Wednesday, February 14, 2007

आता खेळा नाचा...

आक्रमण अशी गर्जना करत (महाभारत आठवतय का?) क्रिकेटचं महायुद्ध सुरु व्हायला आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. डावपेचांना उधाण आलय सगळ्यांच्या. प्रयोगशील प्रशिक्षकांचे सर्वतोपरी प्रयोग करून झालेत (म्हणजे झाले असावेत!) आणि अंतिम संघ नुकतेच जाहीर झालेत.
दर चार वर्षांनी येणाया पर्वणीला मिडीया, समालोचक आणि क्रिकेट रसिकही अगदी सरसावून बसलेत.
भारतीय संघाच्या निवडसमितीने बेह्हद नसलं तरी बरचसं खूष केलेलं दिसतय. आपला संघ म्हणजे कांगारुंचा नाही की जिथे लॆंगर, मार्टीन अगदी बेव्हनला सुद्धा निवृत्ती स्विकारावी लागते आणि तरीही पाठीमागे तयार असतातच. रमेश पवारचं नशीब मात्र खडतर.. योग नव्हता म्हणायचं. असो, पठाण पिंच हीटर म्हणून किंवा तळात मॆच ओढायला उपयुक्त आहे, तो समोरच्या टीमला गाफील ठेवू शकतो. गोलंदाजीत त्याला लपवायला नाही लागला म्हणजे मिळवलं. :-) संत आणि जहीर बर्या फॊर्म मध्ये आहेत. सिंघ चांगला स्वींग करतोय, मुनाफचा वेग आहे, थोडी अचूकता हवेय. कुंबळे चा अनुभव आणि भज्जीचा तडफडारपणा थोडाफार हातभार लावेलच. मुख्य म्हणजे सचिनला फॊर्म गवसलाय, गांगुली बरा खेळतोय सध्या (तुका म्हणे त्यातल्या त्यात) द्रविडनावाचं कवच आहेच.. युवराज (जर तंदुरुस्ती टिकवून ठेवू शकला तर!) क्षेत्ररक्षणासाठी आणि मधल्या फळीसाठी उपयोगी पडेल. सेहवागचं नशीब म्हणून तो टीकलाय. कामगिरीचं प्रचंड दडपण असेल पण त्याच्यावर. खरं तर वन डे चा बादशाहा आहे(होता?) तो. डोकं ठिकाणावर ठेवलं तर नक्की खेळेल. सुरुवातीची मॆच बांगलादेश बरोबर आहे. हात साफ करायला आणि आत्मविश्वास वाढवायला त्याने ह्याचा उपयोग करून घ्यायला हवा. धोनी हा मला वाटतं सध्याचा हुकमी एक्का आहे, यष्टीरक्षणावर त्याने थोडं जबाबदारीने लक्ष द्यायला हवं. लक्ष्मण आणि कैफ नाही ह्याचं वाईट वाटतय. कैफ ने मागच्या वर्ल्डकप मध्ये मॆच काढून दिल्या होत्या. असो पण जे आहे ते आहे! एकंदर आपला संघ समतोल दिसतोय. सहा फलंदाज, चार गोलंदाज आणि यष्टिरक्षक असं समीकरण राहील प्रत्येक मॆच मध्ये. म्हणजे सचिन, सेहवाग, गांगुली मिळुन १० ओवर्स काढतील. पण एखाद्या बॊलरला चोप पडला की मग ह्यांपैकी कोणावरतरी विसंबून राहवं लागणार. येथेच द्रविडची खरी कसोटी आहे. बरं पाच बॊलर घेउन खेळावं तर बॆटींग तेवढी खोल नाही आणि पाच बॊलर मॆच काढून देतील असं म्हणायची सोय नाही. एकंदर थोडं सावध आक्रमण करणंच भाग आहे, निदान सुरुवातीच्या मॆचेस मध्ये. सलामीची जोडी हे कायम न सुटलेलं कोडं आहे आपल्याला. सचिन खाली येतोय खरा पण त्याने तसच द्रविडने शेवटपर्यंत टिकायचा संयम वाढवायला हवा. सचिनला दुसर्या द्रविडच्या भूमिकेत रहावं लागणार असं दिसतय, जमेची बाजू हीच की त्याचा फॊर्म अगदी वेळेवर आलाय परत आणि हो तो प्रत्येक वर्ल्डकप मध्ये खेळतोच.
चिंतेची बाब म्हणजे म्हणजे आपल्याकडे एकही नावाजलेला क्षेत्ररक्षक नाही. रैना, कैफ बाहेर आहेत. इतर संघानी हे टीपून ठेवले असेलच. बर्याचदा जवळच्या फिल्डर्सनी वाचवलेल्या ह्याच धावा निर्णायक ठरतात. मला वाटतं ह्या वर्ल्डकप मध्ये पहिल्यांदाच पॊवर प्ले बघायला मिळेल, त्यामुळे चुरस वाढणार हे नक्की.
ह्या घडीला तरी ऒस्ट्रेलियाच वरचढ वाटतोय पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेचा आहे,घॊडा मैदान जवळ आहेच. खरंतर कॆरेबियन बेटांवर जाऊन निदान एखाद मॆच तरी पहाण्याची भयंकर इच्छा आहे, बघू कसं जमतय ते!
आपल्या अपेक्षांच ओझं न होऊ देता खंबीरपणे पाठीशी उभं राहून भारतीय चमूस शुभेच्छा देउ या आणि एकदिलाने म्हणूया 'विजयी भव!' कपिलचा संघ वर्ल्ड्कप उचलेल असं कुणाला वाटलं होतं का तेव्हा, पण बिनी, मदनलाल, कपिल ह्या अष्ट्पैलू खेळांडूनी आपापलं काम केलं. आज आपल्याकडेही सचिन, सौरव, सेहवाग, इरफान, धोनी असे अष्टपैलू आहेत. काम कठीण असलं तरी अशक्य नाही!

आणि हो, सचिन वर एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख नुकताच वाचला, तंतोतंत पटला. Must Read..
http://ia.rediff.com/cricket/2007/feb/01sriram.htm

1 comment:

Tulip said...

Upas.. saglyach posts ekdam chhan ahet. velat vel kadhun lihit ja.