ह्याबाबींमुळे अस्थिर जीवनमान सुरु होते. प्रोजेक्ट एकाच ठिकाणी असेल ह्याची खात्री बहुधा नस्तेच शिवाय एच वन वर असल्याने घर घेऊन राहाणे ही मोठीच रीस्क बनते. ह्या मंदी मध्ये होत्याचे नव्हते झालेल्या फॆमिली आपण पाहिल्या असतीलच. शिवाय जीसी येईपर्यंत तांत्रिक दृष्ट्या तुम्ही वर्षानुवर्षे तुमचा कामाचा प्रोफाईल वाढवू शकत नाही त्यामुळे प्रसंगी व्यावसायिक हतबलताही येऊ शकते. समजा एखाद्याला वयाच्या पस्तीशी पर्यंत जरी जीसी मिळाले तरी त्यानंतर वीस वर्षांचे होमलोन, इतका वेळ नोकरी टिकवून ठेवणे आणि संसार उभा करणे म्हणजे मोठी जबाबदारी होऊ शकते. ह्याचा एकत्रित विचार करता ग्रीनकार्ड हा एक जुगार झाला आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे ग्रीनकार्ड मिळूनही सीटीझन शीप मिळेपर्यंत ह्यातून सुटका नाहीच.

गट ३.
ह्यांचा इथे येऊन राहाणे हा एकच उद्देश असल्याने परतीचा काही प्रश्न येत नाही.

गट ४.
हा एक महत्त्वाचा घटक आहे. ह्यात आपण बहुसंख्य शिकलेल्या मुली निव्वळ एच ४ वर नोकरी करणे शक्य नाही म्हणून घरी बसलेल्या बघतो. ह्यात त्यांचे करीअरचे वैयक्तिक नुकसान झाल्याची बोच असतेच पण जर अशा व्यक्तीने ड्राइव्हीग, सोशल नेटवर्कींग, इथे वेळेचा स्वत:साठी कसा सदुपयोग करता येईल ह्याचा विचार केला नसेल तर अमेरिकेचा कंटाळा येऊ शकतो आणि मग भारतात परत जाऊया असा दबाव त्यांच्याकडून येऊ शकतो किंवा उलटपक्षी इथले सांसारिक स्वातंत्र्य आवडायला लागून भारतात जायलाच नको असाही सूर आळवला जाऊ शकतो. थोडक्यात, परत जायचं का ह्या मुद्द्यावर ह्या गटाचा प्रभाव अपरिहार्यपणे असतोच.

गट ५
ह्या गटातली माणसं बहुतांश इथे पोहोचेपर्यंत आर्थिक दृष्ट्या यशस्वी, स्थिरावलेली असतात. इतके वर्ष जीसी/सिटिझनशीप साठी लढलॊ त्याचे फळं खाण्याचे दिवस असं मनात येतं असतं. कुटब सुद्धा बरच स्थिरावलेलं असतं. अशावेळी आई वडिलांसाठी इथली बसलेली घडी मोडायची असेल तर कुटुंबाला खूप विश्व्वासात घेणं गरजेच वाटतं. परत जाण्यासाठी ह्यांना थोडं जास्तच धैर्य दाखवावं लागतं., इतके वर्षात इथे चांगला जम बसला असेल तर ह्यावर्षी जाऊ पुढच्या वर्षी जाऊ म्हणत (क्ष + १ सिंड्रोम) इथेच राहातात लोकं असं बरेचदा दिसतं.

एक कुटुंब परततं म्हणजे त्यात साधारणपणे कमावणारी (एक वा क्वचित अधिक)व्यक्ति आणि अवलंबित व्यक्ती (जी इथे कमवू शकत नाही पण कमवण्याची पात्रता आहे किंवा जी शिकतेय किंवा शिकण्यायोग्य होतेय). आता परतणाया कुटुंबप्रमुखास तीन पिढ्यांचा विचार करायचाय, आधीची (म्हणजे आई वडील..), स्वत:ची म्हणजे स्वत: तसेच बायको कसा परतीचा बदल मानवू शकेल आणि पुढची पिढी म्हणजे मुलं. हल्ली बयाच वेळा ’मागच्या पिढीसाठी परत जायचं’ ह्याला सरसकट टाळ्या वाजवल्या जातात, पण ते एका चौकटीतच खरं आहे. म्हणजे वृद्ध आई वडिलांसाठी परत जात असाल पण मुलांचे नुकसान होतेय तिथे गेल्याने किंवा अमेरिकेतल्या शिक्षणाची त्यांची संधी हुकली अशी बोच असेल तर मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचे नुकसान केले असं म्हणायला वाव आहे. ह्याउलट पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी इथे थांबलं तर मागच्या पिढीवर अन्याय होण्याची शक्यताही आहेच. सगळ्यांना पटेल असं ह्याचं उत्तर काढण म्हणूनच शक्य नाही हा असा वैयक्तीक प्रश्न आहे की जिथे तुम्हाला काय हवय आणि काय नकोय हे नीट माहिती असायला हवं आणि जो निर्ण्य घेऊ तो ठामपणे तडीस नेऊन जीवनाची अपरिहार्यता समंजसपणे स्वीकारता यायला हवी.

-- ’मी इथे का आलो?’ ह्याचं उत्तर अमेरिकेत जगायला, अमेरिकन ड्रीम पूर्ण करायला असं असेल तर तुमची दिशा अमेरिकेत राहाण्याकडे झुकतेय त्यामुळे गणिताची उकल सोप्पि हॊइल. जर फक्त पैसे कमवायला, जगाच्या दुसया टोकावर काय चाल्लय पहायला हे उत्तर असेल तर अजूनही परतीची धुकधुकी व्यवस्थित आहे. तुमची आर्थिक उद्दीष्ट जेवढी सुस्पष्ट असतिल तेवढं परतीच गणित सोप्प होईल.
-- इथल्या इमिग्रेशन सिस्टीमच्या कचाट्यात २ब गटामधील बहुसंख्य लोकं मोडतात. जीसी फाईल करण्याचा उपयोग फार तर एच वन सहा वर्षांपलिकडे वाढवायला होईल पण जीसी मिळायला (इबी२ किंवा इबी३ असेल) तरी अंदाजे दहा एक वर्षे लागतील. एवढे वर्ष निर्वासितासारखे (आपण आणि कुटुम्बियांनी) आयुष्य जगायचे का हे ज्याचे त्याने ठरवायचे. स्थैर्य हे तुमचे प्रमुख उद्दीष्ट असेल तर अशा स्थितीत नोकरीत, घर खरेदी, मुलांच्या शाळा, त्यांचा कौटुंबिक सहवास ह्या सगळ्या प्रकारांत स्थैर्य मिळणे दुरापास्त आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे इमिग्रेशन लॊज. ह्या गटातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय नाही (तसं अपेक्षित आहे असं नाही, पण नाहीये हे महत्त्वाचं) कारण ग्रीन कार्ड -सिटीझन आणि एच वन ह्यांना कामाचे स्वरुप, मर्यादा, संध्या ह्यात फरक आहे.
-- जोडीदार जर नोकरी करु शकत नसेल (उदा. एच ४ किंवा मुलांना द्यावा लागणारा पूर्ण वेळ किंवा नोकरीची संधी नसणे) आणि महत्वाकांक्षी असेल तर इथे घालवलेला प्रत्येक दिवस त्याच्या व्यावसायिक आयुष्यास त्रासदायक ठरु शकतो आणि कुटुंब अस्थिर करु शकतो.
-- इथली प्राथमिक शिक्षणसंस्था एका मर्यादेपर्यंतच चांगली आहे असे वाटते. म्हणजे लॆब, हुशारीप्रमाणे शिक्षण, व्यावसायानुषंगिक शिक्षण हे सगळ छान आहेच पण इथल्या शालेय वातावरणात मुल वाढवायला तुमच्या मनाची तयारी असायला हवी. तसच तुम्ही जितक्या लवकर अमेरिकन कल्चर आत्मसात कराल तितकं मुलांना सोप्प जाईल. तिथे शिकले तर आपल्यातले पुष्कळ जण आले तसे उच्चशिक्षणासाठी मूल इथे येऊही शकेल मोठे झाल्यावर. भारताल्या प्राथमिक शिक्षणपद्धतीत मुलांवर बोजा खूप आहे, मान्य पण आता तिथेही शाळा अभ्यासक्रमांत हा मुद्दा विचारात घेत आहेत आणि घरी स्पर्धेतून मुलाचा कोंडमारा होत नाही ना ही काळजी आपण घेतली तर बराच फायदा होऊ शकतो.
-- इथे ठरलेले सणवार (बयाचदा) सोयीस्कर विकेंडला करायचे, दोन वर्षातून एकदा भारतात तीन आठवडे जाऊन ’जी ले तेरी जिंदगी’ करायचं आणि त्यावर समाधान मानायचं हे तात्पुरतं जमेल पण कायमस्वरूपी जमेल का ह्याचा नक्की विचार करायला हवा. अमेरिकेत म्हातारपण घालवायची तयारी आहे का ह्याचाही विचार करायला हवा.
--एक पालक म्हणून, मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण व्हावी असं मनापासून तुम्हाला किती वाटतं आणि ते किती गरजेचं वाटतं? वाटत असेल तर इथे राहून ते अजिबात सोप्प नाही. तुम्हाला वाटेल ते पुण्यातही शक्य नाही पण ते पटत नाही. अजूनतरी पुण्यामुंबईत मराठी मेलेली नाही उलट ’राज’कीय कारणांमुळे तिला पुन्हा बळ येतय. नुसती भाषा नाही तर मराठी संस्कृतीशी पुढच्या पिढीची (ती त्याच्या पुढच्या पिढीत्त तशीच जुळलेली राहावी असा हट्ट नाही) नाळ जुळावी असं वाटत असेल तर नीट विचार होणं आवश्यक आहे. उदा. ’पु.लं. चा नारायण’ मी मुलाला समजावू शकलो पाहिजे, ’चाफ्याच्या फुला’ त्याच्याबरोबर बसून समरसून ऐकू शकलो पाहिजे साहित्याची, वाद्मयाची गोडी त्याला लावता आली पाहिजे अशी इच्छा असेल तर ते इथून वर्षाकाठी काही पुस्तक मागवून पूर्ण होण कठीण वाटतं. शिवाय, ते तिथे (हो बदलत असले तरीही) वातावरणामुळे आपोआप घडून येईल इथे राहिलो तर मात्र नाही म्हटलं तरी मुलांवर मराठी लादावं लागेल आणि जे मराठी भाषेचं आहे तेच अभिजात हिदुस्थानी संगीताच. तिथे सवाई गंधर्व, वसंतोत्सवासारखे उत्सव आणि जर त्याला आवड असेल तर दिग्गज संगीत तन्द्न्य गुरुस्थानी मिळू शकतील, इथून ती आवडं निर्माण करणं थोडं आडवळणाच हॊईल असं वाटतं. अर्थात उदा. इथे राहून व्हायोलिन शिकता येईल तिथे जाऊन हिंदुस्थानी संगीत मुलाने शिकायलाच हवे असे नाही असे एखाद्यास वाटत असेल तर ते वावगे नाही. पालकत्व हा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. हा फक्त मराठीचा मुद्दा झाला पण जर पुढे संस्कृत, उर्दू शेरो शायरी असं काही वेगळं शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते भारतातच जास्त सोप्प आहे.

’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’, प्रत्येकाला इथे राहा किंवा तिथे राहा समस्या आहेत. आपण जगतोय म्हणजेच चांगले वाईट असे भोग भोगतोय. त्यामुळे आपल्याला येणाया समस्यांवर आणि त्यांच्या निवारण्यावर आपलं किती नियंत्रण आहे हे महत्त्वाचं. भारतात तुमच्याकडे पैसा असेल तर बयाच प्रश्नांवर चांगले नियंत्रण येऊ शकते असे म्हणतात.

कौटुंबिक पातळीवर -
इथे जोडपं काम करत असेल तर विकेंड घरकामात, पुढच्या आठवड्याच्या पूर्वतयारीत जातात, रोज सकाळ संध्याकाळ ताजं जेवण मिळतच असं नाही, मुलांना डेकेअर मध्ये ठेवणं अपरिहार्य असतं. ह्याउलट भारतात मनुष्यबळाचा अभाव नाही. तुमचं आर्थिक नियोजन नीट असेल आणि विश्व्वासू माणसं तुम्ही निवडू आणि टिकवू शकलात तर बरीच काम आऊटसोर्स करता येऊ शकतात. शिवाय, आइ वडिलांचा तसेच शेजार्यापासून इतर नातेवाईकांचा आधार मिळवू शकता, धोबी, इस्त्री, पोळ्याला बाई, स्वयंपाकाला बाई, केरवारं करायला बाई अशा अनेक पातळ्यांवर आपण आपली काम करवून घेऊ शकता आणि वेळ वाचवू शकता. नातेवाईकांबरोबर येणार्या लग्न मुंजी बारशी डोहाळेजेवणं अशा कार्यांना पैठण्या नेसून दागिने घालून मिरवणे अशा मजांबरोबरच कुत्सितपणा, भोचकपणा, चोमडेपणा अशा अवगुंणांचाही आपल्याला सामना करावा लागतो पण ते कसं परतून लावायचं की त्याचा ताण घ्यायचा हे पूर्णत: तुमच्यावर आहे. एकूणात दहीहंडी, संक्रांत, गणपती, दिवाळी, पाडवा आणि प्रत्येक सणच जोरदार उत्साहात साजया होणाया ठिकाणी (उदा. गिरगाव, दादर, ठाणे) तुमचं आयुष्य गेलं असेल तर एका उत्सवी जीवनाच आकर्षण आपल्याला असतं, अमेरिकेतलं जीवनमान त्यामुळेच कित्येकदा तेच ते आणि चाकोरीबद्ध वाटू शकतं.
भारतात परतल्यावर तुमचे तसेच जोडीदाराचे आई वडील जवळ असतील, त्यांनाही बरं वाटेल, सहवासाचं प्रेम वाढेल, त्यांच्या तब्येतीची इथे राहुन जी काळजी असेल तर ती उरणार नाही. त्यांनाही मुला-नातवाबरोबर जीव रमवता येईल, नातवालाही डेकेअरची गरज भासणार नाही असं सगळं जूळून आलं तर तुमचं काम सोप्पच होईल खूप.
तिथले गड किल्ले, धार्मिक स्थळे किंवा डोंगर दया, गावं, शेतं तुम्हाला खुणावत असतील तर भारतात असाल तर निदान काही महिन्यातून रजा टाकून ह्यातलं थोडं थोडं तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. प्राजक्त, रातराणी, सोनटक्का, चाफा, मोगरा, बकुळी अशा नानाविध फूलांचे सुगंध तुम्हाला नॊस्टेल्जिक करत असतील किंवा देवगड हापूस तुम्हाला इथे अमेरिकेत कोरडे उसासे टाकायला लावत असेल तर भारतात हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना भरभरून आहे हे लक्षात असलं पाहिजे.

व्यावसायिक पातळीवर-
भारताच्या विकासाचा वेग अमेरिकेच्या विकासाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे. मान्य आहे भारतात भ्रष्टाचार आहे पण त्यामुळे अब्दुल कलाम आणि नारायण मुर्थी घडायचे थांबत नाहीत. भ्रष्टाचारामुळे, राजकारण्यांमुळे वेग कमी होत असेल पण जागतिक रेट्यामुळे, माहितीच्या स्त्रोतांमुळे बरेच फायदे होत आहेत. कोणी सांगावे. अशाच वेगात धावत राहिला तर भारत येत्या पंचवीस वर्षात अमेरिकेच्या आसपास येईलही, हे स्वप्नरंजन मुळीच नाही. शिवाय, भारत विकसनशील असल्याने आणि आपल्यासारख्यांनी विकसित देश म्हणजे काय हे अनुभवले असल्याने भारतात लघु उद्योगाच्या (विशेषत: आय टी क्षेत्रात) प्र चं ड संधी आहेत. एस एस एन सारखी सिस्टीम भारतातही येतेय. आर्थिक क्षेत्रातही सेबीने बरीच शिस्त आणलेय, आयसीआयसीआय डीरेक्ट सारखी पोर्टल्स व्यवस्थित काम करताहेत. लोकसंख्येचा बोजा भारतावर आहे हे मान्य पण हीच लोकसंख्या शिकतेय, ह्यात सुशिक्षित तरुणांचे प्रमाण वाढतेय आणि त्यांना संधी उत्पन्न करुन दिली तर खूप काही करता येईल (जे टाटा, अंबानीने केलं..). त्यामुळे परत गेल्यावर काय असा प्रश्न तूर्त तरी पडत नाही, थोडक्यात इथल्या अनुभवाला भारत बयापैकी न्याय देऊ शकेल असा विश्वास वाढतोय.
कामाच्या बाबतीत अमेरिकेतल्या लोकांना जरा जास्त सहानुभूती मिळतेय असं वाटतं. एन जे (जर्सी सिटी नव्हे) मधे राहून न्यू यॊर्कला अपडाऊन करणारे मित्र सकाळी सहाला जाणार ते रात्री आठ्ला घरी, अगदी कडाक्याच्या थंडीतही. याउलट पुण्यात बाईक वरुन मी १५ मिनिटात ऒफीसला जायचो. मला एवढच म्हणायचं की तुम्ही योग्य ठिकाणी असाल आणि तुमचा व्यावसायिक अनुभव पाठीशी असेल तर घराच्या जवळ किंवा वर्क फ्रॊम होम असा जॊब तुम्ही कुठेही मिळवू शकता नाहीतर कार पुलिंग सारखा उपाय आहेच. इथे अमेरिकेत आयबीएम मधे काम करताना आठवड्यातून चार दिवस क्लायंट कडे आणि एक दिवस घरुन काम अशी कन्स्ल्टींग जॊब मधे जबाबदारी पेलणारे पाहिलेत, त्यांच्या घरच्यांना खरच सलाम.

सामाजिक पातळीवर-
भारतातलं जीवनमान नक्की सुधारतय. प्रत्येक भारतवारीत ते प्रकर्षाने जाणवतय. आज इंटरेनेटवरुन पुण्याच्या जागेचं विजेचं बील मी भरू शकतोय. रस्ते, वाहतूक ह्या समस्या आहेत मान्य पण त्यांना कसं टाळायच हे तुमच्यावर आहे. मुंबईतल्या गर्दीला घाबरून तुम्ही मुंबईत गेलाच नाहीत तर तुम्हाला मुंबईची नशा कशी कळणार.. आणि गर्दी शिवाय मुंबई हा तुमचा हट्ट असेल तर ते शक्य नाही हे स्वीकारता यायला हवंच, कुरबूर करुन काहीच साध्य होणार नाही. एकंदर भारतातही सुविधा येत आहेत. वीज, पाणी अशा समस्या जरूर आहेत, लोकसंख्येचा बोजा आहे पण भारताने शिक्षणाबरोबर दिलेल्या इतर अनेक चांगल्या गोष्टीबरोबर ही कडू गोळीही गिळायला हवी ना. तिथेही माणसं राहात आहेत आपण नक्की ऎडजस्ट करू असा विश्वास आहे.

मग करायचं काय?
एक मात्र नक्की, भारतात जाणार असाल तर व्यवस्थित आर्थिक नियोजन करुनच (त्यात बॆंक बॆलन्स बरोबर योग्यवेळी घर घेणे आलेच) जायला हव असं मनापासून वाटतं. दुसरं म्हणजे तुम्ही योग्यवेळी निर्ण्य घेतला नाहीत किंवा तो लांबवणीवर टाकत राहिलात तर तुम्ही वेळेचा अपव्यय करण्याची शक्यता बळावते. जेथे तुम्हाला आयुष्यातील जास्त काळ राहायचे तिथे कौटुबिक जीवनास लवकर सुरुवात करणे (होमलोन, स्कूलिंग वगैरे च्या दृष्टीने) कधीही सयुक्तिक आहे. म्हणूनच मुलांना थोडे इथले आणि थोडे तिथले असे प्राथमिक शिक्शण द्यायला लागणार नाही ह्याचा जरूर विचार करायला हवा. अशावेळी मुलांना मित्रमैत्रिणी जोडणे, सोशल एक्सेप्टन्स ह्या पातळ्यांवर ताण सहन करायला लागण्याची शक्यता आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व ज्या काळात घडते त्याकाळात अस्थैर्यामुळे किंवा बदलांमुळे त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्ण अमिरेकेतले की पूर्ण भारतातले शिक्षण द्यायचे हा निर्णय मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत घेता आला तर केव्हाही उत्तमच अर्थात तुमचा ’पॊईंट ऒफ नो रीटर्न’ तुम्ही ठरवायचा.

परतीची वा न परतीची एका पेक्षा अधिक कारणं असू शकतात, ती किती सबळ आहेत हे ठरवता येण्यासाठी अशा चर्चेचा अंशत: तरी उपयोग होऊ शकेल असं वाटतं. तशी ती पुरेशी सबळ असतील तर घेतलेला निर्णय हा जाणीवपूर्वक असल्याने कुठलीही (इथे राहिलात तर इथे किंवा तिथे गेलात तर तिथे) एडजेस्टमेंट होऊ शकतेच. तर आपल्यापुरतं ती कारणं शोधणं आणि त्यांची सबळता ठरवणं महत्त्वाचं.

शुभं भवतु!

Sunday, November 29, 2009

कोण मेले? कुणासाठी? रक्त ओकून..

२६ नोव्हेंबर च्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला एक वर्ष झालं. अशा प्रसंगी हुतात्म्यांची आठवण काढायची आणि भरत आलेल्या जखमांवरच्या खपल्याही काढायच्या. होय! असं मुद्दाम म्हणतोय कारण एकूणच प्रशासन मुर्दाड झालय़ आणि लोकांचं आयुष्य इतकं वेगवान झालय की काळाचं औषध बेमालूम वठतं आणि लोक विसरतात, पचवतात आघात.

एका वर्षापूर्वी ह्याच ब्लॊगवर लिहीलेल्या उतायाची ही लिंक.. सरणार कधी रण..प्रभोsssssssss.

काय झालं एका वर्षात --
१. पाकिस्तानने अतिरेकी हे पाकिस्तानी आहेत हे आधी जाहीर नाकबूल केलं पण काही दिवसांनी ते तेथलेच आहेत हे कबूलही केलं. तोयबाच्या नेत्यांना अटक करण्याची नाटकं केली आणि मग सोडूनही दिलं. भारतीय राजकारणी आणि प्रशासन, अमेरिका आणि जगाला पुरावे देऊन आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन हातावर हात ठेवून गप्प राहिलं.
२. करकरेंचं बुलेटप्रूफ जॆकेट हरवलं म्हणून देशाच्या ग्रृहमंत्र्यांनी वीरपत्निची जाहीर माफी मागितली. ते जॆकेट निकृष्ट दर्जाचं होतं म्हणे! :(
३. कसाबचा खटला कोर्टात उभा करून त्याच्या सुरक्षेवर अत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्चे करावे लागलेत, आणि एकीकडे आपदग्रस्तांना पूर्ण मदत मिळू शकली नाही सरकारकडून. त्याचा खटला अजून किती दिवस चालेल प्रश्नचिन्हच आहे आणि एवढं करुन दयेचा अर्ज राष्ट्रपतींना करुन तो अफझल गुरू सारखी फाशी रद्द करवून घेतो की काय बघायचे, सगळाच पोरखेळ.
४. महाराष्ट्र पोलिसदलातले वाद चव्हाट्यावर आलेत आणि गफूर, रॊय, मारीया आणि वरिष्ठ पोलिस अधिकायांतली वादावादी जनतेपुढे उघड झाली. २६ नोव्हेंबरला दुसरा कसा बेजबाबदार वागला हे सांगण्याची सगळ्य़ांतच अहमहमिका लागलेय.
5. राम प्रधान समितीचा अहवाल नेमके काय सांगतो कळू शकेल काय? त्यात मांडलेल्या त्रुटी काय आहेत आणि त्या कश्या दुरूस्त केल्या गेल्या ह्याचे नि:पक्षपाती उत्तर मिळेल काय?
६. अतिरेक्यांचे मृतदेह रासायनिक प्रक्रीयेने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानने ते घेण्यास इन्कार केलाय आणि भारत सरकारही त्यांची विल्हेवाट लावण्यास उत्सुक दिसत नाही.
७. भारताच्या सागरी सीमा खरचं सुरक्षित आहेत काय याचे अजूनही ’होय’ असे ठाम उत्तर देता येत नाही. समुद्रमार्गे पूर्वी आलेले आरडीएक्स. अत्ता आलेले अतिरेकी आणि त्यानंतरही गस्त नौकांमधल्या त्रूटी, समन्वयाचा अभाव हीच त्याची मुख्य कारणे.
८. महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी कमांडॊंचे एक खास पथक तयार केले आहे, ही एक खरोखरच चांगली बाब. तसेच सरकारने काही अद्ययावत शस्त्रे खरेदी करुन पोलिस खाते अधिक शस्त्र सज्ज केले आहे.

पुढे काय? काही प्रश्न..
१. आजही माझ्यासारख्या एखाद्या सामान्य नागरीकास आपत्कालीन परिस्थितीत कसे तोंड द्यायचे, काय करायचे आणि काय करायचे नाही ह्याचे प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे का? असे उपक्रम राबवून सुजाण नागरिकांची फळी निर्माण करता येणे का शक्य नाही? सरकार नाही तर निदान एखादी सेवाभावी संस्था यात लक्ष घालु शकेल का?
२. मिडीया ही आज एक अतिशय संवेदनशील बाब झाली आहे आणि वेगवान माहिती स्त्रोतांमुळे ती अधिक जबाबदार असणे आवश्यक आहे. हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ८०% मोबाईल्स मधे दृक-श्राव्य रेकॊर्डींगची सुविधा असतेच. शिवाय एसेमेस मुळे बातम्या (खया किंवा खोट्या) भराभर पसरतात. एकूणच ह्या मोबाईल नेटवर्क्सवर ल्क्ष ठेवणे, अतिरेक्यांनी मोबाईल वापरले तसे कोणाला वापरता येऊ नयेत ह्याची अंमलबजावणी करणे आवश्यक नाही का? सरकारने ह्यासाठी काय पाऊले उचलली आहेत ते कळायलाच हवे.
३. वरच्याच मुद्द्याला अनुसरून पीत पत्रकारीते पासून लांब राहून आपला टी.आर.पी वाढावा म्हणून कुठल्याही थराला न जाता, लोकांच्या संवेदनशील भावनांना भडकवण्याचे साधन होऊ न देण्याची जबाबदारी हे सत्राशे साठ चॆनेल्स घेतील का? ते स्वत:च अशी एखादी आचारसंहीता तयार करतील का किंवा तसा त्यांच्यावर दबाव आणता येईल का?
४. दुर्दैवी रीत्या अशा किंवा दुसया कुठलाही प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडून झालाच तर भारत सरकारची भूमिका काय असेल? ते असेच गप्प राहाणार का? शिवाय, मुंबईतल्या जनतेच्या सुरक्षितेविषयी महाराष्ट्र सरकारची, भारत सरकारची नेमकी जबाबदारी विषद होईल काय, जेणे करुन एकमेकांकडे बोटे दाखवली जाणार नाहीत.
५. आपली गुप्तहेर यंत्रणा ह्या हल्ल्याची आधीच माहिती काढण्यात अपयशी ठरली, असे का झाले आणि ही जबाबदारी कोणाची हे कळू शकेल का, आणि पुन्हा असे कूचकाम गुप्तहेर यंत्रणेकदून होणार नाही याची हमी भारत सरकार देईल काय? तसेच ह्या यंत्रणेतील पोकळ्या भरण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरात काय केले ते कळू शकेल का?

एका वर्षानंतर मुंबईकरांच्या मनातली भीती अजूनही डोळ्यांत तशीच दिसतेय, सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येईल ह्याची खरच शाश्वती उरलेली नाही. प्रचंड वाढलेली गर्दी आणि सोयी सुविधा, प्रशासनावर त्यामुळे पडणारा ताण ह्यात सामान्य मुंबईकर पूर्वीसारखाच होरपळून निघतोय आणि अपरीहार्यपणे व अगतिकपणे (मुंबई स्पिरीट हे त्याचं गोंडस नाव) ट्रेनला लोंबकाळत खस्ता खातोच आहे, दुसरा इलाजच काय म्हणा.. !!

ह्यावेळी २६-नोव्हेंबरला रक्तदान शिबीरे आणि वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ह्या ब्लॊग मार्फत माझ्या भावनांना वाट देऊन माझीही श्रद्धांजली.

"पब्लिक मेमरी इज शॊर्ट" म्ह्णणणायांना तसेच येणाया पिढ्यांना हा हल्ला नेमका कसा होता त्याची दाहकता, विषण्णता कळत राहाण आवश्यक आहे. नाहीतर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचे विस्मरण जसे आमच्या पिढीला होतेय तसे कैक वर्षांनी ओंबाळे, साळसकर, कामटे, शिंदे विसरले जातील.. "कोण मेले कुणासाठी रक्त ओकून.." असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल.
म्हणूनच २६-नोव्हेंबर-०८ च्या थराराचे हे फोटो इथे देत आहे.

विशेष सूचना
ह्या फोटॊतील काही फोटॊ खूप्पच अंगावर येणारे, मन, बुद्धी आणि संवेदना बधीर करुन सोडणारे आहेत त्यामुळे ही खालची लिंक आपल्या जबाबदारी वर उघडावी.
२६-नोव्हें. २००८ चा थरार पहाण्यासाठी इथे क्लिक करा..

जय हिंद!

Sunday, November 22, 2009

मराठी बाणा..

बरेच दिवसांत खूप काही घडून गेलं आणि काळ एकदम पुढे गेल्यासारखं वाटलं, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरांवर सगळीकडेच. वेगात घटना घडत आहेत आणि त्या त्यावेळी मनात असलेलं बोलायचं, लिहायचं राहून जातय असं वाटू लागलं. थोडं लिहिलं किंबहुना लिहू म्हटलं तरी विचारांत सुसंगती येते (आल्यासारखी वाटते) शिवाय जाता जाता आपल्या मताची नुसती पिंक टाकण्यापेक्षा एखाद्या प्रश्नाचा, मुद्द्याचा अधिक सखोल विचार केला जातो. दुसरा मुद्दा म्हणजे माझ्या मनातले विचार इतरांपर्यंत पुन: पुन्हा पोहोचू शकतात त्याचं समाधान मिळतं ते वेगळच.

असो, तर मराठीच्या मुद्द्यावर मराठी मतांची व्यवस्थित फोडाफोडी करुन आघाडीचे सरकार सत्तेवर आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढच्या निवडणूकीपर्यंत सुखाने पादा पण नांदा म्हणून शुभेच्छा! मनसेने जी मुसुंडी मारलेय त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. उद्धव साहेबांनी कॊर्पोरेट कल्चर आणण्याचा प्रयत्न केला जरुर, पण निकाल पहाता त्यांच्या बयाचश्या खेळी चुक्या म्हणजे खूप्पच चुक्याच! सदा सरवणकराची वासलात लावून, काल पक्षात आलेल्या आदेश बांदेकरला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली आणि दोघेही (आदेशराव आणि शिवसेना) दादरसारख्या ठिकाणी तोंडावर आपटले, त्यातही सदा सरवणकर कॊग्रेसला जाऊन उमेदवारी मिळवता झाला (तेथल्या स्थानिक कॊग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्यायच तो!) आणि त्यात फायदा मात्र झाला मनसेचा. जय हो! एकूण निकाल पाहाता, मराठी मतदारला चुचकारण्यात राजसाहेबांना यश येतेय यात वाद नाही आणि मला व्यक्तिश: ह्याचा आनंदच वाटतो. निदान कोणीतरी मराठी बाणा (आठवा डोंबिवली फास्ट) दाखवतो आणि मी मराठी आहे असे अभिमानाने सांगतोय (मतांसाठी का होईना!), हे ही नसे थोडके. खरं सांगायचं म्हणजे, माझ्या लहानपणी पाहिलेली शिवसेना मला आज मनसेमध्ये दिसतेय आणि माझाच कुठलातरी इगो सुखावतोय. शिवसेनेची राज्यस्तरीय पक्ष म्हणून वाढ होत असताना भाजपासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाबरोबर युती असल्याने शिवसेनेची वैचारीक दमछाक आणि कोंडी होतेय. आजही ठाकरेंना सामन्यात अग्रेलेखातून आगपाखड करावी लागतेय, कारण शिवसेनेची अशी ठसठशीत भूमिकाच राहिलेली नाही. निवडणूकीतल्या पराभवानंतर सुद्धा बाळासाहेबांची उद्विग्नता, हतबलता, नैराश्य सामन्याच्या अग्रलेखांतून दिसले पण एक नेता म्हणून उद्धव साहेब पत्रकारांना सामोरे गेलेत, जबाबदरी स्विकारलेय असं चित्र कुठेच दिसलं नाही. तरुणांचा ओढा शिवसेनेकडे पूर्वी इतका राहिला नाही, एक तर राहूल गांधीनी कॊंग्रेसमध्ये युवा कॊंग्रेसच्या माध्यमातून सुशिक्षित तरूण उमेद्वार देऊन तरूण फळी उभारलेय त्यामुळे तरूण मुले तिथे तरी जात आहेत किंवा राजच्या आंदोलनातल्या ग्लॆमर मुळे मनसेकडे तरी. त्यामुळे शिवसेनेचे पुढे काय होणार हा प्रश्नही विषण्ण करतोच. बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिंणग्यांतून उभारलेली शिवसेना, जिने बरंच काही दिलय महाराष्ट्राला, मुंबईला आणि मराठी माणसाला तिचा भाऊबंदकीमुळे कडेलोट होत असेल तर त्याचं वाईट वाटतच. मनसे आणि शिवसेना एकत्र यावेत आणि बाळासाहेबांनी शिवसेनेचं सुकाणू आपणहून राजच्या हाती द्यावं असं गोड स्वप्न माझ्यासारख्या कित्येकांना पडत असावं पण बाळासाहेबांचा ह्याबतीत तरी धृतराष्ट्र झालाय असं दिसतं. मराठी माणसाचं दुर्दैव, दुसरं काय, मराठीच्या भल्यासाठी इतकं करू शकाल तुम्ही बाळासाहेब?

विधानसभेत मस्तवाल अबू आझमीला चोपला तेव्हा मनात कुठेतरी बरं वाटलंच. विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी असं व्हायला नको होतं असे नक्राश्रूही कित्येकांनी ढाळले, पण चोर देवळात लपल्याने साधू होत नाही त्याला प्रसंगी मंदिरात घुसून चोपावे लागते, त्यामुळे झाले ते बरेच झाले. त्या एकंदर प्रकरणाबाबत वृत्तपत्रांत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आलेल्या बातम्या वाचल्या आणि काही मूलभूत प्रश्न पडले त्यांची उत्तरे शोधायचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केलाय. मुळात मी संकुचित दृष्टीचा मुळ्ळीच नाही आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती, देश, भाषा ह्यांच्याशी माझं नातं वेगळं आहे, असायलाच हवं. त्यामुळे प्रांतियता, भाषा एका प्रतलात, चौकटीत जपायलाच हवी असं मला मनापासून वाटतं. तसच डावा हात श्रेष्ठ की ऊजवा अशा फालतू वादातही मला अर्थ वाटत नाही त्यामुळे हिंदी भाषा मोठी कि मराठी, भारत जवळचा कि महाराष्ट्र असे प्रश्नच मला अस्थानी वाटतात, दोघेही एकमेकांस पूरक आहेत एवढंच म्हणता येईल.
मी मराठी आहे म्हणजे माझ्यापुरतं नेमकं काय?
१. माझी मातृभाषा मराठी आहे. मी मराठी बोलू, वाचू आणि लिहू शकतो. मला मराठीतून विचार व्यक्त करायला आवडतात. मला मराठी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचायला आवडतात.
२. मी मराठी साहित्य वाचण्याचा आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी तुकाराम, रामदास, द्न्यानेश्वर, अत्रे, पुल, जीए, ग्रेस, पाडगावकर, कुसुमाग्रज, सावरकर तसेच इतर कैक मराठी साहित्यकांचा वारसा सांगतो.
३. मराठी रंगभूमी (व्यावसायिक तसेच प्रायोगिक) तसेच मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मला प्रेम आहे.
४. मी मराठी माणसाशी मराठीतूनच बोलतो.
५. मी शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. त्यांनी आम्हाला स्वाभिमान, धाडस, शौर्य दिले हे अभिमानाने सांगतो. शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित ही भाषा, धर्म, संस्कृती मला मिळालीही नसती ह्याची मला जाणीव आहे (न होता शिवराय, तो सुंता सबकी होती, असे कविवर्यांचे बोल आहेत!).
६. महाराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात दिलेल्या योगदानाचा मला अभिमान असून, टिळक, तात्याराव सावरकरांसारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वेचलेल्या आयुष्याची आणि भोगलेल्या कष्टांची मला जाणीव आहे.
७. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती, ती कशी आणि का झाली ह्याची माहिती मी घेतली आहे शिवाय माझ्या बरोबरीच्या तसेच पुढील पिढीपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे (ह्यावेळच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात केदार जोशी यांनी ह्यासंबधी विस्तृत लेख लिहिला आहे.) मुंबई ही महाराष्ट्रात राहावी आणि ती मराठी भाषिकांची व्हावी म्हणून ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडले त्यांसाठी मी सदैव कृतद्न्य आहे. आज केवळ त्यांच्यामुळेच मी माझ्या महाराष्ट्राचा वारसा सांगू शकतो.
८. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नविन वर्ष सुरू होत असून गणपती, गोविंदा, दसरा, दिवाळी असे मराठी मनाच्या जवळचे सण मी उत्साहाने साजरे करतो.
९. महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर आणि वनसंपत्तीवर माझा जीव आहे.महाराष्ट्रात राहाणाया मग तो कुठूनही येवो, प्रत्येकाने इथल्या मातीवर, भाषेवर आणि संस्कृतीवर भरभरून प्रेम करावे, इथे समरसून जावे असे मला मनापासून वाटते.
१०. पुरणपोळी, कांद्याचे थालिपीठ, झुणका भाकर, भरले वांगे असे अस्सल मराठी पदार्थ मला मनापासून आवडतात.
११. महाराष्ट्र राज्यापुढचे प्रश्न तसेच बेळगाव सीमा प्रश्न ह्याबद्दल मी जागरुकतेने माहिती करुन घेतो. तसेच महाराष्ट्रात काम करणाया विविध सामाजिक संस्था, त्यांची कामे आणि समाजसेवक (गाडगेबाबा, फुले, आमटे, लहाने, बावीस्कर इ.) ह्यांविषयी मी सदैव कृतद्न्य आहे.
१२. भारतीय स्तरावर किंवा इतर राज्यातील मित्रांशी बोलताना मी महाराष्ट्राची बाजू मांडतो. मेहनती, स्वयंसिद्ध, हुशार, प्रामाणिक, शूर, पापभिरू, साहित्यप्रेमी अशी मराठी माणसाची प्रतिमा मी इतरांपुढे मांडतो. मराठा रेजिमेंट आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल अभिमानाने सांगतो. आत्ममग्न, कूपमंडूक, एकीचा अभाव, भाऊबंदकी, व्यापार तसेच खूप पैसे कमाण्याविषयी अनास्था असे मराठी माणसाचे दुर्गुणही मी मान्य करतो :)

मुख्य म्हणजे माझी मातृभाषा मराठी असणं आणि मी महाराष्ट्रीय असणं हे मी भारतीय असण्याच्या कुठेही आड येत नाही. जसे की मी एकाचवेळी कोणाचा तरी नवरा आहे, मुलगा आहे, भाऊ आहे आणि बापही. त्यांच्याशी माझी नाती ही परस्परपूरक राहातील अशी ठेवणे मला महत्त्वाचे. तसच भाषेचं. घटनेने आपल्याला भाषावार प्रांतरचना दिली आहे. घटनात्मक लढा देऊन मुंबई महाराष्ट्राने मिळवली आहे. मुंबईचं मराठीपण टिकवण्याची जबाबदारी आपली. हिंदीचा, इंग्रजीचा दुस्वास न करताही मराठी आपली आहे. मुंबई ही सगळ्या भारतियांचीही नक्कीच आहे, पण इथे येऊन दादागिरी करणाया उपयांची नक्कीच नाही. ती महाराष्ट्राची आहे आणि तिची अधिकृत भाषा मराठी आहे हे मान्य करा आणि मग इथे राहा. मराठी माणूस सहिष्णु आहे ह्याचा अर्थ तो षंढ आहे असा काढू नका. चवताळून उठला तर मदांध तख्त फोडण्याचे सामर्थ्य मराठी भाषेत तसेच माणसांत नक्कीच आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने ते सप्रमाण सिद्ध केलय. दुर्दैवाचा भाग असा की, पूर्वापार महाराष्ट्राला दुही ने स्वकीयांचा जेवढा त्रास झालाय तितका त्रास इतर राज्यांना झाला नसावा. अबू आझमी सारखा उपरा मराठी अस्मितेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत करतो आणि मनसे सोडली तर इतर मराठी भाषिक आमदार गप्प राहातात साधा निषेध सुद्धा करत नाहीत हे मराठीचेच दुर्दैव, मला खरच त्या सगळ्या आमदारांची लाज वाटते.. आज अत्रे असायला हवे होते, मराठात एक सणसणीत अग्रलेख वाचायला मिळाला असता असं वाटल्यावाचून राहावत नाही. स्वत:ला छत्रपती म्हणवून ताठ मानेने उभे राहाणारे शिवराय एकच, बाकी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असं आपण म्हटलं तरी बयाच मराठी सरदारांनी दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्यातच समाधान मानलं आणि त्यांची गादी पुढे ह्या महाराष्ट्रातल्या कॊंग्रेजी नेत्यांनी चालवली, यशवंतराव, शंकररावांपासून अगदी अंतुले, देशमुख, अशोकरावांपर्यंत. इतकेच काय जेव्हा वरळीच्या पूलाचे उद्घाटन झाले तेव्हा शरद पवारांनी पूलास राजीव गांधींचे नाव द्यावे असे भाषणात सांगून सोनियाजींना खूष करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या सागरी सेतूवर टांगला. ह्याच साठी राष्ट्रवादीची स्थापना झाली होती का हा प्रश्न त्यांना कोण विचारणार? मराठी माणूस कितीही कर्तुत्ववान म्हटला तरी असा दिल्लीपुढे नतमस्तक होण्यात धन्यता मानतो हेच महाराष्ट्रचं दुर्दैव.

तर यातून पुढे काय? राजसाहेबांनी सुरुवात तर चांगली केलेय. त्यांचे ४ आमदार गेले पण त्यांनी बरच काही कमवलय. पुढच्या निवडणूकांत ह्याचा मनसेला फायदा नक्की होणार. बसेस जाळणे, तोडफोड असले प्रकार थांबवून काही विधेयक कामे राजसाहेब करतात का हे पहायचे. सचिनला मुद्दाम अस्थायी प्रश्न विचारून हिंदी माध्यमांनी पुन्हा एकदा मराठी माणूस फोडायचा प्रयत्न केलाय आणि सचिनच्या वक्तव्यावर टीका करून बाळासाहेबांनी पुन्हा आफत ओढवून घेतलेय.(आठवा पूर्वी महाराष्ट्रभूषण पु. लं वर बाळासाहेबांनी अशीच आगपाखड करुन मराठी मनाला नख लावलं होतं), तर उद्धवसाहेब गप्प! (सेनेचे असं सगळंच चुकत चाल्लय का?) सगळ्यात म्हणजे मराठी माणूस फक्त प्रांतिक आणि संकुचित विचार करतो असं गरळ ओकून हिंदी मिडीया धूळफेक करू पाहात आहे. राष्ट्रीयत्वाचा हिरीरेने पुरस्कार करणाया आणि त्यासाठी सर्वस्वाची होळी करणाया टिळक, आगरकर, फडके, सावरकर ह्यापासून अगदी कामटे, ओंबाळे, करकरे आणि साळसकर सगळ्यांच्याच कर्तव्यदक्षतेचा, राष्ट्रभक्तीचा हा अपमान आहे. ह्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवं. ह्यासाठी मी काय करू शकतो --
१. मराठी बाणा आणि राष्ट्रभक्ती ह्या परस्पर पूरक गोष्टी आहेत हे ठणकावून सांगायला हवं.
२. मुंबईत काम करणाया परप्रांतियांना सामावून घेताना ते इथल्या संस्कृतीत सामावले जातील हे बघायला हवं. घटनेने दिलेले स्थानिकांचे हक्क डावलून बाहेरून आलेल्यांचे फाजील लाड होणार नाहीत हे पहायला हवं
३. स्थानिकांना कामात, नोकयांत प्राधान्य मिळेल (उदा. स्थानियलोकाधिकार समिती) ह्याचा पाठपुरावा करायला हवा
४. पुढची पिढी जागतिक स्पर्धेसाठी तयार करताना (इंग्रजी माध्यमात शिकण्यात काहीच गैर नाही, उलट आवश्यकच आहे) त्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीची ओळख आणि आवड राहील ह्याची जबाबदारी घ्यायला हवी.
अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे पण मराठीच्या मुद्द्यावरुन सजग राहाण हे तूर्त महत्त्वाचं.
जय हिंद! जय महाराष्ट्र! (होय, महाराष्टाच्या जयजयकारा आधी भारताचा जयजयकार होतोच नेहमी, त्यामुळे मराठ्यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेण्याची गरज नाही!)

Sunday, September 20, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ५ (अंतिम भाग)

दिवस सातवा (एमट्रॆक - ऒकलंड ते लॊस एंजिल्स)
ह्या पश्चिम किनायावरच्या प्रवासाचे नियोजन करताना, सॆन फ्रान्सिस्कोमधून खाली लॊस एंजिल्स मधे कसे यायचे याबाबत बरेच पर्याय होते. गाडी भाड्याने घेऊन सुकोया नॆशनल पार्क मधे जायचे, तिथे एक रात्र थांबून लॊस एंजिल्स मधे पोहोचायचे असाही विचार होता. पण सरतेशेवटी ऎमट्रॆक ह्या रेल्वेने येण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो किती योग्य होता हे लग्गेच जाणवलं.
सकाळी लवकर उठून आम्ही फोस्टर सिटीवरून पुन्हा सॆन फ्रान्सिस्कोच्या डाऊनटाऊन मध्ये गेलो. टॆक्सी करून पिअर २ वर एमट्रॆकच्या प्रवेशद्वारी पोहोचलो. हवेत छान गारवा होता, तिथेच कॊफी घेऊन सकाळी जॊगिंग ट्रॆक वर धावणारी माणसे, आसपासच्या शहरातून फेरीने(बोटीने) डाऊनटाऊनला कामासाठी रोज येणाया माणसांची लगबग, जगप्रसिद्ध ऒकलंड पूलावरून अव्याहत सुरू असणारी वाहनांची रहदारी बघत अर्धा तास पटकन गेला. आम्हाला घेऊन ऒकलंड स्थानकावर जाणारी बस आली आणि आम्ही तिथेच बॆग चेक इन करून बस मध्ये बसलो. त्याच भल्या मोठ्या ऒकलंड ब्रिजवरून आमची बस गेली आणि ह्या पुलावरुन प्रवास करण्याचा काही मिनिटे का होईना आनंद लुटता आला. ऒकलंड रेल्वे स्थानकावर फार थांबायला लागलं नाही, पंधरा वीस मिनिटांत गाडी आली. यापूर्वी एमट्रॆकने प्रवास करण्याचा योग आला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. आम्ही ट्रेनमध्ये स्वतंत्र खोली आरक्षित केली होती त्यामधेच सकाळची न्याहारी, डेकवर दोन्ही वेळचे जेवण अंतर्भूत होते. गाडी सुटली तेव्हा लगेचच ब्रेकफास्टची वेळ झाली होती आणि गाडीतल्या डेकवर जाऊन आम्ही कॊफी फळे घेऊन ब्रेकफास्ट केला.
थोडं ह्या ट्रेनविषयी. अमेरिकेतला सगळ्यात निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेला असा हा रेल्वे रुट. वॊशिंग्टन स्टेटमधल्या सिऎटल मध्ये सुरु होऊन ही ट्रेन ऒरेगॊन राज्य ओलांडून कॆलिफॊर्नियात येते आणि खाली सॆन डिएगो पर्यंत जाते. साधारण ३५ तासांचा एकूण प्रवास. वाटेत कॆलिफॊर्नियातल्या सॆक्रोमेंटो, ओकलंड (जिथे आम्ही चढलो), सॆन होझे, सॆंटा बार्बरा, लॊस एंजिल्स (जिथे आम्ही उतरलो) ते सॆन डियॆगो अशा अनेक निसर्गसंपन्न ठिकाणांना जोडत,कधी पॆसिफीक समुद्राला खेटून तर कधी हिरव्यागार शेतांमधून ही ट्रेन जाते.
रेल्वेच्या मधल्या एका बोगीत सगळ्याच लोकांना केवळ निसर्गसौंदर्य न्याहाळता यावं म्हणून काचेच्या मोठ्या खिडक्यांची सोय केली होती. आमची आरक्षित बसायची जागा म्हणजे छोटेखानी रुमच. त्यातच दोन मोठ्या काचांची खिडकी, जेणेकरुन तेथेच बसून बाहेरील निसर्गाचा आस्वाद घेता येईल अशी सोय केली असल्याने आम्हाला जागा रिकामी होण्याची वाट बघायची गरज नव्हती. मस्त हातपाय पसरुन गप्पा मारत आम्ही प्रशांत महासागराचा पसारा, लाटांची खळखळ अनुभवत होतो आणि ते ही तासंन तास. आपण जेव्हा कुठेही समुद्रकिनारी जातो तेव्हा ते समुद्रकिनारे माणसांनी जाऊन जाऊन थोडेफार का होईना पूर्ण नैसर्गिक स्वरुपात दिसू शकत नाही, त्यांच्या काठचं वन्यजीवन पण आपल्याला दिसतं ते फक्त डिस्कव्हरीवरच. पण ह्या प्रवासात असे कितीतरी किनारे जिथे जायचे रस्ते आणि वाटाच नाही ते जस्सेच्या तसे त्यांच्या रांगड्या स्वरुपात गाडीत बसून बघता आले. पश्चिम किनारपट्टी असल्याने एक सुंदर सूर्यास्त बघता आला. गाडीत लॆपटॊपवर जुनी गाणी ऐकत मधेच पु ल/ व पु ऐकत(खोलीत इलेक्ट्रीसिटीची सोय होती) आणि बाहेरचं विश्व बघत दिवसभराचा प्रवास कसा संपला कळलं नाही. सरु नये ही वाट असं सारखं वाटत होतं, विशेषत: सॆंटा बार्बरा येथले बीचेस बघताना, विस्तीर्ण शेते बघताना. निसर्गाने किती मुक्त हस्ते उधळण केलेय आणि मुख्य म्हणजे माणसाने सुनियोजनाने निसर्गाचं देणं कसं छान जपलय, वाढवलय हे जवळून बघता आलं. मनात आलं, कोकणातली आपली जमिन, हवामानही असंच, मग आपल्यालाही जमेल का इतकं सुजलां सुफलां करायला कोकणाला. कोकणच कॆलिफॊर्निया करायचा म्हणजे नेमकं काय हे तेव्हा लक्षात आलं! रात्री नऊच्या दरम्यान आम्ही लॊस एंजिल्सला पोहोचलो आणि मुक्कामी गेलो.

दिवस आठवा (लोस एंजिल्स हॊलीवूड, बेव्हरली हिल्स)
लॊस एंजिल्सचं हॊलीवूड बघायला आम्ही सकाळीच बाहेर पडलो. कॊडॆक थिएटर जिथे ऒस्कर ऎवॊर्ड होतात तिथे पोहोचलो तर बाहेर रस्त्यावर बाजूच्या चायनीज थिएटरबाहेर वेगवेगळ्या वेषभूषेत कलाकार, खूप सारे प्रवासी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून (पैसे देऊन) घेण्याची झुंबड. तेथे फूटपाथ वरच्या लाद्यांवर हॊलीवूडच्या कित्येक कलाकारांचे ठसे असलेल्या चांदण्या कोरल्या आहेत. तेथूनच आम्ही स्टारलाईनची ऒपन टॊप सिटी टूर बस पकडली
आणि हॊलीवूड्ची फेरी मारली. चायनिस थिएटर्वरून निघून गिटार सेंटर, द कॊमेडी स्टोर, बेव्हरली हिल्स, सॆंटा मोनिका, फार्मर्स मार्केट, सी बी एस, सायलंट मूव्ही थिएटर, पॆरामाऊंट पिक्चर्स स्टुडिओ आणि ती जगप्रसिद्ध हॊलीवूड असं मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेली डोंगरावरची खूण असं बघत शेवटी कोडॆक थिएटरपाशी उतरलो. वाटेत बसमध्ये आम्हाला लॊस एंजिल्स शहर, तिथे राहाणारी माणसे, हॊलीवूड व्यवसाय, नटनट्यांची आवडती रेस्टॊरंट्स, एखाद्या नशीब अजमवायला इथे आल्याने सामान्य कलाकाराने घेतलेली असामान्य झेप, त्यांचे अनुभव आणि एकंदर हॊलीवूडचा, इथल्या श्रीमंतीचा कॆलिफॊर्निया राज्यावर आणि पर्यायाने अमेरिकेवर असलेला ठसा तसेच प्रभाव ह्यांची सुंदर ओळख करुन दिली. थोडावेळ कोडॆक थिएटरमध्ये फिरून आम्ही पुन्हा मुक्कामी परतलो. संध्याकाळी मित्रांबरोबर फिरुन दुसया दिवशीच्या सॆन डिऎगोच्या तयारीस लागलो.

दिवस नववा (सॆन डिऎगो)
सकाळी गाडी भाड्याने घेऊन आम्ही लॊस एंजिल्सवरून सॆन डिएगोला निघालो. इथल्या रस्त्यांविषयी, बंपर टू बंपर वाहतूकी विषयी आणि तिच्या वेगाविषयी बरंच ऐकलं होतं. तो थरार, हो थरारच म्हणायला हवा, अनुभवता आला. सहा ते आठ पदरी रस्ते क्षणात बदलाव्या लागणाया लेन्स आणि डाव्या, उजव्या कुठल्याही बाजूने पुढे जाऊ पहाणाया उधाण गाड्या सगळं थोडं नवं होतं पण लवकरच त्याचा सराव झाला आणि सुसाट वेगाने सॆन डिएगो झू पाशी येऊन पोहोचलो. लॊंग विकेंड असल्याने गर्दीही खूप होती. आम्ही पोहोचेपर्यंत पार्क सुरु झाले होते आणि नेहमीचे पार्किंग संपले होते पण सुदैवाने जवळच जास्तीच्या पार्किंगची सोय केली होती. गंमतीची गोष्ट म्हणजे तेथेच बाजूला आम्हाला ’उपास’ स्ट्रीट दिसला :-)

सॆन डिएगो वाइल्ड लाईफ आणि झू ह्या पैकी एकच बघणे शक्य असल्याने आम्ही झू बघणे पसंत केले. ह्यापूर्वी ओमाहाचा आणि डॆलस मधला झू पाहिला असल्याने तसं विशेष नाविन्य नव्हतं तरीही पोलार बेअर, सिंह, वाघ, पांण्डा अगदी जवळून बघता आले. दिवसभर तेथे फिरून संध्याकाळी त्याच वेगवान बाहतूकीमधून आम्ही लॊस एंजिल्सला आर्टॆशियावर पोहोचलो. तेथे भारतीय हॊटेलात स्नॆक्स आणि मग जेवण करून आम्ही रात्री मुक्कामी पोहोचलो.

दिवस दहावा (कोलंबिया परत..)
सकाळीच आम्ही लॊस एंजिल्स विमानतळावर पोहोचलो. पश्चिम किनायावरून पूर्व किनायावर यायचं म्हणजे वेळेचा फरक भरून काढता प्रवासास खूप वेळ लागतो. संध्याकाळपर्यंत कोलंबियात पोहोचून नविन आठवड्यासाठी सज्ज झालो. ह्या पश्चिम किनायावरच्या प्रवासाच्या सुरम्य आठवणीं मात्र कायम स्मरणात राहतील.

- समाप्त

Sunday, August 9, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ४


दिवस सहावा (सॆनफ्रान्सिस्को डाऊनटाऊन, पिअर ३९, मूर वूड्स, ससॆलिटो, गोल्डन गेट ब्रिज)
सकाळी थोडं लवकर उठून आम्ही फोस्टर सिटीवरुन सॆनफ्रान्सिस्को डाऊनटाऊन मधे जाणारी बस पकडली. पूर्व किनायावरच्या न्यूयॊर्कला तोडीस तोड असं हे पश्चिम किनायावरच सॆनफ्रासिस्को. बरचं वाचलं आणि ऐकलं होतं ह्या शहराबद्दल. दोघांचा मुंबईचा पिंड असल्याने अशा शहरांच्या डाऊनटाऊन मध्ये बिझनेस डे मध्ये फिरण्याची ईच्छा आणि उत्सुकता आम्हाला नेहमीच असते. साधारण पाऊण तास प्रवास करून आम्ही डाऊनटाऊन मध्ये पोहोचलो. आमच्या बरोबरचे सगळेच जण फोस्टर सिटी मध्ये राहून रोज सॆन फ्रान्सिस्कोमध्ये कामासाठी अपडाऊन करणारे चाकरमानी असल्याच दिसून आलं. उतरल्यावर पहिलं काही जाणवलं असेल तर चढ उतार असलेले रस्ते. इतके की त्यावर सलग चालण कठीण व्हावं. आम्ही सिटी टूरच्या ऒफीस पर्यंत टॆक्सी केली आणि बरोबर ९ च्या दरम्यान आमची मिनी बस गोल्डन गेट च्या व्हिस्टा पॊईंटच्या दिशेने निघाली. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हलकीशी थंडी अशी सुंदर हवा पसरली होती.


व्हिस्टा पॊईंटवर पंधरा मिनिटं थांबून आम्ही तो प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पाहिला, वेगवेगळ्या कोनातून त्याचे फोटो घेतले. सोन्याच्या शोधार्थ जेव्हा धंदेवाईक लोकं आणि खाण कामगार, कॆलिफोर्नियामध्ये आले तेव्हा फेरीचा म्हणजे बोटींचा वापर बंदरात ये-जा करण्यासाठी होत असे. कडाक्याची थंडी, खाया पाण्याच्या प्रवाहाचा, वायाचा तसेच लाटांचा प्रचंड जोर, मिलीटरीचा सुरक्षिततेच्या कारणाने विरोध, त्यातच आलेली सगळ्यात मोठी आर्थिक मंदी ह्यांना तोंड देत १९३२ ते १९३७ दरम्यान हा ब्रिज बांधला गेला. त्याचा रंग कोणता ठेवायचा ह्याविषयी सुद्धा खूप वाद झाले आणि शेवटी आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला लाल रंग ठरवण्यात आला. अनेकानेक चित्रकारांना, छायाचित्रकारांना आणि सिनेमावाल्यांना खुणावया ह्या गोल्डन गेट ची नजाकत, अदा नजरेत साठवत आम्ही मूर वूड्स च्या दिशेने निघालो.



साधारण अर्धा तास वळवळण्याच्या घाटातून जात आम्ही मूर वूड्स मध्ये पोहोचलो. प्रसिद्ध पर्यावरणवादी जॊन मूर ह्याच्या स्मृती प्रित्यर्थ ह्या संरक्षित जंगलांना मूर वूड्स नाव देण्यात आले. १९०८ मध्ये तत्कालिन अध्यक्ष रुझवेल्ट ह्यांनी जुनी जंगले जपण्यासंबंधिचा कायदा करुन आणि मूर वूड्स ना राष्ट्रीय मालमत्ता जाहीर करून अधिकृत संरक्षण दिले. आज कोस्टल रेडवूड्स बघण्याचे मूर वूड्स हे एकमेव ठिकाण उरले आहे. अतिशय जाणीवपूर्वक नवनवीन तंत्रद्न्यानाचा वापर करून ह्या जंगलांची काळजी घेतली गेली आहे. आत शिरल्यावर सुमारे दीड तास गर्द जंगलातून रेड वूड्स झाडे, वेगवेगळे पक्षी, ढोली, ओहोळ बघत आम्ही भटकत होतो.


तिथून परतून आम्ही मिनी व्हॆनमधून सॊसेलिटॊ ह्या छोटेखानी समुद्र किनायावरच्या आखीव रेखीव शहरात आलो. समोर पसरलेला शांत समुद्र, बंदराला उभी असलेली गलबत, लाटांचा खळाळता बारीकसा आवाज अतिशय प्रसन्न वातावरण. आपलं वेगळेपण ह्या ठिकाणाने जपलेलं लग्गेच जाणवत. खास सी फूडसाठी जमलेली खव्वयांची गर्दि, एखाद्या पर्यटन स्थळी असावं असं उत्सवी वातावरण आणि रस्त्याने निवांत फिरत विंडो शॊपिंग करणारी माणसं, भान हरपून जातं बघताना. ह्या शहराच्या परिसरात कुठल्याही वॊलमार्ट, केमार्ट, मॆक डी, स्टार बक्स सारख्या ब्रॆंडेड आणि साखळी दुकानांना, हॊटेलांना परवानगी नाही. जे काही असेल ते छोटेखानी स्थानिक दुकान. तिथेच साधारण अर्धा तास फिरून आम्ही पिअर ३९ वर नेणारी ओपन रुफ बस पकडली. येताना बसमध्ये सॊसेलिटो शहराची तसेच सॆनफ्रान्सिस्कोची बरीच माहिती मिळाली. ’पर्सूट ऒफ हॆप्पीनेस’ ह्या सिनेमामधून ह्या शहराची पूर्वी ओळख झाली होतीच. गेली तीन शतक लोकांना आकर्षित करणाया, कामाची कधीही कमी नसलेल्या ह्या शहराबद्दल, तिथली म्युझियम्स, संशोधन केंद्रे तसेच शहरावर असलेली आर्थिक उलाढालींची जबाबदारी, वाढणारी लोकसंख्या त्यातून निर्माण होत असलेल्या समस्या सगळ्यांच उहापोह त्या थोड्यावेळात बसमधील समालोचकाने केला. थोड्याच वेळात आमची बस गोल्डन गेट ब्रिजवर आली आणि घोंघावणारा वारा कापत गोल्डन गेट ब्रिजवरून जातानाचा आनंद उपभोगता आला.



तेथूनच समुद्रात दिसणारं अल्कार्टाझ चं बेटही आम्ही पाहिलं, कैद्यांना डांबण्याचं हे ठिकाण. इथून अत्तापर्यंत झालेले कैद्यांचे पलायनाचे कित्येक प्रयत्न फसले आहेत त्ते ह्याच्या भौगोलिक स्थानामुळे. कडाक्याची थंडी आणि बर्फासारखे थंड पाणी पोहून बेटापासून समुद्र किनारी येणे अगदी उन्हाळ्यात सुद्धा अशक्य , थंडीत आणि धुक्यात तर शक्यच नाही.


पिअर ३९ जवळ आम्ही बस मधून उतरलो आणि चालत समुद्र किनायावर फिरू लागलो. पर्यटकांनी सदाबहार असा हा परिसर. सॆन फ्रान्सिस्को शहरात येणारा प्रत्येक जण इथे येतोच येतो. समुद्रकिनार्यालगतच्या हॊटेलांमध्ये सी फूड खाणायांची तर चंगळच पण उत्तम प्रतिची कॊफी तसेच आईस्क्रीमही येते मिळते. प्रत्यक्ष पिअर ३९ वर इकडून तिकडे रमत गमत जाणारी माणसे, मुले, जोडपी, जथ्थे सगळे कसे निवांत सुट्टी उपभोगायच्या मूड मध्ये. बाजूला एखादा रस्त्यावर स्टॊल लावून सूर आळवतोय, बॆंड वाजवतोय आपल्या सिडीज विकतोय तर कुठे फ्ळवाले थेट शेतातून आणलेली फ्ळे विकत आहेत, काही जण फोटोच्या नेमक्या जागा शोधत क्षण कॆमेयात पकडत आहेत तर काही नुसते उडते समुद्रपक्षी पहात उभे आहेत असं निर्मळ आणि निवांत दृश्य. हवेत खारेपणा थोडासा पण थंडावाही त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. तिथेच थोडं खाऊन आम्हीही थोडं विंडो शॊपिंग केलं, पिअर ३९ चा तो प्रसिद्ध, शिंपल्यातला मोती उघडून विकत घेतला. अजून एक चांगलं ठिकाण बघायला मिळालं ह्याच्या आनंदात बस पकडून आम्ही फॊस्टर सिटी गाठली.


दिवस सातवा (सॆन होजे, अल कमिनो रीअल, कारामेल बीच, १७ माईल्स ड्राईव्ह)
आज सकाळी थोडं निवांत उठून आम्ही सॆंताक्रूझ बीच च्या दिशेने निघालो. फॊस्टर सिटीवरुन इथे जाताना बे एरियातून जावयाचे असल्याने गूगल, सिस्को, एप्पल, इ बे अशा मोठमोठ्या कंपन्यांच्या हेड क्वार्टर्स असलेल्या सॆन ओझे मधून जावयाचे असल्याने ट्रॆफीक टाळण्यासाठी आम्ही थोडे उशिरानेच निघणे पसंद केले. साधारण दीड दोन तास प्रवास करून आम्ही १७ माईल्स ड्राईव्ह पाशी पोहोचलो. १७ मैलांचा हा ड्राईव्ह कॆलिफॊर्नियातला सगळ्यात विहंगम दृश्य असलेल्या रस्त्यांमध्ये गणला जातो. पाच ठिकाणांवरुन ह्या दोन लेनच्या १७ मैलांच्या रस्त्याला प्रवेश ठेवला आहे. ह्या ड्राईव्ह वर पोहोचतानाच गेट वर पूर्ण ड्राईव्हचा एक मॆप दिला जातो. त्यावर प्रत्येक पॊईटची सविस्तर माहिती लिहीलेली असते. एखाद्या अद्न्यात बेटावर साईन्स शोधत तुम्ही ड्राइव्ह करतानाची मजा इथे अनुभवायला मिळते. पूर्ण रूटवर २० स्टॊप्स असून प्रत्येक ठिकाणी रस्त्यालगतच्या पार्किंगची सोय आहे. इथला सूर्यास्त उत्तम आहेच पण प्रत्येक पॊईंटवरून दिसणारं निसर्ग सौंदर्य केवळ अप्रतिम आहे. मधेच डॊंगराला वळसा तर मधेच सळाळता समुद्र असं बघत बघत एकेक पॊईंट आपण पुढे सरकतो. मुख्य म्हणजे इथली टिपलेली दृश्ये तुम्ही कुठेही व्यावसायिक लाभासाठी वापरु शकत नाही. हा १७ मैलांचा पूर्ण रस्ता आणि आजूबाजूचा परिसर पेबल बीच ह्या कंपनीच्या मालकीचा असून आपण इथे फक्त गेस्ट म्हणून बघायला येतोय असं आधीच प्रवेशद्वाराजवळ फोर्ममध्ये भरून घेतलं जातं. लोन सायप्रस हे ह्या ड्राईव्हवरचं ठिकाण कॆलिफॊर्नियातल्या आघाडीच्या रोमॆंटीक ठिकाणांपैकी एक. शेफर्डस नॊल, पोईंट जो, बर्ड रॊक, फॆनशेल ओव्हरलुक, द घोस्ट ट्री, रेस्ट्लेस सी हे ह्या ड्राईव्हरचे काही ठळक पॊईंट्स. आम्ही जवळ जवळ प्रत्येक पॊईंटवर उतरून निसर्गसौंदर्याचा डॊळे भरून आणि मनसोक्त आस्वाद घेतला. एक दोन ठिकाणी तर समुद्रकिनायावरच्या खडकांत पाण्यात पाय बुडवून फेसाळत्या लाटा पायावर झेलल्या तेव्हा बॆंड्स्टॆंडची आठवण आल्यावाचून राहिली नाही, फरक इतकाच की समुद्र अतिशय स्वच्छ, आजूबाजूला झाडी आणि थोडीशी वाळू, कुठल्याही प्रकारचा कचरा नाही आणि निरव शांतता. अगदी कुणी म्हणजे कुणी माणूस नाही त्यामुळ लाटांची आणि झाडाच्या पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. जवळ जवळ दोन तास फिरून आणि ड्राईव्हचा आनंद लुटून आम्ही कारामेल बीच च्या एक्झिट ने बाहेर पडलो.


मे महिन्यातली भर दुपार असली तरी हवेत बराच गारवा होता. बीच वर गर्दी अशी नव्हतीच. पाणीही तसे थंडच असल्याने आत जाण्याचा प्रश्नच नव्हता. थोडावेळ बीच वर फिरून आम्ही सॆन ओझे मधे जाण्यासाठी परतीच्या प्रवासाला लागलो. दोन तास ड्राईव्ह करुन आम्ही सॆन ओझे मधे माझ्या आवडत्या कोमला विलास मध्ये खाऊन, अलकमिनो रीअल वर थोडं फिरून (येथेच आम्हाला पी एन गाडगीळांचे सोन्या चांदीच्या दागिन्याचे दुकानही दिसले) फॊस्टर सिटी मध्ये परतलो.

- क्रमश:

Saturday, July 11, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 3

दिवस चौथा (ग्रॆंड कॆनियन / लास व्हेगास)
जगातल्या सात निसर्गनिर्मित आश्चर्यांपैकी एक - ग्रॆंड कॆनियन.


साऊथ रीम की वेस्ट रीम?
एका दिवसात ग्रॆंड कॆनियन पहाणायांना पडणारा हा नेहमीचा प्रश्न. काय बघावं साऊथ रीम की वेस्ट? खूप शोधाशोध केली इंटरनेटवर, मित्रमैत्रिणींकडे आणि मग आम्ही वेस्ट रीम निश्चित केलं. ह्यामागची आमची कारणं अशी -
१. तुम्हाला ट्रेक करत खाली ग्रॆंड कॆनियन मध्ये उतरायचं असेल तर साऊथ रीम केव्हाही उत्तम. ह्या ट्रेकला एक दिवसाहून अधिक कालावधी लागतो आणि तुमची खाली दरीत उतरण्याची आणि मग वर चढण्याची चांगलीच तयारी असावी लागते. आमच्या कडे काही तास असल्याने साऊथ रीम मधून खाली उतरणे शक्यच नव्हते. हॆलिकॊप्टरने खाली उतरायची सोय साऊथ रीम मध्ये नव्हती.
२. ग्रॆंड कॆनियन बघायचा, त्याची भव्यता आणि दिव्यता पहायची तर लांबून बघून समाधान होणं शक्यच नव्हतं. इतक्या लांब आलो आहोत ते केवळ अमाप नैसर्गिक सौंदर्य लुटायला त्यामुळे दरीमध्ये उतरायचं होतच. वेस्ट रीम मध्ये हेलिकॊप्टरने खाली उतरायची सोय होती. शिवाय आत दरीमधल्या कोलोरॆडॊ नदीवर बोटींगही करता येणार होतं.
३. नैसर्गिक चमत्कारांबरोबर आम्हाला वेस्ट रीममध्ये एक मानव निर्मित वास्तुशिल्प बघता येणार होतं, ते म्हणजे ’स्काय वॊक’. आमच्या मित्रांपैकी कोणीही तिथे गेलं नव्हतं त्यामुळे तिथे कसं वाटेल ह्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. नेटवर बरचं काही वाचलं होतं पण काहीतरी वेगळं पहायला मिळणार होतं ते वेस्ट रीम मध्येच.

सकाळी नाश्त्याला बाहेर पडलो आणि साडे सहावाजता बाजूच्या कॆसिनोखाली असलेल्या मॆकडेनॊल्ड्सच्या दिशेने चालू लागतो, तर चक्क अंगातून घामाच्या धारा. :-) इतक्या वर्षात मुंबई, पुणे, डॆलस, कोलंबिया, कॆंसस सगळीकडचे उन्हाळे अनुभवले पण पहाटे उकडायला लागण्याचीही पहिलीच वेळ. लास व्हेगास मध्ये सकाळी ही स्थिती, तर दिवसा काय होत असेल! उन्हाळ्यात तर दिवसा रस्त्यावर चालणेही मुश्कील. बहुसंख्य लोक अशावेळी कॆसिनोमध्ये खेळत नाहीतर रात्रभर जागरण करुन दिवसा हॊटेलात ताणून देतात. लास व्हेगासवरुन ग्रॆंड कॆनियनच्या एका दिवसाच्या ट्रीप्सची पॆकेजेस जवळ जवळ प्रत्येक हॊटेलमधून मिळतात. आमची ग्रॆंड कॆनियनची टूर गो टू बसच्या पेकेजबरोबरच होती. लास व्हेगास पासून वेस्ट रीम जवळ असल्याने आम्ही थोडे उशीरा म्हणजे आठ वाजता निघालो. आमच्या बरोबरचे काही जण जे साऊथ रीम वर जाणार होते ते दुसया बसने सकाळी साडे सहालाच निघाले. रात्री उशीरा झोपल्याने डोळ्यावर थोडीशी पेंग होती. साधारण तासाभरात आमची बस हूवर डॆम जवळ आली आणि तिथल्या निरीक्षण केंद्रावर आम्ही थांबलो.

एरीझोना आणि नेवाडा राज्यांच्या सीमा रेषेवर कोलोरॆडो नदीवर बांधलेले हे कॊंक्रीटचे अमेरीकेतील सगळ्यात उंच कमानिकृती (आर्च) धरण. अमेरीकन मंदीच्या काळात ह्या धरणाचे काम प्रेसिडेंट हूवर ह्यांच्या पुढाकाराने जोरात सुरू होते, १९३६ साली त्याचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण लास व्हेगासला पाणी पुरवठा आणि जलविद्युत पुरवठा हूवर डॆम मधून होतो. तिथल्या निरीक्षण केंद्रातून तो डॆम, त्याचं टनेल, त्याच्यावरचे पूल बघताना अचंबित व्हायला होतं. अभ्यासपूर्ण, साहसपूर्ण चिकाटीने मानवाने निसर्गावर मिळवलेला विधायक विजय म्हणून हूवर डॆमची इतिहासात नोंद झाली आहे. हूवर डॆमवर वेगवेगळ्या कोनातून मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांची पाठवशिवणी बघण्यात अर्धा तास कसा गेला कळलच नाही आणि आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दिशेने पुढे निघालो.

ग्रॆंड कॆनियन साऊथ आणि नॊर्थ सारखा ग्रॆंड कॆनियन वेस्ट हा ग्रॆंड कॆनियन नॆशनल पार्कचा भाग नाही. हा पूर्ण भाग हुलापिया आदिवासींच्या मालकीचा असून बराच अविकसित आहे. त्यामुळे ग्रॆंड कॆनियन अगदी मूळ स्वरुपात बघता येतो. लास व्हेगास पासून ही बाजू सगळ्यात जवळ (साधारण १२० मैल म्हणजे अडीच तास). साधारण साडे दहा च्या जवळपास आमची बस एके ठिकाणी थांबवण्यात आली. मार्गावर जवळपास ना पेट्रोल पंप ना दुकाने ना हॊटेल्स, अगदी कशाकशाचा मागमूस नव्हता. नुकतच कुठे इथ पर्यंत पर्यटक इतक्या प्रमाणात येऊ लागलेयत ह्या भागात हे जाणवत होतं. तिथली प्रसाधनगृह सुद्धा तात्पुरत्या स्वरुपाच्या शेडस मध्ये बांधलेली. तेथून बस बदलून कच्च्या रस्त्यावरुन आम्ही पुढे निघालो. साधारण १५-२० मैलांचे वळणावळणांचे हे अंतर, बरासचा रस्ता कच्चा, अजून तयार होतोय. आजूबाजूला फॊरेस्ट हाऊससारखी तुरळक घरे. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन वेस्ट रीमच्या मुख्य मुक्कामी जायला वेस्ट रीम व्यवस्थापनाच्याच गाड्या होत्या. शिवाय रस्ता खराब असल्याने आपली गाडी नेली तर पंक्चर होण्याची शक्यता जास्त. हा वेस्ट रीमचा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने सगळं थोडं महागच पण व्यवस्थापनला मिळणाया पैशातून बराचसा पैसा हुलायपाय जमातीस जातो असं समजलं. बाहेर ऊन पडलेलं असलं तरी ते न जाणवण्याइतपत गारवा होता हवेत. ग्रॆंड कॆनियनच्या दया दिसत होत्याच जवळ. आम्ही बसमधून उतरून वेस्टरीमच्या माहिती केंद्रात गेलो. दिवसभरात आपण काय करणार आहोत ह्याची साधारण माहिती आमचा गो टू बसचा टूर गाईड विलियमने गाडीतच दिली होती. आम्ही चौघेजण हॆलिकॊप्टर राईड घेणार होतो. आम्हा सगळ्यांची वजने घेऊन त्याप्रमाणे हॆलिकॊप्टर मध्ये बसण्याच्या जागा ठरवण्यात आल्या आणि आम्ही हॆलिपॆडच्या दिशेने निघालो. दोनच मिनिटांत आमच्यासाठी एक हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही आपापल्या जागा घेतल्या. मागे नायगारा बघतानाही मी अशीच राईड घेतली होती पण कौमुदीची ही पहिलीच वेळ आणि गंमत म्हणजे तिला पायलटच्या बाजूची एकमेव सीट मिळाली होती. पंख्याचा प्रचंड खडखडाट चालू होता, आम्ही सीट बेल्ट्स आवळले आणि हॆलिकॊप्टरने झेप घेतली. अहाहा, ह्याच साठी केला सारा अट्टाहास, असा विचार मनात येत होता आणि अतिशय नयनरम्य, विलोभनीय सौंदर्याची खाण, हो खाणच की ही, दोन्ही बाजूंनी उलगडत हॆलिकॊप्टर प्रचंड मोठ्या घळीत उतरत होते. डोळ्यांत आणि कॆमेयात आम्ही दृष्ये साठवत होतो. खालती आता कॊलेरेडो नदी दिसू लागली होती. साधारण १५-२० मिनिटे वेगवेगळ्या अंगानी ग्रॆंड कॆनियनच्या घळीतील सृष्टी आणि पाषाण सौंदर्य पहात आम्ही कॊलेरेडो नदीच्या किनारी उतरलो. आम्हाला उतरवून हॆलिकॊप्टर पुन्हा मागे उडून गेले. हा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने इथे इतर कुणाचीही वाहतूक नाही आणि त्यामुळे मानवी आक्रमणांपासून खूप उत्तमरीत्या जपला गेलाय. थोडं चालत आम्ही नदीच्या काठाशी पोहोचलो तर एक नाविक बोट घेऊन आमची वाटच पाहात होता.

कॊलेरेडो नदीवर बोटींग करण्यासाठी आम्ही मोटर बोटीत बसलो आणि बोट संथ पाण्यावर हळूच हेलकावे घेत पुढे निघाली. नाविक संपूर्ण ग्रॆंड कॆनियनची आणि वेस्ट रीमची माहिती पुरवित होता. कॊलेरेडो नदीच्या पाण्याची पातळी गेले काही वर्ष सातत्याने कमी होतेय, ग्लोबल वॊर्मिंगचे हे उत्तम उदाहरण असून, ग्लेशियर म्हणजे बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी झाल्याने असे होत असावे. ह्या बाजूस म्हणजे वेस्ट रीम वर ग्रॆंड कॆनियनच्या घळीची रुंदी साउथ रीमपेक्षा कमी आहे. ग्रॆंड कॆनियनची दरी ही साधारण पावणे तिनशे मैल लांब असून रुंदी कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त १८ मैल आहे. तिची खोली साधारण २ किमी असून करोडो वर्षांपासून पृथ्वीच्या भूगर्भात तसेच भूस्तरावर होणाया हालचालींची ही दरी साक्षीदार आहे. जगातली हि सगळ्यात खोल दरी. कॊलोरेडो नदीत अक्षरश: दरी कापत जाते तेव्हा दुतर्फा आपल्याला दरीमध्ये दगडांचे पट्टे च्या पट्टे किंवा थर दिसतात. आइस एजच्या दरम्यान जे बर्फ इथून वाहिलं त्यावेळी ही दरी निर्माण झाली. इथले दरीतले दगड तर कोट्यावधी वर्षांचे असून रीमवरचे म्हणजे वरचे काही दशलक्ष वर्षे जुने आहेत. तसेच काही दशलक्ष वर्षांपूर्वी इथे ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हा रसामुळे व्हॊल्केनो दगडांची निर्मिती झाली. हे त्यातल्या त्यात इथले सगळ्यात तरुण दगड म्हणायचे ;) हात बुडवून बघता, नदीचे पाणी तसे गारच होते, बोटींग करत असताना दोन्ही बाजूला ग्रॆंड कॆनियनच्या दगडातले पट्टे, रंग पाहाताना अर्धा पाऊणतास कधी गेला कळलं सुद्धा नाही. पाचच मिनिटांत हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही माहिती केंद्राच्या दिशेने परत उडालो. पुन्हा एकदा दरीतली दृष्ये डॊळ्यात साठवत पंधरा वीस मिनिटांत माहिती केंद्रावर पोहोचलो.

त्यांचीच बस पकडून आम्ही स्कायवॊक ह्या पुढच्या मुक्कामी निघालो. कच्च्या रस्त्यावरून दोन्ही कडे ग्रॆंड कॆनियनच्या डोंगरदया पहात अर्ध्या तासात आम्ही स्कायवॊकवर जाऊन पोहोचलो. बसमधून जातानाच आम्हाला ड्रायव्हरने इगल पॊईंटची माहिती दिली आणि दूरवरून तो दाखवलाही, येताना बघू म्हणून आम्ही तिथल्या माहिती केंद्रावर पुन्हा स्कायवॊकबद्दल माहिती घेतली आणि आमच्या कडच्या बॆगा, कॆमेरे लॊकर मध्ये ठेवून स्कायवॊकच्या रांगेत उभे राहीलो.

स्कायवॊक आहे तरी काय?
ज्यांना ग्रॆंड कॆनियन उतरण शक्य नाही किंवा उडत्या पक्षाला कशी दिसत असेल ही घळी हे बघायचं झालं तर काय करावं लागेल असा एक विचार ग्रॆंड कॆनियनच्या नियमित पर्यटकाच्या मनात आला आणि त्यातून स्कायवॊक संकल्पनेचा उदय झाला. घोड्याच्या नालेच्या आकाराचा संपूर्ण काचेतून बनवलेला हा स्कायवॊक कॆंटीलिव्हर सारखा उभ्या सुळक्यातून साधारण २० मीटर बाहेर काढलाय. इगल पॊइंटच्या जवळच त्याची जागा निवडलेय. दरीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर बांधलेला असून त्याच्या किनायांवर काचेवर थोडी काजळी दिलेय, उद्देश हा की इतक्या खोल बघून कुणाला चक्कर आली तर आधार मिळावा :-) खालचा बेस तसेच बाजूच बांधकाम काचेचं असून बेस दोन इंच जाडीच्या काचेचा आहे आणि खाली आपल्या पायाशी पाहिलं तर दिसते खोल दरी, आरपार. अगदी जसं आपण दरीत उभे आहोत आणि आकाशात चालतोय. स्कायवॊक बांधायला तीन वर्ष लागली. २८ मार्च २००७ मध्ये तो लोकांसाठी खुला करण्यात आला. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी त्यावर चालणाया पहिल्या माणसात होता सुप्रसिद्ध अंतराळवीर एड्विन ऒड्रीन (हाच मानव, ज्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं). त्यापूर्वी स्कायवॊकवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. आठ रिष्टर स्केलचा भूकंप स्कायवॊक सहन करु शकतो. वेगवेगळ्या दिशेने येणारे १०० मैल वेगांचे वारे सुद्धा स्कायवॊक झेलू शकतो. ७० टन म्हणजे साधारण आठशे लोकांच वजन स्कायवॊक घेऊ शकतो (प्रत्यक्षात एकावेळी २०० पेक्शा जास्त लोकांना स्कायवॊकवर प्रवेश दिला जात नाही.) पर्यटकांकडून काचेवर ओरखडे येऊ नयेत म्हणून अतिशय काळजी घेण्यात येते, त्यांना स्कायवॊकवर जाताना बुटांवर चढवायला प्लास्टीक कव्हर देण्यात येते जेणेकरुन काचेवर पाय घसरणार नाही. स्कायवॊक बांधायला ३१ दशलक्ष डॊलर्स खर्च आला असून आता तो पर्यटकांसाठी अप्रूप बनला नसेल तरच नवल. स्कायवॊक बांधल्यापासून वेस्ट रीमला भेट देणाया पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढलेय आणि हुलायपानसाठी ते उत्तम मिळकतीच साधन ठरतय, त्याचा त्यांना वेस्ट रीमच्या इतर व्यवपस्थापनासाठी फायदा होतोय. पर्यावरणवाद्यांचा मात्र असं म्हणणं आहे की संपूर्ण नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ह्या भागात आता मानवनिर्मित स्कायवॊकमुळे माणसांची वर्दळ प्रमाणाबाहेर वाढलेय आणि अर्थातच त्याचा परिणाम इथल्या निसर्गावर झाल्यावाचून रहाणार नाही.


स्कायवॊकच्या रांगेत त्यांनी दिलेली कव्हर्स आम्ही बूटांवर चढवली आणि स्कायवॊकवर गेलो. आत प्रवेश करताच वरती खुले आकाश, आणि खाली काच. काचेवरून चालत पुढे जातोय तोच पायाखालची जमिन सरकणे म्हणजे काय ह्याचा अनुभव आला :-) पावलांखाली खोल दरी, आज मैं उप्पर आसमा निचे अशी स्थिती. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे दगडांचे पट्टॆ घळीत सगळ्याच बाजूना दिसत होते. वाराही चांगला सुटला होता इथे. पंधरा वीस मिनिटे वेगवेगळ्या कोनांतून ग्रॆंड कॆनियन बघून आम्ही स्कायवॊकवरुन बाहेर पडलो. स्कायवॊकवर कॆमेरा न्यायला परवानगी नसली तरी व्यवस्थापनाचे फोटोग्राफर तुमचा फोटॊ काढून देतात. अर्थात तुम्ही नीट पोझिशन देणे आवश्यक आहे, आजूबाजूस काचच असल्याने वेडेवाकडे रीफ्लेक्शन येऊन मजेशीर फोटो येतात, तुम्ही हवेत तरंगत आहात असे :-) बाहेर पडून आम्ही बाजूलाच इगल पॊईंट कडे गेलो.
डोंगरात दगडांनी पंख पसरलेल्या गरुडाचा आकार घेतल्याने ह्या पॊईंटला असं नाव पडलं, त्याचे तसेच तिथून दिसणाया स्कायवॊकचे फोटॊ काढून आम्ही जेवणासाठी उपहारगृहात गेलो.

थोडी विश्रांती घेऊन आम्ही वेस्ट रीमच्या शेवटच्या पॊईंटवर जाण्यासाठी बस पकडली. हुलायपीयन संस्कृतीची ओळख होण्याच्या दृष्टीने त्यांनी तिथे एक पॊईंट बांधलाय. तिथूनही ग्रॆंड केनियनच विहंगम दृष्य दिसतं.







पुन्हा एकदा आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दगडांत फेरफटका मारला, ऊन तर होतच आणि परतिसाठी वेस्ट रीमच्या मुख्य माहिती केंद्रावर जाणारी बस पकडली. पंधरा वीस मिनिटांत मुख्य माहिती केंद्रावर पोहोचलो आणि तिथून वेस्ट रीमच्या व्यवस्थापनाची आम्हाला हमरस्त्यावरील आमच्या बसपाशी सोडणारी बस पकडली. पुन्हा त्या कच्च्या रस्त्यावरून साधारण १८ मैल, २५-३० मिनिटे प्रवास करुन आम्ही आमच्या बस पर्यंत पोहोचे पर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. ह्या पूर्ण वेस्ट रीममध्ये वेगवेगळ्या पॊईंट्स वर काम करणारी माणसे, सुविधा ह्या सगळ्यांचा खर्च पर्यटकांकडून मिळणाया पैशातूनच करावा लागतो. इथपर्यंत पाईपलाईन वगैरे नसल्याने पाणी सुद्धा जपूनच वापरावे लागते. इतक्या लांबपर्यंत वीज, बांधकामाचा माल, खाण्याचे सामान, कच्चा-पक्का माल पोहोचवणे ह्या प्रत्येकासाठी खर्च येतोच. ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर वेस्ट रीम इतके महाग का आहे, ह्याचा अंदाज येतो.

पुन्हा लास व्हेगास रात्र --
समर असल्याने अगदी आठ-साडेआठ वाजेपर्यंत्न स्चच्छ उजेड. त्यामुळे ग्रॆंड कॆनियनच्या परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा हूवर डॆम नीट पहायला मिळाला आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही सर्कस सर्कस मध्ये आमच्या मुक्कामी पोहोचलो. हॊटेलवर तासभर विश्रांती घेऊन लास व्हेगासच्या रात्रीचा जल्लोष अनुभवायला पुन्हा बाहेर पडलो. लास व्हेगास स्ट्रीपच्या मुख्या रस्त्यावर चालत आम्ही दोन्हीकडचा झगमगाट अनुभवत होतो. बॆलिज होटेल मध्ये आज आम्ही ’ज्युबिली’ शो ची तिकीट काढली होती. वाटेवरच आम्हाला रीयोज हॊटेलबाहेर चाल्लेला चकटफू शोज थोडा पहायला मिळाला, तिथला रस्ता खच्चून भरला होता, वाट काढणे मुश्किल. हवेत जाणवण्या इतपत उष्मा होता. त्या झगमगाटातून वाट काढत दहा वाजेपर्यंत आम्ही बेलिज कॆसिनोमध्ये पोहोचलो. कॆसिनोजमध्ये थोडा फेरफटका मारला, थोड्या स्लॊट मशिन्सवर हरण्याचा आनंद घेऊन :-) आम्ही तिथल्या थिएटर मध्ये जाऊन बसलो. ठरल्यावेळी म्हणजे बरोब्बर साडेदहाला शो सुरु झाला, सभागृह जवळ जवळ भरले होतं. पडदा वर करताक्षणी वासलेला आ जवळजवळ पुढचा दिड तास उघडाच होता. जागतिक दर्जाचं म्हणजे नेमकं काय हे प्रकर्षाने जाणवलं. एकमेवाद्वितीय शो. कॊरीओग्राफी, कलाकारांच टायमिंग, अचाट कसरती पुन्हा पुन्हा चकित करत होत्या. त्यात डॊयलॊग असे नव्हतेच. पूर्ण म्युझिकल ट्रीट. अप्रतिम डान्स, लुक्स, कलाकारांचा आत्मविश्वास, त्यांचा मेळ, ताकदीचे अचाट प्रयोग, वेशभूषा, केशभूषा, सेट्सची भव्यता आणि दिव्यता, प्रकाशाचा चपखल वापर आणि प्रत्येक प्रवेशाच्या सादरीकरणातलं नाविन्य, वेगळेवपण उत्कंठा वाढवत होतं. कधी संपूच नये हे अस वाटत होतं. ज्युबिलीच्या या संचात साधारण ७५ कलाकार आहेत, लास व्हेगाज मधल्या त्यावेळच्या टॊप थ्री पैकी हा एक शो, आमच्या सुदैवाने आम्हाला अनुभवता आला. बाहेर पडलो आणि टॆक्सी करायच्या ऐवजी लास व्हेगाज स्ट्रीप चालावी असा उत्साह होता. रात्रीचे साडेबारा होऊनही बयापैकी गर्दी होती रस्त्यावर. लास व्हेगास शहर रात्रीच जागते आणि दिवसा पेंगते हे खरच अगदी. तेथे रात्री दीड वाजता डेनिस मध्ये जेवून आम्ही लास व्हेगास स्ट्रीपवर तासभर चालत हॊटेल सर्कस सर्कस मध्ये पोहोचलो तर तिथे कॆसिनोमध्य बयाच गर्दीत गेमिंग चालू होते. निरनिराळी स्लॊट मशिन्स, पत्त्यांचे, फिरत्या चाकांचे, फाशांचे खेळ आणि ते खेळणारे/खेळवणारे/पाहाणारे हवशे, नवशे आणि गवशे, एकदम जल्लोषाचं वातावरण! रात्री दोन वाजता वरती रुम वर जाऊन झोपलो आणि सकाळी ७ ला परत सॆन फ्रान्सिस्कोकडे निघायचे असल्याने, ६ वाजताच उठलो. गेले तीन दिवस नुसते धावपळीत गेल्याने मनसोक्त कॆसिनोमध्ये खेळणं झालच नव्हतं. फिरत्या चाकावरती देशी नशीबाला आकार ही उक्ती सार्थ ठरवणाया टेबलवर तेवढ्या अर्धा पाऊण तासात खेळून आलो. चांगली गोष्ट अशी की कुठलाही खेळ तुम्हाला माहित नसेल तर समजावून सांगितला जातो, त्यात फसवणूक अशी होत नाही. लोकांना खेळण्याचा मनमुराद आनंद लुटू दिला जातो. गमतीची बाब अशी जे थोडं काही खेळलो त्यात शेवटी प्लस मध्येच राहीलो, आता लास व्हेगासची आठवण म्हणून हे कायम लक्षात राहील :-)



दिवस पाचवा (पुन्हा सॆन फ्रान्सिस्को)
सकाळी सात वाजता आम्ही सॆन फ्रान्सिस्कोच्या दिशेने निघालो. दोन रात्री सगळ्यांनाच लास व्हेगास मध्ये जागरण झाल्याने सगळेच पटापट झोपी गेलो, दरम्यान अकराच्या आसपास, ड्रायव्हरने बस टेंजर ह्या एका मोठ्या मॊल मध्ये थांबवली. वेस्ट कोस्टच्या ह्या टेंजर मॊल मध्ये रीबॊक, गॆप, नायकी, नॊटीका अशी बरीच फॆक्टरी आऊटलेट्स होती. बरोब्बर दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही दुसया टोकाच्या म्हणजे ईस्ट कोस्टच्या टेंजर मॊल मध्ये होतो त्याची आठवण झाली. दिवसभर प्रवास करून संध्याकाळी सात पर्यंत आम्ही सॆन मटिओ ह्या आमच्या फोस्टर सीटीजवळच्या मुक्कामी येऊन पोहोचलो.


संध्याकाळी माऊंटन व्ह्यू मध्ये ड्राईव्ह करुन माझ्या आवडत्या बनाना लिफ मध्ये डिनर साठी गेलो आणि तिथूनच जवळ राहात असणाया मित्रमैत्रिणींना भेटून रात्री मुक्कामी परतलो. डोक्यात दुसया दिवशीचा सॆन फ्रान्सिस्कोचा प्लान तयार होताच.

- क्रमश: