Wednesday, September 26, 2007

उत्सव - लाडक्या मुंबईतले

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..

पारंपारिक उत्साहात विसर्जन सुखरूप पार पडले. अर्थात तो सोहळा बघता आला नाही ह्याची हुरहुर लागलीच आहे.
मायबोलीवर गणेशोत्सव पार पडला, त्यात मी लिहिलेली ही आरती..
-----------------------------------------------------------------------------------
जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०

कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. १

लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी
तंदुल तनु मोहक उंदरावर स्वारी
गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीच्या राया.. २

परशू हाती शोभे ध्यान वक्रतुंड
सिंदुरवदना सुंदर रुळताहे शुंड
अशीच स्फूर्ती राहो किर्ती तव गाया.. ३

आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०
-----------------------------------------------------------------------------------
गणेश विसर्जनाप्रमाणेच अख्खी मुंबई दुमदुमली ती धोनीच्या संघाच्या दणदणीत स्वागताने. ८३ साली मला अंधुक आठवतय गिरगावातून खूप साया मिरवणूका निघाल्या होत्या. कालचा सोहळा हा तसा आयत्यावेळी ठरवलेला पण तरीही बराचसा सुनियोजित वाटला. धोनी आणि संघ इतकं मिळून मिसळून जवळून अभिनंदन स्विकारत होते ते छानच वाटलं. तिकडे असतो तर गेलोच असतो वानखेडेवर, त्याची थोडी चुटपुट लागलीच. तरीही स्टार माझा आणि एन. डी. टीव्ही वर बघता आलं. असो, पण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये धोनीच्या संघाने जो जिगरबाज खेळ केला त्याला तोड नाही. दैव साथ होतं पण त्याला कर्माची, मेहनतीची अचूक साथ मिळाली हे तितकच खरं. धोनीचं आणि भारतीय संघाच मनःपूर्वक अभिनंदन! ह्यातून बरेच प्रश्न सुटलेत आणि तितकेच नवीन उभे राहिलेत असं दिसतय. भारताच्या विश्वचषकातल्या पराभवानंतर जे क्रीकेटवर सावट आलं होतं (आणि जनता चक दे मुळे हॊकी कडे थोड्या प्रमाणात वळू पहात होती) ते सावट दूर होईल हे नक्की. २०-२० नक्कीच पुढे प्रसिद्धीस येणार ह्यात वाद नाही. एकदिवसीय सामन्याच्या गुणवत्तेत आणि डावपेचांत आता खूप फरक पडेल.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक मारण्याचा दिवस आता फार दूर वाटत नाही. एक दिवसीय सामन्यांच्या गर्दीमुळे जसे पाच दिवसाच्या सामन्यात साडेतीन चारच्या गतीने धावा हौऊ लागल्या आणि सामन्यांच्या निकालाची शक्यता वाढली तसा काहीसा परिणाम २०-२० मुळे एक दिवसीय सामन्यांवर होईल असं दिसतय. नवीन तरूण खेळाडू उभे रहात आहेत ही अजून एक आनंदाची बाब. धोनी च्या रुपात चांगला कर्णधार मिळतोय ही भारतीय क्रीकेटच्या दृष्टीने खूपच आनंदाची गोष्ट.
ह्यातून प्रश्न आहेत ते निवडसमितीपुढे. अचूक संघ कसा निवडायचा, आहे त्या खेळाडुंचा पुरेपूर वापर कसा करायचा (नाहीतर आय सी ल आहेच खेळाडू उचलायला) प्रशिक्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे सगळे निवड समितीला पहावे लागेल. क्रीकेट रसिकांनी ह्यातून शिकण्यासारखे म्हणजे आपल्या सदिच्छा संघाला द्याव्यात पण होम हवने करून आणि साकडे घालून अपेक्षांचे ओझे आपल्याच संघावर लादू नये आणि भावनेच्या भरात त्यांच्या मालमत्तेवर आणि शंकेखोर वृत्तीने स्वत्त्वावर हल्ले करु नयेत!
मधे एकदा न्युयॊर्क मूंबई प्रवास करताना शेजारच्या जागी साधारण माझ्या एवढाच मुलगा होता, सलिम. मी क्रीकेटचं काहितरी वाचत बसलो होतो लॆपटॊपवर आणि आमची तेव्हाच ओळख झाली. तर तो होता कराचीतून :-) तिथेच लहानचा मोठा झालेला. मुंबई कराची तशा सख्ख्या बहीणी. दोन्ही उत्तम बंदरे त्यामुळे पूर्वापार व्यावसयिक महत्व. दोन्ही शहरांना आपापल्या देशात विशेष सांस्कृतिक, राजकीय, चित्रपटविषयक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व. तसच क्रीकेट हा अजून एक समान धागा. खूप भरभरून बोललो आम्ही दोघे. एखाद्या सच्च्या पाकीस्तानी क्रीकेटप्रेमीस काय वाटतं क्रीकेटबद्दल, भारतीय टीमबद्दल आणि पाकीस्तानी टीमबद्दल हे जवळून समजून घेता आलं. ते सारं मला काल आठवलं एकदम. सलिम नक्कीच रडला असेल काल!
पण त्या शोएब मलिकने खेळात धर्म आणायला नकोच होता. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे इकडे का बरं लक्ष देत नाहीत?? भारतातला मौला उठून का बरं ह्याचा निषेध करत नाही?? सगळ्या इस्लामिंनी पाकीस्तानास पाठिंबा दिला किंवा द्यायला हवा असे म्हणताना खेळाचे धर्मयुद्ध करण्याचा गाढवप्णाच नव्हे काय? इस्लामही काय पाकीस्तानची इश्टेट आहे का? आणि सगळे जगभरातले इस्लामी पाकीस्तानी आहेत का? की तसं मुद्दाम रुजवण्याचा हा कुटील डाव आहे आणि धूर्त पणे हे पसरवायची साधलेली संधी आहे? अर्थात त्याचा बोलविता धनी कोण हे स्पष्टच आहे आणि तो धनीच स्वतःच्या जाळ्यात फसत चालला आहे दिवसेंदिवस! आय सी सी ह्या विधानांवर काही आक्षेप घेईल असं वाटत नाही! पण मनापसून चीड आली ह्याची.. अशावेळी वाटतं इथे ठाकरी पाणीच हवं!

असो तर, पाच दिवसाचा कसोटी सामना म्हणजे हर हर महादेव म्हणत घेतलेले अंगत पंगत जेवण, एक दिवसीय म्हणजे झटपट उरकलेला बुफे आणि २०-२० म्हणजे एकच स्वीट डीश किंवा थोडेसेच पण रुचकर सॆलड किंवा हलकासा स्नॆक्स. उदरभरण नोहे जाणिजे यद्न्य कर्म म्हणत ताव मारायचे दिवस गेले, ये फास्ट फूड का जमाना है भाई हेच खरं! :-)

चक दे sssssssssss इंडीssssssssssया!

Friday, September 14, 2007

माझे जीवन - गाणे (ऐकणे)


कहा मैखानेका दरवाजा गालिब और कहा वाइज
पर इतना जानते है कल वो जाता था के हम निकले...
हजारो ख्वाईशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले..
बहोत निकले मेरे अर्मान फीर भी कम निकले..
हुं हुं हुं हुं हुं हं हं हं हं..
हुं हुं हुं हुं... हं हं हं हं..
--------------------------------------------------------------

हाथ छुटे तो भी रिश्ते नही छोडा करते
हाथ छुटे तो भी रिश्ते नही छोडा करते
वक्त की शाखसे लम्हे नही तोडा करते..
-- माझ्या मनात आणि ओठात हे गाण उमटलं सुद्धा..
--------------------------------------------------------------

मैने दिलसे कहा, ए दिवाने बता
जबसे कोई मिला तू है खोया हुआ
ये कहानी है क्या, है ये क्या सिलसिला..

अरेच्चा.. आणि हे काय वेगळच गाणं सुरू झालं की.. कपाळाला बारीकशी आठी पडली आणि उठून पाहीलं तर random mode होता.. म्हटलं हं.. जवळ जवळ दोन वर्षांनी ही ऐकतोय.. आज जगजीत मूड आला, (तसा तो बरेचदा असतोही, पण आज निवांतपणा मिळाला... पूर्वीसारखं रात्रभर हळूवार गझल ऐकत बसता येतील असा) आणि माझं मन भूतकाळात रमलं.. अजूनही गाण्यांचा अनुक्रम चांगलाच लक्षात होता तर.. त्या क्रमाने गाणं उमटलं नाही म्हटल्यावर क्षणिक अस्वस्थता आली इतकच!


