Monday, October 20, 2008

तुझे नाम नाही असा श्वास नाही..

श्री स्वामी समर्थ
अक्कलकोटच्या स्वामींसाठी लिहिलेला हा गझलेच्या अंगाने जाणारा स्तुतिपाठ 'मायबोली गझल कार्यशाळा -२' मध्ये सामील करण्यात आला होता. 'नाही' असा रदीफ घेऊन कोणत्याही वृत्तात गझल लिहिण्याचा कार्यशाळेचा उपक्रम होता.

वृत्त - भुजंगप्रयात
गण - ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
उदा. : गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा


तुझे नाम नाही असा श्वास नाही
तुम्हावीण स्वामी दुजा ध्यास नाही

असे केशरी दूध नी गोड पोळी
दिल्यावीण त्वा या मुखी घास नाही

नको वेदशास्त्रे, नको कर्मकांडे
नको ध्येय ज्याला तुझी कास नाही

अणू आणि रेणू तुवा व्यापलेला
न ब्रह्मांड जेथे तुझा वास नाही

तुझ्या पादुकांच्या वरी डोइ माझी
कुठे पाप ज्याला तिथे नास नाही

तुझा हात पाठी भिऊ मी कुणाला
भवाच्या भयाचा मला त्रास नाही

गुरु मार्ग दावी घडे मोक्षप्राप्ती
प्रशांताप्रमाणे दुजा दास नाही

- प्रशांत

Wednesday, October 15, 2008

आर्थिक अस्थैर्याचे दिवस..

यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?
अर्थः जोपर्यंत जगताय सुखात जगा, कर्ज घ्या, तूप प्या.. एकदा हे शरीर गेलं (म्हणजे मृत्यू नंतर) ते पुन्हा कुठं येणार आहे?

तर एकंदर अमेरिकेचा हलणारा आर्थिक डोलारा पहाता हे त्यांच्या इन्वेस्ट्मेंट बँक्सचे तसेच ताकदीपेक्षा जास्त कर्ज घेणार्‍यांचे ब्रिदवाक्य असायला हरकत नाही. गेल्या काही दिवसात अमेरिकेत जो आर्थिक पेचप्रसंग उभा राहिलाय तो जवळून बघता आला, समजून घेता आला. त्यावर घडणार्‍या चर्चा, विवाद, बेल आउट प्रकरण, त्याला झालेला उशीर आणि त्यादरम्यान वाढलेले नुकसान, आकस्मिक तळ गाठणारा वॉलस्ट्रीटचा बाजार आणि मग मागोमाग कोसळणारे जगभरातले बाजार असं बरच काही घडत गेलं. अचानक आयुष्याचा वेग वाढल्यासारखं झालं. इथे अमेरिकेत सामान्य माणूस सुद्धा शेअर, म्युच्युअल फंड्स यामधे गुंतवणूक करतो. बर्‍याच निवृत्ती योजना (ज्यांना इथे ४०१के म्हणतात) त्या म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक करतात. त्यामुळे ज्यांच्या मुलांची शिक्षण आहेत किंवा जी निवृत्तीच्या जवळ आली आहेत त्यांचे ४०१के प्लान्स अक्षरश: वितळत आहेत त्यामुळे ते अतिशय चिंतातूर आहेत. तसच सामान्य माणूस आर्थिक मंदीच्या चाहूलीने हबकलाय. ह्या सगळ्याचे मूळ जो सबप्राइम घोटाळा झाला त्यात तसेच भरमसाठ नफा कमवण्याच्या हावरटपणातून झाल्याचं दिसून येतय. एकामागून एक बँका कोसळण्याच कारण हेच की लघुकालीन अमाप फायदा डोळ्यासमोर ठेवून अनेकांना वाजवी पेक्षा खूप जास्त तात्पुरती सवलत देऊन, पत न बघता घरांसाठी कर्जे दिली गेली आणि ती फेडता न आल्याने कर्जे घेणार्यांनी हात वर केले, हळूहळू वसुली करणे अशक्य झाले आणि कर्जे देणार्‍या बँका स्वत: आर्थिक चणचणीत सापडल्या. ही गुंतागुंत प्रचंड मोठी होत गेली तसेच सरकारचे ह्यावर काडीचेही नियमन नसल्याने सगळीकडेच लिक्विडीटी क्रंच निर्माण झाला. क्रेडीटवर चालणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेला तरण्यासाठी पैंशांचा तातडीने पुरवठा करण्याशिवाय सरकारकडे पर्याय नव्हता. खूप खोलवर जाऊन विचार केला तर अमेरिकी समाजाच्या चैनी वृत्तीत तसेच क्रेडीट वर आधारीत जीवनपद्धतीत ह्याच अजून एक मूळ लपलय हे दिसून येतय. ह्यावर वेंकटेश यांनी स्व्देशी जागरण मंचाच्या सभेत बोलताना केलेला *हा अभ्यासपूर्ण उहापोह* खूपच आवडला. भारततील एकत्र कुटुंबपद्धती तसेच जबाबदारीने वागण्याची सामाजिक समज ह्यामुळे आपल्या इथे जी सेव्हींग्ज बेस्ड आर्थिक जिवनपध्दती आहे त्यामुळे भारतात इथल्या इतकीत बिकट समस्या होण्याची शक्यता कंमी आहे असे दिसते, अर्थात भारतापुढे गरिबी, लोकसंख्या, भ्रष्टाचार असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेतच. एकंदर काय की भांडवलशाहीची शेखी मिरवणार्‍या अमेरिकेला आज त्यांच्या तत्वाविरुद्ध जावं लागतय. सरकारला हस्तक्षेप करावा लागतोय बँकांना पैसा पुरवण्यासाठी. दुर्दैवाची गोष्ट अशी की येउ घातलेल्या निवडणुकातील दोन्ही उमेदवारांमध्ये ह्याविषयी तितकी समज आणि दूरदृष्टी दिसत नाही. आमच्या शेजारीच इथे, मेरी म्हणून एक अमेरिकन बाई राहाते. तिला आशियाई संस्कृतीचे आकर्षण आहे आणि आम्हालाही इथल्या अमेरिकन सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल बरच कळत राहात तिच्याशी बोलताना, त्यामुळे आमच्या गप्पा नेहमीच रंगतात. अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगताना ती म्हणते की अमेरिकन आर्थिक जीवन म्हणजे मोठा ब्रॉड वे शो आहे. पुढे सगळं छान, आकर्षक तुम्ही अगदी ज्याला वर्ल्ड क्लास म्हणाल असं, पण मागे तो एक मोठ्ठा घोळ आहे जो निस्तरायची कोणाचीच इच्छा नाही आणि आता तर ताकदही नाही.
ह्या सार्‍यांतून एक गोष्ट निश्चित दिसतेय. येत्या काही वर्षात नोकरकपात, बेरोजगारी वाढेल. त्याला तोंड द्यायचे असेल तर सगळ्यांनीच आपली सेव्हिंग्ज क्षमता वाढवायला हवी, अनावश्यक खर्च टाळायला हवेत. इथे महागाई जाणवण्याइतपत वाढतेय. भारताच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या इथे बाहेरच्या संस्थानी पैसा काढून घेतल्याने बाजार कोसळलाय. स्वतःच्या पायावर उभ रहायला शिकायला हवं भारताने आता. अणुकरार झाला ही भारताची जमेची बाजू. पंतप्रधान तसेच सरकारी ज्येष्ठांनी दाखवलेल्या मुत्सुदेगिरीमुळेच हे शक्य झालं ह्यात वाद नाही. तसच गुंतवणूकदारांनी बाजारातल्या सगळ्या चढ उतारांकडे बारकाईने पहायला हवं. खाली आलेला बाजार ही गुंतवणूकीची उत्तम संधी असू शकतेही. माझ्या सारखे तरूण ज्यांचे भारत आणि अमेरिका ह्या दोन्ही दगडांवर पाय आहेत त्यांच्यासाठी येता काळ विशेष कसरतीचा आहे. ह्या जागतिकरणाच्या लाटेवर स्वार होणार्‍यात आम्हीही आहोतच. लहान वयात जग बघण्याची संधी, तौलनिक आर्थिक संपन्नता, विशाल दृष्टीकोन ह्या जमेच्या गोष्टींबरोबरच वैयक्तिक, कौटुंबिक पातळ्यांवर अस्थिरता, अपरिहार्य बदल, स्थित्यंतरे ह्यातून कमालिचे वेगवान आयुष्य, रॅट रेस मधे धावण्याची वृत्ती असं बरच काही वाट्याला येतय. त्यातूनच शिकायलाही मिळतय.

डॅलस डायरी:
महाराष्ट्र मंडळाचा गणपती उत्सव छान झाला. दोन छोटी नाटकं बसवली होती स्थानिक कलाकारांनी. शिवाय जेवणही उत्तम होते अनल आपटे यांचे. इथे बर्‍याच मित्रांकडे घरगुती गणपतीला जाण्याचाही योग आला ह्यावेळी. नवरात्रात देवळात नऊ दिवस गरबा होता. काही जणांच्या घरी घट बसले होते तिथे जाऊन आरत्या, जोगवे म्हणता आले. किरण आणि कालिंदी साठये यांच्याकडे कोजागिरीचा छान कार्यक्रम झाला. पु. लं ची 'एक शून्य मी' हा त्यांनी ७४ सालच्या म. टा. दिवाळी अंकात लिहिलेला लेख मी तेव्हा वाचला. भेळ, मसाले भात, मसाला दूध, गप्पा गाणी खूपच खास झाली कोजागिरी ह्यावेळची.
आता दिवाळीची तयारी सुरु आहे. इंडीयन असोशिएशनचा, महाराष्ट्र मंडळाचा असे दिवाळीचे भरघोस कार्यक्रम आहेत.
दरम्यान येथे विजय कोपरकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. खूप आवडला. त्यांनी वसंतराव देशपांडेंच 'सावरे अज्जय्यो' हे गाणं म्हटलं ते केवळ अप्रतिम. मुलतानी, राजहंस हे सायंकाळचे राग त्यांनि आळवले. ठुमरीही खास झाली. वियज कोपरकरांच्या गायन मैफलित व्हायोलिन, पेटी, तबला ह्यावर साथ देणारे कलाकार होते ते सगळे पुण्याचे. त्यांचा पूर्ण चमूच मला वाटतं 'सीओईपी' चा. ह्याच चमूचा 'भैरव ते भैरवी' हा अजून एक कार्यक्रम इथे झाला.
दरम्यान बरेच दिवस मनात असलेली गोष्ट अचानक जमून यावी असं घडलं, ज्याला आपण योग येणं असही म्हणतो. तर इथे सौ. सरिता गायतोंडे यानी प्राणायम, योगासने ह्यांचे अभ्यासवर्ग सुरु केलेत. सुदैवाने मला तिथे सामिल होण्याची संधी मिळाली. स्वत: सरिता काकू गेले दहाहून अधिक वर्ष योग शिकत आहेत. कैवल्यधाम येथे दरवर्षी जाऊन त्या पूर्ण योगाभ्यास शिकल्या आहेत. त्यांचा पातांजली योगाचा अभ्यास आणि ते शिकवण्याच कसब वादातीत आहे. दहा सप्ताहांतांच्या ह्या वर्गाचा आम्ही पंचवीस विद्यार्थी लाभ घेतो आहोत. श्वसनमार्गशुद्धी, कपालभाती ह्या शुद्धीक्रिया, पवनमुक्तासन, मार्जारासन, व्याघ्रासन, पवनमुक्तासन, वज्रासन, चक्रासन्, भुजंगासन ही आसने, त्राटक प्राणायामाचे प्रकार आणि प्रत्येकाचे फायदे हे सगळं छान समजून घेता येतय. मुख्य म्हणजे आम्हाला प्रत्येकाला सरिताकाकूंच वैयक्तिक मार्गदर्शन मिळतय. योग्य वयात काहितरी चांगलं शिकत असल्याच खूप समाधान मिळतय.

योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलम शरिरस्यच वैद्यकेन
योपाकरोत्तम प्रवरम मुनिनाम, पाताजलिं प्रांजलिरानतोस्मि