Monday, October 20, 2008

तुझे नाम नाही असा श्वास नाही..

श्री स्वामी समर्थ
अक्कलकोटच्या स्वामींसाठी लिहिलेला हा गझलेच्या अंगाने जाणारा स्तुतिपाठ 'मायबोली गझल कार्यशाळा -२' मध्ये सामील करण्यात आला होता. 'नाही' असा रदीफ घेऊन कोणत्याही वृत्तात गझल लिहिण्याचा कार्यशाळेचा उपक्रम होता.

वृत्त - भुजंगप्रयात
गण - ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
उदा. : गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा


तुझे नाम नाही असा श्वास नाही
तुम्हावीण स्वामी दुजा ध्यास नाही

असे केशरी दूध नी गोड पोळी
दिल्यावीण त्वा या मुखी घास नाही

नको वेदशास्त्रे, नको कर्मकांडे
नको ध्येय ज्याला तुझी कास नाही

अणू आणि रेणू तुवा व्यापलेला
न ब्रह्मांड जेथे तुझा वास नाही

तुझ्या पादुकांच्या वरी डोइ माझी
कुठे पाप ज्याला तिथे नास नाही

तुझा हात पाठी भिऊ मी कुणाला
भवाच्या भयाचा मला त्रास नाही

गुरु मार्ग दावी घडे मोक्षप्राप्ती
प्रशांताप्रमाणे दुजा दास नाही

- प्रशांत

No comments: