विचारांच्या तंदरीत असताना, आज एकदम काहीतरी झालं आणि शाळेचे दिवस आठवले.. आणि मग ते लहानपण, शाळा, आजी, माऊ-बाबा, शेजारच्या टिळक मामी, बंडू मामा आणि बरच काही काही... जुने दिवस आठवले की एक हुरहुर लागते, गोड नॊस्टेल्जिया सतावतोच.. मग आठवणींच्या ह्या मोहजळात किती डुबक्या मारल्या तरी समाधान होत नाहीच, दर वेळा तळाला वेगळाच मोती मिळतो. कसं अजब आहे ना हे सगळं.. कित्येक वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी बारीक तपशीलासह अशा नजरेसमोर येतात, अगदी अनलिमिटेड स्टोअरेज आणि किती जोरदार अनुक्रम लावलाय त्याचा इवल्याश्या मेंदूनं, काही क्षणात त्या मन:पटलावर येतात सुद्धा, चक्क धक्काबुक्की करत गर्दी करतात मुंबईतल्या रेल्वेच्या डब्यासारखी.
चिकीत्सक शाळेतल्या छोट्या शिशुतल्या प्रवेशाचा हा प्रसंग. मला चांगलाच आठवतोय. रांगेत उभं राहून अगदी फॊर्म वगैरे आणला होता, तेव्हा मुलाखत की काय माहित नाही पण मला आईबरोबर एका खोलीत बोलावलं आणि बाईंनी काहीतरी प्रश्न विचारला. मी आपला औत्स्युकाने सगळ्या खोलीतल्या गोष्टी न्ह्याहाळतोय. टेबलावर एक खेळण्यातला पिंजरा आणि त्यात पोपट ठेवला होता. आठवत असेल तर बयाच ठिकाणी दारावरच्या बेलसाठी तो पूर्वी वापरायचे, म्हणजे बेल वाजवली की हा पोपट ’विठू विठू’ करणार. तर त्यावेळी तो पोपट आणि पिंजरा मला इतका आवडला की मी कुठल्याही प्रश्नाच उत्तर न देता, तो पिंजरा घेऊन तेथून बाहेर जो धुम्म पळालो की बस्स! अर्थातच आमच्या व्रात्यपणामुळे पुढे काय वाढून ठेवलय हे बाईंच्या लक्षात आलं असावं आणि साहजिकच त्यावर्षी शिशु वर्गात प्रवेश मिळाला नाही. माझं वर्ष आता वाया जाणार की काय अशा चिंतेत असतानाच, गिरगावात त्याच वर्षी जयाताईंनी (रेळेकर) शिशु वर्ग सुरु केल्याचं बाबांना कळलं आणि मग त्यांच्या शिशु निकेतनचा मी पहिला विद्यार्थी झालो. तिथून मला शाळा ह्या प्रकाराची आवड निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही (श्रेय जयाताईंनाच). थोडं असही आठवतय की त्याआधी (बहुधा घरी खूप्पच त्रास देत होतो म्हणून ) मी देवभुवन मध्येही काही दिवस डबा खायला जायचो.
असो, तर पहिलीला पुन्हा प्रवेशासाठी अर्ज करुन (आणि मी मागच्यावेळसारखा पुन्हा गोंधळ करणार नाही असा सज्जड दम खाऊन) चिकित्सक समूहाच्या पोतदार प्राथमिक शाळेत प्रवेश करता झालो. पहिली, दुसरी दुपारचे वर्ग असायचे, एका सुरात आम्ही कविता म्हणताना, गाताना जो ताल असायचा तो अजून कानात घुमतोय. पुतळ्याच्या मागचाच वर्ग होता आमचा. अगदी तिसरी पर्यंत हा पुतळा कोणाचा हे तिथे नाव लिहिलेले असूनही (श्री. पोतदार) मला कळले नाही बहुतेक. पगडी घातलेले एकमेव पुरुष पुतळ्याच्या रुपात माहिती होते ते म्हणजे लोकमान्य टिळक. शाळेतल्या प्रत्येक वर्गात असलेल्या वीणाधारी, मोरावर बसलेल्या सरस्वतीचा फोटॊ हे त्याकाळातलं अतिशय आकर्षण. वर्ग सुरु होताना सुरुवातिला जी प्रतिद्न्या आणि मग जन-गण-मन म्हणायचो त्यातून जे भारलेलं वातावरण निर्माण व्हायचं त्याची तुलना फक्त सार्वजनिक गणेशोत्सवात गुरुजींनी केलेल्या सामूहिक मंत्रोच्चाराशीस होऊ शकेल. शाळा संपताना वंदे मातरम, अहाहा काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे कानांचे! त्यातला तो ’जाड्या’ शब्द मला आजपावेतो कळला नाही. पहिलीच्या वर्गात्तील ’फुलपाखरु छान किती दिसते’ हे तर अजून आठवतेय मला, गाण्याच्या आंतरकरबाईंनी शिकवलेल्य हावभावासहित. दुसरीत असताना आम्ही दिंडी काढली होती तेव्हा वारकयांच्या वेषभूषेतला फोटॊ जपून ठेवलाय अजून :) तेव्हा प्राथमिक शाळेच्या सहली नॆशनल पार्क, तानसा वैतरणा अशा गेलेल्या आठवतात. शाळेत शिरतानाच प्रवेशद्वाराजवळ एक फळा आहे. त्यावर सुविचार आणि मग प्रदर्शने, आंतरशालेय स्पर्धा, नाटके ह्यात बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे नाव लिहिले जायचे. वर्षानुवर्षे तेच वळणदार अक्षर. फळ्यावर नाव लागणे म्हणजे अटकेपार झेंडा, अगदी अभिमानास्पद गोष्टच. तिसरीमध्ये असताना ऐन परीक्षेच्या धामधुमित म्हणजे मार्च मध्ये माझी मुंज झाल्याचे आठवतेय. बयाच जणांची त्यावर्षी मुंज झाली होती, तुळतुळीत गोटे करुन शाळेत बिचकत यायचो तेव्हा वेगळंच वाटायचं. माझा वाढदिवस मे मध्ये असल्याची मला कायम बोच होती. एकतर वाढदिवसाच्या दिवशी गणवेशा व्यतिरीक्त छान छान ड्रेस घालायची चैन, मग तुमचा वेगळा ड्रेस बघून तुम्हाला त्या दिवशी असलेला स्पेशल भाव असलं काही मिळायचं नाही मला. तसच वाढदिवसाच्या दिवशी शाळेत गिफ्टपण वाटता यायची नाहीत कधी, एकेकाचे नशीब! चौथीचं शिष्यवृत्तीचं वर्ष. जयकर बाईंनी विशेष मेहनत घेतली तेव्हा आमच्यावर. सकाळी साडेसहाला मोजक्या मुलांसाठी जास्तीचे वर्ग घ्यायच्या बाई. कष्टाचं चीज झालं आणि मिळाली स्कॊलरशीप. तेव्हा पेपरात फोटो आलेला जपून ठेवलाय, त्यावेळी आजीच्या चेहयावरचं कौतुक अजून आठवतय.
प्राथमिक शाळेतली ही वर्ष भुर्रकन उडून पाचवीत आलो आणि हुशार मुलांची ’क’ तुकडी असायची त्यावेळी शाळेत, त्यात येऊन पोहोचलो. ’क’ तुकडी साठी एन.सी.आर.टी. असल्याने तेव्हाच भौतिक आणि रसायनशास्त्राशी ओळख झाली, तसच इंग्लिशही शिकणं सुरु झालं. पाचवी मध्ये प्राविण्य आणि प्रद्न्या ह्या गणिताच्या परीक्षा उत्तीर्ण झालॊ आणि सहावीला बालवैद्न्यानिकसुद्धा. ह्या दोन तीन वर्षात टीळक विद्यापीठाच्याही काही परिक्षा दिल्या, का दिल्या माहिती नाही! पाचवीपासून मी शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात (त्याला आम्ही गॆदरींग म्हणत असू) भाग घेत असे. दीड एक महिना आम्ही सराव करत असू. कधी बेडेकरांच्या गच्चीत तर कधी कुणाच्या घरी. 'डोल डोलतय वायावर बाय माझी' ह्यावर कोळी नाच, 'ए नाम रे सबसे बडा रे तेरा नाम उचे शेरोवाली' ह्यावर गरबा तसच 'डोगराचे आडून एक बाई' ह्यावर असे नाच बसवलेले आठवतायत. मयुरी पालेकर आमचे नाच बसवायची. डिसेंबर महिना आला की मग स्पोर्ट्स आणि शाळेतल्या विद्न्यान प्रदर्शनाची धामधुमही असायची. वर्गाच्या लंगडीच्या टीममध्ये मी असायचो नेहमी. माझा एखादा प्रोजेक्ट असायचाच प्रदर्शनात. बक्षिसाच्या आशेने नव्हे तर माहिती व्हावी, चौकसपणा यावा, सभाधीट पणा यावा ह्यासाठी भाग घ्यायलाच हवा असा आजीचा कटाक्ष असे. मरीन लाइन्सच्या मैदानात आमचे तीन दिवस स्पोर्ट्स असायचे. मी कधीच खेळात चमकलो नाही पण हे तीन दिवस म्हणजे धमाल असायची नुसती. एकीकडे शाळेत ही धामधुम सुरू असताना संक्रांतीचे वेध लागलेले असायचे. पतंगासाठी जीव टाकायचो अगदी.. वाईट्ट म्हणजे वाईट्ट वेड होतं (अजूनही आहे!) आणि शाळेत तिळगूळ समारंभ असायचा. मग आम्ही सगळी मुलं वर्ग सजवून तिळगूळ वाटायचॊ, खायला आणायचो, फिशपॊंड द्यायचो. मुले-मुली एकत्र असल्याने एक वेगळीच मजा असायची त्या वयांत, त्या दिवसांत..
शाळेला खाली पटांगण, मागच्या बाजूला अंगण आणि सगळ्यात वरती मोठ्ठी गच्ची. तिसया मजल्यावर वागळे सभागृह आहे. त्यात कितीतरी जणांच्या हातून बक्षिस घेण्याचा आणि कित्येकांची भाषणं ऐकायचा योग आला. पाचवी पासून वक्तृत्व स्पर्धात भाग घ्यायचो तेही आठवतेय. टिळक पुण्यतिथीनिमित्त एक ऒगस्टला स्पर्धा असायच्या. पण एकूणात वक्तृत्वात मी मागेच असायचो (आमचे उद्योग पडद्यामागचे)! सातवी पुन्हा शिष्यवृत्तीच वर्ष, त्यात गोट्या, पतंग आणि क्रीकेट मुळे पुढे काय अशी घरच्यांना काळजी असतानाच, शिष्यवृत्ती मिळाली, नंबरही बराच वरचा आला. मिळणारी रक्कम अगदी दहा-पंधरा रुपये असायची महिन्याला पण ती घ्यायला बोलावलाय खाली ऒफिसात अशी नोटीस आली वर्गात किती एकदम ढॆंट्डढॆंड वाटायचं. मग आठवीत पुन्हा प्राविण्य आणि प्रद्न्या मिळवून बालवैद्न्यानिक उत्तीर्ण झालो. तेव्हा रुपारेल मध्ये बी.टी.एस. चे वर्ग भरायचे, त्यात मात्र मी रमलोच नाही विशेष. पण दर शनिवारी रेल्वेने माटुंग्याला जायचॊ, मजाच. त्यावेळीच मुंबईतल्या हुशार विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्या (अमित पटवर्धन, जो आमच्या ९३ च्या बॆचमध्ये गुणवत्ता यादीत पहिला आला तो इथेच मित्र बनला). बालमोहन, पार्लेटिळक, चोगले हायस्कूलच्या माझ्या बॆचच्या बयाच हुशार मुलांच्या इथे ओळखी झाल्या. आठवीत आमचा वर्ग होता त्यात सांगाडा होता कपाटात कोपयात ठेवलेला. प्रयोगशाळेच्या बाजूचा हा वर्ग, सापळ्याचा वर्ग म्हणायचो त्याला. बेफाम मस्ती, इतकी की एकदा वर्गातल्या ३० मुलांपैकी २८ जणांना शाळेतून बाहेर काढले होते, कारण काय तर कागदी रॊकेट बनवून उडवणे. तरीही, पुढे एकदा कागद दुमडून ते रबरबॆंडमध्ये अडकवून जोरात मारणे आणि त्याने बेंचवर उड्यामारत युद्ध खेळणे ह्यावरुन बराच प्रसाद खाल्लेला आठवतो. आठवीत असताना आम्ही कुमार कला केंद्रातर्फे घेण्यात येणाया आंतरशालेय स्पर्धेत ’तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटक बसवलं होतं, शिंदेबाई सर्वेसर्वा त्या नाटकामागे. अखिल मुंबईत प्रथम क्रमांक मिळवला, कौस्तुभ सावरकरनं त्यात जोतिबाचं काम केलं होतं. आठवीमध्ये आंतरशालेय विद्न्यान प्रदर्शनातही बक्षिस मिळालं होतं. परेश वैद्य (आमच्या मागच्या म्हणजे ९४ च्या बॆचमद्ये मुंबईत गुणवत्ता यादीत प्रथम) बरोबर ह्या प्रदर्शनात मांडलेल्या प्रकल्पावर आणि कुमार कला केंद्राच्या नाटकात कामही केल्याचं आठवतय. खूप शिकायला मिळालं ह्या काळात बरोबरीच्या मुलांकडून. माझ्याबरोबरची बहुतेक मुलं ह्यावेळी तबला, पेटी किंवा मग तालमीत व्यायाम असं काहीतरी शिकत असताना माझ्या मात्र सर्रास उनाडक्याच चालू होत्या ह्या दिवसांत, नाही म्हणायला वाचनाची गोडी लागली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामुळे. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही शाळेत सकाळी सहाला बॆडमिंटन खेळत असू. आठवी आणि नववी एन.सी.सी. चं वर्ष. उंची चांगली असल्याने मी एअरविंग मध्ये निवडलो गेलो पण तासन तास परेड करण्यात आणि जड बूट पायात घेऊन उन्हात फिरण्यात मला रस नसायचा. पण तरीही कडक पॊलिश असलेले बूट, स्टार्च केलेला तो निळा ड्रेस, बिल्ला असलेली टोपी असा मोठा रुबाब असायचा. ते कपडे धुवायला सुद्धा आम्हाला वॊशिंग अलाउन्स मिळायचा. नववी मध्ये आम्ही अंबरनाथला एन.सी.सी. च्या कॆंपला गेलो होता. घरापासून दूर, फक्त मित्रांसोबत आठ दिवस राहाण्याचा माझ्या (आणि बरोबरच्या जवळजवळ प्रतेकाच्या) आयुष्यातला पहिला प्रसंग. सकाळी पाच वाजता उठून आवरून परेड ते रात्री दहा पर्यंत दंगा चालूच. इतकं असूनही घरच्यांची आठवण यायचीच. विनायक पंडितने तबलावादनाने आणि मी आंतरशालेय चेस मधे अशी दोन पदक कॆंपमध्ये शाळेला मिळवून दिल्याचं आठवतय.
पुढे दहावीच वर्ष सुरु झालं आणि शाळा, क्लास ह्यांच वेळापत्रक सांभाळताना तारांबळ व्हायला लागली. गोडबोले सरांचा दादरला व्हेकेशन क्लास असायचा तेव्हा. इतरही क्लास होतेच. शाळेत सगळ्याच शिक्षकांनी मेहनत घेतली आमच्यावर. अभ्यासाच्या नादात दहावीच वर्ष कधी गेलं कळलंच नाही. तसं सेंड ऒफच्या वेळी थोडं जड वाटलं होतच पण एकतर येऊ घातलेल्या परिक्षेचं टेंशन आणि पुढच्या कॊलेज जीवनातल्या स्वातंत्र्याची ओढ त्यामुळे तेव्हा ते विशेष जाणवलं नसावं. आता मागे वळून पाहाताना, सगळं लख्ख दिसतय. इतके कसे मोकळे झालो शाळेपासून पटकन ह्याचं आश्चर्य वाटतय.
शाळेचा फोटॊ ठेवलाय माझ्या ओर्कुटवरच्या अल्बम मधे. कुणितरी म्हटलं, हे काय किती वर्षात रंग काढला नाहीये शाळेला! अरे हो खरंच की, पण मला कसं खटकलं नाही हे, कदाचित शाळेचं अंत’रंग’, तिची माया अनुभवली असल्याने तिच्या बाहेरच्या रंगाकडे, दिखाऊपणाकडे लक्षच गेलं नसावं. खरं सांगायचं तर, जगात कुठेही गेलो तरी मनाच्या कुपीत लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत आणि एखाद्या निवांत क्षणी ज्या मोराच्या पिसांर्या सारख्या फुलून समोर येतात त्यात ह्या शाळेतल्या वर्षांच्या (की भुर्रकन उडालेल्या क्षणांचा!) मोरपिसांचा मोठ्ठा वाटा आहे. ’मज आवडते मनापासूनि शाळा, जशी माऊली लळा लाविते बाळा’ ह्याचा तंतोतंत प्रत्यय.
सहज मनात आलं की शाळेतल्या प्रत्येक इयत्तेच्या वर्गशिक्षकांची नावं आठवतायत का पहावं आणि गंमत म्हणजे ती आठवली सुद्धा.. मलाच खूप प्रसन्न वाटलं अंगावरुन आठवणीची ही मोरपिसं हलकेच फिरवताना..
पहिली ’अ’ - फडणीस बाई
दुसरी ’अ’ - पेवेकर बाई
तिसरी ’अ’ - गोडबोले बाई
चौथी ’ब’ - साने बाई
प्राथमिक मुख्याध्यापिका - वालावलकर बाई/ जयकर बाई
पाचवी ’क’ - राजवाडॆ बाई
सहावी ’क’ - पाटील बाई
सातवी ’क’ - भातखंडे बाई
आठवी ’क’ - देशमुख बाई
नववी ’क’ - पाटील बाई
दहावी ’क’ - मांजरेकर बाई
उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका - केळकर बाई, पाडगावकर बाई
शिपाई - रघू काका, गायकवाड
ऒफीस स्टाफ - विचारे सर
यांखेरीज ज्या शिक्षकांच्या मुशीतून घडलो ते श्री. घरत सर, भूगोलाचे नारखेडे सर, चित्रकलेचे जोशी सर, मराठीच्या परांजपे बाई, संस्कृतच्या गारखेडकर बाई तसेच दळवी बाई, पीटीचे नलावडे सर, गणिताच्या पाठारे बाई, राणे बाई, इंग्लिशच्या प्रभू बाई, केणी बाई, मुलांवर जीव लावणारे पालकर सर तसेच पालकर बाई अजून कितीतरी नावे घेता येतील. लहानसहान प्रसंगातून ह्या सगळ्यांनी आमच्या संस्कारक्षम वयात पाठ्यपुस्तकाबाहेरचं किती तरी शिकवलं. पु.लं चे चितळेमास्तर वाचताना, बोकीलांचं शाळा वाचताना किंवा प्रकाश संतांच लंपन वाचताना मनातल्या मनात माझी शाळा आणि त्यातले कैक प्रसंग माझ्यासमोर आले ते ह्यातल्या कुण्या ना कुण्या शिक्षकाबरोबरच. विद्यार्थी हा परिक्षार्थी हवाच पण त्यापलिकडे एक चौफेर, चौकस व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आणि तेही एकावेळीस अनेक गोळ्यांवरुन हात फिरवण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलं. शिक्षकी पेशा पलिकडे जाऊन ह्या शिक्षकांनी जे काही दिलय त्याच्या त्रुणात राहाणच परम भाग्याचं. कधी मायेने गोंजारून, कधी पाठीवर शाबासकी देऊन तर कधी घणाचे घाव घालून ह्या सायांनी वर्षामागून वर्षे विद्यार्थी ’तयार’ केले, त्यांच भविष्य अक्षरश: विणलं, घडवलं. ’शीलं परम भूषणं’ हे शाळेचं ब्रीदवाक्य आम्हाला घडवत गेलं ते अशा शिक्षकांमुळेच. आज ह्या सगळ्या शिक्षकांची आठवण यायला गुरुपौर्णिमेचं निमित्त नाही आणि हा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रमही नाही. एका निवांत क्षणी, मागे वळून बघताना, शाळेतल्या क्षणांचा हा धांडॊळा आहे आणि ते क्षण उजवळवणाया ह्या शिक्षकांविषयी मनातली अपार कृतद्न्यता कागदावर उतरते आहे.
दरम्यान इतकी वर्ष उलटली शाळेतून बाहेर पडून, तर पुन्हा एकदा जमता येतय का पहावं असा उत्साही प्रयत्न मिलिंद दामले, वैशाली दळवी, प्रिया बेडेकर, स्वप्निल जोशी यांनी एक-दोनदा केलाय. ह्या फेसबुक आणि ऒरकटच्या कृपेने आम्ही बरेच जण एकमेकांच्या संपर्कात आहोत इतकच, त्यापुढे जाऊन एकत्रित भेटण्याची शक्यता आता बहुतेक म्हातारे होऊन सांसारिक जबाबदाया संपल्यावरच. नाही म्हणायला आमचा वर्गातल्या मुलांचा खास ग्रुप अजून एकत्र जमतो, कधीतरी गिरगावतल्या व्हॊइस ऒफ इंडियाच्या इराण्याकडे चार कप चहावर शाळेतल्या दिवसांच्या रम्य आठवणी अजूनही रंगतात. असंच गप्पांच्या ओघात, आम्ही वर्गातल्या मुलांची सगळी नावं त्यांच्या हजेरीपटाच्या अनुक्रमासहित आठवायचा प्रयत्नही करतो.. धम्मालच!
आता भारतात गेलो की प्रत्येक वेळी शाळेत जातो, स्टाफ रुम मध्ये ओळखीच्या बाई भेटतायत का बघतो, भेटता क्षणीच ओळख पटतेच, कुठल्या बॆचचा वगैरे सांगावं लागत नाही. शिक्षकांच्या चेहर्यावरचा आनंद, अभिमान, कौतुक ह्याचं मिश्रण सारं सारं बघून घेतो, मनोमन सुखावतो. मग खाली तळमजल्यावर येतो, घंटा आहे मोठी तासाचे टोले रघूकाका द्यायचे, जे घरपर्यंत ऐकू येतात. तिच्या खाली उभे राहून अंगणात बेफाम धावणाया मुलांकडे बघत हातात वडापाव घेऊन उभा राहतो. ह्यातलाच कोणीतरी उद्या जगाच्या दुसया टोकावर जाईल आणि ह्याच क्षणांची त्तेव्हा अशीच उजळणी करेल काय, आठवण काढेल काय असा विचार करत भरलेल्या डोळ्यांनी, डॊळे भरुन, त्या धावणाया मुलांना मी कौतुकाने पहात रहातो.. पहातच रहतो.
Saturday, December 18, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
Hey Prashant ..........though i was with you people and in the school till 7th only but relived the moments after so long.................thnx for reminding those golden days!
Hi Prashant...it was a great feeling to go back in the rewind mode and revisit our school days...junya aathavani manat datun aalya...thnx for sharing it with me..n yes..i also must tell u that, u have a very goog flair for writing...vachtana maja aali..Meghana
Thanks for reminding us about our school days. Great job!
Prashant -- hats off to u --- Saglya aathvani manat yajya zalya --- how do u remember the things in so much in detailed----- i am speachless-- gr8
Mitraaaa,
x'anar'dhat Akhi Daha varsha ubhi kelis najare samor.Kai Blog lihila aahes... tuza mendu aahe ki computer sagala athvatei tula( from KG to SSC) Great ... You are Simply Great!!! Kharach tuze Kautuk kara'va tevdha Kamich aahe Rather Mazyakade shabdha apure pad'let tuze Kautuk karaya la. Mitra Thnxs once again. Cheers!!!
Mitraaaa,
x'anar'dhat Akhi Daha varsha ubhi kelis najare samor.Kai Blog lihila aahes... tuza mendu aahe ki computer sagala athvatei tula( from KG to SSC) Great ... You are Simply Great!!! Kharach tuze Kautuk kara'va tevdha Kamich aahe Rather Mazyakade shabdha apure pad'let tuze Kautuk karaya la. Mitra Thnxs once again. Cheers!!!
I don't know much about Chikitsak samuha but this is a good post on teachers and the school in general.
I don't know much about Chikitsak samuha but this is a good post on teachers and the school in general.
Mastach lihila aahes re. Parwa mi sudhaa asach basun 1 te 10 varg-shikshak, shikshika athavayacha prayatna karat hote. Maja mhanaje 5 wi paryant neet kram athavala ani mag nakki kram athavena zala. :-( Aso.
Post a Comment