Wednesday, September 26, 2007

उत्सव - लाडक्या मुंबईतले

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..

पारंपारिक उत्साहात विसर्जन सुखरूप पार पडले. अर्थात तो सोहळा बघता आला नाही ह्याची हुरहुर लागलीच आहे.
मायबोलीवर गणेशोत्सव पार पडला, त्यात मी लिहिलेली ही आरती..
-----------------------------------------------------------------------------------
जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०

कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. १

लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी
तंदुल तनु मोहक उंदरावर स्वारी
गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीच्या राया.. २

परशू हाती शोभे ध्यान वक्रतुंड
सिंदुरवदना सुंदर रुळताहे शुंड
अशीच स्फूर्ती राहो किर्ती तव गाया.. ३

आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०
-----------------------------------------------------------------------------------
गणेश विसर्जनाप्रमाणेच अख्खी मुंबई दुमदुमली ती धोनीच्या संघाच्या दणदणीत स्वागताने. ८३ साली मला अंधुक आठवतय गिरगावातून खूप साया मिरवणूका निघाल्या होत्या. कालचा सोहळा हा तसा आयत्यावेळी ठरवलेला पण तरीही बराचसा सुनियोजित वाटला. धोनी आणि संघ इतकं मिळून मिसळून जवळून अभिनंदन स्विकारत होते ते छानच वाटलं. तिकडे असतो तर गेलोच असतो वानखेडेवर, त्याची थोडी चुटपुट लागलीच. तरीही स्टार माझा आणि एन. डी. टीव्ही वर बघता आलं. असो, पण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये धोनीच्या संघाने जो जिगरबाज खेळ केला त्याला तोड नाही. दैव साथ होतं पण त्याला कर्माची, मेहनतीची अचूक साथ मिळाली हे तितकच खरं. धोनीचं आणि भारतीय संघाच मनःपूर्वक अभिनंदन! ह्यातून बरेच प्रश्न सुटलेत आणि तितकेच नवीन उभे राहिलेत असं दिसतय. भारताच्या विश्वचषकातल्या पराभवानंतर जे क्रीकेटवर सावट आलं होतं (आणि जनता चक दे मुळे हॊकी कडे थोड्या प्रमाणात वळू पहात होती) ते सावट दूर होईल हे नक्की. २०-२० नक्कीच पुढे प्रसिद्धीस येणार ह्यात वाद नाही. एकदिवसीय सामन्याच्या गुणवत्तेत आणि डावपेचांत आता खूप फरक पडेल.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक मारण्याचा दिवस आता फार दूर वाटत नाही. एक दिवसीय सामन्यांच्या गर्दीमुळे जसे पाच दिवसाच्या सामन्यात साडेतीन चारच्या गतीने धावा हौऊ लागल्या आणि सामन्यांच्या निकालाची शक्यता वाढली तसा काहीसा परिणाम २०-२० मुळे एक दिवसीय सामन्यांवर होईल असं दिसतय. नवीन तरूण खेळाडू उभे रहात आहेत ही अजून एक आनंदाची बाब. धोनी च्या रुपात चांगला कर्णधार मिळतोय ही भारतीय क्रीकेटच्या दृष्टीने खूपच आनंदाची गोष्ट.
ह्यातून प्रश्न आहेत ते निवडसमितीपुढे. अचूक संघ कसा निवडायचा, आहे त्या खेळाडुंचा पुरेपूर वापर कसा करायचा (नाहीतर आय सी ल आहेच खेळाडू उचलायला) प्रशिक्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे सगळे निवड समितीला पहावे लागेल. क्रीकेट रसिकांनी ह्यातून शिकण्यासारखे म्हणजे आपल्या सदिच्छा संघाला द्याव्यात पण होम हवने करून आणि साकडे घालून अपेक्षांचे ओझे आपल्याच संघावर लादू नये आणि भावनेच्या भरात त्यांच्या मालमत्तेवर आणि शंकेखोर वृत्तीने स्वत्त्वावर हल्ले करु नयेत!
मधे एकदा न्युयॊर्क मूंबई प्रवास करताना शेजारच्या जागी साधारण माझ्या एवढाच मुलगा होता, सलिम. मी क्रीकेटचं काहितरी वाचत बसलो होतो लॆपटॊपवर आणि आमची तेव्हाच ओळख झाली. तर तो होता कराचीतून :-) तिथेच लहानचा मोठा झालेला. मुंबई कराची तशा सख्ख्या बहीणी. दोन्ही उत्तम बंदरे त्यामुळे पूर्वापार व्यावसयिक महत्व. दोन्ही शहरांना आपापल्या देशात विशेष सांस्कृतिक, राजकीय, चित्रपटविषयक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व. तसच क्रीकेट हा अजून एक समान धागा. खूप भरभरून बोललो आम्ही दोघे. एखाद्या सच्च्या पाकीस्तानी क्रीकेटप्रेमीस काय वाटतं क्रीकेटबद्दल, भारतीय टीमबद्दल आणि पाकीस्तानी टीमबद्दल हे जवळून समजून घेता आलं. ते सारं मला काल आठवलं एकदम. सलिम नक्कीच रडला असेल काल!
पण त्या शोएब मलिकने खेळात धर्म आणायला नकोच होता. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे इकडे का बरं लक्ष देत नाहीत?? भारतातला मौला उठून का बरं ह्याचा निषेध करत नाही?? सगळ्या इस्लामिंनी पाकीस्तानास पाठिंबा दिला किंवा द्यायला हवा असे म्हणताना खेळाचे धर्मयुद्ध करण्याचा गाढवप्णाच नव्हे काय? इस्लामही काय पाकीस्तानची इश्टेट आहे का? आणि सगळे जगभरातले इस्लामी पाकीस्तानी आहेत का? की तसं मुद्दाम रुजवण्याचा हा कुटील डाव आहे आणि धूर्त पणे हे पसरवायची साधलेली संधी आहे? अर्थात त्याचा बोलविता धनी कोण हे स्पष्टच आहे आणि तो धनीच स्वतःच्या जाळ्यात फसत चालला आहे दिवसेंदिवस! आय सी सी ह्या विधानांवर काही आक्षेप घेईल असं वाटत नाही! पण मनापसून चीड आली ह्याची.. अशावेळी वाटतं इथे ठाकरी पाणीच हवं!

असो तर, पाच दिवसाचा कसोटी सामना म्हणजे हर हर महादेव म्हणत घेतलेले अंगत पंगत जेवण, एक दिवसीय म्हणजे झटपट उरकलेला बुफे आणि २०-२० म्हणजे एकच स्वीट डीश किंवा थोडेसेच पण रुचकर सॆलड किंवा हलकासा स्नॆक्स. उदरभरण नोहे जाणिजे यद्न्य कर्म म्हणत ताव मारायचे दिवस गेले, ये फास्ट फूड का जमाना है भाई हेच खरं! :-)

चक दे sssssssssss इंडीssssssssssया!

No comments: