Sunday, August 19, 2007

इथून तिथून..

१५ ऒगष्ट आला SSSSSS
कर्तव्य सांगण्याला.SSSS

..आम्ही लहान असताना पोवाडे म्हणत असू नानीवडेकरांचे आणि ओज इतका ओतप्रत भरला असे त्यात की भारावून जात असू!
कालचा वाढदिवस आला आणि गेला. आता एकसश्टी येईल.. ती ही जाईल.. सूर निराशेचा आहे असं नाही पण थोडा विषाद वाटला इतकच. कोणत्याही संस्थेचा किंवा व्यक्तीचा हिरक महोत्सव (अगदी गणपती उत्सवाचा ही) अगदी दणक्यात होतो.. ६० म्हणजे काही तरी खास.. अगदी रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शतसांवत्सरीक उत्सवासरखं.. स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्षाचा जल्लोश खूप वेगळा (निदान मला तरी) नाही जाणवला!
काल इथे डॆलस मध्ये भारतीय स्वातंत्र्यदीन साजरा करण्यात आला. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आणि ते नाही म्हणजे नेमकं काय, ह्याचा काडीमात्र अंदाज नसलेलेच तिथे जास्त.. त्या गर्दीत मी ही एक.. चार भारतीय माणसं एकत्र आली हाच काय त्यातला उठाव.. एरवी बरेचसे बाजारी स्वरूप.. आनंद बाजार होताच! वाटलं इथे एखादा स्वातंत्र्य सैनीक असता तर किती बरं झाल असतं.. पण नकोच.. त्याचे विचार ऐकायला वेळ होता कोणाला.. प्रत्येक जण आपल्या नादात.. नाही म्हणायला राष्ट्रगीत झालं.. पण अमेरीकेत जन्मलेल्या पिढीला तसे त्याविषयी विशेष वाटण्याचे खास कारण नव्हते.. आणि काही नाहीतर २ मिनिटे स्तब्ध उभ राहून राष्ट्रगीताचा मान राखावा इतकी शुचिता बर्याच उपस्थितांकडे नव्हती. त्यांच्यासाठी ते एक केवळ गाणे जणू काही! त्यांच्यापैकी कित्येकांनी मनमोहन सिंगांचे आणि राष्ट्रपतींचे भाषण ऐकले किंवा वाचले असेल शंकाच आहे! असो, चालायचच.. मी ही कुठे काही खास करतोय म्हणा देशासाठी.. खरय! पण काही तरी करायला हवं ही जाणीन जपणं हेच चालू आहे सध्या.. आजूबाजूच्या गोष्टी पहाता त्याचा विसर पडणं फार कठीण नाहीये.. पण तरीही काही 'नन्ही कली' सारखे चांगले प्रकल्प नेटाने आहेत चालू आणि कोदेंसारखे न्यायाधीशही..

बरेच दिवस लिहीलं नाही इथे.. इथेच काय कुठेच नाही लिहिलं.. का लिहिलं नाही हे शोधावसं वाटलं नाही.. आणि वाटत नसताना लिहायला आम्हास कोणी पैसे देत नाही.. :-) माऊली म्हणते तसं..

आवडे ते वृत्ती किरीटीआधि
मनुनेचि उठी, मग वाचा दिठी
करांसी ये
---आधि मनात येत, मग ओठात येत आणि मग हातावाटे बाहेर पडतं... ते अनुभव संपन्न लिखाण.. बर्याच लेखकांच्या, नाटककारांच्या बाबतीत हे पटतं..

संजुबाबाची जेल, द्रवीडने न दिलेला फ़ॊलो ऒन, सेझ (ह्या बाबतीत माझा खरच वैचरीक गोंधळ उडालाय), श्रावणातल्या आठवणी ह्यावर लिहीण्यासरखे होतेही पण नाही जमलं.. असो, सद्ध्या वाचनाचा मूड आहे. इथे किरण आणि कालिंदी साठ्ये ह्यांच्याकडे खूप छान मराठी पुस्तकांचा संग्रह आहे. दोघेही रसिक आहेतच शिवाय पुस्तक प्रेमी, मस्त भट्टी जमते आमची! दरम्यान ती सगळी पुस्तकं अनुक्रमे लावली आणि नीट ठेवली. वाचनाचे सगळे लाड आता पुरवले जातील असं वाटतय.
नुकतीच वचलेली काही पुस्तके -
पोटाचा प्रश्न - मंगला गोडबोले (पु. ल. नन्तर मी इतका हसलो नाही कुणाला.. कोणालाही आवडेल असं)मण्यांची माळ - सुनीता देशपांडे (सुनीताबाईंचा भाईंवरचा लेख अप्रतिम)
दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर.. (अहाहा.. वेगळ लिहीन ह्या पुस्तकाबद्दल.. बिनतोड आहे.. }

तूर्तास इतकच.. भेटत राहूच..