Sunday, November 29, 2009

कोण मेले? कुणासाठी? रक्त ओकून..

२६ नोव्हेंबर च्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला एक वर्ष झालं. अशा प्रसंगी हुतात्म्यांची आठवण काढायची आणि भरत आलेल्या जखमांवरच्या खपल्याही काढायच्या. होय! असं मुद्दाम म्हणतोय कारण एकूणच प्रशासन मुर्दाड झालय़ आणि लोकांचं आयुष्य इतकं वेगवान झालय की काळाचं औषध बेमालूम वठतं आणि लोक विसरतात, पचवतात आघात.

एका वर्षापूर्वी ह्याच ब्लॊगवर लिहीलेल्या उतायाची ही लिंक.. सरणार कधी रण..प्रभोsssssssss.

काय झालं एका वर्षात --
१. पाकिस्तानने अतिरेकी हे पाकिस्तानी आहेत हे आधी जाहीर नाकबूल केलं पण काही दिवसांनी ते तेथलेच आहेत हे कबूलही केलं. तोयबाच्या नेत्यांना अटक करण्याची नाटकं केली आणि मग सोडूनही दिलं. भारतीय राजकारणी आणि प्रशासन, अमेरिका आणि जगाला पुरावे देऊन आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन हातावर हात ठेवून गप्प राहिलं.
२. करकरेंचं बुलेटप्रूफ जॆकेट हरवलं म्हणून देशाच्या ग्रृहमंत्र्यांनी वीरपत्निची जाहीर माफी मागितली. ते जॆकेट निकृष्ट दर्जाचं होतं म्हणे! :(
३. कसाबचा खटला कोर्टात उभा करून त्याच्या सुरक्षेवर अत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्चे करावे लागलेत, आणि एकीकडे आपदग्रस्तांना पूर्ण मदत मिळू शकली नाही सरकारकडून. त्याचा खटला अजून किती दिवस चालेल प्रश्नचिन्हच आहे आणि एवढं करुन दयेचा अर्ज राष्ट्रपतींना करुन तो अफझल गुरू सारखी फाशी रद्द करवून घेतो की काय बघायचे, सगळाच पोरखेळ.
४. महाराष्ट्र पोलिसदलातले वाद चव्हाट्यावर आलेत आणि गफूर, रॊय, मारीया आणि वरिष्ठ पोलिस अधिकायांतली वादावादी जनतेपुढे उघड झाली. २६ नोव्हेंबरला दुसरा कसा बेजबाबदार वागला हे सांगण्याची सगळ्य़ांतच अहमहमिका लागलेय.
5. राम प्रधान समितीचा अहवाल नेमके काय सांगतो कळू शकेल काय? त्यात मांडलेल्या त्रुटी काय आहेत आणि त्या कश्या दुरूस्त केल्या गेल्या ह्याचे नि:पक्षपाती उत्तर मिळेल काय?
६. अतिरेक्यांचे मृतदेह रासायनिक प्रक्रीयेने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानने ते घेण्यास इन्कार केलाय आणि भारत सरकारही त्यांची विल्हेवाट लावण्यास उत्सुक दिसत नाही.
७. भारताच्या सागरी सीमा खरचं सुरक्षित आहेत काय याचे अजूनही ’होय’ असे ठाम उत्तर देता येत नाही. समुद्रमार्गे पूर्वी आलेले आरडीएक्स. अत्ता आलेले अतिरेकी आणि त्यानंतरही गस्त नौकांमधल्या त्रूटी, समन्वयाचा अभाव हीच त्याची मुख्य कारणे.
८. महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी कमांडॊंचे एक खास पथक तयार केले आहे, ही एक खरोखरच चांगली बाब. तसेच सरकारने काही अद्ययावत शस्त्रे खरेदी करुन पोलिस खाते अधिक शस्त्र सज्ज केले आहे.

पुढे काय? काही प्रश्न..
१. आजही माझ्यासारख्या एखाद्या सामान्य नागरीकास आपत्कालीन परिस्थितीत कसे तोंड द्यायचे, काय करायचे आणि काय करायचे नाही ह्याचे प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे का? असे उपक्रम राबवून सुजाण नागरिकांची फळी निर्माण करता येणे का शक्य नाही? सरकार नाही तर निदान एखादी सेवाभावी संस्था यात लक्ष घालु शकेल का?
२. मिडीया ही आज एक अतिशय संवेदनशील बाब झाली आहे आणि वेगवान माहिती स्त्रोतांमुळे ती अधिक जबाबदार असणे आवश्यक आहे. हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ८०% मोबाईल्स मधे दृक-श्राव्य रेकॊर्डींगची सुविधा असतेच. शिवाय एसेमेस मुळे बातम्या (खया किंवा खोट्या) भराभर पसरतात. एकूणच ह्या मोबाईल नेटवर्क्सवर ल्क्ष ठेवणे, अतिरेक्यांनी मोबाईल वापरले तसे कोणाला वापरता येऊ नयेत ह्याची अंमलबजावणी करणे आवश्यक नाही का? सरकारने ह्यासाठी काय पाऊले उचलली आहेत ते कळायलाच हवे.
३. वरच्याच मुद्द्याला अनुसरून पीत पत्रकारीते पासून लांब राहून आपला टी.आर.पी वाढावा म्हणून कुठल्याही थराला न जाता, लोकांच्या संवेदनशील भावनांना भडकवण्याचे साधन होऊ न देण्याची जबाबदारी हे सत्राशे साठ चॆनेल्स घेतील का? ते स्वत:च अशी एखादी आचारसंहीता तयार करतील का किंवा तसा त्यांच्यावर दबाव आणता येईल का?
४. दुर्दैवी रीत्या अशा किंवा दुसया कुठलाही प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडून झालाच तर भारत सरकारची भूमिका काय असेल? ते असेच गप्प राहाणार का? शिवाय, मुंबईतल्या जनतेच्या सुरक्षितेविषयी महाराष्ट्र सरकारची, भारत सरकारची नेमकी जबाबदारी विषद होईल काय, जेणे करुन एकमेकांकडे बोटे दाखवली जाणार नाहीत.
५. आपली गुप्तहेर यंत्रणा ह्या हल्ल्याची आधीच माहिती काढण्यात अपयशी ठरली, असे का झाले आणि ही जबाबदारी कोणाची हे कळू शकेल का, आणि पुन्हा असे कूचकाम गुप्तहेर यंत्रणेकदून होणार नाही याची हमी भारत सरकार देईल काय? तसेच ह्या यंत्रणेतील पोकळ्या भरण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरात काय केले ते कळू शकेल का?

एका वर्षानंतर मुंबईकरांच्या मनातली भीती अजूनही डोळ्यांत तशीच दिसतेय, सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येईल ह्याची खरच शाश्वती उरलेली नाही. प्रचंड वाढलेली गर्दी आणि सोयी सुविधा, प्रशासनावर त्यामुळे पडणारा ताण ह्यात सामान्य मुंबईकर पूर्वीसारखाच होरपळून निघतोय आणि अपरीहार्यपणे व अगतिकपणे (मुंबई स्पिरीट हे त्याचं गोंडस नाव) ट्रेनला लोंबकाळत खस्ता खातोच आहे, दुसरा इलाजच काय म्हणा.. !!

ह्यावेळी २६-नोव्हेंबरला रक्तदान शिबीरे आणि वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ह्या ब्लॊग मार्फत माझ्या भावनांना वाट देऊन माझीही श्रद्धांजली.

"पब्लिक मेमरी इज शॊर्ट" म्ह्णणणायांना तसेच येणाया पिढ्यांना हा हल्ला नेमका कसा होता त्याची दाहकता, विषण्णता कळत राहाण आवश्यक आहे. नाहीतर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचे विस्मरण जसे आमच्या पिढीला होतेय तसे कैक वर्षांनी ओंबाळे, साळसकर, कामटे, शिंदे विसरले जातील.. "कोण मेले कुणासाठी रक्त ओकून.." असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल.
म्हणूनच २६-नोव्हेंबर-०८ च्या थराराचे हे फोटो इथे देत आहे.

विशेष सूचना
ह्या फोटॊतील काही फोटॊ खूप्पच अंगावर येणारे, मन, बुद्धी आणि संवेदना बधीर करुन सोडणारे आहेत त्यामुळे ही खालची लिंक आपल्या जबाबदारी वर उघडावी.
२६-नोव्हें. २००८ चा थरार पहाण्यासाठी इथे क्लिक करा..

जय हिंद!

No comments: