Saturday, July 11, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 3

दिवस चौथा (ग्रॆंड कॆनियन / लास व्हेगास)
जगातल्या सात निसर्गनिर्मित आश्चर्यांपैकी एक - ग्रॆंड कॆनियन.


साऊथ रीम की वेस्ट रीम?
एका दिवसात ग्रॆंड कॆनियन पहाणायांना पडणारा हा नेहमीचा प्रश्न. काय बघावं साऊथ रीम की वेस्ट? खूप शोधाशोध केली इंटरनेटवर, मित्रमैत्रिणींकडे आणि मग आम्ही वेस्ट रीम निश्चित केलं. ह्यामागची आमची कारणं अशी -
१. तुम्हाला ट्रेक करत खाली ग्रॆंड कॆनियन मध्ये उतरायचं असेल तर साऊथ रीम केव्हाही उत्तम. ह्या ट्रेकला एक दिवसाहून अधिक कालावधी लागतो आणि तुमची खाली दरीत उतरण्याची आणि मग वर चढण्याची चांगलीच तयारी असावी लागते. आमच्या कडे काही तास असल्याने साऊथ रीम मधून खाली उतरणे शक्यच नव्हते. हॆलिकॊप्टरने खाली उतरायची सोय साऊथ रीम मध्ये नव्हती.
२. ग्रॆंड कॆनियन बघायचा, त्याची भव्यता आणि दिव्यता पहायची तर लांबून बघून समाधान होणं शक्यच नव्हतं. इतक्या लांब आलो आहोत ते केवळ अमाप नैसर्गिक सौंदर्य लुटायला त्यामुळे दरीमध्ये उतरायचं होतच. वेस्ट रीम मध्ये हेलिकॊप्टरने खाली उतरायची सोय होती. शिवाय आत दरीमधल्या कोलोरॆडॊ नदीवर बोटींगही करता येणार होतं.
३. नैसर्गिक चमत्कारांबरोबर आम्हाला वेस्ट रीममध्ये एक मानव निर्मित वास्तुशिल्प बघता येणार होतं, ते म्हणजे ’स्काय वॊक’. आमच्या मित्रांपैकी कोणीही तिथे गेलं नव्हतं त्यामुळे तिथे कसं वाटेल ह्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. नेटवर बरचं काही वाचलं होतं पण काहीतरी वेगळं पहायला मिळणार होतं ते वेस्ट रीम मध्येच.

सकाळी नाश्त्याला बाहेर पडलो आणि साडे सहावाजता बाजूच्या कॆसिनोखाली असलेल्या मॆकडेनॊल्ड्सच्या दिशेने चालू लागतो, तर चक्क अंगातून घामाच्या धारा. :-) इतक्या वर्षात मुंबई, पुणे, डॆलस, कोलंबिया, कॆंसस सगळीकडचे उन्हाळे अनुभवले पण पहाटे उकडायला लागण्याचीही पहिलीच वेळ. लास व्हेगास मध्ये सकाळी ही स्थिती, तर दिवसा काय होत असेल! उन्हाळ्यात तर दिवसा रस्त्यावर चालणेही मुश्कील. बहुसंख्य लोक अशावेळी कॆसिनोमध्ये खेळत नाहीतर रात्रभर जागरण करुन दिवसा हॊटेलात ताणून देतात. लास व्हेगासवरुन ग्रॆंड कॆनियनच्या एका दिवसाच्या ट्रीप्सची पॆकेजेस जवळ जवळ प्रत्येक हॊटेलमधून मिळतात. आमची ग्रॆंड कॆनियनची टूर गो टू बसच्या पेकेजबरोबरच होती. लास व्हेगास पासून वेस्ट रीम जवळ असल्याने आम्ही थोडे उशीरा म्हणजे आठ वाजता निघालो. आमच्या बरोबरचे काही जण जे साऊथ रीम वर जाणार होते ते दुसया बसने सकाळी साडे सहालाच निघाले. रात्री उशीरा झोपल्याने डोळ्यावर थोडीशी पेंग होती. साधारण तासाभरात आमची बस हूवर डॆम जवळ आली आणि तिथल्या निरीक्षण केंद्रावर आम्ही थांबलो.

एरीझोना आणि नेवाडा राज्यांच्या सीमा रेषेवर कोलोरॆडो नदीवर बांधलेले हे कॊंक्रीटचे अमेरीकेतील सगळ्यात उंच कमानिकृती (आर्च) धरण. अमेरीकन मंदीच्या काळात ह्या धरणाचे काम प्रेसिडेंट हूवर ह्यांच्या पुढाकाराने जोरात सुरू होते, १९३६ साली त्याचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण लास व्हेगासला पाणी पुरवठा आणि जलविद्युत पुरवठा हूवर डॆम मधून होतो. तिथल्या निरीक्षण केंद्रातून तो डॆम, त्याचं टनेल, त्याच्यावरचे पूल बघताना अचंबित व्हायला होतं. अभ्यासपूर्ण, साहसपूर्ण चिकाटीने मानवाने निसर्गावर मिळवलेला विधायक विजय म्हणून हूवर डॆमची इतिहासात नोंद झाली आहे. हूवर डॆमवर वेगवेगळ्या कोनातून मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांची पाठवशिवणी बघण्यात अर्धा तास कसा गेला कळलच नाही आणि आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दिशेने पुढे निघालो.

ग्रॆंड कॆनियन साऊथ आणि नॊर्थ सारखा ग्रॆंड कॆनियन वेस्ट हा ग्रॆंड कॆनियन नॆशनल पार्कचा भाग नाही. हा पूर्ण भाग हुलापिया आदिवासींच्या मालकीचा असून बराच अविकसित आहे. त्यामुळे ग्रॆंड कॆनियन अगदी मूळ स्वरुपात बघता येतो. लास व्हेगास पासून ही बाजू सगळ्यात जवळ (साधारण १२० मैल म्हणजे अडीच तास). साधारण साडे दहा च्या जवळपास आमची बस एके ठिकाणी थांबवण्यात आली. मार्गावर जवळपास ना पेट्रोल पंप ना दुकाने ना हॊटेल्स, अगदी कशाकशाचा मागमूस नव्हता. नुकतच कुठे इथ पर्यंत पर्यटक इतक्या प्रमाणात येऊ लागलेयत ह्या भागात हे जाणवत होतं. तिथली प्रसाधनगृह सुद्धा तात्पुरत्या स्वरुपाच्या शेडस मध्ये बांधलेली. तेथून बस बदलून कच्च्या रस्त्यावरुन आम्ही पुढे निघालो. साधारण १५-२० मैलांचे वळणावळणांचे हे अंतर, बरासचा रस्ता कच्चा, अजून तयार होतोय. आजूबाजूला फॊरेस्ट हाऊससारखी तुरळक घरे. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन वेस्ट रीमच्या मुख्य मुक्कामी जायला वेस्ट रीम व्यवस्थापनाच्याच गाड्या होत्या. शिवाय रस्ता खराब असल्याने आपली गाडी नेली तर पंक्चर होण्याची शक्यता जास्त. हा वेस्ट रीमचा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने सगळं थोडं महागच पण व्यवस्थापनला मिळणाया पैशातून बराचसा पैसा हुलायपाय जमातीस जातो असं समजलं. बाहेर ऊन पडलेलं असलं तरी ते न जाणवण्याइतपत गारवा होता हवेत. ग्रॆंड कॆनियनच्या दया दिसत होत्याच जवळ. आम्ही बसमधून उतरून वेस्टरीमच्या माहिती केंद्रात गेलो. दिवसभरात आपण काय करणार आहोत ह्याची साधारण माहिती आमचा गो टू बसचा टूर गाईड विलियमने गाडीतच दिली होती. आम्ही चौघेजण हॆलिकॊप्टर राईड घेणार होतो. आम्हा सगळ्यांची वजने घेऊन त्याप्रमाणे हॆलिकॊप्टर मध्ये बसण्याच्या जागा ठरवण्यात आल्या आणि आम्ही हॆलिपॆडच्या दिशेने निघालो. दोनच मिनिटांत आमच्यासाठी एक हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही आपापल्या जागा घेतल्या. मागे नायगारा बघतानाही मी अशीच राईड घेतली होती पण कौमुदीची ही पहिलीच वेळ आणि गंमत म्हणजे तिला पायलटच्या बाजूची एकमेव सीट मिळाली होती. पंख्याचा प्रचंड खडखडाट चालू होता, आम्ही सीट बेल्ट्स आवळले आणि हॆलिकॊप्टरने झेप घेतली. अहाहा, ह्याच साठी केला सारा अट्टाहास, असा विचार मनात येत होता आणि अतिशय नयनरम्य, विलोभनीय सौंदर्याची खाण, हो खाणच की ही, दोन्ही बाजूंनी उलगडत हॆलिकॊप्टर प्रचंड मोठ्या घळीत उतरत होते. डोळ्यांत आणि कॆमेयात आम्ही दृष्ये साठवत होतो. खालती आता कॊलेरेडो नदी दिसू लागली होती. साधारण १५-२० मिनिटे वेगवेगळ्या अंगानी ग्रॆंड कॆनियनच्या घळीतील सृष्टी आणि पाषाण सौंदर्य पहात आम्ही कॊलेरेडो नदीच्या किनारी उतरलो. आम्हाला उतरवून हॆलिकॊप्टर पुन्हा मागे उडून गेले. हा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने इथे इतर कुणाचीही वाहतूक नाही आणि त्यामुळे मानवी आक्रमणांपासून खूप उत्तमरीत्या जपला गेलाय. थोडं चालत आम्ही नदीच्या काठाशी पोहोचलो तर एक नाविक बोट घेऊन आमची वाटच पाहात होता.

कॊलेरेडो नदीवर बोटींग करण्यासाठी आम्ही मोटर बोटीत बसलो आणि बोट संथ पाण्यावर हळूच हेलकावे घेत पुढे निघाली. नाविक संपूर्ण ग्रॆंड कॆनियनची आणि वेस्ट रीमची माहिती पुरवित होता. कॊलेरेडो नदीच्या पाण्याची पातळी गेले काही वर्ष सातत्याने कमी होतेय, ग्लोबल वॊर्मिंगचे हे उत्तम उदाहरण असून, ग्लेशियर म्हणजे बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी झाल्याने असे होत असावे. ह्या बाजूस म्हणजे वेस्ट रीम वर ग्रॆंड कॆनियनच्या घळीची रुंदी साउथ रीमपेक्षा कमी आहे. ग्रॆंड कॆनियनची दरी ही साधारण पावणे तिनशे मैल लांब असून रुंदी कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त १८ मैल आहे. तिची खोली साधारण २ किमी असून करोडो वर्षांपासून पृथ्वीच्या भूगर्भात तसेच भूस्तरावर होणाया हालचालींची ही दरी साक्षीदार आहे. जगातली हि सगळ्यात खोल दरी. कॊलोरेडो नदीत अक्षरश: दरी कापत जाते तेव्हा दुतर्फा आपल्याला दरीमध्ये दगडांचे पट्टे च्या पट्टे किंवा थर दिसतात. आइस एजच्या दरम्यान जे बर्फ इथून वाहिलं त्यावेळी ही दरी निर्माण झाली. इथले दरीतले दगड तर कोट्यावधी वर्षांचे असून रीमवरचे म्हणजे वरचे काही दशलक्ष वर्षे जुने आहेत. तसेच काही दशलक्ष वर्षांपूर्वी इथे ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हा रसामुळे व्हॊल्केनो दगडांची निर्मिती झाली. हे त्यातल्या त्यात इथले सगळ्यात तरुण दगड म्हणायचे ;) हात बुडवून बघता, नदीचे पाणी तसे गारच होते, बोटींग करत असताना दोन्ही बाजूला ग्रॆंड कॆनियनच्या दगडातले पट्टे, रंग पाहाताना अर्धा पाऊणतास कधी गेला कळलं सुद्धा नाही. पाचच मिनिटांत हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही माहिती केंद्राच्या दिशेने परत उडालो. पुन्हा एकदा दरीतली दृष्ये डॊळ्यात साठवत पंधरा वीस मिनिटांत माहिती केंद्रावर पोहोचलो.

त्यांचीच बस पकडून आम्ही स्कायवॊक ह्या पुढच्या मुक्कामी निघालो. कच्च्या रस्त्यावरून दोन्ही कडे ग्रॆंड कॆनियनच्या डोंगरदया पहात अर्ध्या तासात आम्ही स्कायवॊकवर जाऊन पोहोचलो. बसमधून जातानाच आम्हाला ड्रायव्हरने इगल पॊईंटची माहिती दिली आणि दूरवरून तो दाखवलाही, येताना बघू म्हणून आम्ही तिथल्या माहिती केंद्रावर पुन्हा स्कायवॊकबद्दल माहिती घेतली आणि आमच्या कडच्या बॆगा, कॆमेरे लॊकर मध्ये ठेवून स्कायवॊकच्या रांगेत उभे राहीलो.

स्कायवॊक आहे तरी काय?
ज्यांना ग्रॆंड कॆनियन उतरण शक्य नाही किंवा उडत्या पक्षाला कशी दिसत असेल ही घळी हे बघायचं झालं तर काय करावं लागेल असा एक विचार ग्रॆंड कॆनियनच्या नियमित पर्यटकाच्या मनात आला आणि त्यातून स्कायवॊक संकल्पनेचा उदय झाला. घोड्याच्या नालेच्या आकाराचा संपूर्ण काचेतून बनवलेला हा स्कायवॊक कॆंटीलिव्हर सारखा उभ्या सुळक्यातून साधारण २० मीटर बाहेर काढलाय. इगल पॊइंटच्या जवळच त्याची जागा निवडलेय. दरीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर बांधलेला असून त्याच्या किनायांवर काचेवर थोडी काजळी दिलेय, उद्देश हा की इतक्या खोल बघून कुणाला चक्कर आली तर आधार मिळावा :-) खालचा बेस तसेच बाजूच बांधकाम काचेचं असून बेस दोन इंच जाडीच्या काचेचा आहे आणि खाली आपल्या पायाशी पाहिलं तर दिसते खोल दरी, आरपार. अगदी जसं आपण दरीत उभे आहोत आणि आकाशात चालतोय. स्कायवॊक बांधायला तीन वर्ष लागली. २८ मार्च २००७ मध्ये तो लोकांसाठी खुला करण्यात आला. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी त्यावर चालणाया पहिल्या माणसात होता सुप्रसिद्ध अंतराळवीर एड्विन ऒड्रीन (हाच मानव, ज्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं). त्यापूर्वी स्कायवॊकवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. आठ रिष्टर स्केलचा भूकंप स्कायवॊक सहन करु शकतो. वेगवेगळ्या दिशेने येणारे १०० मैल वेगांचे वारे सुद्धा स्कायवॊक झेलू शकतो. ७० टन म्हणजे साधारण आठशे लोकांच वजन स्कायवॊक घेऊ शकतो (प्रत्यक्षात एकावेळी २०० पेक्शा जास्त लोकांना स्कायवॊकवर प्रवेश दिला जात नाही.) पर्यटकांकडून काचेवर ओरखडे येऊ नयेत म्हणून अतिशय काळजी घेण्यात येते, त्यांना स्कायवॊकवर जाताना बुटांवर चढवायला प्लास्टीक कव्हर देण्यात येते जेणेकरुन काचेवर पाय घसरणार नाही. स्कायवॊक बांधायला ३१ दशलक्ष डॊलर्स खर्च आला असून आता तो पर्यटकांसाठी अप्रूप बनला नसेल तरच नवल. स्कायवॊक बांधल्यापासून वेस्ट रीमला भेट देणाया पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढलेय आणि हुलायपानसाठी ते उत्तम मिळकतीच साधन ठरतय, त्याचा त्यांना वेस्ट रीमच्या इतर व्यवपस्थापनासाठी फायदा होतोय. पर्यावरणवाद्यांचा मात्र असं म्हणणं आहे की संपूर्ण नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ह्या भागात आता मानवनिर्मित स्कायवॊकमुळे माणसांची वर्दळ प्रमाणाबाहेर वाढलेय आणि अर्थातच त्याचा परिणाम इथल्या निसर्गावर झाल्यावाचून रहाणार नाही.


स्कायवॊकच्या रांगेत त्यांनी दिलेली कव्हर्स आम्ही बूटांवर चढवली आणि स्कायवॊकवर गेलो. आत प्रवेश करताच वरती खुले आकाश, आणि खाली काच. काचेवरून चालत पुढे जातोय तोच पायाखालची जमिन सरकणे म्हणजे काय ह्याचा अनुभव आला :-) पावलांखाली खोल दरी, आज मैं उप्पर आसमा निचे अशी स्थिती. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे दगडांचे पट्टॆ घळीत सगळ्याच बाजूना दिसत होते. वाराही चांगला सुटला होता इथे. पंधरा वीस मिनिटे वेगवेगळ्या कोनांतून ग्रॆंड कॆनियन बघून आम्ही स्कायवॊकवरुन बाहेर पडलो. स्कायवॊकवर कॆमेरा न्यायला परवानगी नसली तरी व्यवस्थापनाचे फोटोग्राफर तुमचा फोटॊ काढून देतात. अर्थात तुम्ही नीट पोझिशन देणे आवश्यक आहे, आजूबाजूस काचच असल्याने वेडेवाकडे रीफ्लेक्शन येऊन मजेशीर फोटो येतात, तुम्ही हवेत तरंगत आहात असे :-) बाहेर पडून आम्ही बाजूलाच इगल पॊईंट कडे गेलो.
डोंगरात दगडांनी पंख पसरलेल्या गरुडाचा आकार घेतल्याने ह्या पॊईंटला असं नाव पडलं, त्याचे तसेच तिथून दिसणाया स्कायवॊकचे फोटॊ काढून आम्ही जेवणासाठी उपहारगृहात गेलो.

थोडी विश्रांती घेऊन आम्ही वेस्ट रीमच्या शेवटच्या पॊईंटवर जाण्यासाठी बस पकडली. हुलायपीयन संस्कृतीची ओळख होण्याच्या दृष्टीने त्यांनी तिथे एक पॊईंट बांधलाय. तिथूनही ग्रॆंड केनियनच विहंगम दृष्य दिसतं.







पुन्हा एकदा आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दगडांत फेरफटका मारला, ऊन तर होतच आणि परतिसाठी वेस्ट रीमच्या मुख्य माहिती केंद्रावर जाणारी बस पकडली. पंधरा वीस मिनिटांत मुख्य माहिती केंद्रावर पोहोचलो आणि तिथून वेस्ट रीमच्या व्यवस्थापनाची आम्हाला हमरस्त्यावरील आमच्या बसपाशी सोडणारी बस पकडली. पुन्हा त्या कच्च्या रस्त्यावरून साधारण १८ मैल, २५-३० मिनिटे प्रवास करुन आम्ही आमच्या बस पर्यंत पोहोचे पर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. ह्या पूर्ण वेस्ट रीममध्ये वेगवेगळ्या पॊईंट्स वर काम करणारी माणसे, सुविधा ह्या सगळ्यांचा खर्च पर्यटकांकडून मिळणाया पैशातूनच करावा लागतो. इथपर्यंत पाईपलाईन वगैरे नसल्याने पाणी सुद्धा जपूनच वापरावे लागते. इतक्या लांबपर्यंत वीज, बांधकामाचा माल, खाण्याचे सामान, कच्चा-पक्का माल पोहोचवणे ह्या प्रत्येकासाठी खर्च येतोच. ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर वेस्ट रीम इतके महाग का आहे, ह्याचा अंदाज येतो.

पुन्हा लास व्हेगास रात्र --
समर असल्याने अगदी आठ-साडेआठ वाजेपर्यंत्न स्चच्छ उजेड. त्यामुळे ग्रॆंड कॆनियनच्या परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा हूवर डॆम नीट पहायला मिळाला आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही सर्कस सर्कस मध्ये आमच्या मुक्कामी पोहोचलो. हॊटेलवर तासभर विश्रांती घेऊन लास व्हेगासच्या रात्रीचा जल्लोष अनुभवायला पुन्हा बाहेर पडलो. लास व्हेगास स्ट्रीपच्या मुख्या रस्त्यावर चालत आम्ही दोन्हीकडचा झगमगाट अनुभवत होतो. बॆलिज होटेल मध्ये आज आम्ही ’ज्युबिली’ शो ची तिकीट काढली होती. वाटेवरच आम्हाला रीयोज हॊटेलबाहेर चाल्लेला चकटफू शोज थोडा पहायला मिळाला, तिथला रस्ता खच्चून भरला होता, वाट काढणे मुश्किल. हवेत जाणवण्या इतपत उष्मा होता. त्या झगमगाटातून वाट काढत दहा वाजेपर्यंत आम्ही बेलिज कॆसिनोमध्ये पोहोचलो. कॆसिनोजमध्ये थोडा फेरफटका मारला, थोड्या स्लॊट मशिन्सवर हरण्याचा आनंद घेऊन :-) आम्ही तिथल्या थिएटर मध्ये जाऊन बसलो. ठरल्यावेळी म्हणजे बरोब्बर साडेदहाला शो सुरु झाला, सभागृह जवळ जवळ भरले होतं. पडदा वर करताक्षणी वासलेला आ जवळजवळ पुढचा दिड तास उघडाच होता. जागतिक दर्जाचं म्हणजे नेमकं काय हे प्रकर्षाने जाणवलं. एकमेवाद्वितीय शो. कॊरीओग्राफी, कलाकारांच टायमिंग, अचाट कसरती पुन्हा पुन्हा चकित करत होत्या. त्यात डॊयलॊग असे नव्हतेच. पूर्ण म्युझिकल ट्रीट. अप्रतिम डान्स, लुक्स, कलाकारांचा आत्मविश्वास, त्यांचा मेळ, ताकदीचे अचाट प्रयोग, वेशभूषा, केशभूषा, सेट्सची भव्यता आणि दिव्यता, प्रकाशाचा चपखल वापर आणि प्रत्येक प्रवेशाच्या सादरीकरणातलं नाविन्य, वेगळेवपण उत्कंठा वाढवत होतं. कधी संपूच नये हे अस वाटत होतं. ज्युबिलीच्या या संचात साधारण ७५ कलाकार आहेत, लास व्हेगाज मधल्या त्यावेळच्या टॊप थ्री पैकी हा एक शो, आमच्या सुदैवाने आम्हाला अनुभवता आला. बाहेर पडलो आणि टॆक्सी करायच्या ऐवजी लास व्हेगाज स्ट्रीप चालावी असा उत्साह होता. रात्रीचे साडेबारा होऊनही बयापैकी गर्दी होती रस्त्यावर. लास व्हेगास शहर रात्रीच जागते आणि दिवसा पेंगते हे खरच अगदी. तेथे रात्री दीड वाजता डेनिस मध्ये जेवून आम्ही लास व्हेगास स्ट्रीपवर तासभर चालत हॊटेल सर्कस सर्कस मध्ये पोहोचलो तर तिथे कॆसिनोमध्य बयाच गर्दीत गेमिंग चालू होते. निरनिराळी स्लॊट मशिन्स, पत्त्यांचे, फिरत्या चाकांचे, फाशांचे खेळ आणि ते खेळणारे/खेळवणारे/पाहाणारे हवशे, नवशे आणि गवशे, एकदम जल्लोषाचं वातावरण! रात्री दोन वाजता वरती रुम वर जाऊन झोपलो आणि सकाळी ७ ला परत सॆन फ्रान्सिस्कोकडे निघायचे असल्याने, ६ वाजताच उठलो. गेले तीन दिवस नुसते धावपळीत गेल्याने मनसोक्त कॆसिनोमध्ये खेळणं झालच नव्हतं. फिरत्या चाकावरती देशी नशीबाला आकार ही उक्ती सार्थ ठरवणाया टेबलवर तेवढ्या अर्धा पाऊण तासात खेळून आलो. चांगली गोष्ट अशी की कुठलाही खेळ तुम्हाला माहित नसेल तर समजावून सांगितला जातो, त्यात फसवणूक अशी होत नाही. लोकांना खेळण्याचा मनमुराद आनंद लुटू दिला जातो. गमतीची बाब अशी जे थोडं काही खेळलो त्यात शेवटी प्लस मध्येच राहीलो, आता लास व्हेगासची आठवण म्हणून हे कायम लक्षात राहील :-)



दिवस पाचवा (पुन्हा सॆन फ्रान्सिस्को)
सकाळी सात वाजता आम्ही सॆन फ्रान्सिस्कोच्या दिशेने निघालो. दोन रात्री सगळ्यांनाच लास व्हेगास मध्ये जागरण झाल्याने सगळेच पटापट झोपी गेलो, दरम्यान अकराच्या आसपास, ड्रायव्हरने बस टेंजर ह्या एका मोठ्या मॊल मध्ये थांबवली. वेस्ट कोस्टच्या ह्या टेंजर मॊल मध्ये रीबॊक, गॆप, नायकी, नॊटीका अशी बरीच फॆक्टरी आऊटलेट्स होती. बरोब्बर दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही दुसया टोकाच्या म्हणजे ईस्ट कोस्टच्या टेंजर मॊल मध्ये होतो त्याची आठवण झाली. दिवसभर प्रवास करून संध्याकाळी सात पर्यंत आम्ही सॆन मटिओ ह्या आमच्या फोस्टर सीटीजवळच्या मुक्कामी येऊन पोहोचलो.


संध्याकाळी माऊंटन व्ह्यू मध्ये ड्राईव्ह करुन माझ्या आवडत्या बनाना लिफ मध्ये डिनर साठी गेलो आणि तिथूनच जवळ राहात असणाया मित्रमैत्रिणींना भेटून रात्री मुक्कामी परतलो. डोक्यात दुसया दिवशीचा सॆन फ्रान्सिस्कोचा प्लान तयार होताच.

- क्रमश:

Saturday, July 4, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 2

दिवस तिसरा (लास व्हेगास)
फ्रेस्नोहून लास व्हेगास ला पोहोचण्यासाठी आज २६० मैल अंतर कापायचे असल्याने सकाळी आठ वाजता आमची बस सुटली. आज आम्ही कॆलिफॊर्निया राज्याची (गोल्डन स्टेट) हद्द ओलांडून नेवाडा (सिल्व्हर स्टेट) राज्यात प्रवेश केला. आदल्या दिवशीचा थकवा असल्याने आणि पुढचे दोन्ही रात्र आणि दिवस धावपळच असल्याने बसमध्ये सगळेच गाढ झोपी गेलो. काही तासांनी डोळे उघडले तेव्हा आम्ही रेताड आणि रुक्श वाळवंटातून जात असल्याचे जाणवले. दरम्यान हॆंस मधेमधे वेगवेगळी ठिकाणे, त्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व ह्यांची सखोल माहिती पुरवीत होताच. मे च्या तिसया आठवड्यातच एवढं रणरणतं ऊन अनुभवताना सॆन फ्रन्सिस्कोची थंडी आठवली आणि घेतलेल्या जॆकेटचे निदान इथे तरी नक्की ओझेच होणार ह्याची खात्री पटली. दुपारी जेवण उरकून आम्ही लास व्हेगास च्या दिशेने आजच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यासाठी निघालो आणि संध्याकाळी तीनच्या दरम्यान लास व्हेगास शहराजवळ पोहोचलो. लास व्हेगास जवळ आलय ह्याच्या खुणा बाहेर दिसू लागल्या होत्या, बरच काही ऐकलय, वाचलय आणि टीव्हीवर पाहिलेल्या ह्या शहराबद्दल प्रचंड अप्रूप होतं. जसजसे आम्ही शहरात आलो तसतशा खूप मोठ्या आणि भव्य इमारती दुतर्फा दिसू लागल्या. प्रत्येकीचा नखरा वेगळा, ढब वेगळी. जगातील वास्तूशिल्पांचे वैविध्यपूर्ण नमुने इथे पहायला मिळतात. आता लास व्हेगास विषयी थोडसं. लास व्हेगास ला सिन सिटी म्हणूनही ओळखलं जात. साधारण १९३१ च्या दरम्यान म्हणजे मंदी नंतर लग्गेच लास व्हेगास ला जुगार हा अधिकृत करण्यात आला. २००५ मध्ये ह्या शहराला शंभर वर्ष पूर्ण झाली. काही गंमतीशीर गोष्टी लास व्हेगास आणि तिथल्या कॆसिनोजविषयी -
१. Whatever happens in Las Vegas stays in Las Vegas असं म्हणतात. त्यामुळे कॆसिनोतून मिळू शकणारा झटपट पैसा, लफडी ह्यासाठी इथे येणायांचे प्रमाण लक्षणीय. दरवर्षी साधारण ४० दशलक्ष लोक लास व्हेगासला भेट देतात. येणारा जवळ जवळ प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कॆसिनोमध्ये खेळतोच खेळतो. इथे जॆकपॊट लागून कोट्याधीश झालेलेही कितीतरी आहेत पण ’आपल्यालाही लागेल असा जॆकपॊट’ अशा अति-आशावादी दृष्टीकोनाने कितीतरी लोकं निव्वळ जुगार खेळून नशीब अजमवण्यासाठी इथे येतात. मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकायांच्या मिटींग्ज, कॊन्फरन्सेस इतकेच काय तर कोर्पोरेट्स ट्रेनिंग्स सुद्धा लास व्हेगास मध्ये चालतात. ह्या इतक्या प्रचंड संख्येने येणाया लोकांमुळे कॆसिनोजमध्ये रोज कोट्यावधी डॊलर्सची उलाढाल चालते, बहुसंख्य कमाई ही कॆसिनोच्या मालकांचीच होते हे आलेच.
२. कोणत्याही कॆसिनो मध्ये न दिसणाया गोष्टी म्हणजे - खिडकी (म्हणजे बाहेरचा प्रकाश दिसणार नाही, उद्देश हा की खेळणायास दिवस रात्रीचे भान राहू नये), भिंतीवरील घड्याळ (पुन्हा तेच,खेळणायास वेळेचे भान राहू नये ), लहान मुले (लहान मुलांना जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी बंदी आहे) खेळणायांना अधिकाधिक जुगार खेळावा म्हणून टेबलवर स्वस्तात ड्रींक्स, खाणे ह्यांची सर्विस दिली जाते.
३. लास व्हेगास मध्ये लग्न करणे हे इथल्या तरूण तरुणींच एक मोठ्ठ स्वप्न. संपूर्ण अमेरिकेतील जनता इथे लग्नकार्यासाठी येते. तशा झटपट लग्नाच्या सोयीही कॆसिनोजमध्ये आहेत. (आठवलं का रचेल आणि रॊसने तसेच मोनिका आणि शॆंडलरने उडवलेली लास व्हेगास मधली धमाल!). लास व्हेगासमध्ये लग्नापूर्वी रक्त तपासणी करण्याची गरज नाही, प्रतिक्षा यादी पण नाही आणि अगदी मामुली फी, शिवाय वातावरणही तारुण्याच्या धुंदीत ह्यामुळेच लग्नाळूंची इथे गर्दी होत असावी.
४. लास व्हेगास स्ट्रीप हा इथला मुख्य रस्ता. साधारण तास दीड तास लागावा चालायला इतका मोठा. बरेचदा एका कॆसिनोतून दुसयात जायला टॆक्सी वापरावी लागते. अशावेळी टॆक्सी वाल्यास टीप देणे, हॊटेल वाल्यांना व्यवस्थित टीप देणे इथे अतिशय अगत्याचे आहे.
५. लास व्हेगास मधले कॆसिनोज १२ महिने २४ तास चालू असतात. करण्यासारखे काही नाही असं इथे कधी होतच नाही. केनडींची हत्या झाली तेव्हा एकदाच काही मिनिटांसाठी कॆसिनोजची झगमग थांबवण्यात आली होती, अन्यथा शंभराहून अधिक वर्षे हा जुगाराचा पसारा अव्याहत चालू आहे.

लास व्हेगास शोज बद्दल -

ह्याबद्दल खूप काही ऐकले आणि वाचले होते. मागे न्यूयॊर्कमध्ये गेलो होतो तेव्हा इच्छा असूनही ब्रॊड वे वरचे शोज पहाणे शक्य झालं नाही त्यामुळे ह्यावेळी लास व्हेगासचे शोज पहायचेच असे ठरवले होते. ब्रॊडवेज चे आणि लास व्हेगास चे शोज ह्यात तसा फरक आहे. ब्रॊडवेजच्या शोज मधून मुख्यत्त्वे त्यातील नाट्य, आर्तता, दिग्दर्शन, पटकथा, म्युझिकल्स आणि सादरीकरण ह्याचा अनुभव मिळतो तर लास व्हेगासच्या शोज मधून मुख्यत्त्वे थरार, भव्यता, शारिरीक क्षमतेचे खेळ, कोरिओग्राफी, ड्रेसडिझायनिंग, अचाट सादरीकरण ह्यांचा अनुभव मिळतो. दोन्ही प्रकारचे शोज हे जागतिक दर्जाचेच असतात. लास व्हेगासच्या शोजमध्ये आपली कला सादर करणे हे जगातल्या कुठल्याही कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी इथे येऊन कितीही मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते. लास व्हेगासमध्ये वेगवेगळ्या कॆसिनोज मध्ये असे शोज अव्याहत चालूच असतात. लास व्हेगासवर प्रेम करणायांपैकी केवळ ह्यां शोजचा आनंद लुटण्यासाठी प्रामुख्याने येणारेही कितीतरी जण आहेत. काही शोज हे खेळण्यासाठी लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देश्शाने असतात ते थोड्यावेळासाठी असून चकटफु असतात, हे शोज उभ्या उभ्याच बघायचे असतात आणि दहा पंधरा मिनिटांत संपतात. मुख्य शोज हे साधारण दिड ते दोन तासाचे असून त्यांची तिकीटे शंभर डॊलर्सपासून हजारो डॊलर्स पर्यंत असतात. असे शोज कॆसिनोमधल्या स्वतंत्र थिएटर्स मध्ये होत असून कॆमेरा नेण्याची आणि मोबाईल किंवा कुठल्याही साधनाने फोटो काढण्याची तिथे परवानगी नाही.

लास व्हेगास मध्ये बहुसंख्य ठिकाणी तळात प्रशस्त कॆसिनॊज असून वरती ४०-५० मजले राहाण्याची हॊटेल्स आहेत. आम्ही सर्कस सर्कस ह्या प्रसिद्ध कॆसिनो मध्ये उतरलो होतो. इथे बसमधून येताना लास व्हेगासची झलक पहायला मिळाली होती पण बाहेर ऊन असल्याने उकाडाही होताच आणि दिव्यांचा झगमगाट सुरु झाला नव्हता. हॊटेलमध्ये फ्रेश होऊन लास व्हेगास फिरण्यासाठी आम्ही लगेचच बाहेर पडलो. सुदैवाने गो टू बसने आमची काही लास व्हेगास कॆसिनो फिरण्याची आणि काही चकटफु शोज बघण्याची सोय केली होती.

पलॆशियो मधला सायंकाळचा देखावा, तिथलाच व्हिनस शो, सीझर्स मधला अटलांटीसचा शो, बाहेरचा डोकं नसलेला पुतळा, पॆरीसच्या आयफेल टॊवरची प्रतिकृती बघत आम्ही पुढे निघालो. बलॆशियो बाहेरचा पाण्याच्या कारंज्यांचा म्युझिकल शो म्हणजे श्रवणीय आणि प्रेक्षणीय आनंद होता. आमच्या दोन रात्रीच्या वास्तव्यात लास व्हेगास मध्ये असणारे सर्वोत्तम शोज कोणते ते आम्ही शोधले आणि त्याप्रमाणे ’आईस’ आणि ’ज्युबली’ ह्या दोन दिवसांच्या शोजची तिकीटे खरेदी करून ठेवली. आठ वाजता आम्ही रीव्हीयेरा ह्या कॆसिनोमध्ये ’आईस’ ह्या शोसाठी त्यातल्या थिएटरवर जाऊन पोहोचलो. पुढचे दोन तास कमनीय आणि वेगवान हालचालींच्या अत्युच्च दर्जाचे प्रदर्शन अविरत चालू होते. बर्फाच्या लादीच्या स्टेजवर स्केटींग करत कसरतपटू रशियन सर्कस सारखे प्रयोग दाखवत होते. वेग, आवेग, तोल ह्यांचा वापर थक्क करणारा होता. वर्ल्ड क्लास म्हणजे काय ह्याचा प्रत्यय आल्यावाचून राहिला नाही. निव्वळ अफलातून कसरतीं शिवाय एकूण कॊरिओग्राफी, ड्रेस डिझायनिंग, प्रयोगाचे दिग्दर्शन, सिक्वेन्सिंग, कला/ मिमिक्री सादर करणायांचे टायमिंग, स्टेज सगळेच अत्युच्च! थिएटर मधून भारावून बाहेर आलो आणि कॆसिनोमधून चालत रस्त्यावर बाहेर पडलो तर डोळे दिपवणारा झगमगाट लास व्हेगास स्ट्रीपवर सुरु झाला होता. निऒन लाईट्स नी आणि मोठमोठ्या जाहिरातींच्या हॊर्डींग्जनी, झळकत्या दिव्यांनी टाईम स्क्वेअरच्या धुंदीची आठवण झाली. ’अभी तो रात जवा है’ अशा उत्साहात लोकांचे जथ्थे लास व्हेगास स्ट्रीपच्या रस्त्याने फिरत होते. तेथेच थोडं फार फिरून आणि कॆसिनोज मध्ये टाईमपास करत दुसया दिवशी ग्रॆंट कॆनियनला जायचे असल्याने रात्री साडे बारा पर्यंत आम्ही हॊटेलवर परतलो.

- क्रमश: