Saturday, July 11, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 3

दिवस चौथा (ग्रॆंड कॆनियन / लास व्हेगास)
जगातल्या सात निसर्गनिर्मित आश्चर्यांपैकी एक - ग्रॆंड कॆनियन.


साऊथ रीम की वेस्ट रीम?
एका दिवसात ग्रॆंड कॆनियन पहाणायांना पडणारा हा नेहमीचा प्रश्न. काय बघावं साऊथ रीम की वेस्ट? खूप शोधाशोध केली इंटरनेटवर, मित्रमैत्रिणींकडे आणि मग आम्ही वेस्ट रीम निश्चित केलं. ह्यामागची आमची कारणं अशी -
१. तुम्हाला ट्रेक करत खाली ग्रॆंड कॆनियन मध्ये उतरायचं असेल तर साऊथ रीम केव्हाही उत्तम. ह्या ट्रेकला एक दिवसाहून अधिक कालावधी लागतो आणि तुमची खाली दरीत उतरण्याची आणि मग वर चढण्याची चांगलीच तयारी असावी लागते. आमच्या कडे काही तास असल्याने साऊथ रीम मधून खाली उतरणे शक्यच नव्हते. हॆलिकॊप्टरने खाली उतरायची सोय साऊथ रीम मध्ये नव्हती.
२. ग्रॆंड कॆनियन बघायचा, त्याची भव्यता आणि दिव्यता पहायची तर लांबून बघून समाधान होणं शक्यच नव्हतं. इतक्या लांब आलो आहोत ते केवळ अमाप नैसर्गिक सौंदर्य लुटायला त्यामुळे दरीमध्ये उतरायचं होतच. वेस्ट रीम मध्ये हेलिकॊप्टरने खाली उतरायची सोय होती. शिवाय आत दरीमधल्या कोलोरॆडॊ नदीवर बोटींगही करता येणार होतं.
३. नैसर्गिक चमत्कारांबरोबर आम्हाला वेस्ट रीममध्ये एक मानव निर्मित वास्तुशिल्प बघता येणार होतं, ते म्हणजे ’स्काय वॊक’. आमच्या मित्रांपैकी कोणीही तिथे गेलं नव्हतं त्यामुळे तिथे कसं वाटेल ह्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. नेटवर बरचं काही वाचलं होतं पण काहीतरी वेगळं पहायला मिळणार होतं ते वेस्ट रीम मध्येच.

सकाळी नाश्त्याला बाहेर पडलो आणि साडे सहावाजता बाजूच्या कॆसिनोखाली असलेल्या मॆकडेनॊल्ड्सच्या दिशेने चालू लागतो, तर चक्क अंगातून घामाच्या धारा. :-) इतक्या वर्षात मुंबई, पुणे, डॆलस, कोलंबिया, कॆंसस सगळीकडचे उन्हाळे अनुभवले पण पहाटे उकडायला लागण्याचीही पहिलीच वेळ. लास व्हेगाज मध्ये सकाळी ही स्थिती, तर दिवसा काय होत असेल! उन्हाळ्यात तर दिवसा रस्त्यावर चालणेही मुश्कील. बहुसंख्य लोक अशावेळी कॆसिनोमध्ये खेळत नाहीतर रात्रभर जागरण करुन दिवसा हॊटेलात ताणून देतात. लास व्हेगासवरुन ग्रॆंड कॆनियनच्या एका दिवसाच्या ट्रीप्सची पॆकेजेस जवळ जवळ प्रत्येक हॊटेलमधून मिळतात. आमची ग्रॆंड कॆनियनची टूर गो टू बसच्या पेकेजबरोबरच होती. लास वेगास पासून वेस्ट रीम जवळ असल्याने आम्ही थोडे उशीरा म्हणजे आठ वाजता निघालो. आमच्या बरोबरचे काही जण जे साऊथ रीम वर जाणार होते ते दुसया बसने सकाळी साडे सहालाच निघाले. रात्री उशीरा झोपल्याने डोळ्यावर थोडीशी पेंग होती. साधारण तासाभरात आमची बस हूवर डॆम जवळ आली आणि तिथल्या निरीक्षण केंद्रावर आम्ही थांबलो.

एरीझोना आणि नेवाडा राज्यांच्या सीमा रेषेवर कोलोरॆडो नदीवर बांधलेले हे कॊंक्रीटचे अमेरीकेतील सगळ्यात उंच कमानिकृती (आर्च) धरण. अमेरीकन मंदीच्या काळात ह्या धरणाचे काम प्रेसिडेंट हूवर ह्यांच्या पुढाकाराने जोरात सुरू होते, १९३६ साली त्याचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण लास व्हेगासला पाणी पुरवठा आणि जलविद्युत पुरवठा हूवर डॆम मधून होतो. तिथल्या निरीक्षण केंद्रातून तो डॆम, त्याचं टनेल, त्याच्यावरचे पूल बघताना अचंबित व्हायला होतं. अभ्यासपूर्ण, साहसपूर्ण चिकाटीने मानवाने निसर्गावर मिळवलेला विधायक विजय म्हणून हूवर डॆमची इतिहासात नोंद झाली आहे. हूवर डॆमवर वेगवेगळ्या कोनातून मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांची पाठवशिवणी बघण्यात अर्धा तास कसा गेला कळलच नाही आणि आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दिशेने पुढे निघालो.

ग्रॆंड कॆनियन साऊथ आणि नॊर्थ सारखा ग्रॆंड कॆनियन वेस्ट हा ग्रॆंड कॆनियन नॆशनल पार्कचा भाग नाही. हा पूर्ण भाग हुलापिया आदिवासींच्या मालकीचा असून बराच अविकसित आहे. त्यामुळे ग्रॆंड कॆनियन अगदी मूळ स्वरुपात बघता येतो. लास व्हेगास पासून ही बाजू सगळ्यात जवळ (साधारण १२० मैल म्हणजे अडीच तास). साधारण साडे दहा च्या जवळपास आमची बस एके ठिकाणी थांबवण्यात आली. मार्गावर जवळपास ना पेट्रोल पंप ना दुकाने ना हॊटेल्स, अगदी कशाकशाचा मागमूस नव्हता. अत्ता अत्ता कुठे इथ पर्यंत पर्यटक इतक्या प्रमाणात येऊ लागलेयत ह्या भागात हे जाणवत होतं. तिथली प्रसाधनगृह सुद्धा तात्पुरत्या स्वरुपाच्या शेडस मध्ये बांधलेली. तेथून बस बदलून कच्च्या रस्त्यावरुन आम्ही पुढे निघालो. साधारण १५-२० मैलांचे वळणावळणांचे हे अंतर, बरासचा रस्ता कच्चा, अजून तयार होतोय. आजूबाजूला फॊरेस्ट हाऊससारखी तुरळक घरे. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन वेस्ट रीमच्या मुख्य मुक्कामी जायला वेस्ट रीम व्यवस्थापनाच्याच गाड्या होत्या. शिवाय रस्ता खराब असल्याने आपली गाडी नेली तर पंक्चर होण्याची शक्यता जास्त. हा वेस्ट रीमचा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने सगळं थोडं महागच पण व्यवस्थापनला मिळणाया पैशातून बराचसा पैसा हुलायपाय जमातीस जातो असं समजलं. बाहेर ऊन पडलेलं असलं तरी ते न जाणवण्याइतपत गारवा होता हवेत. ग्रॆंड कॆनियनच्या दया दिसत होत्याच जवळ. आम्ही बसमधून उतरून वेस्टरीमच्या माहिती केंद्रात गेलो. दिवसभरात आपण काय करणार आहोत ह्याची साधारण माहिती आमचा गो टू बसचा टूर गाईड विलियमने गाडीतच दिली होती. आम्ही चौघेजण हॆलिकॊप्टर राईड घेणार होतो. आम्हा सगळ्यांची वजने घेऊन त्याप्रमाणे हॆलिकॊप्टर मध्ये बसण्याच्या जागा ठरवण्यात आल्या आणि आम्ही हॆलिपॆडच्या दिशेने निघालो. दोनच मिनिटांत आमच्यासाठी एक हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही आपापल्या जागा घेतल्या. मागे नायगारा बघतानाही मी अशीच राईड घेतली होती पण कौमुदीची ही पहिलीच वेळ आणि गंमत म्हणजे तिला पायलटच्या बाजूची एकमेव सीट मिळाली होती. पंख्याचा प्रचंड खडखडाट चालू होता, आम्ही सीट बेल्ट्स आवळले आणि हॆलिकॊप्टरने झेप घेतली. अहाहा, ह्याच साठी केला सारा अट्टाहास, असा विचार मनात येत होता आणि अतिशय नयनरम्य, विलोभनीय सौंदर्याची खाण, हो खाणच की ही, दोन्ही बाजूंनी उलगडत हॆलिकॊप्टर प्रचंड मोठ्या घळीत उतरत होते. डोळ्यांत आणि कॆमेयात आम्ही दृष्ये साठवत होतो. खालती आता कॊलेरेडो नदी दिसू लागली होती. साधारण १५-२० मिनिटे वेगवेगळ्या अंगानी ग्रॆंड कॆनियनच्या घळीतील सृष्टी आणि पाषाण सौंदर्य पहात आम्ही कॊलेरेडो नदीच्या किनारी उतरलो. आम्हाला उतरवून हॆलिकॊप्टर पुन्हा मागे उडून गेले. हा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने इथे इतर कुणाचीही वाहतूक नाही आणि त्यामुळे मानवी आक्रमणांपासून खूप उत्तमरीत्या जपला गेलाय. थोडं चालत आम्ही नदीच्या काठाशी पोहोचलो तर एक नाविक बोट घेऊन आमची वाटच पाहात होता.
कॊलेरेडो नदीवर बोटींग करण्यासाठी आम्ही मोटर बोटीत बसलो आणि बोट संथ पाण्यावर हळूच हेलकावे घेत पुढे निघाली. नाविक संपूर्ण ग्रॆंड कॆनियनची आणि वेस्ट रीमची माहिती पुरवित होता. कॊलेरेडो नदीच्या पाण्याची पातळी गेले काही वर्ष सातत्याने कमी होतेय, ग्लोबल वॊर्मिंगचे हे उत्तम उदाहरण असून, ग्लेशियर म्हणजे बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी झाल्याने असे होत असावे. ह्या बाजूस म्हणजे वेस्ट रीम वर ग्रॆंड कॆनियनच्या घळीची रुंदी साउथ रीमपेक्षा कमी आहे. ग्रॆंड कॆनियनची दरी ही साधारण पावणे तिनशे मैल लांब असून रुंदी कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त १८ मैल आहे. तिची खोली साधारण २ किमी असून करोडो वर्षांपासून पृथ्वीच्या भूगर्भात तसेच भूस्तरावर होणाया हालचालींची ही दरी साक्षीदार आहे. जगातली हि सगळ्यात खोल दरी. कॊलोरेडो नदीत अक्षरश: दरी कापत जाते तेव्हा दुतर्फा आपल्याला दरीमध्ये दगडांचे पट्टे च्या पट्टे किंवा थर दिसतात. आइस एजच्या दरम्यान जे बर्फ इथून वाहिलं त्यावेळी ही दरी निर्माण झाली. इथले दरीतले दगड तर कोट्यावधी वर्षांचे असून रीमवरचे म्हणजे वरचे काही दशलक्ष वर्षे जुने आहेत. तसेच काही दशलक्ष वर्षांपूर्वी इथे ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हा रसामुळे व्हॊल्केनो दगडांची निर्मिती झाली. हे त्यातल्या त्यात इथले सगळ्यात तरुण दगड म्हणायचे ;) हात बुडवून बघता, नदीचे पाणी तसे गारच होते, बोटींग करत असताना दोन्ही बाजूला ग्रॆंड कॆनियनच्या दगडातले पट्टे, रंग पाहाताना अर्धा पाऊणतास कधी गेला कळलं सुद्धा नाही. पाचच मिनिटांत हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही माहिती केंद्राच्या दिशेने परत उडालो. पुन्हा एकदा दरीतली दृष्ये डॊळ्यात साठवत पंधरा वीस मिनिटांत माहिती केंद्रावर पोहोचलो.

त्यांचीच बस पकडून आम्ही स्कायवॊक ह्या पुढच्या मुक्कामी निघालो. कच्च्या रस्त्यावरून दोन्ही कडे ग्रॆंड कॆनियनच्या डोंगरदया पहात अर्ध्या तासात आम्ही स्कायवॊकवर जाऊन पोहोचलो. बसमधून जातानाच आम्हाला ड्रायव्हरने इगल पॊईंटची माहिती दिली आणि दूरवरून तो दाखवलाही, येताना बघू म्हणून आम्ही तिथल्या माहिती केंद्रावर पुन्हा स्कायवॊकबद्दल माहिती घेतली आणि आमच्या कडच्या बॆगा, कॆमेरे लॊकर मध्ये ठेवून स्कायवॊकच्या रांगेत उभे राहीलो.

स्कायवॊक आहे तरी काय?
ज्यांना ग्रॆंड कॆनियन उतरण शक्य नाही किंवा उडत्या पक्षाला कशी दिसत असेल ही घळी हे बघायचं झालं तर काय करावं लागेल असा एक विचार ग्रॆंड कॆनियनच्या नियमित पर्यटकाच्या मनात आला आणि त्यातून स्कायवॊक संकल्पनेचा उदय झाला. घोड्याच्या नालेच्या आकाराचा संपूर्ण काचेतून बनवलेला हा स्कायवॊक कॆंटीलिव्हर सारखा उभ्या सुळक्यातून साधारण २० मीटर बाहेर काढलाय. इगल पॊइंटच्या जवळच त्याची जागा निवडलेय. दरीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर बांधलेला असून त्याच्या किनायांवर काचेवर थोडी काजळी दिलेय, उद्देश हा की इतक्या खोल बघून कुणाला चक्कर आली तर आधार मिळावा :-) खालचा बेस तसेच बाजूच बांधकाम काचेचं असून बेस दोन इंच जाडीच्या काचेचा आहे आणि खाली आपल्या पायाशी पाहिलं तर दिसते खोल दरी, आरपार. अगदी जसं आपण दरीत उभे आहोत आणि आकाशात चालतोय. स्कायवॊक बांधायला तीन वर्ष लागली. २८ मार्च २००७ मध्ये तो लोकांसाठी खुला करण्यात आला. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी त्यावर चालणाया पहिल्या माणसात होता सुप्रसिद्ध अंतराळवीर एड्विन ऒड्रीन (हाच मानव, ज्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं). त्यापूर्वी स्कायवॊकवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. आठ रिष्टर स्केलचा भूकंप स्कायवॊक सहन करु शकतो. वेगवेगळ्या दिशेने येणारे १०० मैल वेगांचे वारे सुद्धा स्कायवॊक झेलू शकतो. ७० टन म्हणजे साधारण आठशे लोकांच वजन स्कायवॊक घेऊ शकतो (प्रत्यक्षात एकावेळी २०० पेक्शा जास्त लोकांना स्कायवॊकवर प्रवेश दिला जात नाही.) पर्यटकांकडून काचेवर ओरखडे येऊ नयेत म्हणून अतिशय काळजी घेण्यात येते, त्यांना स्कायवॊकवर जाताना बुटांवर चढवायला प्लास्टीक कव्हर देण्यात येते जेणेकरुन काचेवर पाय घसरणार नाही. स्कायवॊक बांधायला ३१ दशलक्ष डॊलर्स खर्च आला असून आता तो पर्यटकांसाठी अप्रूप बनला नसेल तरच नवल. स्कायवॊक बांधल्यापासून वेस्ट रीमला भेट देणाया पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढलेय आणि हुलायपानसाठी ते उत्तम मिळकतीच साधन ठरतय, त्याचा त्यांना वेस्ट रीमच्या इतर व्यवपस्थापनासाठी फायदा होतोय. पर्यावरणवाद्यांचा मात्र असं म्हणणं आहे की संपूर्ण नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ह्या भागात आता मानवनिर्मित स्कायवॊकमुळे माणसांची वर्दळ प्रमाणाबाहेर वाढलेय आणि अर्थातच त्याचा परिणाम इथल्या निसर्गावर झाल्यावाचून रहाणार नाही.


स्कायवॊकच्या रांगेत त्यांनी दिलेली कव्हर्स आम्ही बूटांवर चढवली आणि स्कायवॊकवर गेलो. आत प्रवेश करताच वरती खुले आकाश, आणि खाली काच. काचेवरून चालत पुढे जातोय तोच पायाखालची जमिन सरकणे म्हणजे काय ह्याचा अनुभव आला :-) पावलांखाली खोल दरी, आज मैं उप्पर आसमा निचे अशी स्थिती. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे दगडांचे पट्टॆ घळीत सगळ्याच बाजूना दिसत होते. वाराही चांगला सुटला होता इथे. पंधरा वीस मिनिटे वेगवेगळ्या कोनांतून ग्रॆंड कॆनियन बघून आम्ही स्कायवॊकवरुन बाहेर पडलो. स्कायवॊकवर कॆमेरा न्यायला परवानगी नसली तरी व्यवस्थापनाचे फोटोग्राफर तुमचा फोटॊ काढून देतात. अर्थात तुम्ही नीट पोझिशन देणे आवश्यक आहे, आजूबाजूस काचच असल्याने वेडेवाकडे रीफ्लेक्शन येऊन मजेशीर फोटो येतात, तुम्ही हवेत तरंगत आहात असे :-) बाहेर पडून आम्ही बाजूलाच इगल पॊईंट कडे गेलो.
डोंगरात दगडांनी पंख पसरलेल्या गरुडाचा आकार घेतल्याने ह्या पॊईंटला असं नाव पडलं, त्याचे तसेच तिथून दिसणाया स्कायवॊकचे फोटॊ काढून आम्ही जेवणासाठी उपहारगृहात गेलो.

थोडी विश्रांती घेऊन आम्ही वेस्ट रीमच्या शेवटच्या पॊईंटवर जाण्यासाठी बस पकडली. हुलायपीयन संस्कृतीची ओळख होण्याच्या दृष्टीने त्यांनी तिथे एक पॊईंट बांधलाय. तिथूनही ग्रॆंड केनियनच विहंगम दृष्य दिसतं.

पुन्हा एकदा आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दगडांत फेरफटका मारला, ऊन तर होतच आणि परतिसाठी वेस्ट रीमच्या मुख्य माहिती केंद्रावर जाणारी बस पकडली. पंधरा वीस मिनिटांत मुख्य माहिती केंद्रावर पोहोचलो आणि तिथून वेस्ट रीमच्या व्यवस्थापनाची आम्हाला हमरस्त्यावरील आमच्या बसपाशी सोडणारी बस पकडली. पुन्हा त्या कच्च्या रस्त्यावरून साधारण १८ मैल, २५-३० मिनिटे प्रवास करुन आम्ही आमच्या बस पर्यंत पोहोचे पर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. ह्या पूर्ण वेस्ट रीममध्ये वेगवेगळ्या पॊईंट्स वर काम करणारी माणसे, सुविधा ह्या सगळ्यांचा खर्च पर्यटकांकडून मिळणाया पैशातूनच करावा लागतो. इथपर्यंत पाईपलाईन वगैरे नसल्याने पाणी सुद्धा जपूनच वापरावे लागते. इतक्या लांबपर्यंत वीज, बांधकामाचा माल, खाण्याचे सामान, कच्चा-पक्का माल पोहोचवणे ह्या प्रत्येकासाठी खर्च येतोच. ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर वेस्ट रीम इतके महाग का आहे, ह्याचा अंदाज येतो.

पुन्हा लास व्हेगास रात्र --
समर असल्याने अगदी आठ-साडेआठ वाजेपर्यंत्न स्चच्छ उजेड. त्यामुळे ग्रॆंड कॆनियनच्या परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा हूवर डॆम नीट पहायला मिळाला आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही सर्कस सर्कस मध्ये आमच्या मुक्कामी पोहोचलो. हॊटेलवर तासभर विश्रांती घेऊन लास व्हेगाजच्या रात्रीचा जल्लोष अनुभवायला पुन्हा बाहेर पडलो. लास व्हेगाज स्ट्रीपच्या मुख्या रस्त्यावर चालत आम्ही दोन्हीकडचा झगमगाट अनुभवत होतो. बॆलिज होटेल मध्ये आज आम्ही ’ज्युबिली’ शो ची तिकीट काढली होती. वाटेवरच आम्हाला रीयोज हॊटेलबाहेर चाल्लेला चकटफू शोज थोडा पहायला मिळाला, तिथला रस्ता खच्चून भरला होता, वाट काढणे मुश्किल. हवेत जाणवण्या इतपत उष्मा होता. त्या झगमगाटातून वाट काढत दहा वाजेपर्यंत आम्ही बेलिज कॆसिनोमध्ये पोहोचलो. कॆसिनोजमध्ये थोडा फेरफटका मारला, थोड्या स्लॊट मशिन्सवर हरण्याचा आनंद घेऊन :-) आम्ही तिथल्या थिएटर मध्ये जाऊन बसलो. ठरल्यावेळी म्हणजे बरोब्बर साडेदहाला शो सुरु झाला, सभागृह जवळ जवळ भरले होतं. पडदा वर करताक्षणी वासलेला आ जवळजवळ पुढचा दिड तास उघडाच होता. जागतिक दर्जाचं म्हणजे नेमकं काय हे प्रकर्षाने जाणवलं. एकमेवाद्वितीय शो. कॊरीओग्राफी, कलाकारांच टायमिंग, अचाट कसरती पुन्हा पुन्हा चकित करत होत्या. त्यात डॊयलॊग असे नव्हतेच. पूर्ण म्युझिकल ट्रीट. अप्रतिम डान्स, लुक्स, कलाकारांचा आत्मविश्वास, त्यांचा मेळ, ताकदीचे अचाट प्रयोग, वेशभूषा, केशभूषा, सेट्सची भव्यता आणि दिव्यता, प्रकाशाचा चपखल वापर आणि प्रत्येक प्रवेशाच्या सादरीकरणातलं नाविन्य, वेगळेवपण उत्कंठा वाढवत होतं. कधी संपूच नये हे अस वाटत होतं. ज्युबिलीच्या या संचात साधारण ७५ कलाकार आहेत, लास व्हेगाज मधल्या त्यावेळच्या टॊप थ्री पैकी हा एक शो, आमच्या सुदैवाने आम्हाला अनुभवता आला. बाहेर पडलो आणि टॆक्सी करायच्या ऐवजी लास व्हेगाज स्ट्रीप चालावी असा उत्साह होता. रात्रीचे साडेबारा होऊनही बयापैकी गर्दी होती रस्त्यावर. लास व्हेगास शहर रात्रीच जागते आणि दिवसा पेंगते हे खरच अगदी. तेथे रात्री दीड वाजता डेनिस मध्ये जेवून आम्ही लास व्हेगास स्ट्रीपवर तासभर चालत हॊटेल सर्कस सर्कस मध्ये पोहोचलो तर तिथे कॆसिनोमध्य बयाच गर्दीत गेमिंग चालू होते. निरनिराळी स्लॊट मशिन्स, पत्त्यांचे, फिरत्या चाकांचे, फाशांचे खेळ आणि ते खेळणारे/खेळवणारे/पाहाणारे हवशे, नवशे आणि गवशे, एकदम जल्लोषाचं वातावरण! रात्री दोन वाजता वरती रुम वर जाऊन झोपलो आणि सकाळी ७ ला परत सॆन फ्रान्सिस्कोकडे निघायचे असल्याने, ६ वाजताच उठलो. गेले तीन दिवस नुसते धावपळीत गेल्याने मनसोक्त कॆसिनोमध्ये खेळणं झालच नव्हतं. फिरत्या चाकावरती देशी नशीबाला आकार ही उक्ती सार्थ ठरवणाया टेबलवर तेवढ्या अर्धा पाऊण तासात खेळून आलो. चांगली गोष्ट अशी की कुठलाही खेळ तुम्हाला माहित नसेल तर समजावून सांगितला जातो, त्यात फसवणूक अशी होत नाही. लोकांना खेळण्याचा मनमुराद आनंद लुटू दिला जातो. गमतीची बाब अशी जे थोडं काही खेळलो त्यात शेवटी प्लस मध्येच राहीलो, आता लास व्हेगासची आठवण म्हणून हे कायम लक्षात राहील :-)


दिवस पाचवा (पुन्हा सॆन फ्रान्सिस्को)
सकाळी सात वाजता आम्ही सॆन फ्रान्सिस्कोच्या दिशेने निघालो. दोन रात्री सगळ्यांनाच लास व्हेगास मध्ये जागरण झाल्याने सगळेच पटापट झोपी गेलो, दरम्यान अकराच्या आसपास, ड्रायव्हरने बस टेंजर ह्या एका मोठ्या मॊल मध्ये थांबवली. वेस्ट कोस्टच्या ह्या टेंजर मॊल मध्ये रीबॊक, गॆप, नायकी, नॊटीका अशी बरीच फॆक्टरी आऊटलेट्स होती. बरोब्बर दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही दुसया टोकाच्या म्हणजे ईस्ट कोस्टच्या टेंजर मॊल मध्ये होतो त्याची आठवण झाली. दिवसभर प्रवास करून संध्याकाळी सात पर्यंत आम्ही सॆन मटिओ ह्या आमच्या मुक्कामी येऊन पोहोचलो.


संध्याकाळी माऊंटन व्ह्यू मध्ये ड्राईव्ह करुन माझ्या आवडत्या बनाना लिफ मध्ये डिनर साठी गेलो आणि तिथूनच जवळ राहात असणाया मित्रमैत्रिणींना भेटून रात्री मुक्कामी परतलो. डोक्यात दुसया दिवशीचा सॆन फ्रान्सिस्कोचा प्लान तयार होताच.

- क्रमश:

Saturday, July 4, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 2

दिवस तिसरा (लास व्हेगास)
फ्रेस्नोहून लास व्हेगास ला पोहोचण्यासाठी आज २६० मैल अंतर कापायचे असल्याने सकाळी आठ वाजता आमची बस सुटली. आज आम्ही कॆलिफॊर्निया राज्याची (गोल्डन स्टेट) हद्द ओलांडून नेवाडा (सिल्व्हर स्टेट) राज्यात प्रवेश केला. आदल्या दिवशीचा थकवा असल्याने आणि पुढचे दोन्ही रात्र आणि दिवस धावपळच असल्याने बसमध्ये सगळेच गाढ झोपी गेलो. काही तासांनी डोळे उघडले तेव्हा आम्ही रेताड आणि रुक्श वाळवंटातून जात असल्याचे जाणवले. दरम्यान हॆंस मधेमधे वेगवेगळी ठिकाणे, त्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व ह्यांची सखोल माहिती पुरवीत होताच. मे च्या तिसया आठवड्यातच एवढं रणरणतं ऊन अनुभवताना सॆन फ्रन्सिस्कोची थंडी आठवली आणि घेतलेल्या जॆकेटचे निदान इथे तरी नक्की ओझेच होणार ह्याची खात्री पटली. दुपारी जेवण उरकून आम्ही लास व्हेगास च्या दिशेने आजच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यासाठी निघालो आणि संध्याकाळी तीनच्या दरम्यान लास व्हेगास शहराजवळ पोहोचलो. लास व्हेगास जवळ आलय ह्याच्या खुणा बाहेर दिसू लागल्या होत्या, बरच काही ऐकलय, वाचलय आणि टीव्हीवर पाहिलेल्या ह्या शहराबद्दल प्रचंड अप्रूप होतं. जसजसे आम्ही शहरात आलो तसतशा खूप मोठ्या आणि भव्य इमारती दुतर्फा दिसू लागल्या. प्रत्येकीचा नखरा वेगळा, ढब वेगळी. जगातील वास्तूशिल्पांचे वैविध्यपूर्ण नमुने इथे पहायला मिळतात. आता लास व्हेगास विषयी थोडसं. लास व्हेगास ला सिन सिटी म्हणूनही ओळखलं जात. साधारण १९३१ च्या दरम्यान म्हणजे मंदी नंतर लग्गेच लास व्हेगास ला जुगार हा अधिकृत करण्यात आला. २००५ मध्ये ह्या शहराला शंभर वर्ष पूर्ण झाली. काही गंमतीशीर गोष्टी लास व्हेगास आणि तिथल्या कॆसिनोजविषयी -
१. Whatever happens in Las Vegas stays in Las Vegas असं म्हणतात. त्यामुळे कॆसिनोतून मिळू शकणारा झटपट पैसा, लफडी ह्यासाठी इथे येणायांचे प्रमाण लक्षणीय. दरवर्षी साधारण ४० दशलक्ष लोक लास व्हेगासला भेट देतात. येणारा जवळ जवळ प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कॆसिनोमध्ये खेळतोच खेळतो. इथे जॆकपॊट लागून कोट्याधीश झालेलेही कितीतरी आहेत पण ’आपल्यालाही लागेल असा जॆकपॊट’ अशा अति-आशावादी दृष्टीकोनाने कितीतरी लोकं निव्वळ जुगार खेळून नशीब अजमवण्यासाठी इथे येतात. मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकायांच्या मिटींग्ज, कॊन्फरन्सेस इतकेच काय तर कोर्पोरेट्स ट्रेनिंग्स सुद्धा लास व्हेगास मध्ये चालतात. ह्या इतक्या प्रचंड संख्येने येणाया लोकांमुळे कॆसिनोजमध्ये रोज कोट्यावधी डॊलर्सची उलाढाल चालते, बहुसंख्य कमाई ही कॆसिनोच्या मालकांचीच होते हे आलेच.
२. कोणत्याही कॆसिनो मध्ये न दिसणाया गोष्टी म्हणजे - खिडकी (म्हणजे बाहेरचा प्रकाश दिसणार नाही, उद्देश हा की खेळणायास दिवस रात्रीचे भान राहू नये), भिंतीवरील घड्याळ (पुन्हा तेच,खेळणायास वेळेचे भान राहू नये ), लहान मुले (लहान मुलांना जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी बंदी आहे) खेळणायांना अधिकाधिक जुगार खेळावा म्हणून टेबलवर स्वस्तात ड्रींक्स, खाणे ह्यांची सर्विस दिली जाते.
३. लास व्हेगास मध्ये लग्न करणे हे इथल्या तरूण तरुणींच एक मोठ्ठ स्वप्न. संपूर्ण अमेरिकेतील जनता इथे लग्नकार्यासाठी येते. तशा झटपट लग्नाच्या सोयीही कॆसिनोजमध्ये आहेत. (आठवलं का रचेल आणि रॊसने तसेच मोनिका आणि शॆंडलरने उडवलेली लास व्हेगास मधली धमाल!). लास व्हेगासमध्ये लग्नापूर्वी रक्त तपासणी करण्याची गरज नाही, प्रतिक्षा यादी पण नाही आणि अगदी मामुली फी, शिवाय वातावरणही तारुण्याच्या धुंदीत ह्यामुळेच लग्नाळूंची इथे गर्दी होत असावी.
४. लास व्हेगास स्ट्रीप हा इथला मुख्य रस्ता. साधारण तास दीड तास लागावा चालायला इतका मोठा. बरेचदा एका कॆसिनोतून दुसयात जायला टॆक्सी वापरावी लागते. अशावेळी टॆक्सी वाल्यास टीप देणे, हॊटेल वाल्यांना व्यवस्थित टीप देणे इथे अतिशय अगत्याचे आहे.
५. लास व्हेगास मधले कॆसिनोज १२ महिने २४ तास चालू असतात. करण्यासारखे काही नाही असं इथे कधी होतच नाही. केनडींची हत्या झाली तेव्हा एकदाच काही मिनिटांसाठी कॆसिनोजची झगमग थांबवण्यात आली होती, अन्यथा शंभराहून अधिक वर्षे हा जुगाराचा पसारा अव्याहत चालू आहे.

लास व्हेगास शोज बद्दल -

ह्याबद्दल खूप काही ऐकले आणि वाचले होते. मागे न्यूयॊर्कमध्ये गेलो होतो तेव्हा इच्छा असूनही ब्रॊड वे वरचे शोज पहाणे शक्य झालं नाही त्यामुळे ह्यावेळी लास व्हेगासचे शोज पहायचेच असे ठरवले होते. ब्रॊडवेज चे आणि लास व्हेगास चे शोज ह्यात तसा फरक आहे. ब्रॊडवेजच्या शोज मधून मुख्यत्त्वे त्यातील नाट्य, आर्तता, दिग्दर्शन, पटकथा, म्युझिकल्स आणि सादरीकरण ह्याचा अनुभव मिळतो तर लास व्हेगासच्या शोज मधून मुख्यत्त्वे थरार, भव्यता, शारिरीक क्षमतेचे खेळ, कोरिओग्राफी, ड्रेसडिझायनिंग, अचाट सादरीकरण ह्यांचा अनुभव मिळतो. दोन्ही प्रकारचे शोज हे जागतिक दर्जाचेच असतात. लास व्हेगासच्या शोजमध्ये आपली कला सादर करणे हे जगातल्या कुठल्याही कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी इथे येऊन कितीही मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते. लास व्हेगासमध्ये वेगवेगळ्या कॆसिनोज मध्ये असे शोज अव्याहत चालूच असतात. लास व्हेगासवर प्रेम करणायांपैकी केवळ ह्यां शोजचा आनंद लुटण्यासाठी प्रामुख्याने येणारेही कितीतरी जण आहेत. काही शोज हे खेळण्यासाठी लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देश्शाने असतात ते थोड्यावेळासाठी असून चकटफु असतात, हे शोज उभ्या उभ्याच बघायचे असतात आणि दहा पंधरा मिनिटांत संपतात. मुख्य शोज हे साधारण दिड ते दोन तासाचे असून त्यांची तिकीटे शंभर डॊलर्सपासून हजारो डॊलर्स पर्यंत असतात. असे शोज कॆसिनोमधल्या स्वतंत्र थिएटर्स मध्ये होत असून कॆमेरा नेण्याची आणि मोबाईल किंवा कुठल्याही साधनाने फोटो काढण्याची तिथे परवानगी नाही.

लास व्हेगास मध्ये बहुसंख्य ठिकाणी तळात प्रशस्त कॆसिनॊज असून वरती ४०-५० मजले राहाण्याची हॊटेल्स आहेत. आम्ही सर्कस सर्कस ह्या प्रसिद्ध कॆसिनो मध्ये उतरलो होतो. इथे बसमधून येताना लास व्हेगासची झलक पहायला मिळाली होती पण बाहेर ऊन असल्याने उकाडाही होताच आणि दिव्यांचा झगमगाट सुरु झाला नव्हता. हॊटेलमध्ये फ्रेश होऊन लास व्हेगास फिरण्यासाठी आम्ही लगेचच बाहेर पडलो. सुदैवाने गो टू बसने आमची काही लास व्हेगास कॆसिनो फिरण्याची आणि काही चकटफु शोज बघण्याची सोय केली होती.

पलॆशियो मधला सायंकाळचा देखावा, तिथलाच व्हिनस शो, सीझर्स मधला अटलांटीसचा शो, बाहेरचा डोकं नसलेला पुतळा, पॆरीसच्या आयफेल टॊवरची प्रतिकृती बघत आम्ही पुढे निघालो. बलॆशियो बाहेरचा पाण्याच्या कारंज्यांचा म्युझिकल शो म्हणजे श्रवणीय आणि प्रेक्षणीय आनंद होता. आमच्या दोन रात्रीच्या वास्तव्यात लास व्हेगास मध्ये असणारे सर्वोत्तम शोज कोणते ते आम्ही शोधले आणि त्याप्रमाणे ’आईस’ आणि ’ज्युबली’ ह्या दोन दिवसांच्या शोजची तिकीटे खरेदी करून ठेवली. आठ वाजता आम्ही रीव्हीयेरा ह्या कॆसिनोमध्ये ’आईस’ ह्या शोसाठी त्यातल्या थिएटरवर जाऊन पोहोचलो. पुढचे दोन तास कमनीय आणि वेगवान हालचालींच्या अत्युच्च दर्जाचे प्रदर्शन अविरत चालू होते. बर्फाच्या लादीच्या स्टेजवर स्केटींग करत कसरतपटू रशियन सर्कस सारखे प्रयोग दाखवत होते. वेग, आवेग, तोल ह्यांचा वापर थक्क करणारा होता. वर्ल्ड क्लास म्हणजे काय ह्याचा प्रत्यय आल्यावाचून राहिला नाही. निव्वळ अफलातून कसरतीं शिवाय एकूण कॊरिओग्राफी, ड्रेस डिझायनिंग, प्रयोगाचे दिग्दर्शन, सिक्वेन्सिंग, कला/ मिमिक्री सादर करणायांचे टायमिंग, स्टेज सगळेच अत्युच्च! थिएटर मधून भारावून बाहेर आलो आणि कॆसिनोमधून चालत रस्त्यावर बाहेर पडलो तर डोळे दिपवणारा झगमगाट लास व्हेगास स्ट्रीपवर सुरु झाला होता. निऒन लाईट्स नी आणि मोठमोठ्या जाहिरातींच्या हॊर्डींग्जनी, झळकत्या दिव्यांनी टाईम स्क्वेअरच्या धुंदीची आठवण झाली. ’अभी तो रात जवा है’ अशा उत्साहात लोकांचे जथ्थे लास व्हेगास स्ट्रीपच्या रस्त्याने फिरत होते. तेथेच थोडं फार फिरून आणि कॆसिनोज मध्ये टाईमपास करत दुसया दिवशी ग्रॆंट कॆनियनला जायचे असल्याने रात्री साडे बारा पर्यंत आम्ही हॊटेलवर परतलो.

- क्रमश:

Thursday, June 25, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग १

ईस्ट कोस्टवरच्या मर्टल बीच वरून परतेपर्यंत एकीकडे पश्चिम किनायावरच्या सुट्टीचे आणि भटकंतीचे प्लान्स तयार होत होते. २५ च्या लॊंग विकेंडला धरुन साधारण दहा दिवसांची ट्रीप आम्ही आखत होतो. आमच्या बयाच मित्रमैत्रिणींनी ह्या ट्रीपविषयी आणि प्लानिंग विषयी विचारल्याने त्याबद्दल थोडं इथे लिहीण्याचं ठरवलय. कुठेही फिरायला जाण्याचा विचार करण्यापूर्वी तिथे नेमकं आपण कशासाठी जात आहोत हा विचार आधी करण आवश्यक आहे (पु,ल. नी ’म्हैस मध्ये कोकणाच्या प्रवासात मी इथे का आलो असा विचार करत हळहळ व्यक्त केलेय म्हणून म्हटलं आपण सुधारावं! ;) ). कधी कोणाला फक्त भेटायला म्हणून तर कधी धार्मिक स्थळास भेट म्हणून, कधी निव्वळ विश्रांती किंवा हवापालट म्हणून तर कधी इथल्या पार्कांमध्ये मानवनिर्मित अचाट प्रयोग अनुभवण्यासाठी तर कधी निसर्गाची भव्य आणि दिव्य रुपे बघत अचंबित होण्यासाठी आपण फिरतो. मीना प्रभूंसारखं भेट देणाया भागाबद्दल विस्तृत वाचन करणं जरी शक्य नसलं तरी इंटरनेटच्या कृपेने बरीच माहिती मिळू शकते. ही माहिती वाचून आपल्याला त्यातलं काय बघायचंय, कसं बघायचय, किती प्रवास स्वतः करायचाय, कुणाला भेटायचय हे सगळं नोंदवलं आणि सुसंगत केलं की झालं प्लानिंग. प्रवास जास्तीत जास्त आरामदायी आणि आनंददायी असण्याकडे आमचा कल होताच. पश्चिम किनायावर राहाणाया बयाच मित्रमैत्रिणींकडून मूलभूत माहिती मिळाली होती त्याचा फायदा झाला. लॊंग विकेंड असूनही तीन महिने आधी बुकींग केल्याने सुदैवाने आम्हाला विमानाची तसेच इतर सोयीची तिकीटे मिळाली.

पूर्वतयारी
१. फ्लाईट टिकीट्स -मागच्यावर्षी ईस्ट कोस्ट फिरायला जाताना डॆलास वरून व्हर्जिनियाला विमानाने गेलो होतो आणि परतलो न्यू जर्सीवरुन. ही अशी वन वे फ्लाईट्स थोडी महाग पडली तरी वेळेच्या बचतीच्या दृष्टीने आणि प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी पडतात, दगदगही कमी होते. ह्यावेळी सुद्धा कोलंबिया ते सॆन फ्रान्सिस्को आणि लॊस एंजिल्स ते कोलंबिया अशी वन वे टिकीट्स काढली होती.
२. प्रवासी कंपनी टीकीट्स -
बरीच शोधाशोध केल्यावर आम्ही’ ’गो टू बस’ ह्या प्रवासी कंपनीची निवड केली. प्रवासी कंपनीचा विचार करण्याची कारणे म्हणजे
अ. कमी वेळात अधिक ठिकाणे पहाता येणे
ब. सोबत असलेल्या गाईड द्वारे अधिक आणि अचूक माहिती मिळणे
क. ह्या स्थळांना भेट देणे हे मुख्य प्रयोजन (तिथे काही दिवस/रात्र राहून एखादे ठिकाण एक्स्प्लोअर करावयाचे असा विचार नव्हता)
ड. प्रवास आरामदायी व्हावा आणि दगदग होऊ नये, जेणे करून वेळेची आणि श्रमांची बचत होईल
इ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास व्हेगाज ला सगळी मजा रात्रीच अनुभवायची असल्याने दिवसा गाडीत विश्रांती होईल आणि रात्री कॆसिनोज मध्ये फिरायला उत्साह राहील असा विचारही त्या मागे होता. तसेच नेवाडाच्या रुक्ष वाळवंटातून उन्हातून गाडी हाकताना होणारी दमछाक, नको तितका डोळ्यांवर येणारा आणि वाळूकणांवरून परावर्तित होणारा प्रखर सूर्यप्रकाश हे टाळायचं असेल तर बसचा प्रवास हा मार्ग सगळ्यात उत्तम होता.
त्यांच्या साईट वर विविध प्रकारची पॆकेजेस गोटू बस ने दिली आहेत, त्यांविषयी माहिती http://www.gotobus.com इथे पहाता येईल. आम्ही सॆन फ्रान्सिस्को, योसेमिटी, लास वेगास, ग्रॆंड कॆनियन (वेस्ट रीम) असं चार दिवसांच प्रवासी पॆकेज निश्चित केलं होतं.
३. एमट्रॆक टिकीट्स -
सॆन फ्रान्सिस्कोवरुन लॊस एंजल्सला येण्यासाठी ’स्टार लाईट’ ह्या निसर्गसौंदर्याने परिपूर्ण अशा कोस्टल रेल्वे लाईनची आम्ही निवड केली. एक महिना आधीच बुकिंग केल्याने आम्हाला एक स्वतंत्र केबिन वाजवी दरात बुक करता आली.
४. स्थानिक आकर्षणांची टिकीट्स -
सॆन फ्रन्सिस्को सिटी टुर्स तसेच स्थानिक फिरणाया ठिकाणांची तिकीटे आधीच काढल्यास पुष्कळदा स्वस्त पडतातच शिवाय वेळही वाचतो.
५. कार रेंटल आणि हॊटेल रेंटल -
तुमचं वेळापत्रक ठरलं की हे सुद्धा वेळेवर करण महत्त्वाचं आहेच. (तुमच्याकडे AAA चे सभासदत्व असेल तर दरांत थोडी फार सूट नक्कीच मिळते.)

विमान, रेल्वे आणि वर म्हटलेल्या सर्व प्रकारच्या तिकीटांची एक फाईल करून बरोबर ठेवली होती. त्याच फाईल मध्ये संपूर्ण दहा दिवसांचे ढोबळ वेळापत्रक, ज्या ठिकाणी जायचय त्यांचे पत्ते, फोन नंबर एकत्र करून ठेवले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे मॆप्सही मॆपक्वेस्ट वरुन घेऊन फाईलमध्ये ठेवले होते. जीपीएस जवळ असला तरी न जाणॊ ऐनवेळी गडबड नको. शिवाय अनोळखी ठिकाणी प्रवासापूर्वी रस्त्याचा साधारण अंदाज असलेला केव्हाही चांगला.

दिवस पहिला (कोलंबिया ते सॆनफ्रान्सिस्को):
शुक्रवारी संध्याकाळी कोलंबिया एअरपोर्टवरून आम्ही निघालो आणि अटलांटाला कनेक्टींग फ्लाईट पकडून रात्री सॆन फ्रान्सिस्कोला पोहोचलो. प्रवास जरी सहा सात तासांचा असला तरी वेळेच्या फरकामुळे पोहोचेपर्यंत रात्रीचे साडे नऊच झाले होते. एअरपोर्टवरून बाहेर रस्त्यावर येताच पहिल्यांदा जाणवलं ती सॆन फ्रान्सिस्कोची थंड आणि प्रसन्न हवा :)

दिवस दुसरा (योसेमिटी नॆशनल पार्क):शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता सॆन मटीओ येथून गो टू बस कंपनीच्या बसने आम्हाला घेतले. बस (व्होल्वोसारखी) चांगली ऐसपैस आणि वातानुकूलित होती. शिवाय त्यात मागे रेस्ट रूमही होती. बसच्या काचा मोठ्या असल्याने बाहेरच्या गोष्टी बघणे सहज शक्य होते. आमच्या बरोबर प्रवास करणायांपैकी बहुतेक जण अमेरीका फिरायला आलेले एशियन होते. त्यात बरेचसे चायनीज आणि थोडेफार भारतीयही होते. सॆन मटिओ वरुन बसने माऊंटन व्ह्य़ू मधून चक्कर मारून सिस्को, ऎप्पल ह्या अव्वल दर्जाच्या कंपन्यांच्या मुख्यालयातून फिरवून फ्री मॊंटच्या दिशेने कूच केले. तिथून काही प्रवाशांना घेऊन आम्ही योसेमिटीच्या दिशेने निघालो. योसेमिटीला पोहोचायला आम्हाला साधारण दोनशे माईल्स अंतर कापायचे होते. दोन्हीबाजूस शेते, फळबागांमधून बस पळत होती. कॆलिफॊर्नियाचा हा शेतीसमृद्ध भाग, लांबपर्यंत पसरलेली आधुनिक तंत्रद्न्यानानी नटलेली शेते, त्यावर थुईथुई नाचणारे स्प्रिंकलर्स, अवजड यंत्रे सगळं बघत बघत आम्ही पुढे सरकत होतो. आमचा गाईड (त्याचं नाव हॆंस) प्रत्येक ठिकाणाची माहिती चायनीज आणि इंग्रजीतून देत होता. दुपारी वाटेवरच जेवण उरकून आम्ही आमचा प्रवास पुढे सुरू केला आणि योसेमिटीला साधारण दोनच्या आसपास पोहोचलो. साधारण १२२० चौ. मैल पसरलेले योसेमिटी १८९० मध्ये ’राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित झाले. अमेरिकेत एकूण अशी ६२ राष्ट्रीय उद्याने आहेत. दरसाल जास्तीत जास्त पर्यटक येणारे योसेमिटी हे तिसया क्रमाकांचे राष्ट्रीय उद्यान. स्मोकी माऊंटन नॆशनल पार्क हे नॊर्थ कॆरोलिना मधले प्रथम क्रमांकाचे असून ग्रॆंड कॆनियनचा दुसरा क्रमांक लागतो. लक्षात घेण्यासारखा फरक असा की स्मोकी माऊंटन येथे बाराही महिने चांगले हवामान उपलब्ध असल्याने, पर्यटक वर्षभरात कधीही येऊ शकतात परंतु भरपूर स्नो, खूप थंड किंवा खूप उष्ण अशा हवामानांमुळे योसेमिटी तसेच ग्रॆंड केनियन मध्ये पर्यटक वर्षातील विशिष्ट काळीच येणे पसंत करतात. प्रत्येक नॆशनल पार्कमध्ये साधारण वीस ते चाळीस डॊलर प्रवेश फी भरावी लागते. पण सिनियर्स सिटीझन्स ना अगदी मामुली दरात कुठल्याही नॆशनल पार्क मधे प्रवेश मिळतो.

मे च्या दरम्यान योसेमिटीला येण्याचा आम्ही विचार केला ह्याचं अजून एक कारण म्हणजे वरच्या डोंगरांवरचा बर्फ वितळून ठिकठिकाणी कोसळणारे विलोभनीय धबधबे ह्या वेळे दरम्यान (केवळ चार ते सहा आठवडेच) पहावयास मिळतात. त्यानंतर हा भाग वाढत्या उन्हाळ्यामुळे शुष्क होऊ लागतो. योसेमिटी दरी ही सात मैल लांब आणि एक मैल रूंद असून उंची समुद्रसपाटीपासून साधारण ४००० फूट आहे. एल कॆप्टन शिखर, हाफ डोम अशा ठिकाणी ती ८००० फूटांपर्यंत जाते. बसमधून जाताना हंस आम्हाला व्हॆलीविषयी माहिती देत होता, शिवाय मधूनच डोकावणारे धबधबे, त्यांची पर्यटकांनी दिलेली नावे, दूर दिसणारी एल कॆप्टन, हाफ डोम ची पर्वत शिखरे, त्यांवर चमकणारे बर्फ (ग्लेशियर), अगदी ’पहाता किती पाहशील दोन नयने’ होत होते.

बस ठिकठिकाणी थांबून आम्ही हजारो फूटांवरुन कोसळणारे धबधबे दोन्ही बाजूस पहात होतो. घोड्याच्या शेपटी सारखा दिसणारा हॊर्श टेल वॊटरफॊल खूप्पच छान दिसत होता. न संपणाया पर्वतरांगांमधून वळणावळणाचा रस्ता घेताना अगदी मुंबईतून देशावर किंवा कोकणात जाताना लागणाया घाटांची आठवण येत होती. मध्येच थांबून आम्ही जवळच असलेल्या ब्रिडल व्हील फॊल (Bridal Veil Fall) पर्यंत थोडं चालत गेलो आणि उभ्या सुळक्यामधून कोसळणारा धबधबा पाहिला. तेथेच बाजूला वहात असलेली मर्सिड रीव्हरही पाहिली.

रेस्ट एरियामध्ये बस थांबली आणि आम्ही जथ्थ्याने पायी फिरायला बाहेर पडलो. जवळच असलेल्या लोअर योसेमिटी फॊलपर्यंत थोडं चालत गेलो. प्रत्यक्ष धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिथे लाकडी ट्रेल बनवला आहे. तापमान साधारण ७५ फॆ च्या आसपास असावे. वळणावळणाने ट्रेलवरुन जात पाण्याच्या आवाजाच्या दिशेने सरकत आम्ही थेट धबधब्यापाशी जाऊन पोहोचलो. पाण्याचा स्त्रोत इतका प्रचंड आणि वेगात होता की मान वरुन करुन पाहाणेही शक्य नव्हते. पांढया शुभ्र पाण्याचा धबधबा जोरदार आवाज करत कोसळत होता. सगळे वातावरण मिस्टी आणि दुधाळ झाले होते. प्रत्यक्ष धबधब्याजवळ पाण्याचे थंडगार तुषार झेलत भिजण्यात (विशेषत: बाहेर इतकं जास्त तापमान असताना) विशेष मजा येत होती. थंड हवेच्या ठिकाणी असल्यासारखेच तिथे वाटत असल्याने ह्या लोअर योसेमिटी धबधब्यात भिजण्याचा हा अगदी चिंब आल्हाद दायक अनुभव! त्याच वाटेवरुन एल कॆप्टनच पर्वत शिखर दिसतं. हा म्हणजे साधारण ३००० फूटांचा अतिप्रचंड सुळका. पूर्ण ग्रॆनाईटचा बनलेला हा पर्वत सर करणे जगातील प्रत्येक रॊक क्लायंबर्सचे स्वप्न. सरासरी एवढी उंची रॊक क्लायंबिंग करून गाठायला तरबेज क्लायंबरला सुद्धा चार ते पाच दिवस लागतात. ह्या अतिविशाल दगडावर सुद्धा स्पीड क्लायंबिंग करून काही तासात जाणारे महाभाग आहेत. :-)

योसेमिटीशी माझी पहिल्यांदा ओळख झाली जेव्हा मी एका पुस्तकात हाफ डोमविषयी वाचलं. हाफ डॊमने मग कुतुहूल इतक जागृत केलं की आम्ही दोघं हाफ डोमवर ट्रेकींग करता येईल का असा विचार करू लागलो. त्या अनुषंगाने करी व्हिलेज मध्ये राहायची व्यवस्था (जवळ जवळ सहा महिने आधी बुकिंग करावे लागते), शरीराला सवय होण्यासाठी नियमित व्यायाम वगैरे तयारी करणं आवश्यक होत, One Best Hike: Yosemite's Half Dome हे Rick Deutsch चं पुस्तकही विकत घेतलं. पण मग वेळेअभावी हा विचार सोडून द्यावा लागला. ह्यामुळे दुरून का होईना पण हाफ डोम पाहाता येणार म्हणून आम्ही दोघेही उत्सुक होतो. ८८४२ फूट उंच असलेला हाफ डोम ग्रेनाईटचा बनलेला आहे. हा मुळत: पूर्ण डोंगर असून आईस एज दरम्यान बर्फाने दुभंगला गेल्याने ह्याचा अर्धा भाग कोसळला असे म्हणतात. हाफ डोम वर जाणारी हाईक साधारण १७ मैलांची असून साधारण १० ते १२ तास लागतात. प्रचंड हिमवर्षाव, पाऊस होत असल्याने ही हाईक वर्षातील चार ते सहा महिनेच शक्य होते. तसेच हाईक एकाच दिवसात पूर्ण करावी लागते त्यामुळे पहाटे लवकर निघून दुपार पर्यंत हाफ डोमवर पोहोचावे लागते. हाईकचा शेवटचा टप्पा विशेष कठीण असून केबलच्या तारांवरून जवळ जवळ ८०-९० अंशातून शरीरावर ओढून अरूंद मार्गावरून पुढे सरकावे लागते. अर्थात वर पोहोचल्यावरचे दृश्य विहंगम असणारच ह्यात शंका नाही. जगातील कुठल्याही कसलेल्या गिर्यारोहकाला सर करण्यात अभिमान वाटेल असा हा हाफ डोम. निव्वळ हाफ डोम सर करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील गिर्यारोहक अमेरिकेत आणि योसेमिटीमध्ये येतात. तर असा हा हाफ डोम डोळे भरून पाहून घेतला आणि आम्ही बसने टनेल व्ह्यू च्या दिशेने निघालो.


योसेमिटीच्या पार्कच्या कुठल्याही माहितीत सगळ्यात जास्तीवेळा वापरण्यात येणारा कुठला फोटॊ असेल तर ह्या टनेल व्ह्यू स्पॊट वरुन घेतलेला. सगळं योसेमिटी पार्क सौंदर्य उघडून उभं राहतं समोर.योसेमिटीत येणाया प्रत्येकाने आलच पाहिजे असं हे ठिकाण. डाव्या बाजूस एल कॆप्टन, समोर क्लाऊड्स रेस्ट आणि हाफ डोम हे सुळके, त्याच्या उजव्या बाजूस सेंटिनेल डोम, सगळ्यां उजवीकडे कॆटेड्रेल स्पायरस हा सुळका आणि त्याच्या मधून कोसळणारा ब्रिडल व्हील फॊल्स. त्यातून भर म्हणजे डोंगर माथ्यावर पांढया जावळा सारखं दिसणारं आणि उन्हात चमकणारं ग्लेशियर (बर्फ). अगदी पंचपक्वान्नाची मेजवानीच निसर्गाने मांडून ठेवलेय. आयुष्यभरात इतक नयनरम्य दृश्य आपण क्वचितच पाहिलं असेल असं वाटल्यावाचून राहात नाही आणि वेगवेगळ्या कोनांतून कितीही फोटॊ काढले तरी मन भरत नाही. तृप्त मनाने आम्ही योसेमिटीतून बाहेर पडलो आणि रात्रीच्या मुक्कामी फ्रेस्नो शहराकडे निघालो.

- क्रमश:

Wednesday, June 3, 2009

यह शाम मस्तानी..


स्प्रिंग सुरु झाला आणि गेले दोन महिने भटकंती सुरु झालेय. म्हटलं ऊन मी म्हणायच्या आत बाहेर पडावं, मोकळेपणे भटकून घ्यावं. ’लेक मरे’ आणि जवळपासच्या ठिकाणांवर भटकतानाच पटकन व्हर्जिनिया टेक वरुन वरती वॊशिंग्टन डीसी पर्यंत ड्राईव्ह करुन आलो, ते चेरी ब्लॊसमची धुंदी अनुभवण्यासाठी.

मे मधल्या दहा तारखेच्या विकेंडला आम्ही मर्टल बीच आणि आसपास फिरून आलो. पूर्वी साधारण २००२ मध्ये लिंचबर्ग मध्ये असताना आम्ही सगळे बॆचलर्स आलो होतो इथे. माझा हा एक अतिशय आवडता बीच ईस्ट कोस्ट वरचा. आता पुन्हा तो नव्यानेच सामोरा आला.

मर्टल बीच हे खरं म्हणजे ’फॆमिली व्हेकेशन’ म्हणून वसवण्यात आलेलं ठिकाण. सगळ्या वयांच्या माणसांना हरखून टाकतील असे त्या त्या वयातील उद्योग इथे आहेत, इतके छान की केवळ प्रत्येकासाठी तरी इथे यावच. लहान मुलांसाठी उत्तम वॊटर पार्क आहे, इतर खेळ/ पार्कही आहेतच. पूर्व किनायावरची अतिशय उत्तम शॊपिंग आऊटलेट्स इथे आहेत. नायकी, रीबॊक, हॆगर, व्हॆन हुसेन, नॊटीका, पोलो, गॆप तसेच इतर अनेक नामांकीत ब्रॆंडसची दुकानं इथे टॆंजर मॊल मधे आहेत. आम्हाला दोघांना अशी आऊटलेट आवडण्याच कारण म्हणजे चांगल्या ब्रॆंड मध्ये खूप चांगली विविधता पहायला मिळते शिवाय किंमतही बरीच वाजवी असते. मर्टल बीच परिसरात नुसतं रस्त्यानं फिरलं तरी हार्ले डेव्हीडसन घेऊन बायकींगची नशा अनुभवणारे बघितले की मस्त वाटतं. ह्या बाईकांचे (बायकांसारखेच) नखरे तरी किती, उंच हॆंडल वाली, मागे रेलणारी, लांब दांड्याची काय न काय. त्यावर बसणायांचा थाट तर विचारू नका. असं सुसाट तरुणाईने भारलेलं वातावरण बीच च्या आसपास. ह्याशिवाय इथे उत्तम गोल्फ कोर्सेसही आहेत. साऊथ कॆरोलिना हे राज्य गोल्फ साठी अतिशय सुप्रसिद्ध आहेच, इथे ऒगस्टा मध्ये अतिशय प्रतिष्टेच्या गोल्फ स्पर्धा दरवर्षी होतात. केवळ गोल्फ खेळण्यासाठी मर्टल बीचला येणारा (बयाचश्या निवृत्त) धनदांडग्यांचा अजून एक वर्ग आहे. अजून एक इथली आवडलेली बाब म्हणजे, समुद्रकिनायाला खेटूनच हॊटेल्स आहेत. हॊटेलच्या आवारात गाडी पार्क केली तर पार्कींगचा मोठा प्रश्न सुटतो. हॊटेल मधून बीच वर जायला हॊटेलच्या आतूनच रस्ता असल्याने समुद्रकिनायावर कितीही धुमाकूळ घालायला आपण मोकळेच. तिथल्या लांबच लांब समुद्रकिनायाच्या ओल्या वाळूत फिरण्यात विलक्षण मजा आहे. इथे पूर्व किनायावर अटलांटीक सीटी, न्यू जर्सीचं पॊईंट प्लेजर ते अगदी खाली मियामीचा साऊथ बीच, की वेस्ट अशा बयाच समुद्रकिनायांवर अत्तापर्यंत भटकंती झालेय. आम्हाला दोघांनाही सूर्यास्त पहाण्याचं वेड आहे. त्यावेळची ती बदलती रुपं, लाल पिवळा तेजोनिधी लोहगोल, त्याचं ते मावळतीचं तेज, संध्येच्या रंगाची उधळण आणि बघता बघता मावळणारा सूर्य, ती कातरवेळ, ते ’मावळत्या दिनकर’ चे मनात उमटणारे स्वर. दररोजचा सोहळा पण प्रत्येक वेळा नवीन रुपात, अगदी नव्या कोर्या उत्साहाने निसर्गाने मांडलेला. हे सगळं वेगवेगळ्या किनायांवरून बघायला आवडतच, इतकच काय तर एखाद्या निवांत संध्याकाळी घराबाहेरच्या तळ्याशेजारुनही सूर्यास्त खुणावतोच. ’की वेस्ट’ चा सूर्यास्ताने असंच वेडं केलय पूर्वी (त्याचा फोटॊ मी ऒरकूटवर लाईफ टाईम मोमेंट्स मध्ये ठेवलाय), बाकी ह्या इतर ठिकाणी पूर्व किनारा असल्याने समुद्रातून ’सूर्योदय’ होतो आणि ’सूर्यास्त’ किनायावर. मियामीला मुद्दाम मी असा समुद्रातून होणारा सूर्योदय टिपला होता. माझ्यासारख्या (पश्चिम किनारी) मुंबईत वाढलेल्याला हे एक अप्रूपच! (त्याच्या आदल्याच दिवशी सूर्यास्ताच्यावेळी मियामीच्या साऊथ बीच वर समुद्रावर निरभ्र विस्तीर्ण आकाशात एकावेळी दोन इंद्र्धनुष्य पाहाण्याचाही योग आला होता).


बरेच दिवस खोल समुद्रात जाऊन सूर्यास्त पहाण्याचं मनात होतं आणि मग तसं ठरवून मर्टल बीच पासून एका तासावर असलेल्या जॊर्ज टाऊन हया छोटेखानी शहरात आम्ही एक प्रायव्हेट यॆच (शिडाची होडी) बुक केली. संध्याकाळी साडेसात चा सूर्यास्त होता. साधारण साडेपाच च्या आसपास आम्ही तिथे पोह्चलो. जॊर्ज टाऊन हे इथल्या टीपीकल जुन्या, छोट्या शहरांसारखं एक मेन स्ट्रीट आणि कोर्ट स्ट्रीट सारखे एक दोन मोजके रस्ते आणि छॊटी दुकानं/ जुन्या वळणाची घरं असलेलं गाव. पटकन कुठल्यातरी गल्लीतून टांग्यात बसून साहेब येईल असं वाटावं इतकं सुबक आणि नेटकं. तिथे थोडं भटकून आम्ही लगेच बोटींचा ताफा असलेल्या किनायावर आलो. आमचा नाविक डेव्ह वाट बघत होताच. साधारण साडेसहाच्या सुमारास आम्ही तिथून एका छोट्याश्या कनू मधून किनायापासून लांब उभ्या असलेल्या शिडाच्या बोटीकडे (यॆच) निघालो. कनूवरुन त्या बोटीवर पोहोचलो आणि निवांत पसरलेलं ते अटलांटीक समुद्राचं पाणी पहाताक्षणी वेगळ्या विश्वात घेऊन गेलं. डेव्ह हा रीटायर्ड मरीन ऒफीसर. ही बोट हेच त्याचं घर. त्याच्या बायकोने आम्हाला त्या बोटीची आतून सफर करवून आणली. खाली उतरून आत जायला जिना होता, बोटीतल्या त्या तळघरात अद्ययावत सोयी होत्या. दोन बेड, किचन अगदी व्यवस्थित आणि इंटरनेटही. ही बोट हेच ह्यांच आयुष्य आणि उपजीविकेचं साधन देखील. सोबतीला एक गलेलठ्ठ बोकाही. पुन्हा वरती डेक वर येऊन आम्ही जागा घेतली आणि वायाचा अंदाज घेत डेव्ह ने शिड सोडलं. पूर्वी कीवेस्ट ला स्नॊर्कल्रिंग करताना एकदा आम्ही शिडाच्या बोटीत बसलो होतो पण आज फक्त आम्हीच बोटीवर असल्याने वेगळीच मजा होती. समुद्राचं वारं पित आणि बोटीवर आदळणाया लाटांचा मंजूळ आवाज ऐकत आमची बोट जसजशी पुढे जाऊ लागली तसतसा किनारा हळू हळू दिसेनासा झाला. बदलणारी हवा आणि त्याचा वेग ह्याचं व्यवस्थित द्न्यान असल्याने डेव्हने बोटीचा वेग आणि दिशा अचूक पकडली होती. अशा छोट्या शिडाच्या बोटींचा फायदा असा की वायावर बोट हाकली जाते त्यामुळे इंधनाची बचत, शिवाय डीझेल वापरले जात नसल्याने त्या दुर्गंधीने मळमळीचा त्रासही नाही. जसजसं सूर्यास्त जवळ येत होता तशा आमच्या गप्पा अबोल झाल्या. दिड्मुख होऊन ते क्षण आम्ही अनुभवत होतो.

लांब दिसणाया डोंगरा आड बघता बघता तो लाल गोळा खाली जात होता. असंख्य रंगाची उधाळण एव्हाना सुरु झाली होती. ते सूर्याला लपवणारे लांबचे डोंगर सोडले तर पाणीच पाणी चहूकडे असल्याने ही रंगांची उधळण कुठल्याही अडथळ्याविना अनुभवता येत होती. ’सूरमयी शाम’, ’वो शाम कुछ अजीब थी’, ’ये शाम मस्तानी’, ’संधिकाली या अशा’ अशी काय न काय गाणी आम्हाला आठवायला लागली. किती उपकार करुन ठेवलेत नाही ह्या गीतकारांनी, संगीतकारांनी आणि गायकांनी. त्या संध्याकाळचे अगदी कातरवेळेत रुपांतर होऊन संध्याछाया भिवविती हृदया अशी मनाची स्थिती होईपर्यंत आम्ही त्तो सोहळा अनुभवला, उपभोगला आणि साठवला. मावळत्या दिनकरास दोन्ही करांनी वंदन केलं तेव्हा समुद्राच्या लाटांवर अवखळपणे पसरलेल्या त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्याने आम्हाला कधी वेढलं कळलही नाही. आम्ही सगळेच अगदी निश:ब्द झालो होतो. मग डेव्हने परतीच्या प्रवासासाठी शिडाची दिशा बदलली आणि किनायाच्या ओढीने आमची बोट सरकू लागली. इथे येताना खारा वारा कितीही प्यायला तरी तृप्त वाटत नव्हत, पण जाताना तेच आता शांत, संयत आणि गंभीर वाटत होतं. त्या पिठूळ चांदण्याच्या प्रकाशातच पाण्यातच आम्ही बोटीवरून केनूवर उतरलो आणि समुद्रकिनायाकडे परतलो. तिथून पुन्हा गाडीने तासभर प्रवास करून मर्टल बीचवर. हॊटेलवर येताना लक्षात होतंच अनायसे पौर्णिमा आहे.
अतिशय शांत समुद्र आणि चमचमणारी वाळू, पिठूळ चांदण्यात आपलं सौंदर्य उघडून बसलेला तो समुद्रकिनारा अगदी हॊटेलमधून सुद्धा प्रसन्न दिसत होता. ह्यावेळचा वाढदिवस अशा भारलेल्या वातावरणात साजरा करता आल्याने हे असं कायम लक्षात राहील.


इथून परततोय तोच लग्गेचच्याच शुक्रवारी आमची पश्चिम किनायाची सफर ठरली होती. त्याच्या आखणीविषयी लिहिण्याचं बयाचं मित्रमंडळींनी सांगितलय, वेळ झाला की इथेच हातावेगळं करेन. तोपर्यंत च्याव!

Monday, March 30, 2009

Netflix rocks!!

बर्‍याच दिवसांनी लिहितोय. थंडी बरोबर तिने आणलेला थोडासा आळसही निघून गेलाय. झाडांचं रुप पालटताना बघण हा विलक्षण सुंदर अनुभव जाणवतोय इथे. थंडी ओसरतेय तसा बर्‍याच झाडांवर पांढर्‍या फुलांचा मोहोर येतोय आणि आठवड्याभरात तो गळून पडून नवीन हिरवी कंच पालवी फुटतेय. त्यात पाऊस पडला की सगळी झाडं न्हालेल्या गृहिणी सारखी तेजःपुंज आणि प्रसन्न दिसतात. एकंदर निसर्गाने अगदी उधळून बरसात केलेय इथे. आता वेळ मिळेल तशी आणि तितकी भटकंती सुरु..

कोलंबिया डायरी:
नवीन ठिकाणं, नवीन काम, नवीन माणसं ह्यात आता आम्ही छान रुळलोय. थंडी बरीचशी ओसरून आता
हवा छान झालेय. चेरी ब्लॉसम बघण्याचे तसेच भटकंतीला बाहेर पडण्याचे कार्यक्रम ठरू लागलेत.
कामाचा जोर (सुदैवाने) खूप आहे इथे आल्यापासून, वाचन बरच मंदावलय. दरम्यान नेटफ्लीक्सची व्हिडीओ लायब्ररी लावलेय (Yes! Netflix rocks!), त्यामुळे खूप चांगले चित्रपट पाहून होत आहेत सद्ध्या. काही जुने पिक्चर्स त्याच्या साईटच्या माध्यमातून चकटफु पाहाण्याचीही सोय केली आहे त्यांनी, हा त्यांचा अतिशय स्पृहणीय उपक्रम. थँक्स गिव्हींगच्या वेळी सोनी ब्रॅव्हियो घेतला (३२ इंच फ्लॅट स्क्रीन) त्यामुळे असे चित्रपट पहायला खूप मजा येतेय. तर गेल्या दोन महिन्यात पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांची ही यादी :-
Beatiful Mind
Big Daddy
Life is beautiful
Father of the bride - 1
Father of the bride - 2
Forest Gump
Finding Nemo
Ice Age
Miss Congeniality - 1
Miss Congeniality - 2
Cast Away
Honey I shrunk the kids
Not without my daughter
Phone booth
Eagle eye
The mask

डिस्ने चे चित्रपट आम्हाला दोघांनाही खूप आवडतात. ते पहाणे आहेच शिवाय फ्रेंड्स च्या सगळ्या सिझन्सची पारायणे झाली आहेत, एव्हरी बडी लव्हस रेमण्ड्स सुद्धा बघतोय आम्ही. त्यातले निख्खळ विनोद, परिस्थितीजन्य विनोद नकळत दाद घेऊन जातात.

शिवाय बावर्ची, रंगबीरंगी, रब ने बना दी जोडी असे काही हिंदी चित्रपटही पाहिले गेल्या महिन्याभरात. स्लम डॉग मिलिनेअर तर चक्क इथे थिएटरला लागला होता जवळच तर तिथे जाऊन पाहिला. माझ्या लाडक्या मुंबईला पहाताना अगदी भरून आलं (तसच काहीसं 'तारे जमीन पर' मधल्या गाण्यातली दक्षिण मुंबई डॅलसला थिएटर मध्ये बघताना झालं होतं). हो पण स्लम डॉग मिलिनेअर अंगावर आला पण पहाताना.

पाहिलेल्या ह्या प्रत्येक चित्रपटाबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे, पण वेळेअभावी ते शक्य नाही तरीही
प्रत्येक पिक्चर आम्ही अगदी छान उपभोगलाय. कधीतरी वेळ झाला, मूड लागला तर अवश्य लिहीन कुठल्या ना कुठल्या चित्रपटाविषयी, त्यातलं काय अपील झालं, रुचलं, आवडलं नाही त्याविषयी. शिवाय पिक्चर पाहून झाला की त्याचा एक हँग ओव्हर चढतो. कधी डोक्यात जातो तर कधी तरंगायला लावतो. मग आमची घरात त्याविषयी चर्चा चालते. पिक्चर पहाण्याबरोबरच अशी नंतरची चर्चा विशेष आनंददायी असते.

ह्यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा संपूर्ण पाहिला. भारतीय चित्रपटाला मिळालेले पुरस्कार पाहून ऊर अभिमानाने भरून आला. ए आर रहमान ला ऐकत आमची पिढी मोठी झालेय, त्याच्या रंगीला, बॉम्बे, दिल से वर थिरकत आम्ही शाळा कॉलेजात इतकच काय गणपतीतही नाचलोय. तो खरा जिनियस आहे, त्याला ऑस्करने मिळालेली दाद हा त्या पुरस्काराचा सन्मान आहे.

गुढीपाडव्याला ह्यावर्षीही गुढी उभारली, श्रिखंड पुरीचा बेत होता, त्यामुळे एकंदर मज्जाच..!

तुम्हा आम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखा समाधानाचे, सुरक्षिततेचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो!

Friday, December 26, 2008

सरणार कधी रण... प्रभोsssssssss

बयाच गोष्टी खूप वेळ मनात असूनही लिहायला वेळ मिळत नव्हता आणि शांतपणाही. मुंबईत अतिरेक्यांनी घडवलेलं हत्याकांड, मिडीयाचा नंगा नाच आणि राजकारण्यांचे बळी, अगदी काही दिवसात खूप उलथापालथ झाली. खूप काही वाचायला, ऐकायला मिळालं ह्या दरम्यान. आता नक्की काय झालं, का झालं ह्याचा अंदाज आल्याने लिहायच ठरवलं आज..

वयाची २२ वर्ष दक्षिण मुंबईत गेल्याने गेट वे, ताज, सी.एस.टी. सगळ्याच ठिकाणांशी माझं अतूट नातं आहे. आजही चर्चगेट, व्ही.टी., महानगरपालिका, फ़ाउंटन च्या इमारती, राजाबाई टॊवर पाहिला की माझं उर भरून येत. त्या दगडी इमारतींचा गारवा आणि भक्कमपणा अगदी नवख्या माणसास सुद्ध रोमांचित करेल. सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, रस्त्यावरचे विक्रेते, मार्केट मधे काम करणारे कामगार, मुंबई बघायला तसच तिची झिंग अनुभवायला आलेले जगप्रवासी सगळ्यांची इथे रेलचेल. अगदी सळसळत्या तारूण्यापासून वाकलेल्या काठीपर्यंत प्रत्येकाची ही मुंबई. दहा पोरसवदा माणसं बोटीने येतात काय आणि मुंबईला ओरबडतात काय, सगळं अविश्वसनीय होतं. तिथे त्यारात्री फायरींग सुरु झालं आणि दुसया मिनिटाला याहू वर बातमी आली. ही बातमी इथे सी एन एन, फॊक्स न्यूज वर पुढचे दोन दिवस ब्रेकींग न्यूज म्हणून कव्हर करत होते. बयाच अमेरीकन लोकांशी ह्यावेळी बोलताना जाणवलं की एकूणच इथल्या जनमानसात भारताविषयी आणि भारतीयांविषयी आपुलकी निर्माण होतेय. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर तुमचा आणि आमचा शत्रू एकच असं काहीसं.

साळसकरांसारखा पोलिस अधिकारी ज्याने मुंबईतलं गॆंगवॊर मोडून काढलं, कामठे, करकरेंसारखे अधिकारी मिसरूड सुद्ध न फुटलेल्या टिनपाट पोरांच्या अंदाधुंद गोळ्यांना बळी पडले हे पचवण अजूनही जड जातय. दहशतवादी हल्ला, त्यातून घडलेले राजकीय नाट्य तसेच पुढे काय ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडलेत, त्यांची उत्तरे मिळतील किंवा नाही पण प्रश्न विचारून तरी चिडचिड, विषण्णता, असहाय्यता बाहेर पडेल म्हणून हे लिहायच झालं --

१. अतिरेक्यांचा हल्ला होताक्षणी ’दक्षिण मुजाहीदीन’ कडून एका चॆनेलला मेल गेलं असं म्हटलं गेलं. प्रत्यक्षात असा ग्रूप आहे का? नसल्यास त्याचं नाव कोणी पुढे आणलं? पाकिस्तानने आपला हात झाकण्यासाठी हे खोटं पिल्लू सोडलं नसेल ना? हा धागा पोलिस खणून काढतील?

२. गुप्तचर यंत्रणा नावाचा काही प्रकार असतो हे सांगाव लागेल असा अश्लाघ्य प्रकार घडलाय. आपल्या देशाच्या सागरी सीमा सुरक्षित नसल्याने शत्रूची हिम्मत झाली आतपर्यंत पोहोचायची. गुप्तचर यंत्रणा आणि गस्तपथकाने त्यांच्या कामात कसूर केल्याने कर्तबगार अधिकायांना प्राण गमवावे लागलेत ह्याची किंमत कधीच भरून येणार नाही. हे असे पुन्हा घडू नये म्हणून सरकारने काय खबरदारी घेतली आहे? दुसरं म्हणजे गुप्तचर यंत्रणांचा हल्ली राजकीय वापर होतोय असं जाणवू लागलय. राजकारणी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, दुसयास कोंडीत पकडण्याची संधी साधण्यासाठी किंवा आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यास कोण कुठे भेटला ह्याची इत्यंभूत माहिती ठेवण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा वापरत असल्याचे दिसते. शिवाय पोलिस तपासातही राजकीय दबाव आणला जातोय. पोलिसांच्या सगळ्या नाड्या प्रशासनाच्या हाती असल्याने कर्तव्यपूर्ती म्हणजे पुढायांची हाजी हाजी असं समीकरण बनलय. जर एखादा पोलिस अधिकारी खरच प्रवाहाविरुद्ध पोहायचं धाडस दाखवू लागला तर त्याची बदली कर किंवा त्याच्या मागे विभागीय चौकशी लाव असं केल जातय. सारांश हा की पोलिस खात्यातला राजकीय हस्तक्षेप काढायला किंवा निदान कमी करायला हवा. पोलिसांना न्यायव्यवस्थेसारखी थोडी स्वायत्तता असायला हवी. हे सोप्प नाही हे मान्य पण त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असं काही करता येऊ शकेल?

३. पोलिस अपुया शस्त्रांनी लढतोय. एके-४७ शी लढायला तो प्रशिक्षितही नाही आणि शस्त्रसिद्धही. तरीही केवळ धाडस आणि शौर्याच्या बळावर तो अतिरेक्यांशी भिडला. सी.एस.टी स्थानकात पिस्तुलानिशी शिंदेनी केलेला सामना आणि चौपाटीवर ओंबाळेंनी अतिरेक्याच्या गोळ्या अंगावर झेलत स्वीकारलेलं हौतात्म्य. एखादा जीवावर उदार झालेला जिहादी अतिरेकी जिवंत पकडण्याच धाडस जे जगात कोणी करू शकलेलं नाही ते मुंबई पोलिसांनी केलं ते ओंबाळेंसारख्या शूरवीरामुळेच शक्य झालं. एफ. बी. आय., मोसाद चे अधिकारी कसबच्या जबानीतून खूप सारी नवीन माहिती मिळवत आहेत. पोलिसांना पुरेश्या शस्त्रांनी, शिक्षणाने कधी सुसज्ज करणार? आम्हाला नुसती आश्वासन नको, कृती आणि अमंलबजावणीचं वेळापत्रक हवय. दुसरं म्हणजे दहशतवादाशी मुकाबला करणारी स्वतंत्र शाखा हवी. त्यांना वेगळ्याप्रकारंच प्रशिक्षण तसेच अधिकार हवेत. दुसया विभागतल्या पोलिसांच्या इथे तात्पुरत्या बदल्या करून काम साधणार नाही. ह्या विशेष पथकातील पोलिसांकडे खास क्षमता असायला हवी. हे सगळ करायचं असेल तर राजकीय इच्छाशक्तीची आज गरज आहे. सरकार ह्याकडे प्राधान्याने लक्ष देईल का?

४. अतिरेक्यांनी गुगल अर्थ वापरून नकाशे अभ्यासले, व्ही. ओ. आय. पी. तंत्रद्न्यान वापरून फोन कॊल्स केले. आपले पोलिस दल, गुप्तहेर खाते ह्या आधुनिक तंत्रद्न्याने सुसज्ज करायलाच हवे. त्यासाठी संगणकीय तसेच आधुनिक तंत्रद्न्यान अवगत असलेले किंवा ते आत्मसात करु शकतील असे तुलनेने तरूण पोलिस तयार करावे लागतील, ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शासनाची योजना काय?

५. सामान्य नागरीकांनी दक्ष राहावं तसंच अशा काळात कसं वागावं ह्यासाठी त्यांच्यासाठी काही ड्रील्स (इथे अमेरिकेत जसे फायर ड्रील्स/ टॊर्नेडॊ ड्रील्स असतात त्यासारखे), छोटे अभ्यासक्रम ठेवता येतील का? अफवा पसरवू नयेत, तसच त्या पसरवणायांवर कडक कारवाई केली जावी म्हणून काही निश्चित उपाय योजना आवश्यक आहे. १९९३ च्या दंगली नंतर जशी मोहल्ला कमिटी बनवण्यात आली त्याचा पुढे बराच फायदा झालाय तसच काहिसं करता येणं शक्य आहे का? राज्यस्तरावर प्रशिक्षित कमांडॊजच पथक तयार ठेवण्याचा विचार स्तुत्य आहेच पण त्याही पुढे जाऊन सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं आवश्यक ठरेल. रेड क्रॊस सारखेच काही प्रथमोपचार करणारे प्रशिक्षित नागरीक आपण तयार ठेवायला हवेत. आपत्कालीन परिस्थितीत धाव घेऊन ते देवदूतासारखे काम करू शकतील. शासनाच्या, स्वयंसेवी संस्थांच्या ह्यासंदर्भात काय योजना आहेत?

६. अशा प्रकारच्या ह्ल्ल्यानंतर करण्याच्या उपाययोजना पुढे येत आहेत पण असं होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देणं अधिक महत्त्वाच आहे. आपल्या आजूबाजूस कॊण रहातय,काही संशयास्पद चालू आहे का हे सामान्य नागरीकास पोलिसांना पटकन कळवता यायला हवं. त्याला पोलिसाचा धाक किंवा कटकट न वाटता तो मित्र वाटायला हवा. नागरीक आणि पोलिसात सौहार्दाच नात निर्माण करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शासन काय करतय त्यादृष्टीने?

७. हल्ल्याचा एकंदर वृत्तांत पहात असताना एक लक्षात आलं की पोलिसांच्या कंट्रोल रुमला हल्ल्याचा अंदाज यायला वेळ लागला. त्यामुळेच नेमके किती अतिरेकी आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रे काय आहेत ह्याचा सखोल विचार न करता तीन मोठे अधिकारी एकाच गाडीतून कामा होस्पीटल जवळ गेले. क्लोज सर्किट टिव्हीवरून टेहळंणी करणारी खूप सारी पथके अविरत तयार असायला हवीत. हे सोप्प नाही ह्याची जाणीव आहे पण आवश्यक मात्र आहेच. जिथे शक्य होईल तिथे हीडन कॆमेरे लावले गेलेच पाहीजेत. सरकारी यंत्रणा यद्ययावत करण्यासाठी शासन काय पावले उचलत आहे?

८. मला आठवतय की पाच सहा महिन्यांपूर्वी सामना आणि सकाळमध्ये मुख्य बातमी होती की मुंबईला सागरी मार्गाने धोका संभवतॊ असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. असे बरेच इशारे गुप्तचर यंत्रणा देत असेलही पण (राज्य आणि केंद्र) शासनाने दुर्लक्ष का केले ह्याचं उत्तर कोण देणार? ज्यांनी आपल्या कामात बेजबाबदारपणा दाखवला त्यांना उघडं कधी पाडणार?

९. करकरे युद्धाला निघाले, त्यांनी चिलखत घातलय, हॆल्मेट घालत आहेत असं सगळं मिडीयावाले कव्हर करत होते. त्यातून नेमकं काय साधलं त्यांनी? समस्त मिडीया एक शुद्ध आचारसंहिता बनवू शकत नाही का? किंवा प्रसारभारती सारखी शासकीय संस्था बातम्या सेंसॊर करू शकत नाही का? तशी वेळ आता आलेय असं वाटतं. ब्रेकींग न्यूज मिळवण्यासाठी आणि टी आर पी वाढवण्यासाठी ह्या वाहीन्या कुठल्याही थराला जातील. ह्याच वाहिन्या सामान्य माणसाच्या बुद्धीभेदास आणि अफवा प्रसूत करण्यात आघाडीवर असल्याचं वाटतं. त्यांच्यावर चाप बसायलाच हवा ना? दुसरी धक्कादायक बाब म्हणजे वृत्तपत्रातील बातम्या. ’करकरेंची हत्या दहशतवाद्यांनी केली नाहीच?’ किंवा ’पाकिस्तानी सैन्याची सीमेवर जमवाजमव?’ अशा प्रक्षोभक बातम्या पुढे प्रश्नचिन्ह टाकून पेपरात दिल्या जातात. ह्या प्रकाराची मनस्वी चीड येते. उगाच काहीतरी पिल्लू सोडायचं आणि मग ’पेपरात आलय’ म्हणजे खरच असणार असं धरून चालणारा जो वर्ग आहे समाजात त्याची दिशाभूल करायची. बरीचशी वर्तमानपत्रे अशा बेजबाबदारीने वागताना दिसतात आणि मन अधिक विषण्ण होतं.

१०. दहशतवादी हा अतिरेकीच आहे, कुठल्याही धर्माचा का असेना. अशावेळी तो मुस्लिम असेल तर मुस्लिम संस्थानी पुढे येऊन त्याचा धिक्कार करायला हवा. हा जिहाद, ही नाहक निरपराध माणसं मारणं ही इस्लामची शिकवण नाही हे सगळ्या मुस्लिम धर्मगुरुंनी ठणकावून सांगायला हवय. तरच हे अतिरेकी एकटे पडतील. मेलेल्या अतिरेक्यांना इस्लाम धर्माप्रमाणे संस्कारीत न करता त्यांची बेवारस म्हणून विल्हेवाट लावण्यात आली तर इतरांना चांगलीच चपराक बसेल. त्यातूनच सामान्य हिंदू मुस्लिम जास्त जवळ येऊन दहशतवादी विरुद्ध भारतीय हे नवीन समीकरण तयार होईल. मुस्लिम धर्मगुरू ह्या दहशतवाद्यांना काफीर ठरवून मुस्लिम धर्मातून पदच्युत करतील काय?

११. संसदेवरील हल्ल्याला इतकी वर्षे झाली, तिथेही आपल्या प्राणांची बाजी लावून आर.एस.पी च्या जवानांनी आपल्या संसदेची लाज राखली. न्यायालयाने अफजल गुरुला दोषी ठरवून फाशी सुनावूनदेखील केवळ राजकारणाने त्याला अजून जिवंत ठेवलाय. उद्या असच कोणीतरी कंदाहारप्रमाणे विमान हायजॆक करून त्याला सोडवून नेतील आणि आपण बघत बसू. ह्याची विलक्षण चीड येतेय. पिचक्या कणाच्या ह्या राजकारणी लोकांनी देशाची सुरक्षा सुद्धा विकलेय का असं वाटायला लागतं. ह्याबातीत कितीही नाही म्हटलं तरी शिवसेनाप्रमुखांना आपण मानायलाच हवं. जिवंत पकडलेल्या कसबला त्याच सी. एस. टी. समोर किंवा ताज समोर हजार वेळा फाशी द्या अशी जरब बसवा की पुन्हा कोणी वाकडी नजर करून मुंबईकडे बघू शकणार नाही. पण मतांसाठी लाचार असलेल्या सरकारला हे जमेल काय?

१२. पाकिस्तानने फार फार कोलांट्या उड्या मारल्या आहेत ह्या संदर्भात. पुरावे नाहीत म्हणून गळे काढण्यापलिकडे ते काहीच करत नाहित. मागे पाकिस्तानची क्रीकेट टीम भारतात आली होती तेव्हा वानखेडेची खेळपट्टी उखडली होती शिवसैनिकांनी. तेव्हा शिवसेनेचं असं आंदोलन माझ्यासह सगळ्यांनाच खटकलं असलं तरी आता पाकिस्तानचा दौरा भारत सरकारने रद्द करायला लावला त्यात आपल्याला तथ्य वाटतय. शिवसेना प्रमुखांचं मोठेपण कशात असेल तर अशा द्रष्टेपणात आहे हे जाणवतं. माझही मत आधी; राजकारण, संगीत, क्रीडा ह्यात देश, धर्म आणू नये असं होतं पण आता डोक्यावरून पाणी जातय. सरकारने कडक धोरण अवलंबलच पाहिजे. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक सगल्याच पातळींवर आपण असहकार पुकारायला हवा. आपण वेळ पडलीच तर किंवा वेळ पाडूनच अतिरेक्यांचे अड्डॆ पाकिस्तानात घुसून उखडलेच पाहिजेत. भारत पाक सीमांवर तणाव निर्माण करून अफगाण तालिबान च्या सीमांवरच पाकिस्तानी सैन्य भारताच्या सीमांकडे वळवण्याचा तालिबान्यांचा प्रयत्न असेलही पण आपण केवळ राजकीय मुत्सद्दीचे, टीप्पण्यांचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यायला हवा. पाकिस्तान हे राष्ट्र दहशतवाद्यांना पोसून जागतिक भय निर्माण करत आहे हे आपण सगळ्या जगाला पटवून द्यायला हवय. तिकडे कराची चा शेअर बाजार पार ढासळलाय. पाकिस्तानातली अर्थव्यवस्था कोलमलडतेय. सामान्य लोकांची अन्नान्न दशा होण्याचा दिवस दूर नाही. सद्ध्या अमेरिका जो पैसा त्यांना पुरवतेय त्याचा त्यांना खूप आधार आहे. अजून डबघाईला गेल्यास कुरापती काढून युद्ध करण्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय दिसत नाही. युद्ध न करता त्यांची कोंडी करता आली तर आपल्याला तेही हवच आहे. संसदेवरचा हल्ला, बॆंगलोर तसेच इतर शहरांमध्ये झालेले हल्ले ह्यातून सरकारने काहीच बोध घेतलेला जाणवला नाही, आता तरी सरकार काही करेल अशी अपेक्षा करावी काय?

अशा अनेक प्रश्नांनी मी, माझ्यासारखे तरूण जर्जर आहोत. माहितीचा अधिकार असला तरी तो वापरण्याचे द्न्यान, उत्साह आणि पुढाकार घेण्याची कोणाची इच्छा नाही. पूर्वी सारखी तत्वद्न्यांनींची भाषण ऐकायला कदाचित मिळणार नाहीत पण ह्याविषयांवर लिहीणारे राजकीय मुत्सुद्यांचे, विश्लेषकांचे ब्लॊग्स मिळतील का ह्याचा शोध सुरु आहे. नुकतेच यु ट्युब वर अविनाश धर्माधिकारी यांनी केलेल्या भाषणांच्या, आवाहनाच्या चित्रफिती पहाण्यात आल्या. मनापासून आवडल्या, कोणतरी चांगलं करतोय, तळमळीने करतोय हे पाहून बरं वाटलं. रेडीफ वरचे अनेक विचारवंतांचे लेखही आवडले.

बातम्या पहाताना मला जाणवत होतं की ताज जिंकलं, ट्रायडेन मिळवलं अशा बातम्या येत होत्या. सखेद आश्चर्य वाटलं ते ह्या गोष्टीचं की आपल्या इथे घुसून अतिरेक्यांनी आपलीच वित्तहानी, जिवितहानी केली. त्यांच्याकडून आपण आपलाच भूभाग शूरवीर पोलिसांच्या बदल्यात मिळवला म्हणून जल्लोष करायचा? आपण त्यांना इतक्या सहज घुसू दिलं ह्याची आधी लाज वाटायला हवी. एखाद्या फितूरामुळे मुघलांना मिळालेला किल्ला परत मिळवताना तानाजी गेला तेव्हा राजे कसे हळहळले असतील ह्याची कल्पना येऊ शकते. अंगावर गोळ्या झेलत दोन्ही हातांनी दांडपट्टा चालवत शत्रूला एक इंचही पुढे येऊ न देणारे बाजी.. ’सरणार कधी रण..’ म्हणत तोफांचे आवाज येईपर्यंत यमाला सुद्धा थांबवणारे बाजी... आणि अतिरेक्याची बंदूक हातात पकडून ठेवून देहाची चाळण झाली तरी न कोलमडणारे ओंबाळे ह्यांच्या शौर्यात काहीच फरक नाही. असे आदर्श इतिहासाच्या पुस्तकातून तरुण पिढी पुढे यायला हवेत. ह्या पोलिसांच्या शौर्यावर प्रतिभावंतांनी पोवाडे लिहायला हवेत आणि प्रभातफेर्यांमध्ये किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये ते गौरवाने गायले जायला हवेत.

आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईचे रक्षण करणाया पोलिसांना/ सैनिकांना तसेच हॊटेलमधील, कामा रुग्णालयातील कर्मचारी ज्यांनी इतरांची सुटका केली त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. पोलिसांनी अतिरेक्यांना तिथेच रोखलं म्हणून पुढचा अनर्थ टळला ह्याची सगळ्यांना जाणीव आहेच. "भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी...." हे आज एकदिलानं मुंबई पोलिसांना, कमांडोज ना आपण सांगूया.

स्वतःच्या प्रांणांची पर्वा न करता सदरक्षणाय खलनिर्दालनाय सरसावणाया सगळ्या द्न्यात, अद्न्यात वीरांसाठी बोरकरांच्या शब्दात ही आदरांजली --

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती........

यद्न्यी ज्यांनी देऊन निजशिर
घडले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर
नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती.. !!

मध्यरात्री नभ घुमटाखाली
शांतिशिरी सम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती..
तेथे कर माझे जुळती.. !!

-------------------------------------------------------------------------------------
कोलंबिया डायरी:
कोलंबियामध्ये येऊन महिना उलटला, दोघेही स्थिरावलोय आता बयापैकी. थंडीच प्रमाण त्यामानाने कमीच दिसतय इथे, तसच अजूनही इथे हिरवी कंच झाडी आहेत, पूर्ण पानझड अजून तरी दिसत नाहीये. सकाळी बरच कुंद वातावरण असतं, अशावेळी दोन्ही बाजूंनी फांद्या झुकलेल्या दाट झाडीतून नाजूक थंडीने झाकोळलेल्या सूर्याचे कवडसे झेलत आणि कॆसेटप्लेअरवर कुमार सानू किंवा किशोरदाची गाणी किंवा मग परवीन सुलतानाची ठुमरी ऐकत जाण्यात एक वेगळीच मजा अनुभवायला मिळतेय. ऒफीस तसं १० मिनिटांच्या ड्राईव्हवरच आहे आणि वाहतूकही तुरळक त्यामुळे गाडी चालवताना वेळ कसा जातो कळतच नाही. रानडे रोड, मुंबई २८ आणि लक्ष्मी रोड, पुणे ३० इथे मिळत नाही (पु. लं. नी म्हटलय) तसच टू नॊच रोड, कोलंबिया, साउथ कॆरोलिना-२९२२३ इथे मिळत नाही असं काही नाही असं म्हणता येईल. वॊलमार्ट, टार्गेट, पोस्ट ऒफीस, सगळ्या प्रकारची हॊटेल्स, इंडियन ग्रोसरी स्टोअर सगळं सगळं इथे आहे, हाच इथला एक मुख्य रोड असल्यामुळेही असेल कदाचित, त्यामुळे एकाच फेरीत सगळी कामं होऊन जातात. एकंदर इथे जम बसायला लागलाय नवीन ओळखीही होत आहेत. शिवाय इथे अपार्टमेंट घेताना ते लेक फेसिंग (विंड्सर लेक) घेतलय त्यामुळे बाल्कनी मध्ये उभ राहून किंवा खुर्च्या टाकून तळं, त्यातली बदक, बगळे, होड्या, झाडं सगळं काही वेगळ्याच विश्वात घेऊन जातं, उन्हाळ्यात खूपच छान असेल इथे असं दिसतय.

Monday, November 3, 2008

एदिऒस डेलस..

तसं बघायला गेलं तर आम्ही कन्सल्टींग मधले सॊफ्टवेअर इंजिनिअर्स म्हणजे मुशाफ़ीरीत वाकबगारच. एके ठीकाणच काम संपलं किंवा अधिक चांगलं काम मिळालं की दुसरीकडे मुक्काम वळवणारे. त्यातूनच नविन माणसे, नविन ठिकाण, नविन अनुभव यांनी संपन्न होत जाणारं हे आयुष्य मला खूपच आवडतं. घराबाहेर पडलोच आहोत तर जग बघून घ्यावं हा हेतू कायम मनात असतोच त्यामुळे जिथे आपल्या बुद्धी आणि कष्टांच अधिक चीज होईल तेथे जाण्याकडे कल अधिकच असतो. ह्याचबरोबर आर्थिक जगतातील बद्लांचे आडाखे बांधत कामात सुरक्षितता, स्थैर्य, मोबदला ह्यात समन्वय साधायला जमणं हे देखील व्यक्तिगत आणि तितकच महत्त्वाचं.

या अवाढव्य अमेरीकेत एकूण सहा टाईम झोन आहेत आणि सगळीकडे भाषा एकच असली तरी हवामान, वाहातूक ह्यांच्याशी जुळवून घेताना दरवेळी वेगवेगळे अनुभव येतात. तरीही स्टारबक्स, डंकीन डोनट्स, वॊलमार्ट, सॆम्स क्लब, पिज्जा हट, सब वे सगळं प्रत्येक ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या कुठल्याही कोपयात गेलो तरीही एक साचेबंद जीवनमान आढळते. भारताशी तुलना केली तर हे विशेषत्त्वाने जाणवते. मुंबईच्या माणसाला पुण्याला राहायला जायचे असेल तरीही खाण्यापिण्याच्या, राहाण्याच्या आणि किराणामालाच्या खरेदी पासून सगळ्या गोष्टी नव्याने समजून घ्याव्या लागतात हा माझा स्वानुभव आहे. भारतात एका राज्यातून दुसया राज्यात जाऊन स्थायिक व्हायचे तर भाषेपासून अनंत अडथळ्यांवर मात करावी लागते (कॊस्मोपॊलिटन मुंबई पुण्यात येणारे बाहेरील लोक त्यातल्या त्यात नशीबवान म्हणायचे!). त्यामानाने इथे सगळंच सोप्प आणि साचेबद्ध आहे, आमच्यासारख्या फिरण्याची हौस असणाया जोडप्यांना खूप्पच सोप्प पडतय त्यामुळे. मर्यादित सांसारीक जबाबदयांमुळे ते सहज शक्य होतय हे ही तितकच खरं.

अमेरिकेतल्या माझ्या आयुष्याची सुरुवात लिंचबर्ग ह्या व्हर्जिनियातल्या लहानशा गावातून झाली. खूप सारे समवयीन तसेच शांतेश, अनिरुद्ध सारखे जीवाभावाचे मित्र, वॊल्डन पॊड सारखं सुंदर अपार्टमेंट कॊंप्लेक्स, शांत आणि प्रसन्न गाव. शिवाय डोंगरांच्या जवळ. काम खूप असलं तरी खूप फ़िरता आलं तिथे असताना. महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम सगळे लांब होत असले तरी मी ३-३ तास ड्राईव्ह करून जात असे. अगदी मंतरलेले दिवस होते ते. पुढचा टप्पा कॆसस मधल्या ऒव्हरलॆंड पार्कातला. सुदैवाने मुकुंद-वैशाली, उदय-गौरी ह्यांसारखे मित्र शिवाय शांतेश-सोनालीही तिथे असल्याने खूप आनंदात गेले दिवस. आमच्या कंपनीतल्या मित्रांचा खूप छान ग्रूप झाला होता, एक छोटस कुटुंबच. ह्या भागात सगळं सपाट, डोंगर दर्या समुद्र असलं काही नसलं तरी शेतं खूप. बरेच मित्र एकत्र असल्याने आणि सगळ्यांना भटकायची आवड असल्याने चिक्कार फिरलॊ. इथलं महाराष्ट्र मंडळ बर्यापैकी कार्यरत असल्याने बर्याच कार्यक्रमाना उपस्थिती लावता आली. नंतर मग न्यू जर्सी मध्ये होतो बराच काळ. तिथे ट्रफिक खूप असलं तरी एडीसनच्या जवळ राहाण्याची मजाच निराळी. कॆंसस मधे आणि मग इथे कडाक्याची थंडी म्हणजे काय ते अनुभवता आलं. मराठी विश्वच मनोहर सभागृह अगदी जवळच असल्यानं सगळ्याच कार्यक्रमाना माझी उपस्थिती असायची. शिवाय त्यांनी सुरु केलेल्या मराठी वाचनालयाचा मी पहिला सभासद होतो, ती भूकही छान भागवता आली. सेअरव्हिल्ली मधल्या तळ्याभोवतीचा दोन अडीच मैलाचा फेरफटका ही माझी विशेष आवडाती गोष्ट त्या दिवसातली. तळ्याकाठी तासंतास बसून वाचत किंवा सूर्यास्ताच्या रंगाची उधळण बघत किंवा पक्षी, फुलपाखरं पहात बसण्याची गोडी निराळीच.. मधे जेव्हा कौमुदी आणि मी न्यूजर्सी/ न्यूयॊर्क फिरायला गेलो तेव्हा मुद्दाम ह्या तळ्यापाशी घेऊन गेलो होतो तिला, असो! तर आता हे गेले सोळा सतरा महिने डेलस मधे कसे गेले खरच कळ्लं नाही. आशीष, सारीका सारखे जवळचे मित्र आणि किरण, कालिंदी सारख्या रसिक जोडप्याचा सहवास मिळाला हे आमचं अहोभाग्यच. इथून लांब गेल्यावर त्याची खरी किंमत अजून जाणवेल हे निश्चित. किरण कडची मराठी पुस्तके तसेच इथले कोजागिरी, गणपती सारखे घरगुती कार्यक्रम, क्रिकेट ह्यामुळे इथले सगळेच वीकेन्ड्स कुठे ना कुठे लागलेले असायचे. डेलास महाराष्ट्र मंडळ तसेच डेलास मेहफील ह्यांचे विशेष आभार मानायला हवेत. मेहफील ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे आम्हाला खूप साया शास्त्रीय गायकांना जवळून ऐकता आलं, ते क्षण कधीच विसरता येणार नाही.

सगळ्या ठिकाणांचा उल्लेख करताना अजून एक गोष्ट आठवते म्हणजे प्रत्येक ठिकाणची देवळे. ’जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरोनिया’ ह्या उक्तीवर दृढ विश्वास असल्याने प्रत्येक ठिकाणची देवळे हा आमच्या रोजच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनलाय. तेथे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे ह्यातून अतिशय ह्रुदय तसेच निस्पृह संबंध जोडले गेलेत. अनेक सदविचारी, सदविवेकी, विद्वान तसेच अभ्यासू माणंस मला इथूनच भेटलीत. पार्सिपेनितील इस्कॊनचे देऊळ तसेच डॆलस मधील इस्कॊनचे कालाचंदजी देऊळ मला विशेषत्वाने आवडते. न्यू जर्सी मधील ब्रिजवॊटर टॆंपल सुरेख आहेच पण तिथले उपहारगृह विशेष चवदार आहे! :-) डेलास मधल्या एकता मंदीरातले कार्यक्रम पण विशेष उल्लेखनीय आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे सरिता गायतोंडे यांनी घेतलेले आमचे योगाभ्यासाचे वर्ग ही इथली अजून एक उल्लेखनीय बाब. तसेच देवळात वरच्या मजल्यावर एक मेडीटेशन हॊल बांधलाय. तेथे मृगांक जोशी ह्या प्रसिद्ध चित्रक्रारांनी दोन वर्षे मुक्काम करून भारतातील संत महात्म्यांची आठ आठ फूटी चित्रे रेखाटली आहेत. अक्कलकोट स्वामी, संत रामदास, संत द्न्यानेश्वर तसेच मीराबाई, जलाराम बापा, कबीर अशा बयाच संतांचा मेळाच तिथे भरलाय. अवश्य भेट देण्याचे हे ठिकाण. विठठल रखमाईची मूर्ती तसेच दत्तात्रयप्रभूंची मूर्ती हा अजून एक सुखद धक्का देवळातला. अनल आपटेंचं उत्कृष्ट जेवण ही अजून एक तिथली आवडती गोष्ट.

सुरुवातीला मला लोकं प्रश्न विचारायचे काय मग, ’अमेरिका बरी वाटतेय की भारत?’ जसजसा काळ बदलला मी इथे फिरलो, रुळलो तसा प्रश्न बदलला आता. ’अमेरिकेतल काय आवड्त मग वर्जिनिया, कॆसस, न्य़ू जर्सी की डेलस?’ असं आता विचारलं जातं. गूळही गोड, साखरही गोड, मधही गोड. मेनका, रंभा सगळ्याच अप्सरा. तुलना करून मन संकुचित करणं मला तरी अवघड जातं, अयोग्य वाटतं. जे आहे ते तसं तिथल्या निसर्गासह, माणसांसह मला आवडलं, त्यांनीच माझं आयुष्य इतकं समृद्ध केलय असं मी आज आत्मविश्वासाने म्हणू शकतोय!

’चालणायाचे भाग्य चालते’ असं म्हणतात, पुढे जायलाच हवं.. नव्याच्या शोधात, जुन्या आठवणी सुगंधी कुपित ठेवून.. मग एखाद्या निवांत संध्याकाळी त्या सुगंधी आठवणींनी उजळून जायचं.. जुन्या डायरीच्या पानासारखं.. नविन माणसं, नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आयुष्याच्या कुठल्यातरी पुढच्या अद्न्यात टप्प्यावर मग तेही जुनं ठरवित अजून पुढे, अधिक नवीन.. अधिकाधिक नवीन..

असं मनमोकळं, नाविन्याला आसुसलेल आयुष्य जगण्यात विलक्षण नशा आहे, मजा आहे! जोपर्यंत साचेबद्ध आयुष्याची अपरिहार्यता समोर येत नाहीये.. निदान तोपर्यंत तरी, पुढे जायलाच हवं, आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने!

एक राह रुक गयी तो और जुड गयी
मै मुडा तो साथ साथ राह मुड गयी
हवा के परों पे मेरा आशियाना...
मुसाफीर हू यारो, न घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है.. बस्स चलते जाना..