माझ्या बाबतीत होतं असं काही वेळा.. मला गाणी एका मूड मध्ये तसच एका गायकाच्या आवाजात सलग ऐकायला आवडतात, विशेषतः long drive करताना किंवा रात्री झोपताना! गंमत अशी की त्या गाण्यांबरोबरच त्यांचा अनुक्रम सुद्धा अगदी डोक्यात फीट्ट बसतो, बरेचदा आपल्या नकळत. मग कित्येक वर्ष तो निघत नाही तिथून.. पूर्वी जेव्हा गिरगावात मी audo cassets बनवून घ्यायचो गाण्याच्या तेव्हा 'अ' बाजूस पहिले आणि शेवटचे तसच 'ब' बाजूस पहिले आणि शेवटचे गाणे कोणते ठेवायचे ह्याकडे माझा कटाक्ष असे, जेणे करू नुसती casset ची बाजू बदलली की एका बाजूचं पहिलं आणि दुसया बाजूच शेवटचं गाणं परत परत ऐकता यावं! त्यामुळे माझ्या कित्येक आवडत्या गाण्यांनी माझ्या casset च्या संग्रहात पहिलं किंवा शेवटचं स्थान पटकवलय.

जसा हा अनुक्रम ठिय्या मारुन बसतो ना मनात, तसच काहीसं आठवणींच.. बयाच गाण्यांशी आपल्या काही आठवणी निगडीत असतात. म्हणजे ते कुठून मिळवलं किंवा काही किस्से घडलेले किंवा एखादी संबंधित व्यक्ती किंवा ते गाणे ऐकताना झालेली चूक किंवा गाण्याने भारवून गेलो ते क्षण किंवा अगदी त्याच सादरीकरण किंवा अजून बरच काही. मानवी मेंदू हा खरच कमाल आहे. हे सगळं तो त्या त्या गाण्याशी अचूक बांधून ठेवतो आणि मग वेळ पडली की मनःपटलावर उमटवून देतो, ते ही काही क्षणात. अगदी! इतकं छान auto indexing आणि quick search निर्माण करणाया ह्या शक्तीची कमालच म्हणायला हवी.

दरम्यान बरेचदा पु लंनी आणि सुनिताबाईंनी सादर केलेला बा. भ. बोरकरांचा आनंदयात्री कार्यक्रम मी ऐकतो, समाधान होत नाही कितीही ऐकलं तरी! तर, त्यात भाईंनी मध्ये मध्ये केलेल्या टिपण्या, सुनीताबाईंचा कधी गंभीर तर कधी मिश्कील आवाज ह्यातून कविता किंवा गाणे आणि त्याच्याशी जडलेल्या आठवणी अशा काही उमलतात ना की बस्स! कवितांजली मध्ये सुनीताबाईंनी असच अप्रतिम काव्यवाचन केलय. मराठी वाद्यवृंदांमध्ये तसच मैफीलींमध्ये माझे आवडते समालोचक म्हणजे भाऊ मराठे (जे भाऊचा धक्का हा कार्यक्रम सादर करतात), संजय उपाध्ये (गप्पाष्टक वाले) आणि मंगला खाडीलकर. व्वा क्या बात है! प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी, त्याला निगडीत काही प्रसंग, व्यक्ती असं सगळं अभ्यासपूर्ण समालोचन ऐकायला मिळतं आणि सादरीकरण सुद्धा प्रेक्षकांची नाडी (म्हणजे टिळक स्मारकातली गर्दी आणि गिरगावतल्या गल्लीतल्या प्रेक्षकांची रसिकता ह्यातला फरक) ओळखून हे समालोचक सादरीकरण करतात, त्याचबरोबर मार्मिकता, हजरजबाबीपणा असतो तो खासच!

अशा कैक गाण्याच्या शब्दांची, त्यांच्या माझ्याकडील अनुक्रमाची, त्यांच्याबरोबरच्या आठवणींची यादी इवल्याश्या डोक्यात साठत असते. हे असं वाढतच रहाणार, जेवढं आपण अनुभव संपन्न होऊ तेवढं. त्याचा आस्वाद घेत रहाणं तेवढं करत रहायचं..
पाडगावकरांच्या बोलगाण्यात सांगायचं तर ह्या पाखरासारखं मस्त जगाव.. हसत हसत गाणं म्हणत!माझं हे खूप आवडतं बोलगाणं..

एक पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं
दुसरं पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं

तिसरं पाखरू आलं
ते गात बसलं,
भारावून आपल्याच सुरात
न्हात बसलं!


तुच्छतेने बघत त्याला
चौथं पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं


तरीही ते तिसरं पाखरू
गात बसलं,
भारावून आपल्याच सुरांत
न्हात बसलं!

(आठवली का ती Sprite ची जाहीरात! अगदी तस्संच! ) :-)