Sunday, February 17, 2008

प्रश्नच प्रश्न...

इथे प्रेसिडेंट डेची सुट्टी असल्याने आणि बाहेर वातावरण थोडे थंडच असल्याने सद्ध्या घरीच थोडा आराम. तर आज लिहीणार आहे मी एका चांगल्या कार्यक्रमाविषयी.

इथे डॆलास मध्ये पहिले २४X७ देसी एफ एम प्रसारण केंद्र (रेडीओ सलाम नमस्ते, १०४.९ एफ. एम.) आहे. खरं तर मी त्याच्या अतिशय प्रेमात असण्याची बरीच कारणं आहेत पण त्यातल्या त्यात काही प्रमुख म्हणजे वैविध्यपूर्ण कार्यक्रम, नवीन तसेच जुनी तुम्हाला आवडतील अशी गाणी, तदनुषंगे समालोचन आणि खिळवून ठेवतील असे कॊल इन प्रॊग्राम्स. जुनी फर्माईशी गाणी ऐकण्याव्यतिरीक्त नवीन टॊप टेन तसच ऐशी नव्वदच्या दशकातली उत्तम गाणी सुद्धा सहज जाता जाता कानी पडतात आणि आपण कधी शाळा कॊलेजच्या त्या दिवसात हरवून जातो कळत देखील नाही. त्याचबरोबर एखाद्या गायकाचा, गीतकाराचा, संगीतकाराचा, अभिनेत्याचा , अभिनेत्रीचा, निर्मात्याचा, दिग्दर्शकाचा वाढदिवस असेल तर काहीवेळा त्याचा स्पेशल प्रोग्राम ऐकायलाही तितकीच मजा येते. शिवाय मधून मधून बॊलीवूड ट्रीव्हीया क्वीझेस असतातच तुमचं बॊलीवूड्च अगाध द्न्यान तपासायला. त्याशिवाय बयाच आध्यत्मिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल असते. शनिवारी संध्याकाळची हिंदू देवळातली आरती सुद्धा प्रसारीत करण्यात येते. ह्या प्रसारणाचा मुख्य श्रोतृवर्ग देसी म्हणजे डॆलसस्थित भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी आणि बांगलादेशी असा असल्याने कार्यक्रम बहुढंगी होतात. शिवाय देसी डॊक्टर्स, सी.पी.एज, विमा एंजंट्स, हॊटेल्स ह्यांची माहिती सुद्धा मिळते. एकंदरच देसी कम्युनिटीच्या वाढीस आणि एकत्रिकरणास चांगलाच हातभार लागतोय ह्या प्रसारण केंद्रामुळे. तर आज मी मला ह्या केंद्रावरून प्रसारीत होणाया अशाच एका कार्यक्रमाविषयी लिहिणार आहे.

सदाफ म्हणून एक आर.जे (रेडीओ जॊकी) दर शुक्रवारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान हा कार्यक्रम सादर करते. एखादा राजकीय किंवा सामाजिक विषय घेऊन आणि त्याच सूत्र संचालन स्वतःकडे ठेवून सदाफ लोकांना त्यावर आपली मत प्रदर्शित करायचं आव्हान करते आणि मग वेगवेगळे लोक आपली मत मांडण्यासाठी ऒन एअर फोन करतात आणि मग एकावेळी एक एक कॊलरशी संभाषण करीत सदाफ कार्यक्रम छान रंगवते. म्हटलं तर तसं सोप्प आहे आणि म्हटलं तर हे काम कठीण सुद्धा. लोक बरेचदा भावूक होतात फॊन वर, शिवाय सगळ्यांना बोलायला संधी देता यावी म्हणून तिला बोलताना काटेकोरपणे वेळ द्यावी लागते प्रत्येकाला. मला ह्यात सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या लोकांची माहिती मिळते तसच वेगवेगळ्या शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या माणसांचे विचार, अनुभव ऐकायला मिळतात. अगदी मायबोलीवरच्या व्ही ऎण्ड सी (म्हणजे व्ह्यूज ऎण्ड कमेंट्स) सारखं.

दोन आठवड्यांपूर्वी सदाफने अमेरीकेतल्या प्रायमरी विषयी प्रश्न मांडला होतात त्यातून स्त्रीवर्गाचा पाठींबा हिलरीला का आणि किती आहे शिवाय ओबामालाही मिळणारा पाठींबा ह्याची झलक मिळाली. विशेषतः डॆलास मधे तरी बरेच देसी अमेरीकन्स आहेत ज्यांचा डेमोक्रेटीक पार्टीला पाठींबा आहे.

मागच्या वेळी सदाफने पाकिस्तानातले सद्य राजकारण हा विषय घेतला होता. बेनझीरची राजकीय हत्या आणि त्यानंतर आज होत असलेल्या निवडणूका ह्यावर बरीच चर्चा झाली. खूप पाकीस्तानी लोकांनी कॊल करून पाकिस्तानच्या सद्य परिस्थिती बद्दल चिंता तसेच विषाद व्यक्त केला. भारताशी तुलना करता पाकिस्तानची लोकशाहीतली अधोगती अर्थातच अधोरेखित झाली. गमतीची गोष्ट अशी की मुशर्रफ ह्यांना सगळ्याच थरातून वाढता पाठींबा दिसून आला. इथे असलेले पाकिस्तानी हे बरेचसे सुजाण आणि सुविद्य पाकिस्तानी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. एकंदरच पाकिस्तानात बोकाळलेली सरंजामशाही बेनझीर, नवाझ शरीफ ह्यांनी कमवलेली अफलातून संपत्ती, भ्रष्टाचाराचा कळस ह्यामुळे तेथील जनता इतकी जर्जर झाली आहे की विचारता सोय नाही. ह्या पार्श्चभूमीवर मुशर्रफांकडे दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने बघत लोक पाठींबा देत आहे. मूलतत्त्ववाद्यांचा धोका, दह्शतवाद आणि राजकीय अस्थैर्य ह्यात पाकिस्तानी जनता अक्षरशः भरडली जातेय. दुर्दैवाने दूरदृष्टी असलेला नेता त्यांच्याकडे नाही. शिवाय लष्करशाहीने लोकशाहीचा खेळ करून टाकलाय आणि ह्याचेच सुविद्य पाकिस्तानींना जास्त दुःख आहे. स्त्रियांचे शिक्षण, पुढच्या पिढीत मूलतत्ववाद्यांचे वाढते धोकादायक आकर्षण आणि वाढती धार्मिक. सामाजिक विषमता ह्यामुळे प्रगतीच्या विरुद्ध दिशेने पाकिस्तान जात आहे असं दिसतय. शिवाय तालिबान तसेच अफगाणिस्तानचा काही प्रदेश ह्यांकडून त्यांना टॊळ्यांचा धोका आहेच. अत्तापर्यंतचे सगळेच राज्यकर्ते भारताचा द्वेष हे एकच धोरण मध्यभागी ठेवून जनतेची दिशाभूल करत राहीले परिणामतः साठ वर्षांनतरही पाकिस्तानातली सुंदोपसुंदी संपताना दिसत नाही, उलट अस्थैर्य आणि आर्थिक विषमता वाढतच आहे. मूठभर धनिकांच्या हातात अजूनही देशाच्या नाड्या आवळलेल्या आहेत आणि लष्कराच्या अकारण हस्तक्षेपामुळे बर्याच राजकीय, सामाजिक निर्णयांना वेगळे वळण लागून सामान्य नागरीकाची सुरक्षितता आणि स्वातंत्र्यच धोक्यात येत आहे. पाकिस्तानात रहाणाया अतिशय थोड्या हिंदूचे हाल तर कल्पनातीत आहेत. इतर अनेक विषमतांबरोबर धार्मिक विषमता त्यांना सहन करावी लागते आणि अर्थात पाकिस्तान तसेच त्यांचा इस्लाम हा काही सहिष्णू नव्हेच. एका पाकिस्तानी हिंदूने रेडीओवर सांगितलेली प्रतिक्रीया पुरेशी बोलकी होती. सद्ध्या पाकिस्तानात रोटीचा प्रश्न गाजतोय. तेथे गव्हाचे उत्पन्न खूप होते. गहू हेच मुख्य खाणे आणि नंतर भात. तर अचानक गहू आणि आटा बाजारातून गायब झालाय. इतका की काळ्याबाजाराला उत येतोय. मुशर्रफ सरकार म्हणते गहू आहे पण तो लोकांपर्यत पोहोचत नाहीये. मधले दलाल त्याला परस्पर बाहेर विकत आहेत. इतकं टोकाला गेलय हे की लष्कराचे सैनिक गव्हाच्या गोदामांना राखण्यासाठी ठेवावे लागत आहेत. ह्याच खरं कारण असं दिसतय की सरकार जरी म्हणत असलं की गव्हाच चांगलं उत्पन्न झालय तरी बराचसा गहू त्यांना निर्यात करावा लागलाय, नाहीतर देशाला पैसा मिळणार कुठून. एकंदर कठीण काळातून जात आहे पाकिस्तान. त्यातच ह्या निवडणूकांचे ओझे. लालमशीद प्रकरण, अमेरीकेचा दबाव, संरजामशाहीकडे झुकलेल्या आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सिस्टीमचा आडमुठेपणा ह्या सगळ्यांशी लढताना मुशर्रफना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि त्यातूनच हाच एक माणूस पाकिस्तानासाठी निदान काहीतरी करू शकेल अशी भावना तेथे मूळ धरत आहे. जे असेल ते, पण भुकेने पेटलेल्या आणि बजबजपुरीने विटलेल्या जनतेचे लोंढे बांगलादेशासारखे पुन्हा इथे वळायला नकोत ह्यासाठी भारतीय लष्कराला मात्र डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करावं लागतय.

अजून एक विषय सदाफने चर्चेला घेतला होता तो म्हणजे जोधा अकबर आणि मतमतांतरे. त्याविषयी माझं मत. चित्रपट कितीही चांगला बनवला असला तरी तो करमणुकीसाठी आणि निव्वळ पैसे कमवण्यासाठी बनवलाय त्यामुळे हाच खरा इतिहास असं पुढच्या पिढीला सांगण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. आपल्या अभ्यासक्रमातल्या इतिहासात सन सनावळ्या पाठ करण्यावरच भर असतो आणि त्याच्याव्यतिरीक्त काय आहे खरा इतिहास हे वाचावं हे शालेय जीवनानंतर सहसा वाटत नाही आणि वाटलं तरी वेळ मिळतोच असं नाही. त्यामुळे असं चित्रपटात दाखवलेलं खरं मानून तेच इतिहास म्हणून पुढं केलं जातं. ह्यामुळे खरच नुकसान होतय इतिहासाचं. आशुतोष गोवारीकरने तरी चित्रपटाच्या सुरुवातीला हा खरा इतिहास असेलच असं नाही असंं लिहायला हवं होतं. राजपूतांच्या भावना दुखावल्या जाणारच ह्यात. राणाप्रतापासारखे तुरळक अपवाद सोडले तर बयाच राजपूत नायकांनी मुघलांबरोबर रोटी बेटी व्यवहार करून मांडिलकी पत्करली. जर राजपूत स्त्रियांच्या ह्या असहाय्यतेला प्रेमाचं स्वरूप दिलं गेल असेल तर ते कोणालाही आवडणार नाहीच, शिवाय मुगलांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करून प्राणार्पण करणाया कित्येक राजपूत स्त्रीयांचा तो अपमानही ठरेल. तुम्ही चित्रपटात अर्थात काहीही दाखवू शकता पण हाच इतिहास हे लादण्याचा अट्टाहास कशासाठी? ज्याला खरंच काय आहे खरं, ती जोधा होती की नव्हती, तिच शत्रूतुल्य अकबरावर प्रेम होतं की न्हवतं ह्याचा शोध घ्यायचाय तो संशोधन करेलही. शिवाय अकबर हा सम्राट असला आणि त्यातला त्यात बरा मुगल राजा असला तरी शेवटी परकीयच त्यामुळे स्थानिकांवर अत्याचार होतच असणार. बिरबल तसेच नवरत्नांमुळे आणि कलोपासनांमुळे तो चांगला प्रसिद्धिस पावला इतकेच. सांगायचा मुद्दा असा की जोधा अकबर जरुर पाहा पण एक निव्वळ करमणूक म्हणून, ऐश्वर्या छान दिसतेय म्हणून, लढाया चांगल्या चित्रीत केल्यात म्हणून, ह्रुतिक भरजरी कपड्यात उमदा दिसतोय म्हणून.. हा खरा इतिहास आहे असं समजून नको... उद्या अशुतोष गोवारीकरच्या लगान मधे जी मॆच झाली तशी खरोखरच झाली होती असं म्हटलं तर ते मान्य होईल का? शिवाय पुढे कोणत्या परराष्ट्रीय अभ्यासकाने ऐतिहासिक संदर्भ म्हणून हा चित्रपट घेतला तर योग्य होईल काय? आणि म्हणूनच शिवरायांविषयी किंवा आपल्या गणेशोत्सवाविषयी जेव्हा कोणी उद्दाम आणि सवंग लिहू पाहाते तेव्हा आपणास राग येत असेल तर तसाच राजपूतांना येणे शक्य नाही काय?

No comments: