Monday, March 15, 2010

विंदा

विं.दा. गेल्याची बातमी आली. वाईट वाटलं, पण एक समृद्ध आणि यशस्वी जीवन जगलेल्या मनस्वी माणसाला दीर्घायुष्याचं वरदान लाभलं हे समाधान होतं. पाडगांवकरांइतक्या सहजतेने मला विं.दां.च्या खूप काही कविता ऐकायला मिळाल्या नाहीत पण ज्या ऐकल्या त्यांनी अशी पकड घेतली की बस्स.. ’शुभ्र फुलांची ज्वाळा’ ही कॆसेट मला भेट मिळाली होती, त्यातल्या सगळ्याच गझला आम्हाला दोघांनाही इतक्या आवडल्या की मागच्या भारत भेटीत सीडी आणली. पद्मजा फेणाणीचा आवाज तर मस्तच, पिळवटून टाकणारा..अप्रतिम.. गझल आवडणाया व्यक्तिकडे संग्राह्य असायलाच हवी ही सीडी.

राज्यसभेत महिला विधेयक पारित झालेलं ऐकलं तेव्हा खरं तर विंदांचेच शब्द ओठावर आले आणि मागोमाग ते गेल्याची बातमी. त्यांच्याच ह्या दोन्ही गझल इथे लिहून विंदांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.










सर्वस्व तुजला वाहूनी

मागू नको सख्या रे

सर्वस्व तुजला वाहूनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहूनी ॥

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतूनी ॥

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती कांच रे, दिसतोस मजला त्यांतूनी ॥

संसार मी करीते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आद्न्या तुझी ती मानूनी ॥

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानूनी ॥

- विं. दा. करंदीकर

मागू नको सख्या रे, माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले ।।

स्वप्नांतल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग का रे, सर्वस्व वाहिलेले ।।

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू, अन हात शापिलेले ।।

स्वप्नात पाहिलेले, म्हणूनी कसे असत्य
स्वप्नास सत्य सते, सामिल जाहलेले ।।

स्व्प्नातल्या कळीला, स्वप्नात ठेवूनी जा
हे नेत्र घेउनी जा, स्वप्नांत नाहलेले ।।

जा नेर घेउनी जा, स्वप्नांध पांगळीचे
आता पहावयाचे, काही न राहिलेले ।।

- विं. दा. करंदीकर