Sunday, February 10, 2008

"राज"कारण

उपास, मार आणि उपासमार मधल्या मार विषयी थोडसं लिहीणार आहे आज.. आणि तदनुषंगाने राज-कारणाविषयीही.

गेले आठ दिवस मुंबईत जे काही चालू आहे त्याविषयी ऐकतोय आणि वाचतोय. सगळ्या थरातून संमिश्र प्रतिक्रीया आहेत आणि खरं काय चाल्लय ह्याचा नीट उलगडा व्हायला वेळ लागतोय. खरं तर हे मिडीयाचं अपयश म्हणावं लागेल. सगळेच सवंग पत्रकारीतेच्या मागे असल्याने एखाद्या लहानशा गोष्टीचं भांडवल करून त्याला भडक रूप देऊन breaking news बनवायचं आणि आपला TRP वाढवायचा पद्धतशीर प्रयत्न मिडीया कडून होताना दिसतोय. ह्याची परिणिती मिडीयावरचा विश्वास कमी होण्यात होतेय आणि हे चांगलं लक्षण नाही.

प्रांतीय वाद आणि प्रादेशिक अस्मिता हा विषय तसा नाजूक आहे. भारतीय घटनेने भारतीयास भारतात कुठेही जाऊन राहाण्याचा, घर थाटण्याचा (दुर्दैवाने काश्मीर वगळता - कलम ३७०) हक्क दिला आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही जिकडे स्थायिक व्हाल तिथे तुम्ही शांतता, स्थैर्य राखून स्थानिकांच्या भावनांचा, स्थनिक म्हणून त्यांच्या हक्कांचा विचार करायलाच हवा. सांस्कृतिक, भाषिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक सगळ्या पातळ्यांवर समरसून एकत्र राहाण्याची तयारी असायलाच हवी. ह्या मुद्द्यांवर राज जे काही म्हणतोय त्यात तथ्य वाटतय. भारतातल्या इतर राज्यांशी तुलना करता मुंबईतला मराठी माणूस बराच सहिष्णू आहे, दिवसेंदिवस मुंबईत येणारा लोंढा बघून तो अजूनही शांत आहे. पण विशेषतः उत्तर प्रदेशातले, तेथे हरल्यामुळे रिकामटेकडे असलेले नेते पुनःपुनः मुंबईत येऊन इथले वातावरण विनाकारण कलुषित करत आहेत. तसं पाहाता तात्विक दृष्ट्या विचार केला तर केवळ भैय्या लोकांवर राग असण्याचे कारण नाही. जे जे मुंबईत राहून केवळ तिला ओरबाडतच नाहीत तर इथे येऊन हक्कांची आणि दादागिरीची भाषा करतात त्यांना मराठी माणूस म्हणून बाणा दाखवायलाच हवा. तुम्ही इकडे निष्ठा ठेवत असाल आणि इथल्या सांस्कृतिक आणि भाषिक वातावरणात जुळवून रहाणार असाल तर रहा नाहीतर चालते व्हा असं सांगण्यात काहीच गैर नाही. ह्या बाबतीत मला गुजराथी, जैन समाजाचे विशेष कौतुक वाटते. माझे कित्येक जैन, गुजराथी मित्र मराठी उत्तम बोलतातच शिवाय घरी गणपतीही बसवतात. ह्याला म्हणतात एकात्मता. अजून एक बातमी वाचून डोकं ठणकलं ती म्हणजे मुंबई महानगर पालिकेचा कारभार हिंदीतूनही चालवण्याचा प्रस्ताव. हा प्रस्ताव आणायची हिम्मत होते आणि कित्येकांना त्याबद्दल काही वाटत नाही हे मराठी माणसाच दुर्दैव आहे. हिंदी असेलही आमची राष्ट्रभाषा पण मराठीला ही मान्यताप्रत दर्जा आहे. भाषावार प्रांत रचनेत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्रीय माणसाने १०५ हुतात्म्यांचे मोल देऊन मुंबई मिळवलेय, तिचा कारभार मराठीशिवाय इतर भाषेत होऊ देताच कामा नये. बाहेरून येणायांना मराठीतला कारभार कळत नसेल तर मराठी शिकून या म्हणावं. चेन्नई, कोलकत्ता किंवा इतर कोणत्या ठिकाणी असा प्रस्ताव आणायची कोणी हिम्मत तरी करु शकेल काय? आज आपलं आयुष्य कमालीचं वेगवान झालय आनि सामाजिक मन प्रचंड निष्क्रिय. त्यामुळे मुंबईत मराठीचा टक्का घटण्याचे धोके काय आहेत ह्याचा विचार करायला वेळच नाहीये कोणाला. राज ते करतोय हे नक्कीच चांगलं आहे. शिवसेने सुद्धा मराठी माणसाची तळी उचलली काही वर्षांपूर्वी म्हणून मुंबई मराठी माणसाची अशी ओळख राहीली. पण मग राजकारण्यांनी रेशनीग कार्ड वाटली राजकीय स्वार्थासाठी आणि आता परप्रांतीयांचा टक्का इतका वाढलाय की त्यांचा राजकीय दबावगट तयार झालाय.

आता केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारातून आलेल्या भैय्यांच्या बाबतीत बोलायचं तर मला वैयक्तीक पातळीवर त्यांविषयी आदरच आहे. जे अनेक समूह मुंबईत आहेत त्यातल्या त्यात हा समाज मेहनत करून जगणारा आणी थोडासा पापभिरू. हातावर पोट असलेल्यांपैकी. राज ने ह्या समाजाला निषाण करायचं कारण अर्थात राजकीय जास्त आहे. पण मराठी माणसाच्या उद्योगातल्या उदासीनतुमुळे भैय्या लोकांनी अनेक धंदे काबीज केलेत. दूधवाला, पानवाला, इस्त्रीवाला, भेळवला, चणेवाला इतकच काय तर न्हावी, भाजीवाला अशा सगळीकडे आपल्याला भैय्येच दिसतात. जिथे तुमच्या कामातल्या कौशल्यापेक्षा ढोर मेहनत अधिक लागते तिथे भैय्ये लोक हमखास दिसतील. शिवाय एक भैय्या आला की तो थोडे दिवसानी रायबरेली किंवा तत्सम ठिकाणावरून दुसरा, तिसरा आणि मग त्यांची कुटुंब असं चालूच आहे. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही, मेहनत करणायाला तर कधीच नाही. पाडगावकर एका बोलगाण्यात म्हणतात तसं, कधी कधी एखादा भैया दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची आठवण काढत एकसुरी जगत असेलेला दिसतो. एका खोलीत दहा दहा जण राहून पैसे वाचवून गावाला पाठवताना बरेचदा दिसून येतं. अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाचा अभाव, लग्नावर ऐपतीबाहेर होणारे खर्च ह्यामुळे हा समाज तसा मागेच आहे. तिथल्या राजकरण्यांनी केलेल्या दिवाळखोरीमुळे आणि मुंबापुरीच्या आकर्षणामुळे भैय्ये लोक इथे येतात आणि दुय्यम दर्जाची कामे करून उरलेल्या वेळात भजन किर्तनात वेळ घालवतात. ढोबळ मानाने ह्या भैय्या लोकांच्या मेहनतीचा मुंबापुरीला उपयोगच होतोय. पण त्यांनी इथे समरसून जाणं आवश्यक आहे. रामलीला इतके वर्ष होत आहेच आणि होत राहीलही, पण आपल्या समूहाचा दबावगट तयार करून स्थानिकांवर कुरघोडी करू नये हे त्यांच्या नेत्यांना समजायला हवं.

राजचा मुद्दा तंतोतंत पटण्यासारखा आहे पण झुंडशाहीचा मार्ग बरोबर नाही असे वाटते. शिवाय हातावर पोट असलेल्या सामान्य भैय्याला मारुन काय होणार, आपली रेष मोठी कशी करायची ह्याचा मराठी मनाने विचार करायला हवा, दुसयाची रेष पुसायची गरज नाही, त्याचबरोबर भैय्याला दिली ओसरी भैय्या हात पाय पसरी हे ही होता कामा नये म्हणून स्थानिकांचा आवाज बुलंद असायलाच हवा.

ह्या ग्लोबल युगात संकुचित राहूनही अजिबात चालणार नाही त्यामुळे सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि प्रादेशिक अस्मिता ह्यांचा योग्य मेळ साधायला हवा. मराठी माणसानेही पोटापाण्यासाठी मुंबई सोडलेय तो देशा परदेशात रहातोय. त्यानेही महाराष्ट्र मंडळे चालवून ठिकठिकाणि मराठी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मुंबईतल्या आततायी पणाचा मुंबईबाहेरील मराठी माणसास त्रास होणार नाही हे ही बघणे महत्त्वाचे.

राजच्या मनसे कडून बर्याच अपेक्षा होत्या मला, विशेषतः त्याचा जाहीरनामा वाचला तेव्हा. अत्तापर्यंत त्याने काही ठोस केल्याचे जाणवले नाही आणि हे आंदोलन सुद्धा राजकीय जास्त वाटतय. झुंडशाहीचा त्याचा मार्ग पटत नाही पण मराठीचा मुद्दा बरोबरच आहे. शिवसेनेला काटशह देण्याचाही त्याचा हेतू स्पष्ट दिसतोच आहे. त्याने म टा मधे आपली भूमिका स्पष्ट मांडलेय ह्याचा त्याला नक्कीच उपयोग होतोय. शिवसेनेला मात्र आता थोडी भिती आहे की मराठी पणाच्या चलनी नाण्यात वाटेकरी झाला की काय? बाळासाहेबांना मराठी मक्तेदारी शिवसेनेकडेच हे ओरडून सांगण्यासाठी वेगळा अग्रलेख लिहावा लागला सामन्यात ह्यातच राजच्या करिष्म्याची झलक दिसतेय. बाळासाहेबांच्या बर्याच गुणांची छबी राज मध्ये तंतोतंत दिसतेय. बाळासाहेबांकडे पक्षाची भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवायला जसे मार्मिक आणि मग सामना ही पत्रे होती, तसं काहीतरी राजकडे असणं आवश्यक आहे. गुंडगिरी सोडून विधायक कामांवर राजने जास्त लक्ष दिलं तर एक चांगली लोकमान्यता त्याला नक्कीच मिळू शकेल.

जय हिंद, जय महाराष्ट्र!!

No comments: