गेले कित्येक दिवसांच्या धावपळीनंतर आज प्रवास करताना निवांतपणा मिळालाय, म्हटलं नुवार्क इंटरनॆशनल एअरपोर्टवर बसलोय शांत तर मन मोकळं करावं. काही वर्षांपूर्वी डॆलस सोडून कोलंबियाला येताना मी इथेच ’ऎदिऒस डॆलस’ असा ब्लॊग लिहिला होता, आज काहीसं तसच वाटतय ’ऎदिऒस अमेरिका’ म्हणताना. ’कुण्या देशांचं पाखरु.. ’ ह्या माझ्या ब्लॊग मध्ये अमेरिकेत राहायचं की ती सोडायची ह्याचा उहापोह मी मागे केला होता, आणि त्याचीच परिणिती आज अमेरिका सोडून ’स्चेच्छेने स्वदेश’ स्विकारताना झालेय. अमेरिका सोडून भारतात परतलोय म्हणजे काही तीर मारले नाहियेत हे नक्कीच आणि अमेरिकेने व्यक्तिश: मला इतकं दिलय की ह्या देशाविषयी मला कायम आदरच आहे.
’या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या..’ हे कायम लक्षात होतंच, आपल्या आईवडलांच्या आयुष्यातल्या ’जाहल्या तिन्हीसांजा’ ना, कातरवेळी त्यांच्या बरोबर राहायची इच्छा हे एक महत्त्वाचं कारण असलं तरीही कुटूंबाचा विचार करता मुलाचं शिक्षण भारतात करणं, बायकोच्या करिअरचा विचार करणं ह्या ही गोष्टींचा विचार केला होताच. त्यामुळे इथलं सगळं सोडून परत जायचं हे नक्की होतंच, प्रश्न होता की परत जाण्याची योग्य वेळ कोणती.. आणि आता तो ही प्र्श्न सोडवला. ’Point of no return’ ला पोहोचण्यापूर्वी, इथल्या इमिग्रेशनच्या चक्रातून बाहेर पडलोय ह्याचं आज समाधान आहे. ह्या निर्णयाच्या दोन्ही बाजूंनी संमिश्र प्रतिक्रिया आम्हाला मित्र-मैत्रिणींकडून मिळाल्यात, त्यामुळे बघू तिकडे गेल्यावर कसं रुळतोय ते, सध्या काही विचार करत नाहीये. दोन बॆग्स घेऊन आलोय आणि दोन बॆग्स घेऊन परत जायचं हे कायम डोक्यात असल्याने आवराआवरी करताना तसं सोप्पं गेलं. गाडी विकताना, भांडीकुंडी देऊन टाकताना किंवा चक्क फेकून देताना थोडं जड झालचं पण तिकडचे वेध लागल्याने निर्मोही वृत्तीने मोकळंही होता आलं.
बरं, पण मग असं निवांत बसलो की काय दिलं अमेरिकेने इतक्या वर्षात हा विचार मनात येतोच आणि मग अगदी लहान सहान गोष्टींचा जमाखर्च मांडणारी वृत्ती डोकं वर काढते. काही महिन्यांसाठी, केवळ व्यावसायिक अनुभवासाठी इथे अमेरिकेत येण्याचं खूप वर्षांपूर्वी जे ठरवलं ते इथे आल्यावर लगेचचं पुसलं गेलं. जगाच्या दुसया टोकावर लोकं कशी राहतात, वागतात, विचार करतात हे पाहून खूप काही शिकायला मिळणार इथे, आचार - विचार बदल होणारच हे लगेच कळून चुकलं. स्वावलंबन, हिशोबी वृत्ती, पैशाची किंमत ह्यांच महत्त्व लगेच लक्षात आलं. बघता बघता आर्थिक उद्दीष्टे वाढत गेली आणि ती साध्य करण्यासाठी वेग वाढवला गेला, स्वत:त सुधारणा होत गेली, अगदी न कळतच. आपल्यातलं चांगलं बाहेर येण्यासाठी अमेरिका कशी मदत करते हे इथेच जाणवलं. अमेरिका एक पर्यटक म्हणून काना-कोपयांतून फिरुन झालीच पण अमेरिकन मित्र मैत्रिणीही झाल्या खूप आणि त्यातून सांस्कृतिक देवाण-घेवाणसुद्धा. बॆचलर तसच मॆरिड लाईफ अमेरिकेत पुरेपुर जगल्याने दोन्ही प्रकारच्या आयुष्याचा अनुभव इथे मिळाला. एकमेकाला धरुन असलेली भारतीय माणसे, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून एकत्र जोडली गेलेली मराठी मने आणि मग (विकेडला का होई ना) साजरे होणारे सण-वार आणि पुढच्या पिढीकडे मराठी भाषा, भारतिय संस्कृती पोहोचवण्याची धडपड सगळं सगळं जवळून अनुभवता आलं. विशेषत: न्यू जर्सी, डेलस मध्ये दिग्गजांच्या शास्त्रिय संगिताच्या मैफिली ऐकण्याचे जे योग आले ते सगळे कौटुंबिक सोहळेच असायचे, कायम स्मरणात राहातील असे. तारुण्याचा बराच काळ अमेरिकेत आयुष्य घडवण्यात गेलाय ह्याची जाणीव आहे आणि जी संधी मिळाली तिचा सुयोग्य वापर करता आला ह्याचं समाधानही आहे. मायबोली, मिसळपाव, माझा ब्लॊग, ठिकठिकाणची महाराष्ट मंडळे, ब्रेकफास्ट क्लब्स, नेटवर्किंग इवेंट्स ह्यांच्या माध्यमातून अमेरिकेत अनेक त्रुणानुबंध जुळले. फेसबुक, लिंक्ड-इन च्या माध्यमातून संपर्क राहाणार आहेच, मी फक्त एक इ-मेल, एक फोन कॊल किंवा एक स्क्रॆप लांब आहे इतकंच.
अमेरिकेत, साधारण आठ वर्षांच्या अनुभवाने मी ठाम सांगू शकेन की - सार्वजनिक स्वच्छता, प्रदूषण मुक्त शुद्ध हवा, सुरक्षा, सार्वजनिक सभ्यता, शिस्त, दुसयाच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची वृत्ती, धर्म/देश/भाषे पलिकडॆ व्यक्ती म्हणून तुमची इतरांना आणि इतरांची तुम्हाला असलेली ओळख, सामान्य माणसापर्यंत न पोहोचलेली लाचखोरी, कायद्याचा वचक आणि अमंलबजावणी, पुरेशी वेगवान न्यायव्यवस्था, तुमच्या शिक्षणाचा/ कौशल्याचा/ द्न्यानाचा सर्व स्तरांतून आदर आणि त्यातून मिळणाया संधी, 'Survival of the fittest' ह्या उक्तीला सार्थ ठरवणारी कठीण प्रसंगात तुमची लागणारी कसोटी आणि त्यातून मिळणारे जीवन-शिक्षण अशा हिरव्या नोटांमध्ये न मोजता येणाया बयाच गोष्टी मला अमेरिकेत मिळाल्य़ा. त्याचबरोबर कामाच्या वेळा आणि घरात तसेच स्वत:च्या आवडी निवडी साठी देता येणारा वेळ ह्याची सर्वसाधारणपणे उत्तम सांगड घालता आल्याने ’मला काय हवंय?’, ’मला काय करायचय?’ ह्या प्रश्नांचा विचार करत आत्मपरिक्षणास पुरेसा वेळ मिळत गेला. ह्या मिळालेल्या वेळात अतिरीक्त वाचन, लिखाण, थोडीशी आध्यात्मिक साधना करता आल्याने वेळेचा सदुपयोग केल्याचं समाधान नक्कीच आहे.
मग इथून पुढे काय? आयुष्याच्या ह्या वळणावर अमेरिकेतल्या अनुभवाची शिदोरी वापरून भारतात संधी, रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने काही करता येईल का हे बघायचा विचार आहे. ’सुपंथ’ च्या माध्यमातून गेले दोन वर्षे सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचं काम आम्ही करतोय त्याबाबतीत पुढे काय करता येईल हे बघायचय. एका नव्या जीवनशैलीला सुरुवात करताना मी ह्याक्षणी प्रचंड उत्सुक आहे हे नक्की.. शुभं भवतु !! :-)
Saturday, March 26, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment