Saturday, January 13, 2007

अन्न हे पूर्ण ब्रह्म..

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला..
नमस्कार,
IT Consulting च्या कामामुळे मला गेले काही महिने, वर्ष ठिकठिकाणी फिरायला मिळतय (हो फिरावं लागतय असं म्हणत नाही मी!!) आणि त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या संबंधित क्षेत्रातील तद्न्यांशी अगदी जवळून ओळखी होत आहेत. त्यात जसे स्थानिक अमेरिकन्स आहेत तसे भारतातून तसेच चीनमधून येउन इथे कित्येक वर्षे स्थायिक झालेलेही आहेत. बरेचदा मग आमच्या जागतिकीकरण, राजकारण, छंद अशा कित्येक विषयांवरील चर्चा रंगतात, त्यातून बरंच शिकायला तर मिळतंच पण विशेष म्हणजे अशावेळी कधी प्रत्येक तंत्रद्न्यामधे लपलेला कलाकार हळूच डोकावून जातो तर कधी एक माणूस म्हणून त्याची वेगळीच झलक देऊन जातो.

मध्ये एकदा Thanks Giving च्या पार्टी बद्दल आमची चर्चा चालली होती आणि पार्टी म्हणजे नक्की काय केलं ते प्रत्येक जण भरभरून समजाऊन सांगत होता आणि मी ही समरसून ऐकत होतो. मेमी (माझी मागच्या प्रॊजेक्टमधील सहकारी) सांगत होती "One day I prepared food and rest of the two days I was invited at my friends for leftOvers!" ज्या उत्साहाने ती तिने बनवलेल्या जेवणाबद्दल सांगत होती त्याच उत्साहने तिच्या मैत्रिणींनी तिला त्यांच्या उरलेल्या स्वयंपाकाच्या मेजवानीला बोलावले असे सांगताना तिला आनंदच होत होता. पार्टी ची ही संकल्पना मला थोडी नवीनच होती पण अर्थात आवडली हे नक्की. इथे Office मध्ये project तर्फे बयाचवेळा लंच म्हणून pizza, paasta मागवला जातो, आणि उरलेले अन्न फेकून न देता मोकळ्या जागी व्यवस्थित मांडून ठेवले जाते आणि मग सगळ्यांना त्या बद्दल मेल पाठवले जाते. महत्वाचा मुद्दा असा की प्रत्येक जण आपले अन्न प्लेट मधून काढून घेताना अतिशय शिस्तशीरपणे काढून घेत असल्याने पदार्थ चिवडल्यासारखेही दिसत नाहीत आणि अन्न फुकट न जाता पोटी लागते.
अजून एक गोष्ट इकडे पहाण्यात येते ती म्हणजे , हॊटेलात गेल्यावर तुम्ही तुमचे खाऊन शिल्लक राहिलेले पदार्थ वेटरला बांधून बरोबर देण्यास सांगू शकता आणि तसे ते हसतमुखाने दिले जातात देखील.

आपल्या भारतातसुद्धा अशा काही चांगल्या गोष्टी सुरू करता आल्या तर किती छान होईल बरं. आपल्या ताटातली पोळी जर देणे शक्य नसेल तर निदान असे जर गरीब भुकेल्या जीवास नीट बांधून देता आले तर अन्नाचा किती छान विनियोग होईल. नुसतेच जेवताना "उदरभरण नोहे जाणीचे यद्न्य कर्म" म्हण्यापेक्षा ह्या पूर्ण ब्रह्म अन्नाची उपेक्षा न होता भुकेल्या पोटास तरी ते शांत करू शकेल. हे लिहित असतानाच मला आठवतेय ती सदाशिव पेठेतल्या सात्विक थाळी मधली पाटी आणि त्यावरचा हा सुविचार:
वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात
श्रमीक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात
स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदर भरण व्हावे चित्त होण्या विशाल!!

शेवटी थोडं विषयांतर. आज मकर संक्रांत. माझा सगळ्यात आवडता सण. लहानपाणापासून गच्चीवर, कौलांवर चढून पतंग उडवण्याचं मला भारी वेड. इथे इतर सगळे सण अगदी धुमधडाक्यात साजरे होतात पण संक्रांतीची दक्षिण मुंबईतली नशाच न्यारी. सकाळी सहापासून रात्री काळोख दाटेपर्यंत पतंग उडवताना अगदी जेवायचे सुद्धा भान नसायचे. गाणी, ओरडा, मांजाने कापलेली बोटं कित्येक आठवणी दाटून येताहेत. ह्याक्षणी खूप nastalgic वाटतय! असो.. सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!

No comments: