Friday, December 26, 2008

सरणार कधी रण... प्रभोsssssssss

बयाच गोष्टी खूप वेळ मनात असूनही लिहायला वेळ मिळत नव्हता आणि शांतपणाही. मुंबईत अतिरेक्यांनी घडवलेलं हत्याकांड, मिडीयाचा नंगा नाच आणि राजकारण्यांचे बळी, अगदी काही दिवसात खूप उलथापालथ झाली. खूप काही वाचायला, ऐकायला मिळालं ह्या दरम्यान. आता नक्की काय झालं, का झालं ह्याचा अंदाज आल्याने लिहायच ठरवलं आज..

वयाची २२ वर्ष दक्षिण मुंबईत गेल्याने गेट वे, ताज, सी.एस.टी. सगळ्याच ठिकाणांशी माझं अतूट नातं आहे. आजही चर्चगेट, व्ही.टी., महानगरपालिका, फ़ाउंटन च्या इमारती, राजाबाई टॊवर पाहिला की माझं उर भरून येत. त्या दगडी इमारतींचा गारवा आणि भक्कमपणा अगदी नवख्या माणसास सुद्ध रोमांचित करेल. सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, रस्त्यावरचे विक्रेते, मार्केट मधे काम करणारे कामगार, मुंबई बघायला तसच तिची झिंग अनुभवायला आलेले जगप्रवासी सगळ्यांची इथे रेलचेल. अगदी सळसळत्या तारूण्यापासून वाकलेल्या काठीपर्यंत प्रत्येकाची ही मुंबई. दहा पोरसवदा माणसं बोटीने येतात काय आणि मुंबईला ओरबडतात काय, सगळं अविश्वसनीय होतं. तिथे त्यारात्री फायरींग सुरु झालं आणि दुसया मिनिटाला याहू वर बातमी आली. ही बातमी इथे सी एन एन, फॊक्स न्यूज वर पुढचे दोन दिवस ब्रेकींग न्यूज म्हणून कव्हर करत होते. बयाच अमेरीकन लोकांशी ह्यावेळी बोलताना जाणवलं की एकूणच इथल्या जनमानसात भारताविषयी आणि भारतीयांविषयी आपुलकी निर्माण होतेय. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर तुमचा आणि आमचा शत्रू एकच असं काहीसं.

साळसकरांसारखा पोलिस अधिकारी ज्याने मुंबईतलं गॆंगवॊर मोडून काढलं, कामठे, करकरेंसारखे अधिकारी मिसरूड सुद्ध न फुटलेल्या टिनपाट पोरांच्या अंदाधुंद गोळ्यांना बळी पडले हे पचवण अजूनही जड जातय. दहशतवादी हल्ला, त्यातून घडलेले राजकीय नाट्य तसेच पुढे काय ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडलेत, त्यांची उत्तरे मिळतील किंवा नाही पण प्रश्न विचारून तरी चिडचिड, विषण्णता, असहाय्यता बाहेर पडेल म्हणून हे लिहायच झालं --

१. अतिरेक्यांचा हल्ला होताक्षणी ’दक्षिण मुजाहीदीन’ कडून एका चॆनेलला मेल गेलं असं म्हटलं गेलं. प्रत्यक्षात असा ग्रूप आहे का? नसल्यास त्याचं नाव कोणी पुढे आणलं? पाकिस्तानने आपला हात झाकण्यासाठी हे खोटं पिल्लू सोडलं नसेल ना? हा धागा पोलिस खणून काढतील?

२. गुप्तचर यंत्रणा नावाचा काही प्रकार असतो हे सांगाव लागेल असा अश्लाघ्य प्रकार घडलाय. आपल्या देशाच्या सागरी सीमा सुरक्षित नसल्याने शत्रूची हिम्मत झाली आतपर्यंत पोहोचायची. गुप्तचर यंत्रणा आणि गस्तपथकाने त्यांच्या कामात कसूर केल्याने कर्तबगार अधिकायांना प्राण गमवावे लागलेत ह्याची किंमत कधीच भरून येणार नाही. हे असे पुन्हा घडू नये म्हणून सरकारने काय खबरदारी घेतली आहे? दुसरं म्हणजे गुप्तचर यंत्रणांचा हल्ली राजकीय वापर होतोय असं जाणवू लागलय. राजकारणी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, दुसयास कोंडीत पकडण्याची संधी साधण्यासाठी किंवा आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यास कोण कुठे भेटला ह्याची इत्यंभूत माहिती ठेवण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा वापरत असल्याचे दिसते. शिवाय पोलिस तपासातही राजकीय दबाव आणला जातोय. पोलिसांच्या सगळ्या नाड्या प्रशासनाच्या हाती असल्याने कर्तव्यपूर्ती म्हणजे पुढायांची हाजी हाजी असं समीकरण बनलय. जर एखादा पोलिस अधिकारी खरच प्रवाहाविरुद्ध पोहायचं धाडस दाखवू लागला तर त्याची बदली कर किंवा त्याच्या मागे विभागीय चौकशी लाव असं केल जातय. सारांश हा की पोलिस खात्यातला राजकीय हस्तक्षेप काढायला किंवा निदान कमी करायला हवा. पोलिसांना न्यायव्यवस्थेसारखी थोडी स्वायत्तता असायला हवी. हे सोप्प नाही हे मान्य पण त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असं काही करता येऊ शकेल?

३. पोलिस अपुया शस्त्रांनी लढतोय. एके-४७ शी लढायला तो प्रशिक्षितही नाही आणि शस्त्रसिद्धही. तरीही केवळ धाडस आणि शौर्याच्या बळावर तो अतिरेक्यांशी भिडला. सी.एस.टी स्थानकात पिस्तुलानिशी शिंदेनी केलेला सामना आणि चौपाटीवर ओंबाळेंनी अतिरेक्याच्या गोळ्या अंगावर झेलत स्वीकारलेलं हौतात्म्य. एखादा जीवावर उदार झालेला जिहादी अतिरेकी जिवंत पकडण्याच धाडस जे जगात कोणी करू शकलेलं नाही ते मुंबई पोलिसांनी केलं ते ओंबाळेंसारख्या शूरवीरामुळेच शक्य झालं. एफ. बी. आय., मोसाद चे अधिकारी कसबच्या जबानीतून खूप सारी नवीन माहिती मिळवत आहेत. पोलिसांना पुरेश्या शस्त्रांनी, शिक्षणाने कधी सुसज्ज करणार? आम्हाला नुसती आश्वासन नको, कृती आणि अमंलबजावणीचं वेळापत्रक हवय. दुसरं म्हणजे दहशतवादाशी मुकाबला करणारी स्वतंत्र शाखा हवी. त्यांना वेगळ्याप्रकारंच प्रशिक्षण तसेच अधिकार हवेत. दुसया विभागतल्या पोलिसांच्या इथे तात्पुरत्या बदल्या करून काम साधणार नाही. ह्या विशेष पथकातील पोलिसांकडे खास क्षमता असायला हवी. हे सगळ करायचं असेल तर राजकीय इच्छाशक्तीची आज गरज आहे. सरकार ह्याकडे प्राधान्याने लक्ष देईल का?

४. अतिरेक्यांनी गुगल अर्थ वापरून नकाशे अभ्यासले, व्ही. ओ. आय. पी. तंत्रद्न्यान वापरून फोन कॊल्स केले. आपले पोलिस दल, गुप्तहेर खाते ह्या आधुनिक तंत्रद्न्याने सुसज्ज करायलाच हवे. त्यासाठी संगणकीय तसेच आधुनिक तंत्रद्न्यान अवगत असलेले किंवा ते आत्मसात करु शकतील असे तुलनेने तरूण पोलिस तयार करावे लागतील, ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शासनाची योजना काय?

५. सामान्य नागरीकांनी दक्ष राहावं तसंच अशा काळात कसं वागावं ह्यासाठी त्यांच्यासाठी काही ड्रील्स (इथे अमेरिकेत जसे फायर ड्रील्स/ टॊर्नेडॊ ड्रील्स असतात त्यासारखे), छोटे अभ्यासक्रम ठेवता येतील का? अफवा पसरवू नयेत, तसच त्या पसरवणायांवर कडक कारवाई केली जावी म्हणून काही निश्चित उपाय योजना आवश्यक आहे. १९९३ च्या दंगली नंतर जशी मोहल्ला कमिटी बनवण्यात आली त्याचा पुढे बराच फायदा झालाय तसच काहिसं करता येणं शक्य आहे का? राज्यस्तरावर प्रशिक्षित कमांडॊजच पथक तयार ठेवण्याचा विचार स्तुत्य आहेच पण त्याही पुढे जाऊन सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं आवश्यक ठरेल. रेड क्रॊस सारखेच काही प्रथमोपचार करणारे प्रशिक्षित नागरीक आपण तयार ठेवायला हवेत. आपत्कालीन परिस्थितीत धाव घेऊन ते देवदूतासारखे काम करू शकतील. शासनाच्या, स्वयंसेवी संस्थांच्या ह्यासंदर्भात काय योजना आहेत?

६. अशा प्रकारच्या ह्ल्ल्यानंतर करण्याच्या उपाययोजना पुढे येत आहेत पण असं होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देणं अधिक महत्त्वाच आहे. आपल्या आजूबाजूस कॊण रहातय,काही संशयास्पद चालू आहे का हे सामान्य नागरीकास पोलिसांना पटकन कळवता यायला हवं. त्याला पोलिसाचा धाक किंवा कटकट न वाटता तो मित्र वाटायला हवा. नागरीक आणि पोलिसात सौहार्दाच नात निर्माण करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शासन काय करतय त्यादृष्टीने?

७. हल्ल्याचा एकंदर वृत्तांत पहात असताना एक लक्षात आलं की पोलिसांच्या कंट्रोल रुमला हल्ल्याचा अंदाज यायला वेळ लागला. त्यामुळेच नेमके किती अतिरेकी आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रे काय आहेत ह्याचा सखोल विचार न करता तीन मोठे अधिकारी एकाच गाडीतून कामा होस्पीटल जवळ गेले. क्लोज सर्किट टिव्हीवरून टेहळंणी करणारी खूप सारी पथके अविरत तयार असायला हवीत. हे सोप्प नाही ह्याची जाणीव आहे पण आवश्यक मात्र आहेच. जिथे शक्य होईल तिथे हीडन कॆमेरे लावले गेलेच पाहीजेत. सरकारी यंत्रणा यद्ययावत करण्यासाठी शासन काय पावले उचलत आहे?

८. मला आठवतय की पाच सहा महिन्यांपूर्वी सामना आणि सकाळमध्ये मुख्य बातमी होती की मुंबईला सागरी मार्गाने धोका संभवतॊ असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. असे बरेच इशारे गुप्तचर यंत्रणा देत असेलही पण (राज्य आणि केंद्र) शासनाने दुर्लक्ष का केले ह्याचं उत्तर कोण देणार? ज्यांनी आपल्या कामात बेजबाबदारपणा दाखवला त्यांना उघडं कधी पाडणार?

९. करकरे युद्धाला निघाले, त्यांनी चिलखत घातलय, हॆल्मेट घालत आहेत असं सगळं मिडीयावाले कव्हर करत होते. त्यातून नेमकं काय साधलं त्यांनी? समस्त मिडीया एक शुद्ध आचारसंहिता बनवू शकत नाही का? किंवा प्रसारभारती सारखी शासकीय संस्था बातम्या सेंसॊर करू शकत नाही का? तशी वेळ आता आलेय असं वाटतं. ब्रेकींग न्यूज मिळवण्यासाठी आणि टी आर पी वाढवण्यासाठी ह्या वाहीन्या कुठल्याही थराला जातील. ह्याच वाहिन्या सामान्य माणसाच्या बुद्धीभेदास आणि अफवा प्रसूत करण्यात आघाडीवर असल्याचं वाटतं. त्यांच्यावर चाप बसायलाच हवा ना? दुसरी धक्कादायक बाब म्हणजे वृत्तपत्रातील बातम्या. ’करकरेंची हत्या दहशतवाद्यांनी केली नाहीच?’ किंवा ’पाकिस्तानी सैन्याची सीमेवर जमवाजमव?’ अशा प्रक्षोभक बातम्या पुढे प्रश्नचिन्ह टाकून पेपरात दिल्या जातात. ह्या प्रकाराची मनस्वी चीड येते. उगाच काहीतरी पिल्लू सोडायचं आणि मग ’पेपरात आलय’ म्हणजे खरच असणार असं धरून चालणारा जो वर्ग आहे समाजात त्याची दिशाभूल करायची. बरीचशी वर्तमानपत्रे अशा बेजबाबदारीने वागताना दिसतात आणि मन अधिक विषण्ण होतं.

१०. दहशतवादी हा अतिरेकीच आहे, कुठल्याही धर्माचा का असेना. अशावेळी तो मुस्लिम असेल तर मुस्लिम संस्थानी पुढे येऊन त्याचा धिक्कार करायला हवा. हा जिहाद, ही नाहक निरपराध माणसं मारणं ही इस्लामची शिकवण नाही हे सगळ्या मुस्लिम धर्मगुरुंनी ठणकावून सांगायला हवय. तरच हे अतिरेकी एकटे पडतील. मेलेल्या अतिरेक्यांना इस्लाम धर्माप्रमाणे संस्कारीत न करता त्यांची बेवारस म्हणून विल्हेवाट लावण्यात आली तर इतरांना चांगलीच चपराक बसेल. त्यातूनच सामान्य हिंदू मुस्लिम जास्त जवळ येऊन दहशतवादी विरुद्ध भारतीय हे नवीन समीकरण तयार होईल. मुस्लिम धर्मगुरू ह्या दहशतवाद्यांना काफीर ठरवून मुस्लिम धर्मातून पदच्युत करतील काय?

११. संसदेवरील हल्ल्याला इतकी वर्षे झाली, तिथेही आपल्या प्राणांची बाजी लावून आर.एस.पी च्या जवानांनी आपल्या संसदेची लाज राखली. न्यायालयाने अफजल गुरुला दोषी ठरवून फाशी सुनावूनदेखील केवळ राजकारणाने त्याला अजून जिवंत ठेवलाय. उद्या असच कोणीतरी कंदाहारप्रमाणे विमान हायजॆक करून त्याला सोडवून नेतील आणि आपण बघत बसू. ह्याची विलक्षण चीड येतेय. पिचक्या कणाच्या ह्या राजकारणी लोकांनी देशाची सुरक्षा सुद्धा विकलेय का असं वाटायला लागतं. ह्याबातीत कितीही नाही म्हटलं तरी शिवसेनाप्रमुखांना आपण मानायलाच हवं. जिवंत पकडलेल्या कसबला त्याच सी. एस. टी. समोर किंवा ताज समोर हजार वेळा फाशी द्या अशी जरब बसवा की पुन्हा कोणी वाकडी नजर करून मुंबईकडे बघू शकणार नाही. पण मतांसाठी लाचार असलेल्या सरकारला हे जमेल काय?

१२. पाकिस्तानने फार फार कोलांट्या उड्या मारल्या आहेत ह्या संदर्भात. पुरावे नाहीत म्हणून गळे काढण्यापलिकडे ते काहीच करत नाहित. मागे पाकिस्तानची क्रीकेट टीम भारतात आली होती तेव्हा वानखेडेची खेळपट्टी उखडली होती शिवसैनिकांनी. तेव्हा शिवसेनेचं असं आंदोलन माझ्यासह सगळ्यांनाच खटकलं असलं तरी आता पाकिस्तानचा दौरा भारत सरकारने रद्द करायला लावला त्यात आपल्याला तथ्य वाटतय. शिवसेना प्रमुखांचं मोठेपण कशात असेल तर अशा द्रष्टेपणात आहे हे जाणवतं. माझही मत आधी; राजकारण, संगीत, क्रीडा ह्यात देश, धर्म आणू नये असं होतं पण आता डोक्यावरून पाणी जातय. सरकारने कडक धोरण अवलंबलच पाहिजे. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक सगल्याच पातळींवर आपण असहकार पुकारायला हवा. आपण वेळ पडलीच तर किंवा वेळ पाडूनच अतिरेक्यांचे अड्डॆ पाकिस्तानात घुसून उखडलेच पाहिजेत. भारत पाक सीमांवर तणाव निर्माण करून अफगाण तालिबान च्या सीमांवरच पाकिस्तानी सैन्य भारताच्या सीमांकडे वळवण्याचा तालिबान्यांचा प्रयत्न असेलही पण आपण केवळ राजकीय मुत्सद्दीचे, टीप्पण्यांचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यायला हवा. पाकिस्तान हे राष्ट्र दहशतवाद्यांना पोसून जागतिक भय निर्माण करत आहे हे आपण सगळ्या जगाला पटवून द्यायला हवय. तिकडे कराची चा शेअर बाजार पार ढासळलाय. पाकिस्तानातली अर्थव्यवस्था कोलमलडतेय. सामान्य लोकांची अन्नान्न दशा होण्याचा दिवस दूर नाही. सद्ध्या अमेरिका जो पैसा त्यांना पुरवतेय त्याचा त्यांना खूप आधार आहे. अजून डबघाईला गेल्यास कुरापती काढून युद्ध करण्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय दिसत नाही. युद्ध न करता त्यांची कोंडी करता आली तर आपल्याला तेही हवच आहे. संसदेवरचा हल्ला, बॆंगलोर तसेच इतर शहरांमध्ये झालेले हल्ले ह्यातून सरकारने काहीच बोध घेतलेला जाणवला नाही, आता तरी सरकार काही करेल अशी अपेक्षा करावी काय?

अशा अनेक प्रश्नांनी मी, माझ्यासारखे तरूण जर्जर आहोत. माहितीचा अधिकार असला तरी तो वापरण्याचे द्न्यान, उत्साह आणि पुढाकार घेण्याची कोणाची इच्छा नाही. पूर्वी सारखी तत्वद्न्यांनींची भाषण ऐकायला कदाचित मिळणार नाहीत पण ह्याविषयांवर लिहीणारे राजकीय मुत्सुद्यांचे, विश्लेषकांचे ब्लॊग्स मिळतील का ह्याचा शोध सुरु आहे. नुकतेच यु ट्युब वर अविनाश धर्माधिकारी यांनी केलेल्या भाषणांच्या, आवाहनाच्या चित्रफिती पहाण्यात आल्या. मनापासून आवडल्या, कोणतरी चांगलं करतोय, तळमळीने करतोय हे पाहून बरं वाटलं. रेडीफ वरचे अनेक विचारवंतांचे लेखही आवडले.

बातम्या पहाताना मला जाणवत होतं की ताज जिंकलं, ट्रायडेन मिळवलं अशा बातम्या येत होत्या. सखेद आश्चर्य वाटलं ते ह्या गोष्टीचं की आपल्या इथे घुसून अतिरेक्यांनी आपलीच वित्तहानी, जिवितहानी केली. त्यांच्याकडून आपण आपलाच भूभाग शूरवीर पोलिसांच्या बदल्यात मिळवला म्हणून जल्लोष करायचा? आपण त्यांना इतक्या सहज घुसू दिलं ह्याची आधी लाज वाटायला हवी. एखाद्या फितूरामुळे मुघलांना मिळालेला किल्ला परत मिळवताना तानाजी गेला तेव्हा राजे कसे हळहळले असतील ह्याची कल्पना येऊ शकते. अंगावर गोळ्या झेलत दोन्ही हातांनी दांडपट्टा चालवत शत्रूला एक इंचही पुढे येऊ न देणारे बाजी.. ’सरणार कधी रण..’ म्हणत तोफांचे आवाज येईपर्यंत यमाला सुद्धा थांबवणारे बाजी... आणि अतिरेक्याची बंदूक हातात पकडून ठेवून देहाची चाळण झाली तरी न कोलमडणारे ओंबाळे ह्यांच्या शौर्यात काहीच फरक नाही. असे आदर्श इतिहासाच्या पुस्तकातून तरुण पिढी पुढे यायला हवेत. ह्या पोलिसांच्या शौर्यावर प्रतिभावंतांनी पोवाडे लिहायला हवेत आणि प्रभातफेर्यांमध्ये किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये ते गौरवाने गायले जायला हवेत.

आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईचे रक्षण करणाया पोलिसांना/ सैनिकांना तसेच हॊटेलमधील, कामा रुग्णालयातील कर्मचारी ज्यांनी इतरांची सुटका केली त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. पोलिसांनी अतिरेक्यांना तिथेच रोखलं म्हणून पुढचा अनर्थ टळला ह्याची सगळ्यांना जाणीव आहेच. "भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी...." हे आज एकदिलानं मुंबई पोलिसांना, कमांडोज ना आपण सांगूया.

स्वतःच्या प्रांणांची पर्वा न करता सदरक्षणाय खलनिर्दालनाय सरसावणाया सगळ्या द्न्यात, अद्न्यात वीरांसाठी बोरकरांच्या शब्दात ही आदरांजली --

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती........

यद्न्यी ज्यांनी देऊन निजशिर
घडले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर
नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती.. !!

मध्यरात्री नभ घुमटाखाली
शांतिशिरी सम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती..
तेथे कर माझे जुळती.. !!

-------------------------------------------------------------------------------------
कोलंबिया डायरी:
कोलंबियामध्ये येऊन महिना उलटला, दोघेही स्थिरावलोय आता बयापैकी. थंडीच प्रमाण त्यामानाने कमीच दिसतय इथे, तसच अजूनही इथे हिरवी कंच झाडी आहेत, पूर्ण पानझड अजून तरी दिसत नाहीये. सकाळी बरच कुंद वातावरण असतं, अशावेळी दोन्ही बाजूंनी फांद्या झुकलेल्या दाट झाडीतून नाजूक थंडीने झाकोळलेल्या सूर्याचे कवडसे झेलत आणि कॆसेटप्लेअरवर कुमार सानू किंवा किशोरदाची गाणी किंवा मग परवीन सुलतानाची ठुमरी ऐकत जाण्यात एक वेगळीच मजा अनुभवायला मिळतेय. ऒफीस तसं १० मिनिटांच्या ड्राईव्हवरच आहे आणि वाहतूकही तुरळक त्यामुळे गाडी चालवताना वेळ कसा जातो कळतच नाही. रानडे रोड, मुंबई २८ आणि लक्ष्मी रोड, पुणे ३० इथे मिळत नाही (पु. लं. नी म्हटलय) तसच टू नॊच रोड, कोलंबिया, साउथ कॆरोलिना-२९२२३ इथे मिळत नाही असं काही नाही असं म्हणता येईल. वॊलमार्ट, टार्गेट, पोस्ट ऒफीस, सगळ्या प्रकारची हॊटेल्स, इंडियन ग्रोसरी स्टोअर सगळं सगळं इथे आहे, हाच इथला एक मुख्य रोड असल्यामुळेही असेल कदाचित, त्यामुळे एकाच फेरीत सगळी कामं होऊन जातात. एकंदर इथे जम बसायला लागलाय नवीन ओळखीही होत आहेत. शिवाय इथे अपार्टमेंट घेताना ते लेक फेसिंग (विंड्सर लेक) घेतलय त्यामुळे बाल्कनी मध्ये उभ राहून किंवा खुर्च्या टाकून तळं, त्यातली बदक, बगळे, होड्या, झाडं सगळं काही वेगळ्याच विश्वात घेऊन जातं, उन्हाळ्यात खूपच छान असेल इथे असं दिसतय.

No comments: