Tuesday, October 19, 2010

आमचे साहेब..

खरं म्हणजे इतक्या दिवसांनी लिहितोय, इतका खंड पडेल लिखाणात असं वाटलं नाही, पण चलता है, गेले काही माहिने घर आणि नंतर कामात इतका व्यस्त होतो की वाचन तसं थंडावलच पण मनात असूनही कागदावर उतरवण्या इतका वेळ काढू शकलो नाही. लक्षमणचे ते लाजवाब डाव, सचिनने दिलेले दणके, कॊमनवेल्थ मधला भ्रष्टाचार आणि मग भारतियांनी लुटलेली पदक, बिहारच्या निवडणूकांतली रणधुमाळी, अयोध्याकांडाचा पुढचा अध्याय आणि असं बरच काही बघत, वाचत होतो.. बरेचदा मनात असूनही लिहायचं राहून गेलं, असो.. पण बाळासाहेबांची दसयाची डरकाळी ऐकली आणि अगदी उचंबळून आलं सगळं, म्हटलं लिहून मोकळं व्हायलाच हवं.

तर, परवाच्या सेनेच्या (आता सेना म्हटली कि फक्त ’शिव’सेनाच, आता ’शिव’ हा शब्द वड्यापासून उद्योगापर्य़ंत वापरून टाकलाय तो भाग सोडा!) दसयाच्या सभेचा इतिवृत्तांत वाचला आणि जुने दिवस आठवले. गिरगावात शाखा म्हणजे संघाची नाही तर सेनेचीच असं त्यावेळी वातावरण. दसयाची सभा म्हणजे घरचं कार्य असल्यासारखी तयारी असे. म्हणजे सकाळी घरोघरी पूजा करुन, उन्हातान्हात शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे विचार ऐकायला वडिल-काका आणि आजूबाजूचे सगळेच जात असू. तो भगव्याचा गजर, बाळासाहेबांचा करारी आवाज आणि मिश्कील चिमटे, परखडपणा.. त्यांच्या विचाराचं सोनं लुटत आम्ही पांगायचो एक समाधान घेऊन. एक तरी व्यक्ती आहे जी मनापासून आणि मनातलं बोलते, निर्भिडपणे आग ओकते आणि हो, मराठी माणसाचा विचार करते हे सुखावणारं होतं, निदान त्या काळात तरी. तेव्हा शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करणारी होती म्हणून असेल पण मध्यमवर्गीय तरुणांत आणि नवतरुणांत (केवळ मराठीच नाही तर गुजराथीही) बाळासाहेबांनी एक चैतन्य निर्माण केलं होतं. शिवसेनेचा बंद म्हणजे बंद (धाकामुळे किंवा केवळ साहेबांचा शब्द म्हणून) असे मंतरलेले ते दिवस. ९२-९३ च्या दंगलीत बाळासाहेबांचा निर्भीडपणा आणि वचक आम्हा गिरगावकरांना तरी सुखावूनच गेला होता. पुढे ९५ मध्ये युतीचं सरकार आलं आणि शिवशाही येणार अशा अपेक्षांच ओझं घेऊन सेना भाजपाने कारभार सुरु केला. त्याक्षणी बाळासाहेबांनी स्वत: मुख्यमंत्री पद न घेता (रिमोट कंट्रोल हातात ठेवून अर्थत) जे शुचितेचं दर्शन घडवलं (न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चारं!) ते त्यांच्याविषयी आदर द्विगुणीत करणारं ठरलं. पण हा सगळा इतिहास झाला, केव्हा.. जेव्हा सेनेचा हा वाघ, ढाण्या वाघ, स्वत:च्या कर्तुत्वावर जंगल गाजवत होता, जीवाला जीव देणाया मराठ्यांची फौज उभी करुन भिडत होता, आपल्या निर्भीड. तर्कशुद्ध वकृत्वाने सभा गाजवत होता. पण मग निसर्गनियमाप्रमाणे उतरती कळा लागली आणि गेल्या काही वर्षात जे बघायला मिळतय त्याने वाईट, विषण्ण, उद्विग्न, असहाय्य आणि हो लाजिरवाणं ही वाटतय. ज्या बाळासाहेबांववर जीवापाड प्रेम केलं, प्रसंगी, त्यांनी पु.ल. / सचिन ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मोहयांवर केलेला शाब्दिक हल्ला सुद्धा दुर्लक्षित केला, त्या बाळासाहेबांबद्द्ल आता केवळ सहानुभूतीच वाटून राहिलेय.

तर परवाच्या भाषणाच्या अनुषंगाने.. शरद पवारांनी कोलांट्या मारल्या तर आपण स्वीकारतोच हो, पण बाळासाहेबांनी तसं करावं हे कसं पचनी पडणार? आयुष्यभर, घराणेशाहीचा आरोप करत शेवटी मुलगा कार्याध्यक्ष म्ह्णून पुढे आणून वर ही घराणेशाही नाही ही मखलाशी कशासाठी ते कळलं नाही. शिवसेनेत सगळे निर्णय बाळासाहेबच घेतात ना, मग हा निर्णय कृष्णकुंजवरुन घेतला गेला ह्याला काय अर्थ आहे, जर बाळासाहेबांना तो पटला नस्ता तर तुम्ही तेव्हाच कार्याध्यक्ष पद दुसया कुणाला तरी द्यायला हवं ना! ते जाउंदेच पण आदित्यला लॊंच करताना त्याचा भाऊ म्हणजे दुसरा नातू माझ्यासारखाच हे सांगण्याचा केविलवाणा अट्टाहास कशासाठी? त्यांना (आदित्य/ तेजस) करु दे ना त्यांच्या लढाया, घेऊ देत ना केसेस अंगावर. गेले कित्येक दिवस सामन्यात पद्धतशीर पणे आदित्यला फोकस केलं जातय, त्यामुळे त्याला लॊंच करणार हे अभिप्रेत होतच पण मग प्रश्न पडतो सामान्य शिवसैनिकाचं काय? शिवाय तुम्ही घराणेशाही विरुद्ध वाजवलेल्या फुसक्या बाराचं काय? शिवसैनिकांनीच निवडून दिलं आणि त्यांच्या इच्छेखातर असं झालं हे म्हणायचं असेल तर तसच राजीव गांधी, राहूल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्याबाबतर्ही म्हणता येईल की. उलट त्यांनी घराणेशाही नको अशा घोषणा तरी दिल्या नाहीत. माझ्या मते घराणी शाही असण्यात खास चूकही नाहीच कारण घरात ज्या वातावरणात तुम्ही वाढता त्याचा तुम्हाला लहानपणापासून व्यावसायिक गोष्टी जवळून अनुभवता आल्याने फायदा होतोच (जसा इंदिरा गांधींना नेहरूंचा झाला), पण पुढच्या पिढीला त्यासाठी तयार करणं एकवेळ समजू शकतो, आदित्यला पुढे आणणं हा त्याचाच एक भाग असू शकतो हे ही बुद्धीला पटतं पण ’ही घराणेशाही नाही’ ही मखलाशी करणं, ती करावी लागणं आणि ते ही बाळासाहेबांना ह्याच वाईट वाचल्यावाचून राहत नाही. प्रबोधनकारांनी असं बाळासाहेबांना लॊंच केल्याचं ऐकीवात नाही आणि राज ठाकरेंना बाळासाहेबांनी लॊंच केल्याचं ऐकीवात नाही, असो कालाय तस्मै नम:!

साहेबांनी भाषणात म्हटलं की ज्या मुद्द्यावर सेना उभी राहीलीत्याच जुन्या मुद्द्यावर ते (राज) लढतायत. आता साहेबांच्या ह्या विधानात अनेक अर्थ निघतात, एक म्हणजे मराठी हा मुद्दा अजून इतक्या वर्षांनतरही राजकीय होऊ शकतो ह्यात नाही म्हटलं तरी सेनेचं अपयश आहेच की. दुसरं म्हणजे, मराठीचा मुद्दा सेनेने सोडलाच, त्याशिवाय राजसाहेबांना एवढा पाठींबा मिळालाच नसता. ’दोपहर का सामना’ मुंबईत काढण्याची गरज तेव्हा सेनेला का भासली? ह्यातून कुणाचं लांगुलचालन चाल्लल होत, हे मराठी माणसाला कळत नव्हतं का? सेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मजबूत होण्यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावर पसरायचा प्रयत्न केला. झाले काय की इथले बुरुज ढासळत गेले. शिवसेनेसारखी एक संघटना उभारण्यात बाळासाहेबांचे जितके यश, कौतुक आहे तितकेच खंदे शिलेदार गमवून ती एकसंध ठेवण्यात आलेले अपयशही आहे. भुजबळ, राणे, गणेश नाईक ह्यांसारखे पुढच्या फळीचे नेते तसेच बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, सदा सरवरणकर ह्यांसारखे तरुण रक्त शिवसेना एक संघटना म्हणून बांधून ठेवू शकली नाही, ह्यां सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षांचे मेळ, एक नेता म्हणून, बाळासाहेब घालू शकले नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव असं वाटल्यावाचून राहात नाही. परवाच्या भाषणात त्यांनी भुजबळांचा उल्लेख केला, मला तर हसू आले. लखोबा म्हणून एके काळी सैनिकांनी ज्याला दणका दिला, ज्याने बंडखोरी म्हणजे काय हे सेनेला पहिल्यांदा दाखवून दिले एवढेच काय तर बाळासाहेबांना अटक करण्याचे मनसुबे केले, त्यांची सदिच्छा भेट! राजकारणात सगळं क्षम्य असतं मान्य, पण बाळासाहेबांना हे शोभत नाहीच, अहो त्यापेक्षा राज आणि उद्धव एकत्र यावेत यासाठी जे शिवसैनिक प्रयत्न करतायत त्यांचा तरी उल्लेख करायचा, बरं वाटलं असतं! बाळासाहेबांच्या भाषणात प्रमुख हल्ला होता राज ठाकरेंवर ह्यातच सगळं आलं. राजसाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावर जे वातावरण पेटवलय त्याचे चटके सेनेला बसत आहेतच. मला खात्री आहे कुठेतरी मनाच्या कोपयात बाळासाहेब राजचं कौतुक करत असणारच. इतक्या छोट्या कालावधित मनसेने जे आक्रमक धोरण ठेवलय त्याची दखल बाळासाहेबांनी घेतली हीच पोचपावती.

दरम्यान, अयोध्येच्या निकालानंतर सामान्य जनतेने दाखवलेला समजूतदारपणा, प्रसार माध्यमांनी आणि राजकारण्यांनी दाखवलेली परिपक्वता (असन्माननीय अपवाद वगळता) पाहून खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. गेल्या १७ वर्षात शिक्षण वाढलेय, जागतिकरण वाढलय, जीवनाचा वेग वाढलाय, लोकांना विकासाचं वेड लागलय. आपापसात लढ्ण्यात काहीच हशील नाही, प्रगति करायला हवी असं नवी पिढी, प्रसंगी जुन्या पिढीला सांगतेय, त्यामुळेच हे शक्य झालं असं वाटतय. उदाहरणच द्यायचं झालं, तर १७ वर्षांपूर्वी माझे अयोध्येविषयी दृष्टीकोन होते ते आमूलाग्र बदलले आहेत, तेव्हा ते चूक होते असं म्हणणार नाही, त्यावेळच्या परिस्थितीत ते योग्य असतिलही, पण आता आपण एक समाज म्हणून पुढे जायला हवं हे उमगतं आणि असं एकत्रित प्रगती करण शक्य, आवश्यक आणि अपरिहार्य आहे हे ही समजतं. तर ह्यातून सांगायचा मुद्दा हा की, जसं शिक्षणाचं प्रमाण वाढतय, माहितीचा अधिकार वापरण्याचं प्रमाण वाढतय, परकीय गंगाजळी वाढतेय, उद्योगधंदे वाढताहेत तस तस लोकांना समृद्ध जीवनाचे फायदे दिसायला लागलेत, त्याची फळं चाखायला मिळालेयत. असं असताना भावनेच्या राजकारणातून विशेष काहीही होणार नाही हे आता राजकीय पक्षांनाही जाणवू लागलेय. गुजराथचे उदाहरण पाहाता तर हे अधोरेखित होतय. नरेंद्र मोदींनी केवळ ’समतोल विकास’ ह्या एका मुद्द्यावर अगदी पंचायत समित्या आणि नगरपालिकाही निर्विवाद जिंकून आणल्या. बिहार मध्ये नितिशकुमारही विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करत आहेत. दक्षिणेत चंद्राबाबूंनीही तो प्रयत्न केला पण विकासात ते समतोल साधण्यात अपयशी ठरले. केंद्रात मनमोहनसिंग सरकारही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन भारताच्या अर्यव्यवस्थेच्या वाढीच्या गतीची स्वप्ने जगाला दाखवत आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, बाळासाहेबांच्या भाषणात, ’विकास’ हा मुद्दा अभावानेच आढळला. वीस वर्षांपूर्वीचा तरूण आणि आजचा तरूण ह्याच्या विचारात बराच फरक आहे हे समजायला हवे. केवळ अर्वाच्य शब्दात इतरांची हेटाळणी करुन मने जिंकण्याचे दिवस गेले, त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेत इतके वर्ष सत्ता असताना सेनेने काय काय केले ह्यावर लक्ष वेधले असते तर नक्कीच छान वाटले असते.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, आदित्यच्या बरोबरीने आदेश बांदेकरांचे सेनेने केलेलं लॊंचिंग. गेले कित्येक दिवस त्यासाठी सामन्यात मोर्चेबांधणीसुरु होती, म्हणजे आज भाऊजींनी बाळासाहेबांची भेट घेतली, भाऊजींनी मराठी दांडीया सुरु केला वगैरे वगैरे! ज्या भाऊजींवर दादर मधून पडण्याची नामुष्की आली (कारण काहीका असेना!) त्यांना शिवसेनेत सचिवपद? म्हणजे इतके वर्ष घासलेल्या शिवसैनिकाने करायचं काय? कुठल्याही पक्षात सचिवपद म्हणजे कार्याध्यक्षाशी समन्वय साधण्यासाठी, थिंक टॆंक म्हणून तसेच लोकांकडून कामं करुन घेण्यासाठी अतिशय महत्त्वांचं, जबाबदारीचं आणि तितकच व्यस्त पद. इतर उद्योग सांभाळताना ह्या पदाला भाऊजी न्याय देऊ शकतील ? त्यांचं पहिलं ध्येय मिडीया म्हणूनच राहाणार ना मग डमी म्हणून त्यांना इथे पुढे केलय की काय अशी शंका यायला जागा आहेच, म्हणजे एखाद्या सच्चा शिवसैनिकाची ह्या पदासाठीची जागा बाहेरून आलेल्याने घेतली, हेच अगदी विधानसभा निवडणूकीत झालं दादर मतदारसंघात आणि परिणाम दिसलेच. व्यक्तिश: कुणाला विरोध नाही पण कुठेतरी चुकतय असं वाटत राहातं.

एकंदर, हे असं आहे. शिवसेनेचा प्रवास म्हणजे माझ्यासारख्या कित्येकांचा तारुण्याचा प्रवास. बाळासाहेबांचे विचार ऐकत आम्ही घडलॊ, एका दिशेने पुढे गेलो. त्यामुळे हे असं काही पाहिलं की पोटतिडकीने तितक्याच हक्काने काही सांगावसं वाटतं, चुकीचं वाटतं असलं की मन मोकळं करावसं वाटतच. असेच पुढचे दसरे मेळावे येतील, पन्नाशीही पार करतील, पिढ्यान पिढ्या वाघाची डरकाळी ऐकायला येतील पण जर आवाजातील धारचं कमी होत चालली असेल, तर न्यायालयाला डेसिबल मध्ये आवाजाची क्षमता घालायची वेळच येणार नाही हे तितकच खरं!

No comments: