Tuesday, November 2, 2010

आली माझ्या घरी ही दिवाळी..

ह्या दिवाळीला बायको आणि मुलगा ’माझ्या माहेरी’ आहेत, त्यामुळे इथे एकटाच.. अर्थात तरी दिवाळीचा उत्साह कमी नाहीच. कंदील लावला आज आणि हो फराळ केलाय, म्हणजे बनवलाय :-))

अर्थात वैदेहीने http://www.chakali.blogspot.com/ इथे दिलेल्या आधाराशिवाय हे कठीणच होतं, म्हणजे पूर्वी कधितरी मी ओगले आजींच्या पुस्तकांचे संच आणले होते वाहून अमेरिकेत, पण मायबोली, मिसळपाव आणि मुख्यत्वे चकलीवर वैदेहीच्या रेसिपीज मुळे ती पुस्तक उघडायची आताशा गरज राहीली नाही.

शंकरपाळे करताना मैदा मस्त मळला, कणकेचा वापर कटाक्षाने टाळला. थोडं मोहन घातलं मैदा मळत असताना, त्यावरुन आठवलं - ’मोहन’ हा शब्द कुठून आला असावा ह्या स्वयंपाकात? मला शब्दांची व्युत्पत्ती शोधायला फार आवडतं, त्यातून जुन्या संस्कृतीचं एखादं रुपडं, त्या काळातील माणसांची विचार करण्याची पद्धती चटकन उडी मारुन डोळ्यासमोर येऊ शकते. असो, तर माझ्या दोन्ही आज्या पट्टीच्या सुगरणी. दोन्हींमध्ये साम्य म्हणजे स्वयंपाक करताना त्यांचं नामस्मरण तरी चालू असे किंवा अभंग, ओव्या ह्यांचा स्त्रोत गोड गळ्यातून अखंड सुरु असे. शिवाय पदार्थ तयार झाला की आधी देवापुढे ठेवणे असेच. त्यामुळे नेहमीचा स्वयंपाक करतानाही त्यांची एकतानता, तलिन्नता बघण्यासारखी असे, आणि असे दिवाळीचे पदार्थ करायचे असले तर बघायलाच नको. एकमेकीकडे जाऊन सगळ्या बायका अतिशय उत्साहाने पदार्थ करणार दिवाळीचे. तर देवाचे चिंतन करत स्वयंपाक करताना त्या मन-मोहनाचा मोह पडल्याने, तेलाच्या फोडणीला मोहन नाव पडले असेल का? असेलही, कुणास ठाऊक!!

लाडू करताना केवळ वासावरुन आणि रंगावरुन बेसन कसं आणि किती भाजलं गेलय ओळखण्याच काम जमून आलं आणि लाडू मनासारखे छान वळलेही गेलेत. शंकरपाळे तळतानासुद्धा तेल किती तापायला हवं, कोणत्या रंगावर ते तळून काढायला हवेत हे एकदा लक्षात आलं की काम सोप्प होतं. पूर्वी आजी करायची तेव्हा नाही म्हटलं तरी थोडी लुडबूड असायची स्वयंपाक घरात, बोलता बोलता आजीही स्वयंपाकातल्या खाचाखोचा सांगायची. मग नंतर स्वयंपाकघर जे सुटलं ते सुटलं. इथे एकटा असतानाही कधी तळणीचा विचार केला नाही (बॆचलरपणीचा सामूहीक आळस बहुधा) नंतर बायकोने लाड पुरवले, पण ह्यावेळी ओट्याशी उभं राहून फराळ करताना खरच मजा आली, बायकॊचाही टेलिफोनिक सपोर्ट होताच :) त्यामानाने चिवडा सरळ सोप्पा करायला, अर्थात तो खालून न जळून देता मिक्स करणं आणि पोहे कच्चे न राहाणं हे साधलं की झालं.


असो, तर शंकरपाळे, पातळ पोह्याचा चिवडा आणि बेसनाचे लाडू असा फराळ दिवाळीला तय्यार, सोबत कंदील आणि तोरणं आहेतच. फटाक्यांची अनुपस्थिती अर्थातच जाणवतेय पण फटाके न लावण्याची सवय आता अंगवळ्णी पडलेय, मुलाबरोबर पुन्हा लहान होईन तेव्हा करुच धमाल.

तमसो माSSSS ज्योतिर्गमय:
सगळ्याना शुभ-दिपावली !