Sunday, December 30, 2007

For here or to go?

कालचक्र हे अविरत फिरे
कुणाचे कुणावाचूनी अडे
काळ चालला पुढे
पहा हा काळ चालला पुढे..

चालल्या वर्षातील कडू गोड आठवणींसह येत्या वर्षाला उत्साहाने सामोरे जाऊया! जो जे वांच्छील तो ते लाहो अशी वैश्विक प्रार्थना करत २००८ चे जोरदार स्वागत करुया. आता ह्या ब्लॊगला एक वर्ष पूर्ण होतय. मनात असलेलं खूप काही लिहायला जमलं नाही ह्याची थोडी खंत वाटली तरी अनियमितपणे का होईना, हा उपक्रम चालू ठेवू शकलो ह्यात ह्या क्षणी समाधान आहे! लोक वाचतील, त्यातून प्रतिकीया मिळतील, हुरुप येईल म्हणून लिहीणं हा काही माझा पिंड नाही. स्वान्त सुखाय लिहीण्यारातले आम्ही, शिवाय जे जे आपणासी ठावे ते ते दुसयासी द्यावे ह्या हेतूने चार शब्द लिहायला आवडतात इतकंच. त्यातच मला खूप समाधान मिळतय आणि ते बयाच अंशी साध्य झालय हे सुद्धा जाणवू लागलय.

नुकताच उत्तर अमेरिकेच्या पूर्व दक्षिणी किनायावर भटकून आलो. प्रत्यक्ष तिथे नाही तरी विमान प्रवासात छान वेळ मिळाला. असे लांब विमान प्रवास मला आवडतात ते ह्या कारणासाठी. स्वतःसाठी छान वेळ मिळू शकतो आणि तो मला गाण्यांसाठी, वाचनासाठी राखून ठेवता येतो. भारतातून येताना ह्यावेळी बरीच पुस्तक आणली आहेत, त्यातलं अपर्णा वेलणकरांचं "फॊर हिअर ऒर टू गो?" हे पुस्तक बरेच दिवस वाचायचं मनात होतं, ते वाचून काढलं. मनापासून आवडलं. त्याबद्दल आज लिहीणार आहे थोडंसं.

पुस्तकाचे नाव: फॊर हिअर ऒर टू गो?
लेखिका: अपर्णा वेलणकर
प्रकाशक: मेहता पब्लिकेशन

कोणतही पुस्तक वाचण्या आधी मी ते चाळतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ (अगदी दिवाळी अंक असेल तर त्यावरील सुहासिनीच्या चित्रासह :-) ) बघतो. पुस्तकाची प्रस्तावना बघतो, तसच शेवटी एखाद्या सूचीतून इतर पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत का ते बघतो. ह्या सगळ्यांतून एक आकृती बंध तयार होतो मनात, पुस्तक सुरु करण्या आधी. लेखकाने किती मेहनत घेतलेय, किती सचोटीने लिहिलय ह्याचा थोडा अंदाज सुरुवातीला बांधता येतो. ह्या सगळ्या निकषांवर अपर्णा वेलणकरांचं हे पहिलं पुस्तक मला कसोटीला उतरल्याचं वाटलं. मुखपृष्ठावर अमेरिकन पारपत्राचं चित्र असून, nationality - Unitest states of America आणि place of birth - India हे ठळक अक्षरात दिसतं, ह्यावरुनच आत कशाचा उहापोह केला आहे ह्याची पूर्ण कल्पना येते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाच्या विषयाची थोडक्यात ओळख करून दिलेय. शिवाय For here or to go? हे रोजच्या अमेरिकन व्यवहारातील वाक्य, शिर्षक म्हणुन चपखल बसलं आहे. अमेरिकेत येणाया माझ्यासारख्या अनेक अनिवासी भारतीयांपुढे आपोआप येणारा प्रश्न, इथेच बसून आस्वाद घेणार की इथले सोबत घेऊन तिकडे परत जाणार? जणू काही अमेरीकन स्वातंत्र्य देवता प्रत्येक आश्रितास अपरिहार्य प्रश्न विचारत आहे "For here or to go?" आणि "ज्याचा त्याचा प्रश्न" ह्या पठडीतल्यासारखं अगदी व्यक्तीसापेक्ष उत्तर!!

चाळीस एक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दिलिप चित्रे यांनी पुस्तकाची प्रस्तावना अतिशय समयोचित आणि समर्पक केली आहे. एकूण विषयाचे स्वरूप हळू हळू उलगडत असताना लेखिकेने घेतलेली मेहनत त्यांनी स्पष्ट केली आहे. अमेरिकेत राहाणाया, इकडलं जग अनुभवलेल्या व्यक्तीची प्रस्तावना असणं का आवश्यक आहे हे वाचताक्षणीच जाणवतं.

पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी थोडं लेखिकेविषयी. अपर्णा ही व्यावसायिक पत्रकारीतेमधली. एका अमेरीका दौयात विजय तेंडुलकरांशी बोलताना तिने इथल्या अमेरिकन बोर्न मराठी मुलांविषयी अभ्यासण्यात आणि लिहीण्यात रस असल्याचे सांगताच, तेंडुलकरांनी तिला त्या आधी त्या मुलांच्या आईवडिलांच्या पिढीला समजाऊन घेण्यास सुचवले. अर्थात हा विषाय खूपसा नाजूक, कौटुंबिक असल्याने त्याविषयी पूर्ण अमेरिकेत फिरून लोकांच्या भेटी घेउन, त्यांना बोलतं करणं, सगळं मुद्देसूद लिहून काढणं, विषयानुरुप संदर्भ वेचणं, ते योग्य ठिकाणी उद्धृत करणं आणि हे सगळं करताना ते त्रयस्थ दृष्टीतून अभ्यासणं हे सगळं अपर्णाने छान पेलवलय ह्यात वाद नाही. ह्यातून तिची अभ्यासू, चिकाटी वृत्ती आणि कठोर परिश्रमच दिसून येतात.

साधारण पन्नास वर्षांपूर्वी काही धडाडीच्या तरुणांनी चाकोरी बाहेर विचार करून तसच देशद्रोहाचा शिक्का माथी मारुन घेउन अमेरीकाला येण्याचे धाडस केले. काही जणांचे परतीचे दोर कापले गेले होते म्हणून तर काही जण ह्याच परतीच्या दोरांच्या घट्ट बळावर अमेरिकेत येउन थडकले. सगळेच x = x + 1 syndrome चे बळी, आज जाऊ उद्या जाऊ म्हणत इथेच रेंगाळलेले किंवा अपरिहार्यपणे इथे राहिलेले. प्रचंड मेहनतीची तयारी, हुशारी आणि चिकाटीच्या जोरावर बयाच जणांनी व्यावसायिक यश अनुभवले, कुटुंबाची सांपत्तिक स्थिती अमेरिकेत आणि भारतातही कमालीच्या वेगात सुधरवली. त्यांच्या आयुष्यातील यशाप्रमाणेच संघर्षाचे उत्तम टिपण अपर्णाने केले आहे. ह्यापूर्वी अनेक लेखकांनी परदेश वाया केल्या पण बहुतेकांच्या मनात अमेरीका म्हणजे व्यभिचार, हव्यास हे पूर्वग्रह इतके दूषित होते की त्यापुढे त्यांना इथला मराठी माणूस आणि त्यांची मुले ही ह्याच पठडीत मोडतात असे वाटू लागले. सहाजिकच त्यांच्या साहित्यातून इथल्या मराठी पिढीविषयी असे रगेल आणि रंगेल चित्र रेखाटले गेले. ह्याचा परिणाम म्हणजे भारतातील मराठी माणूस आणि अमेरिकेतील मराठी माणूस ह्यांत एक दरी निर्माण झाली. चुकीच्या गोष्टींवर जरूर समिक्षा करावी पण आंधळेपणामुळे खोटे लिहिण्यापूर्वी विषयाचा सर्वांगीण अभ्यास करावा, इथल्या मराठी माणसास समजून घ्यावे असे कुठल्याही साहित्यिकास विशेष जमले नाही. अमेरीकेत रहाणायांचा दुस्वास म्हणून असो किंवा भारतातल्या संस्कृतीचा पोकळ अभिमान असो त्यामुळेच बहुधा असे घडले असावे. अपर्णाने ह्या सायाचा छान परामर्ष घेतला आहे.

उत्तर अमेरिकेतल्या ह्या पिढीचे व्यावसायिक यश मिळवत असताना कौटुंबिक पातळीवर होणारे झगडे वाचताना मन अचंबित होते. Internet युगा पूर्वीची अमेरिका किती दुष्कर असू शकेल ह्याची प्रचिती येते. कामातील अस्थिरता, कधी अनुभवास येणारा परकेपणा, त्यातून नोकरीत झालेले अन्याय, परिस्थिती हवामानशी जुळवणूक, माहेरवाशिणींची उलघाल, पुढच्या पिढीचा जन्म, त्यांच्यावरचे संस्कार, तिकडे मागच्या पिढीची काळजी, घराचं गाडीच mortgage, जागतिक मंदी ह्या सगळ्या आघाड्यांवर चिवटपणे झुंजणाया ह्या पिढीविषयी खूप कृतद्न्य वाटून जातं. त्यामानाने माझ्या सारख्या पाहुण्यांना अगदी red carpet मिळालं इथे यायला असं म्हणायला हरकत नाही. शिवाय इथे मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, नवीन पिढीस मराठीची आवड निर्माण व्हावी म्हणून जे उपक्रम चालू केले आहेत त्यांना तोड नाही. न्यू जर्सी मधली आंबेकरांची मराठी शाळा तसेच महाराष्ट्र मंडळे त्यांची अधिवेशने, सम्मेलने, एकता त्रैमासिक, महाराष्ट्र फाउंडेशन ह्यांसारखे उपक्रम ह्यातून देशांच्या सीमा ओलांडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे, वाढवण्याचे प्रयत्न पाहिले की मन थक्क होतं.

अमेरीकन असणं म्हणजे नेमकं काय आणि भारतीय असणं म्हणजे नेमकं काय ह्या नेहमी पडणाया प्रश्नावरील वाचनीय उत्तरे अपर्णाने ओघात नोंदवली आहेत. ह्याविषयी पुढच्या पिढीत असणारी विचारांची स्पष्टता केवळ सुखावह आहे. We are americans with our deep routes in India असं निर्भिडपणे सांगतना दोन्ही कडील चांगले ते भक्कम पकडल्याचे जाणवते. भारतातील संस्कृती आणि अमेरीकेची सिस्टीम ह्या दोहोंचा मिलाफ मागच्या पिढीने पुढे समर्थपणे दिल्याचे जाणवते. सतत नविन अधिक चांगलं करण्याची अमेरीकन सिस्टीमची प्रेरणा, संशोधनास कर्तुत्वास वाव, दिलेला मोकळेपणा, जात धर्म वंश रंग न मानता दिलेली समान संधी, going that extra one mile ह्यातली तडफ, पारदर्शी चुरस, दुसर्याची रेघ पुसून न टाकता आपली रेघ मोठी करण्यात आणि असण्यात आनंद मानण्याची अमेरिकन वृत्ती हे सगळं इथे अमेरीकेतच अनुभवायला मिळू शकतं म्हणून आज अमेरिका देश पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगभरातील माणसांची अमेरीकन दुतावासांपुढे रीघ लागतेय.

हे पुस्तक तयार करताना लेखिकेने त्यास दिलेला वेळ पुरेपूर जाणवतो. तसेच अमेरीकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मराठी मुलांची मानसिकता शोधण्याचा छोटा प्रयत्नही सॊनीयाद्वारे अपर्णाने केला आहे. एकंदर हे पुस्तक म्हणजे अनेक यशपयशांच्या अनुभवांचा ठेवा आहे.

एकच थोडीशी खटकलेली तांत्रिक गोष्ट अशी की हे पुस्तक वाचताना ते अनेक स्वतंत्र ललित लेखांचा संग्रह असल्यासारखे वाटते. त्यामुळे बरेच मुद्दे आणि संदर्भ पुन्हा पुन्हा येत रहातात.

अनिवासी महाराष्ट्रीयन मराठी ह्या विषयाचा अभ्यास करणाया आणि अमेरिकेची वाट चोखाळणाया अनेकांना ह्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग होऊ शकेल. एक चांगला आणि महत्वाचा विषय हाताळून वाचकांस वाचनीय आणि चिंतनीय खुराक दिल्याबद्दल अपर्णाचे आभारच मानायला हवेत. हा विषय महत्त्वाचा अशासाठी की तिकडे महाराष्ट्रात मराठीविषयी पालकांमध्ये आणि त्यान्वये पाल्यांमधील उदासीनता पाहून अमेरीकेतच मराठी जास्त टिकेल काय असे वाटू लागले आहे. त्याचाही थोडासा परामर्ष अपर्णाने शेवटी घेतला आहे.

मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळाला मुख्यमंत्री निधीतून पन्नस लाख रुपयांची देणगी (ते ही फक्त ह्यावेळेस नाही तर दर अधिवेशनाला) जाहीर केली. तिकडे महाराष्ट्रात वीज टंचाई, पाणी, शेतकर्यांच्या आत्महत्या इतके ज्वलंत प्रश्न असून तिथे पैसे खर्च करण्याची गरज असताना इथे दान देण्याची गरज काय हे कोडे आहे. इथला मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या सशक्त आहे उलट महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या अनेक संस्था कोट्यावधी रुपयांची आर्थिक तसेच श्रमिक मदत करताना दिसतात. ह्याउलट चलाख मोदी सरकारने अनिवासी गुजराथी लोकांकडून बरेच पैसे वळवून गुजराथकडे पैशांची गंगाजळी निर्माण केली आहे. ह्याला म्हणतात दूरदर्शीपणा आणि समाजाभिमुखता (निदान दाखवण्यासाठीतरी)!

असो, तर तुम्ही अमेरीकेतले अनिवासी मराठी असाल किंवा निवासी महाराष्ट्रीय सगळीकडून मराठीचा, महाराष्ट्राचा (पर्यायाने भारताचा) विचार आणि उत्कर्ष होताना प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य दिसते..

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.. !!

-------------------------------------------------------------------------------------
सद्ध्या to read list वरची आणखी काही पुस्तके --
पुस्तकाचे नाव: खरेखुरे आयडॊल
लेखक: सुहास कुलकर्णी
प्रकशाक: समकालीन (युनिक फीचर्स)

पुस्तकाचे नाव: खरी खुरी टीम इंडीया
लेखक: सुहास कुलकर्णी
प्रकशाक: समकालीन (युनिक फीचर्स)

Monday, October 8, 2007

जे जे उत्तम

"पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. " - नंदन

स्वातीने टॆग केलं आणि नेमकं काय निवडावं ह्यासाठी द्वंद्वच नाही तर मनात युद्धधच सुरु झालं. सुनिताबाईंचं आहे मनोहर तरी, मुग्यांची रांग बघणारा म्याड लंपन, एक शून्य मी मधले परखड पु लं. , बारोमासमधला भुकेने कासावीस शेतकरी, एक एक पान गळावया, कृष्णकिनारा, चौघीजणी, बाबसाहेंबांनी जिवंत केलेला शिवराज्याभिषेक अगदी दासबोधातली मुर्खांची लक्षणे अशी कैक लिखाणे लगेचच डोळ्यासमोर आली. माझ्या भटक्या प्रवृत्तीमुळे आणि कामाच्या स्वरुपामुळे बरीचशी असंग्रह वृत्ती बळावल्याचं जाणवतय. त्यामुळे खूप पुस्तक, कॆसेटस घेउन फिरणं अशक्यच होतं. उतारा देण्यासाठी जवळच्या पुस्तकांपैकीच काहीतरी निवडणं गरजेच झालं, शिवाय ह्या पुस्तकाचं गारूड उतरलं नाहीये अजून! ह्या पुस्तकातला अजून एक उत्तारा लिहायचं केव्हापासून डोक्यात घोळतय ते स्वतंत्रपणे लिहीनच.

-------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातले दुर्ग आणि महाराष्ट्राबाहेरचे, यांत मनस्वी अंतर आहे - उंचीच्या दृष्टीनं, अवशेषांच्या दृष्टीनं. दिल्लीला लालकिल्ला पाहात हींडत होतो. दिल्लीलाच राहाणारा एक समानशील मित्र तो किल्ला दाखवायला मज बरोबर होता, किल्ला दाखवून झाल्यावर तो क्षण थांबून म्हणाला,
"दांडेकरजी, एक सवाल पूंछू?"
"जी हां, विना संकोचसे!"
"आप दुर्गभरे देशसे आ रहे है! यह हमारा किल्ला भी आपने देखा! क्या इनकी तुलना कर सकेंगे?"
"क्यों नही?"
"तब फिर शुरु किजिये!"
"पहले आपके इए किले के बारे मे बताउं! जैसा कोई अमीर हाथों मे चमेली की मालाए पहने, आंखोमे सुरमा लगाए, तकियेसे सटकर किसी तवायफ का मदभरा गाना सुनने बैठा हो - आपका यह किला वैसा सुहावना है!"
प्रसन्न होऊन तो म्हणाला,
"क्या कही, दांडेकरजी! वाकई आप उपन्यासकार है! ही अब इसके साथ आपके किलोंके बारे मे ---"
"अजी जाने दिजीये! मेरे देशके किलोंकी तुलना इस लाल किलेके साथ नही की जा सकती!"
"भई क्यो?"
"सारे बदनमे अरंडी का तेल लगाये कोई दो तगडे मल्ल हाथमे वज्रमुष्टी लिये एक एकेक साथ झूंज रहे हो, सारा बदन लहुलूहान हो गया हो, मेरे देश के गिरीदुर्ग देखनेपर इस दृश्य का स्मरण होता है!"

उत्तरेतले बहुतेक सगळे किल्ले -- त्यातील अवशेषांवर दुर्लक्षांमुळं काळाची पावलं उमटली, ती वगळता अजून जसेच्या तसे आहेत. त्यातले कक्ष, अट्टालिका, प्रासाद, गुसलखाने, दीवान-इ-आम, दीवान-इ-खास, कारंजी, इमामखाने - सगळं सगळं अजून दाखवता येतं. आमच्या गिरिदुर्गांची मूळ बांधणीच काळ्या कुळकळीत दगडांची. उपयुक्ततेकडे लक्ष अधिक, सौंदर्याकडे कमी. त्यांत आद्न्यापत्रामध्ये मुद्दाम आदेशच देवून ठेवला आहे.

---गडाची इमारत गरजेची करू नये. गडावरी राजमंदिराविरहीत थोर इमारतीचे घर बांधो नये.
कारण कुणालाही कळू शकतं. सगळा बेभरवशाचा काळ. केव्हा किल्ला शत्रूच्या हाती जाईल, त्याचा भरवसा नाही. तेव्हा विनाकारण खर्च करून महाल उठविले, अन उद्या ते शत्रूनं जिंकून घेतले, म्हणजे?

एकतर बहुतेक सगळ्या इमारती गरजेपुरत्याच बांधलेल्या. कुण्या इंग्रज वकिलानं शिवकाळी रायगड पाहिल्यावर लिहून ठेवलं आहे, की गडावरील घरं राजवाडा वगळता सुमार बांधणीची, केवळ छपरीच आहेत.

- आणि त्यात लढायांमधून झालेला विध्वंस! मुख्यतः सन अठराशे अठरा मध्ये इंग्रज - मराठे यांचं तुंबळ युद्ध झालं. मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रजी तोफखान्याची तुकडी तोफांच्या भडीमाराने सगळे किल्ले उद्ध्वस्त करत महाराष्ट्रभर हिंडत होती. एक इमारत काही त्यांनी धड राहून दिली नाही.

या किल्ल्यांच्या आंग्रेजी तोफांच्या महिन्याभराच्या काही तारखा अन त्या भडिमाराचे नायक सांगतो :
पांडवगड : एप्रिल १८१८, मेजर थॆकर
केंजळगड : २६ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
वसंतगड : १३ मे १८१८१, मनरो
जीवधन : ३ मे १८१८, मेजर एलड्रिज
चाकण : २५ फेब्रुवारी १८१८, लेफ्टनंट कर्नल डिफन
विसापूर : ४ मार्च १८१८, जनरल प्रॊथर
सिंहगड : २ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
रायगड : १० मे १८१८, मेजर प्रॊथर

येणेप्रमाणे मराठ्यांच्या किल्ल्यांची अक्षरशः धूळधाण झाली! सिंहगडाच्या भवताली कुण्या टेपावर किती
पाउंडी तोफा रोवल्या होत्या आणि त्यांचे गोळे कुठं पडणार होते, याचं मानचित्र त्यावेळी कुण्या इंग्रज इंजिनिय्रनं काढलं होतं त्याची प्रतच मजपाशी आहे!

उत्तरेत मात्र हे झालं नाही. बहुधा सगळ्या किल्ल्यांचे तट, बुरुज, दरवाजे, आतील इमारती हे जसच्या तसं आहे. काय त्यावर काळाची पावलं उठली असतील तेवढीच!


पुस्तक: दुर्गभ्रमणगाथा
लेखक: गोपाळ नीलकठण दांडेकर
प्रकाशन: मॆजेस्टीक, गिरगांव

-------------------------------------------------------------------------------------

खालील व्यक्तींना खो देईन म्हणतो :
मृदुला गोरे
रचना बर्वे
तात्या अभ्यंकर
जयश्री अंबास्कर

टॆगिंगचा दुहेरी उद्देश असा की, ह्यातून ब्लॊगर्सना लिहीण्यासाठी नवी उभारी मिळेल आणि आपण काय वाचतोय, काय आवडतय ह्याची ओळख करून देण्याची, ह्या ह्रुद्यीचे त्या ह्रुद्यी घालण्याची संधीही!
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते...

Wednesday, September 26, 2007

उत्सव - लाडक्या मुंबईतले

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..

पारंपारिक उत्साहात विसर्जन सुखरूप पार पडले. अर्थात तो सोहळा बघता आला नाही ह्याची हुरहुर लागलीच आहे.
मायबोलीवर गणेशोत्सव पार पडला, त्यात मी लिहिलेली ही आरती..
-----------------------------------------------------------------------------------
जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०

कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. १

लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी
तंदुल तनु मोहक उंदरावर स्वारी
गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीच्या राया.. २

परशू हाती शोभे ध्यान वक्रतुंड
सिंदुरवदना सुंदर रुळताहे शुंड
अशीच स्फूर्ती राहो किर्ती तव गाया.. ३

आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०
-----------------------------------------------------------------------------------
गणेश विसर्जनाप्रमाणेच अख्खी मुंबई दुमदुमली ती धोनीच्या संघाच्या दणदणीत स्वागताने. ८३ साली मला अंधुक आठवतय गिरगावातून खूप साया मिरवणूका निघाल्या होत्या. कालचा सोहळा हा तसा आयत्यावेळी ठरवलेला पण तरीही बराचसा सुनियोजित वाटला. धोनी आणि संघ इतकं मिळून मिसळून जवळून अभिनंदन स्विकारत होते ते छानच वाटलं. तिकडे असतो तर गेलोच असतो वानखेडेवर, त्याची थोडी चुटपुट लागलीच. तरीही स्टार माझा आणि एन. डी. टीव्ही वर बघता आलं. असो, पण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये धोनीच्या संघाने जो जिगरबाज खेळ केला त्याला तोड नाही. दैव साथ होतं पण त्याला कर्माची, मेहनतीची अचूक साथ मिळाली हे तितकच खरं. धोनीचं आणि भारतीय संघाच मनःपूर्वक अभिनंदन! ह्यातून बरेच प्रश्न सुटलेत आणि तितकेच नवीन उभे राहिलेत असं दिसतय. भारताच्या विश्वचषकातल्या पराभवानंतर जे क्रीकेटवर सावट आलं होतं (आणि जनता चक दे मुळे हॊकी कडे थोड्या प्रमाणात वळू पहात होती) ते सावट दूर होईल हे नक्की. २०-२० नक्कीच पुढे प्रसिद्धीस येणार ह्यात वाद नाही. एकदिवसीय सामन्याच्या गुणवत्तेत आणि डावपेचांत आता खूप फरक पडेल.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक मारण्याचा दिवस आता फार दूर वाटत नाही. एक दिवसीय सामन्यांच्या गर्दीमुळे जसे पाच दिवसाच्या सामन्यात साडेतीन चारच्या गतीने धावा हौऊ लागल्या आणि सामन्यांच्या निकालाची शक्यता वाढली तसा काहीसा परिणाम २०-२० मुळे एक दिवसीय सामन्यांवर होईल असं दिसतय. नवीन तरूण खेळाडू उभे रहात आहेत ही अजून एक आनंदाची बाब. धोनी च्या रुपात चांगला कर्णधार मिळतोय ही भारतीय क्रीकेटच्या दृष्टीने खूपच आनंदाची गोष्ट.
ह्यातून प्रश्न आहेत ते निवडसमितीपुढे. अचूक संघ कसा निवडायचा, आहे त्या खेळाडुंचा पुरेपूर वापर कसा करायचा (नाहीतर आय सी ल आहेच खेळाडू उचलायला) प्रशिक्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे सगळे निवड समितीला पहावे लागेल. क्रीकेट रसिकांनी ह्यातून शिकण्यासारखे म्हणजे आपल्या सदिच्छा संघाला द्याव्यात पण होम हवने करून आणि साकडे घालून अपेक्षांचे ओझे आपल्याच संघावर लादू नये आणि भावनेच्या भरात त्यांच्या मालमत्तेवर आणि शंकेखोर वृत्तीने स्वत्त्वावर हल्ले करु नयेत!
मधे एकदा न्युयॊर्क मूंबई प्रवास करताना शेजारच्या जागी साधारण माझ्या एवढाच मुलगा होता, सलिम. मी क्रीकेटचं काहितरी वाचत बसलो होतो लॆपटॊपवर आणि आमची तेव्हाच ओळख झाली. तर तो होता कराचीतून :-) तिथेच लहानचा मोठा झालेला. मुंबई कराची तशा सख्ख्या बहीणी. दोन्ही उत्तम बंदरे त्यामुळे पूर्वापार व्यावसयिक महत्व. दोन्ही शहरांना आपापल्या देशात विशेष सांस्कृतिक, राजकीय, चित्रपटविषयक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व. तसच क्रीकेट हा अजून एक समान धागा. खूप भरभरून बोललो आम्ही दोघे. एखाद्या सच्च्या पाकीस्तानी क्रीकेटप्रेमीस काय वाटतं क्रीकेटबद्दल, भारतीय टीमबद्दल आणि पाकीस्तानी टीमबद्दल हे जवळून समजून घेता आलं. ते सारं मला काल आठवलं एकदम. सलिम नक्कीच रडला असेल काल!
पण त्या शोएब मलिकने खेळात धर्म आणायला नकोच होता. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे इकडे का बरं लक्ष देत नाहीत?? भारतातला मौला उठून का बरं ह्याचा निषेध करत नाही?? सगळ्या इस्लामिंनी पाकीस्तानास पाठिंबा दिला किंवा द्यायला हवा असे म्हणताना खेळाचे धर्मयुद्ध करण्याचा गाढवप्णाच नव्हे काय? इस्लामही काय पाकीस्तानची इश्टेट आहे का? आणि सगळे जगभरातले इस्लामी पाकीस्तानी आहेत का? की तसं मुद्दाम रुजवण्याचा हा कुटील डाव आहे आणि धूर्त पणे हे पसरवायची साधलेली संधी आहे? अर्थात त्याचा बोलविता धनी कोण हे स्पष्टच आहे आणि तो धनीच स्वतःच्या जाळ्यात फसत चालला आहे दिवसेंदिवस! आय सी सी ह्या विधानांवर काही आक्षेप घेईल असं वाटत नाही! पण मनापसून चीड आली ह्याची.. अशावेळी वाटतं इथे ठाकरी पाणीच हवं!

असो तर, पाच दिवसाचा कसोटी सामना म्हणजे हर हर महादेव म्हणत घेतलेले अंगत पंगत जेवण, एक दिवसीय म्हणजे झटपट उरकलेला बुफे आणि २०-२० म्हणजे एकच स्वीट डीश किंवा थोडेसेच पण रुचकर सॆलड किंवा हलकासा स्नॆक्स. उदरभरण नोहे जाणिजे यद्न्य कर्म म्हणत ताव मारायचे दिवस गेले, ये फास्ट फूड का जमाना है भाई हेच खरं! :-)

चक दे sssssssssss इंडीssssssssssया!

Friday, September 14, 2007

माझे जीवन - गाणे (ऐकणे)


कहा मैखानेका दरवाजा गालिब और कहा वाइज
पर इतना जानते है कल वो जाता था के हम निकले...
हजारो ख्वाईशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले..
बहोत निकले मेरे अर्मान फीर भी कम निकले..
हुं हुं हुं हुं हुं हं हं हं हं..
हुं हुं हुं हुं... हं हं हं हं..
--------------------------------------------------------------

हाथ छुटे तो भी रिश्ते नही छोडा करते
हाथ छुटे तो भी रिश्ते नही छोडा करते
वक्त की शाखसे लम्हे नही तोडा करते..
-- माझ्या मनात आणि ओठात हे गाण उमटलं सुद्धा..
--------------------------------------------------------------

मैने दिलसे कहा, ए दिवाने बता
जबसे कोई मिला तू है खोया हुआ
ये कहानी है क्या, है ये क्या सिलसिला..

अरेच्चा.. आणि हे काय वेगळच गाणं सुरू झालं की.. कपाळाला बारीकशी आठी पडली आणि उठून पाहीलं तर random mode होता.. म्हटलं हं.. जवळ जवळ दोन वर्षांनी ही ऐकतोय.. आज जगजीत मूड आला, (तसा तो बरेचदा असतोही, पण आज निवांतपणा मिळाला... पूर्वीसारखं रात्रभर हळूवार गझल ऐकत बसता येतील असा) आणि माझं मन भूतकाळात रमलं.. अजूनही गाण्यांचा अनुक्रम चांगलाच लक्षात होता तर.. त्या क्रमाने गाणं उमटलं नाही म्हटल्यावर क्षणिक अस्वस्थता आली इतकच!


माझ्या बाबतीत होतं असं काही वेळा.. मला गाणी एका मूड मध्ये तसच एका गायकाच्या आवाजात सलग ऐकायला आवडतात, विशेषतः long drive करताना किंवा रात्री झोपताना! गंमत अशी की त्या गाण्यांबरोबरच त्यांचा अनुक्रम सुद्धा अगदी डोक्यात फीट्ट बसतो, बरेचदा आपल्या नकळत. मग कित्येक वर्ष तो निघत नाही तिथून.. पूर्वी जेव्हा गिरगावात मी audo cassets बनवून घ्यायचो गाण्याच्या तेव्हा 'अ' बाजूस पहिले आणि शेवटचे तसच 'ब' बाजूस पहिले आणि शेवटचे गाणे कोणते ठेवायचे ह्याकडे माझा कटाक्ष असे, जेणे करू नुसती casset ची बाजू बदलली की एका बाजूचं पहिलं आणि दुसया बाजूच शेवटचं गाणं परत परत ऐकता यावं! त्यामुळे माझ्या कित्येक आवडत्या गाण्यांनी माझ्या casset च्या संग्रहात पहिलं किंवा शेवटचं स्थान पटकवलय.

जसा हा अनुक्रम ठिय्या मारुन बसतो ना मनात, तसच काहीसं आठवणींच.. बयाच गाण्यांशी आपल्या काही आठवणी निगडीत असतात. म्हणजे ते कुठून मिळवलं किंवा काही किस्से घडलेले किंवा एखादी संबंधित व्यक्ती किंवा ते गाणे ऐकताना झालेली चूक किंवा गाण्याने भारवून गेलो ते क्षण किंवा अगदी त्याच सादरीकरण किंवा अजून बरच काही. मानवी मेंदू हा खरच कमाल आहे. हे सगळं तो त्या त्या गाण्याशी अचूक बांधून ठेवतो आणि मग वेळ पडली की मनःपटलावर उमटवून देतो, ते ही काही क्षणात. अगदी! इतकं छान auto indexing आणि quick search निर्माण करणाया ह्या शक्तीची कमालच म्हणायला हवी.

दरम्यान बरेचदा पु लंनी आणि सुनिताबाईंनी सादर केलेला बा. भ. बोरकरांचा आनंदयात्री कार्यक्रम मी ऐकतो, समाधान होत नाही कितीही ऐकलं तरी! तर, त्यात भाईंनी मध्ये मध्ये केलेल्या टिपण्या, सुनीताबाईंचा कधी गंभीर तर कधी मिश्कील आवाज ह्यातून कविता किंवा गाणे आणि त्याच्याशी जडलेल्या आठवणी अशा काही उमलतात ना की बस्स! कवितांजली मध्ये सुनीताबाईंनी असच अप्रतिम काव्यवाचन केलय. मराठी वाद्यवृंदांमध्ये तसच मैफीलींमध्ये माझे आवडते समालोचक म्हणजे भाऊ मराठे (जे भाऊचा धक्का हा कार्यक्रम सादर करतात), संजय उपाध्ये (गप्पाष्टक वाले) आणि मंगला खाडीलकर. व्वा क्या बात है! प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी, त्याला निगडीत काही प्रसंग, व्यक्ती असं सगळं अभ्यासपूर्ण समालोचन ऐकायला मिळतं आणि सादरीकरण सुद्धा प्रेक्षकांची नाडी (म्हणजे टिळक स्मारकातली गर्दी आणि गिरगावतल्या गल्लीतल्या प्रेक्षकांची रसिकता ह्यातला फरक) ओळखून हे समालोचक सादरीकरण करतात, त्याचबरोबर मार्मिकता, हजरजबाबीपणा असतो तो खासच!

अशा कैक गाण्याच्या शब्दांची, त्यांच्या माझ्याकडील अनुक्रमाची, त्यांच्याबरोबरच्या आठवणींची यादी इवल्याश्या डोक्यात साठत असते. हे असं वाढतच रहाणार, जेवढं आपण अनुभव संपन्न होऊ तेवढं. त्याचा आस्वाद घेत रहाणं तेवढं करत रहायचं..
पाडगावकरांच्या बोलगाण्यात सांगायचं तर ह्या पाखरासारखं मस्त जगाव.. हसत हसत गाणं म्हणत!माझं हे खूप आवडतं बोलगाणं..

एक पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं
दुसरं पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं

तिसरं पाखरू आलं
ते गात बसलं,
भारावून आपल्याच सुरात
न्हात बसलं!


तुच्छतेने बघत त्याला
चौथं पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं


तरीही ते तिसरं पाखरू
गात बसलं,
भारावून आपल्याच सुरांत
न्हात बसलं!

(आठवली का ती Sprite ची जाहीरात! अगदी तस्संच! ) :-)

Sunday, August 19, 2007

इथून तिथून..

१५ ऒगष्ट आला SSSSSS
कर्तव्य सांगण्याला.SSSS

..आम्ही लहान असताना पोवाडे म्हणत असू नानीवडेकरांचे आणि ओज इतका ओतप्रत भरला असे त्यात की भारावून जात असू!
कालचा वाढदिवस आला आणि गेला. आता एकसश्टी येईल.. ती ही जाईल.. सूर निराशेचा आहे असं नाही पण थोडा विषाद वाटला इतकच. कोणत्याही संस्थेचा किंवा व्यक्तीचा हिरक महोत्सव (अगदी गणपती उत्सवाचा ही) अगदी दणक्यात होतो.. ६० म्हणजे काही तरी खास.. अगदी रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शतसांवत्सरीक उत्सवासरखं.. स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्षाचा जल्लोश खूप वेगळा (निदान मला तरी) नाही जाणवला!
काल इथे डॆलस मध्ये भारतीय स्वातंत्र्यदीन साजरा करण्यात आला. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आणि ते नाही म्हणजे नेमकं काय, ह्याचा काडीमात्र अंदाज नसलेलेच तिथे जास्त.. त्या गर्दीत मी ही एक.. चार भारतीय माणसं एकत्र आली हाच काय त्यातला उठाव.. एरवी बरेचसे बाजारी स्वरूप.. आनंद बाजार होताच! वाटलं इथे एखादा स्वातंत्र्य सैनीक असता तर किती बरं झाल असतं.. पण नकोच.. त्याचे विचार ऐकायला वेळ होता कोणाला.. प्रत्येक जण आपल्या नादात.. नाही म्हणायला राष्ट्रगीत झालं.. पण अमेरीकेत जन्मलेल्या पिढीला तसे त्याविषयी विशेष वाटण्याचे खास कारण नव्हते.. आणि काही नाहीतर २ मिनिटे स्तब्ध उभ राहून राष्ट्रगीताचा मान राखावा इतकी शुचिता बर्याच उपस्थितांकडे नव्हती. त्यांच्यासाठी ते एक केवळ गाणे जणू काही! त्यांच्यापैकी कित्येकांनी मनमोहन सिंगांचे आणि राष्ट्रपतींचे भाषण ऐकले किंवा वाचले असेल शंकाच आहे! असो, चालायचच.. मी ही कुठे काही खास करतोय म्हणा देशासाठी.. खरय! पण काही तरी करायला हवं ही जाणीन जपणं हेच चालू आहे सध्या.. आजूबाजूच्या गोष्टी पहाता त्याचा विसर पडणं फार कठीण नाहीये.. पण तरीही काही 'नन्ही कली' सारखे चांगले प्रकल्प नेटाने आहेत चालू आणि कोदेंसारखे न्यायाधीशही..

बरेच दिवस लिहीलं नाही इथे.. इथेच काय कुठेच नाही लिहिलं.. का लिहिलं नाही हे शोधावसं वाटलं नाही.. आणि वाटत नसताना लिहायला आम्हास कोणी पैसे देत नाही.. :-) माऊली म्हणते तसं..

आवडे ते वृत्ती किरीटीआधि
मनुनेचि उठी, मग वाचा दिठी
करांसी ये
---आधि मनात येत, मग ओठात येत आणि मग हातावाटे बाहेर पडतं... ते अनुभव संपन्न लिखाण.. बर्याच लेखकांच्या, नाटककारांच्या बाबतीत हे पटतं..

संजुबाबाची जेल, द्रवीडने न दिलेला फ़ॊलो ऒन, सेझ (ह्या बाबतीत माझा खरच वैचरीक गोंधळ उडालाय), श्रावणातल्या आठवणी ह्यावर लिहीण्यासरखे होतेही पण नाही जमलं.. असो, सद्ध्या वाचनाचा मूड आहे. इथे किरण आणि कालिंदी साठ्ये ह्यांच्याकडे खूप छान मराठी पुस्तकांचा संग्रह आहे. दोघेही रसिक आहेतच शिवाय पुस्तक प्रेमी, मस्त भट्टी जमते आमची! दरम्यान ती सगळी पुस्तकं अनुक्रमे लावली आणि नीट ठेवली. वाचनाचे सगळे लाड आता पुरवले जातील असं वाटतय.
नुकतीच वचलेली काही पुस्तके -
पोटाचा प्रश्न - मंगला गोडबोले (पु. ल. नन्तर मी इतका हसलो नाही कुणाला.. कोणालाही आवडेल असं)मण्यांची माळ - सुनीता देशपांडे (सुनीताबाईंचा भाईंवरचा लेख अप्रतिम)
दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर.. (अहाहा.. वेगळ लिहीन ह्या पुस्तकाबद्दल.. बिनतोड आहे.. }

तूर्तास इतकच.. भेटत राहूच..

Sunday, April 1, 2007

आयुष्यावर बोलू काही..

नमस्कार,
बर्याच कालावधीनंतर आज थोडावॆळ काढता आला इथे लिहायला, कधी कधी माझ्यासारखाच हा ब्लॊग अनियमित होतोय इतकचं. शिवाय भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव आणि मुख्य म्हणजे त्यांचा निरुत्साही, आत्मविश्वासशून्य खेळ ह्यातून आलेली अगतिकता आणि संताप ह्यामुळे काही लिहायचा मूडच नव्हता. आता पुन्हा चार वर्षे वाट बघणे आणि मग त्याच भोळ्या आशा आणि हम होंगे कामयाब म्हणून जोशपूर्ण आवाज हे ही आलंच. आशा अमर आहे, मरतोय तो आपल्या टीमचा उत्साह आणि हो बॊब.. असो!

वर्षानुवर्षे आपण वाट पाहूनही एखादी गोष्ट होत नाही आणि आपल्या आयुष्याला वळण देणारी घट्ना काहीशी अनपेक्षितरीत्या अगदी थोड्यावेळात घडते हे जवळजवळ प्रत्येकानेच कमी अधिक प्रमाणात अनुभवले असेल. तर ह्यावेळच्या भारतवारीत जरी कामासाठीच गेलॊ होतो तरी काही योग इतके छान जुळून आले की विचारता सोय नाही. बरं तर सांगायचं हे की दिनांक १८ मार्च २००७ रोजी माझ्या निघण्याचा दिवशी सकाळी माझा आणि यशश्रीचा (यशश्री काळे, रा. दादर) साखरपुडा झाला. :-)

साखरपुड्याचे फोटो इथे ठेवले आहेत : http://photos.yahoo.com/upasanip

काही दिवसांपूर्वी मायबोलीवर वैभव जोशी ह्यांच्या पुढाकाराने गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बरंच काही शिकायला मिळालं त्याद्वारे. "त्रुतू येत होते त्रुतू जात होते' ह्या ओळीने सुरुवात करून भुजंगप्रयात वृत्तात 'लगागा लगागा लगागा लगागा' (समर्थांनी मनाचे श्लोक ह्या वृत्तात लिहिले आहेत.) ह्या मात्रांमधे गझल लिहिण्याचे आव्हान करण्यात आले होते. मी हया ओळीकडे तीन अतिशय भिन्न दृष्टींनी बघून विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला सखेद नमूद करावेसे वाटते की व्यक्तीशः मला ह्यातील एकही गझल अपील झालेली नाही. एकाही गझलेत हवी तशी खोली मला मिळालेली नाही. ह्यापेक्षा खूप चांगलं लिहिता आलं असतं असं वाटत राहतेय. तरीही, वैभवने केलेल्या काही सूचनांचा स्वीकार करून व्याकरणदृष्ट्या त्यातल्या त्यात निर्दोष गझल इथे ठेवतोय.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
१. ती..
त्रुतू येत हॊते त्रुतू जात होते
प्रियेला कसे ते कुठे द्न्यात होते?

तिच्या नेत्रपंक्ती खुणावीत आम्हा
मुखे पाखरू इष्क पाशात होते..

तिला काय ठावे मनाच्या व्यथा ह्या
तिचे भास प्रत्येक श्वासात होते..

प्रियेच्या कटाक्षात घायाळ आम्ही
धिटाई नुरे ठेच ह्रुद्यात होते

कितीही जरी मी तिचा हट्ट केला
न ठावे कुणा काय दैवात होते..

खुळ्या त्या दिवाण्या पतंगाप्रमाणे
कधी प्रेम साफल्य त्यागात होते!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

२.स्वार्थी
त्रुतू येत हॊते त्रुतू जात होते
धुके दाट स्वार्थांध डोळ्यात होते

गुरे माणसे ही सुनामीत जाती
अहोरात्र कामी किती हात होते?

मलाही हवी तूपरोटी पुढ्यासी
गळफास कोण्या नशीबात होते

मनाच्या कवाडांस जाळीत जाती
असे हाय कार्पार धर्मात होते

कुण्या राखण्या कारणे देह सांडी
तयाशी कुठे बंध रक्त्तात होते?

अहो काय त्याचे कुणी का मरेना
मला फक्त स्वारस्य रोख्यात होते!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

३. भज गोविंदं..
त्रुतू येत हॊते त्रुतू जात होते
तुझे लक्ष्य सारे विषयात होते

तुला मानवाचा जरी जन्म आला
प्रभू नाम ओठी न ह्रुद्यात होते

तुझे बाल्य तारुण्य संसारतापी
हरीच्या जपावीण रंगात होते

तरीही सदा आठवी रामराया
जरी कापरे हातपायात होते

करी मानसी प्रार्थना राघवाची
तयाच्या प्रसादे क्षुधाशांत होते

असे साधु बैराग मोक्षास गेले
अखंडीत देवास जे गात होते!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

वेळेची गुंतवणूक आता फ्यामिली पातळीवर जास्त होणार असली तरी इथे नियमितपणे लिहीण्याचा मनापासून प्रयत्न राहील.

पु.ल. नी भाच्यास लिहिलेले पत्र सगळ्यांनी वाचलेले असेल, त्यालाच अनुसरून लग्न झालेल्याच काय पण लग्न ठरलेल्या व्यक्तीचा (बहुमोल) वेळ (अर्थात केळवणाव्यतिरीक्त) घेता कामा नये हे सूद्न्यांनी ओळखले असेलच! :-)

Wednesday, February 14, 2007

आता खेळा नाचा...

आक्रमण अशी गर्जना करत (महाभारत आठवतय का?) क्रिकेटचं महायुद्ध सुरु व्हायला आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. डावपेचांना उधाण आलय सगळ्यांच्या. प्रयोगशील प्रशिक्षकांचे सर्वतोपरी प्रयोग करून झालेत (म्हणजे झाले असावेत!) आणि अंतिम संघ नुकतेच जाहीर झालेत.
दर चार वर्षांनी येणाया पर्वणीला मिडीया, समालोचक आणि क्रिकेट रसिकही अगदी सरसावून बसलेत.
भारतीय संघाच्या निवडसमितीने बेह्हद नसलं तरी बरचसं खूष केलेलं दिसतय. आपला संघ म्हणजे कांगारुंचा नाही की जिथे लॆंगर, मार्टीन अगदी बेव्हनला सुद्धा निवृत्ती स्विकारावी लागते आणि तरीही पाठीमागे तयार असतातच. रमेश पवारचं नशीब मात्र खडतर.. योग नव्हता म्हणायचं. असो, पठाण पिंच हीटर म्हणून किंवा तळात मॆच ओढायला उपयुक्त आहे, तो समोरच्या टीमला गाफील ठेवू शकतो. गोलंदाजीत त्याला लपवायला नाही लागला म्हणजे मिळवलं. :-) संत आणि जहीर बर्या फॊर्म मध्ये आहेत. सिंघ चांगला स्वींग करतोय, मुनाफचा वेग आहे, थोडी अचूकता हवेय. कुंबळे चा अनुभव आणि भज्जीचा तडफडारपणा थोडाफार हातभार लावेलच. मुख्य म्हणजे सचिनला फॊर्म गवसलाय, गांगुली बरा खेळतोय सध्या (तुका म्हणे त्यातल्या त्यात) द्रविडनावाचं कवच आहेच.. युवराज (जर तंदुरुस्ती टिकवून ठेवू शकला तर!) क्षेत्ररक्षणासाठी आणि मधल्या फळीसाठी उपयोगी पडेल. सेहवागचं नशीब म्हणून तो टीकलाय. कामगिरीचं प्रचंड दडपण असेल पण त्याच्यावर. खरं तर वन डे चा बादशाहा आहे(होता?) तो. डोकं ठिकाणावर ठेवलं तर नक्की खेळेल. सुरुवातीची मॆच बांगलादेश बरोबर आहे. हात साफ करायला आणि आत्मविश्वास वाढवायला त्याने ह्याचा उपयोग करून घ्यायला हवा. धोनी हा मला वाटतं सध्याचा हुकमी एक्का आहे, यष्टीरक्षणावर त्याने थोडं जबाबदारीने लक्ष द्यायला हवं. लक्ष्मण आणि कैफ नाही ह्याचं वाईट वाटतय. कैफ ने मागच्या वर्ल्डकप मध्ये मॆच काढून दिल्या होत्या. असो पण जे आहे ते आहे! एकंदर आपला संघ समतोल दिसतोय. सहा फलंदाज, चार गोलंदाज आणि यष्टिरक्षक असं समीकरण राहील प्रत्येक मॆच मध्ये. म्हणजे सचिन, सेहवाग, गांगुली मिळुन १० ओवर्स काढतील. पण एखाद्या बॊलरला चोप पडला की मग ह्यांपैकी कोणावरतरी विसंबून राहवं लागणार. येथेच द्रविडची खरी कसोटी आहे. बरं पाच बॊलर घेउन खेळावं तर बॆटींग तेवढी खोल नाही आणि पाच बॊलर मॆच काढून देतील असं म्हणायची सोय नाही. एकंदर थोडं सावध आक्रमण करणंच भाग आहे, निदान सुरुवातीच्या मॆचेस मध्ये. सलामीची जोडी हे कायम न सुटलेलं कोडं आहे आपल्याला. सचिन खाली येतोय खरा पण त्याने तसच द्रविडने शेवटपर्यंत टिकायचा संयम वाढवायला हवा. सचिनला दुसर्या द्रविडच्या भूमिकेत रहावं लागणार असं दिसतय, जमेची बाजू हीच की त्याचा फॊर्म अगदी वेळेवर आलाय परत आणि हो तो प्रत्येक वर्ल्डकप मध्ये खेळतोच.
चिंतेची बाब म्हणजे म्हणजे आपल्याकडे एकही नावाजलेला क्षेत्ररक्षक नाही. रैना, कैफ बाहेर आहेत. इतर संघानी हे टीपून ठेवले असेलच. बर्याचदा जवळच्या फिल्डर्सनी वाचवलेल्या ह्याच धावा निर्णायक ठरतात. मला वाटतं ह्या वर्ल्डकप मध्ये पहिल्यांदाच पॊवर प्ले बघायला मिळेल, त्यामुळे चुरस वाढणार हे नक्की.
ह्या घडीला तरी ऒस्ट्रेलियाच वरचढ वाटतोय पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेचा आहे,घॊडा मैदान जवळ आहेच. खरंतर कॆरेबियन बेटांवर जाऊन निदान एखाद मॆच तरी पहाण्याची भयंकर इच्छा आहे, बघू कसं जमतय ते!
आपल्या अपेक्षांच ओझं न होऊ देता खंबीरपणे पाठीशी उभं राहून भारतीय चमूस शुभेच्छा देउ या आणि एकदिलाने म्हणूया 'विजयी भव!' कपिलचा संघ वर्ल्ड्कप उचलेल असं कुणाला वाटलं होतं का तेव्हा, पण बिनी, मदनलाल, कपिल ह्या अष्ट्पैलू खेळांडूनी आपापलं काम केलं. आज आपल्याकडेही सचिन, सौरव, सेहवाग, इरफान, धोनी असे अष्टपैलू आहेत. काम कठीण असलं तरी अशक्य नाही!

आणि हो, सचिन वर एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख नुकताच वाचला, तंतोतंत पटला. Must Read..
http://ia.rediff.com/cricket/2007/feb/01sriram.htm

Sunday, January 21, 2007

हम होंगे कामयाब...

आजकाल फार ऐकतो नाही आपण India Super Power होतेय, शेअर मार्केट उचंबळून येतय, प्रगतीचा दर वाढतोय आणि असं बरच काही..
पण खरच सामान्य गृहिणीसाठी स्वयंपाकाचा गॆस स्वस्त झालाय का? पेट्रोल वाढ आणि त्या अनुषंगाने येणारी महागाई थांबलेय का? रेशनवर गहू साखर रॊकेलचीही वानवा आहेच की.. म्हणजे काय तर बराच पल्ला गाठायचाय आपल्याला. पण होय आपला देश प्रगती पथावर आहे हे नक्की आणि तो तसाच रहायला हवा ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी झालेय. मोबाईल हल्ली हातोहाती पोहोचलाय, खाजगी क्षेत्रातील चढाओढीचा फायदा सामान्य ग्राहकाला मिळतोय, विदेशी कंपन्याना भारतात सुरक्षित वाटू लागल्याने नवीन तंत्रद्न्यान आणि outsourcing मुळे नोकरीच्या सुविधा प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहेत,ह्या वाढत्या सुशिक्षित मनुष्य बळाच्या मागणीला आपल्याला व्यवस्थित नियोजन आणि तयारी करूनच सामोरं जायला हवय. मला बरेचदा असं वाटायचं, की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि अगदी लाल बहादूर शास्त्रींपर्यंत आदर्श म्हणावे असे राजकारणी होते, ज्यांच्याकडे विश्वासाने बघत एक पिढी घडत होती. पण नंतर एकंदरच भ्रष्टाचार इतका बोकाळला की सृजनशील व्यक्ती राजकारणात औषधालाही सापडेनाशी झाली. तरुण पिढीला एकत्र आणून एखाद्या ध्येयाने प्रेरीत करेल असे नेत्रुत्व देशाला विशेष काळ लाभले नाही. पण आता परिस्थिती बद्लतेय. आपले पंत्रप्रधान, राष्ट्रपती सगळेच त्यांच्या क्षेत्रात दिग्गज तर आहेतच पण त्यांना राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रस असल्याचे जाणवते. आज जर मी कोणामुळे भारावून जात असेन, तर आपल्या आदरणीय राष्ट्रपतींचे नाव मी प्रथम घेईन.

काही महिन्यांपूर्वी आमचे सॆम साहेब भारतात आले होते तेव्हा सगळ्या IBMers बरोबर एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमास राष्ट्रपती विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच ते अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि समयोचित भाषण अजून आठवतय. तेव्हापासून त्यांच्या साईटचा मी नियमित वाचक बनलोय. कुठेही भाषण असलं की श्रोत्रृवर्गाचा आणि विषयाचा अभ्यास करुन भाषण तयार केले जाते आणि त्याचे मुद्दे साईट्वर लगेचच संदर्भासाठी तयार ठेवले जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायला हवे असे नुसतेच उपदेश पूर्ण न सांगता ते कसे करता येईल, त्यात कोणत्या अडचणी येऊ शकतील आणि त्यावर मात कशी करता येईल ह्याचा पूर्ण उहापोह तुम्हाला त्यांच्या प्रत्येक भाषणात आढळेल.
कलाम साहेबांच्या गेल्या आठवड्यातील पुणे भेटी दरम्यान National youth Award समारंभात तरूणाई समोर मांडलेले विचार अंतर्मुख करायाला लावणारे आहेतच पण नेमक्या शब्दात त्यांनी खूप काही दाखवून दिलय. My Mission my nation ह्या शिर्षकाखाली I can do it असा आत्मविश्वास तरुणांना देताना त्यांनी सात सूत्री शपथ दिलेय युवकांना. मला माहितेय की माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या मनात देशासाठी काय आणि कसं करायचं असा प्रचंड गोंधळ आहे आणि म्हणूच ती शप्पथ मी इथे नमूद करतोय.

1. I realize, I have to set a goal in my life. To achieve the goal, I will acquire the knowledge, I will work hard, and when the problem occurs, I have to defeat the problem and succeed.

2. As a youth of my nation, I will work and work with courage to achieve success in all my tasks and enjoy the success of others.

3. I shall always keep myself, my home, my surroundings, neighbourhood and environment clean and tidy.

4. I realize righteousness in the heart leads to beauty in the character, beauty in the character brings harmony in the home, harmony in the home leads to order in the nation and order in the nation leads to peace in the world.

5. I will lead an honest life free from all corruption and will set an example for others including my home to adopt a righteous way of life.

6. I will light the lamp of knowledge in the nation and ensure that it remains lit for ever.

7. I realize, whatever work I do if I do the best, I am contributing towards realizing the vision of developed India 2020.

किती परिपूर्ण आहेत हे विचार. राष्ट्रपतींच्या साईटवर त्यांच्या प्रत्येक भाषणाची प्रत आहे, वाचून अगदी मन थक्क होते! www.presidentofindia.com ला जरुर जरुर भेट द्या!

अजून एका साईट बद्दल मी सांगणार आहे आज, ती म्हणजे www.rebuildindia.org, काही वर्षांपूर्वी अशाच ध्येयप्रेरीत तरुणांनी ही साईट बनवली आणि सांगावयास आनंद वाटतो की ह्या साईटच्या माध्यमातून आज बरेच चांगले उपक्रम सुरु आहेत. माझी एक सुपीक डोक्याची मैत्रीण स्वप्ना (स्वप्ना हवालदार, बालमोहन) हिने साईटच्या संकल्पनेत आणि मांडणीत विशेष मेहनत घेतलेय.

एकंदर काय आपल्या सगळ्यांना मिळून भारत घडवायचाय. वाट दिसतेय, वाटाड्याही आहे मुद्दा इतकाच की आपण कितपत प्रतिसाद देतो.. आशा अमर आहे.

हम होंगे कामयाब एक दिन
मन मे है विश्वास
पुरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन..

जय हिंद!

Saturday, January 13, 2007

अन्न हे पूर्ण ब्रह्म..

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला..
नमस्कार,
IT Consulting च्या कामामुळे मला गेले काही महिने, वर्ष ठिकठिकाणी फिरायला मिळतय (हो फिरावं लागतय असं म्हणत नाही मी!!) आणि त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या संबंधित क्षेत्रातील तद्न्यांशी अगदी जवळून ओळखी होत आहेत. त्यात जसे स्थानिक अमेरिकन्स आहेत तसे भारतातून तसेच चीनमधून येउन इथे कित्येक वर्षे स्थायिक झालेलेही आहेत. बरेचदा मग आमच्या जागतिकीकरण, राजकारण, छंद अशा कित्येक विषयांवरील चर्चा रंगतात, त्यातून बरंच शिकायला तर मिळतंच पण विशेष म्हणजे अशावेळी कधी प्रत्येक तंत्रद्न्यामधे लपलेला कलाकार हळूच डोकावून जातो तर कधी एक माणूस म्हणून त्याची वेगळीच झलक देऊन जातो.

मध्ये एकदा Thanks Giving च्या पार्टी बद्दल आमची चर्चा चालली होती आणि पार्टी म्हणजे नक्की काय केलं ते प्रत्येक जण भरभरून समजाऊन सांगत होता आणि मी ही समरसून ऐकत होतो. मेमी (माझी मागच्या प्रॊजेक्टमधील सहकारी) सांगत होती "One day I prepared food and rest of the two days I was invited at my friends for leftOvers!" ज्या उत्साहाने ती तिने बनवलेल्या जेवणाबद्दल सांगत होती त्याच उत्साहने तिच्या मैत्रिणींनी तिला त्यांच्या उरलेल्या स्वयंपाकाच्या मेजवानीला बोलावले असे सांगताना तिला आनंदच होत होता. पार्टी ची ही संकल्पना मला थोडी नवीनच होती पण अर्थात आवडली हे नक्की. इथे Office मध्ये project तर्फे बयाचवेळा लंच म्हणून pizza, paasta मागवला जातो, आणि उरलेले अन्न फेकून न देता मोकळ्या जागी व्यवस्थित मांडून ठेवले जाते आणि मग सगळ्यांना त्या बद्दल मेल पाठवले जाते. महत्वाचा मुद्दा असा की प्रत्येक जण आपले अन्न प्लेट मधून काढून घेताना अतिशय शिस्तशीरपणे काढून घेत असल्याने पदार्थ चिवडल्यासारखेही दिसत नाहीत आणि अन्न फुकट न जाता पोटी लागते.
अजून एक गोष्ट इकडे पहाण्यात येते ती म्हणजे , हॊटेलात गेल्यावर तुम्ही तुमचे खाऊन शिल्लक राहिलेले पदार्थ वेटरला बांधून बरोबर देण्यास सांगू शकता आणि तसे ते हसतमुखाने दिले जातात देखील.

आपल्या भारतातसुद्धा अशा काही चांगल्या गोष्टी सुरू करता आल्या तर किती छान होईल बरं. आपल्या ताटातली पोळी जर देणे शक्य नसेल तर निदान असे जर गरीब भुकेल्या जीवास नीट बांधून देता आले तर अन्नाचा किती छान विनियोग होईल. नुसतेच जेवताना "उदरभरण नोहे जाणीचे यद्न्य कर्म" म्हण्यापेक्षा ह्या पूर्ण ब्रह्म अन्नाची उपेक्षा न होता भुकेल्या पोटास तरी ते शांत करू शकेल. हे लिहित असतानाच मला आठवतेय ती सदाशिव पेठेतल्या सात्विक थाळी मधली पाटी आणि त्यावरचा हा सुविचार:
वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात
श्रमीक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात
स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदर भरण व्हावे चित्त होण्या विशाल!!

शेवटी थोडं विषयांतर. आज मकर संक्रांत. माझा सगळ्यात आवडता सण. लहानपाणापासून गच्चीवर, कौलांवर चढून पतंग उडवण्याचं मला भारी वेड. इथे इतर सगळे सण अगदी धुमधडाक्यात साजरे होतात पण संक्रांतीची दक्षिण मुंबईतली नशाच न्यारी. सकाळी सहापासून रात्री काळोख दाटेपर्यंत पतंग उडवताना अगदी जेवायचे सुद्धा भान नसायचे. गाणी, ओरडा, मांजाने कापलेली बोटं कित्येक आठवणी दाटून येताहेत. ह्याक्षणी खूप nastalgic वाटतय! असो.. सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!