Thursday, August 28, 2008

डेलसचा ऒगष्ट..

डेलास डायरी:
हा ऒगष्ट तसा खूपच उन्हाळ्याचा होता इथे, तापमान बरेचदा दिवसा १०० फॆ च्या वर जायच (म्हणजे ३४ सें.) आणि भाजून काढणारं ऊन नको वाटायचं. पण महिना व्यस्त गेला खेळ आणि भटकणं अशी उत्तम चंगळ झाल्याने.

ऒलिंपिक्सच्या बयाच स्पर्धा बघता आल्या त्या केवळ एन.बी.सी च्या कृपेने. मायकल फ्लेप्स एक शतांश सेकंदाने जिंकला हे पहाताना डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कुठे पोहोचलय तंत्रशास्त्र की इतका सूक्षम फरक सुद्धा पकडता यावा! मायबोलीवर मुकुंदने ऒलिंपिक विषयी, त्यातले संभाव्य विजेते खेळाडू, वेगवेगळ्या स्पर्धा ह्यांची माहिती दिली होती त्याचा बराच फायदा झाला खेळ बघताना. बोल्ट्चा वेगही एकदम सुसाटच. ऒलिंपिक मध्ये पात्र ठरून देशाचे प्रतिनिधित्व करणार्या प्रत्येकाला माझा मनःपूर्वक सलाम. दुसरं आवडलं ह्यावेळी ते म्हणजे चीनची जिद्द. गेले कैक वर्ष अनेक दबावांना सामोरे जात चीनने ऒलिंपीकची तयारी चालवली होती. उद्घाटनाच्या आणि समारोपाच्या कार्यक्रमाने चीनने साया जगास तोंडात बोटे घालावयास लावली, शिवाय त्याबाबतीत त्यांनी एक नवीन मैलाचा दगड बनवून ठेवलाय. तसच नुसते सुनियोजनच नव्हे तर जास्तीत जास्त सुवर्ण घेऊन अमेरीकेच्या खेळातील वर्चस्वाला सरळ आव्हानच दिलेय. अभिनव बिंद्राला सुवर्णपदक देताना लावलेले भारताचे राष्ट्रगीत ऐकताना पुन्हा एकदा रोमांच उभे राहीले. भारताच्या दृष्टिने हे ऒलिंपिक चांगलेच गेले. हेच पथक ऒलिंपीकला जायच्या आधी कलमाडीनी मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते की आम्ही जातोय पण पदकाच्या अपेक्षा ठेवू नका, आणि ही बातमी पेपरात वाचून धक्काच बसला होता. जर एवढ्या जबाबदार पदावरच्या व्यक्तीमध्ये जर इतका कमी आत्मविश्वास असेल तर कसचे काय. ऒलिंपिक हा शारिरीक तर आहेच पण मानसिक कणखरपणाचा खेळ आहे. तुम्ही त्या क्षणाला दबाव कसा झेलता आणि कशी कामगिरी करता हे महत्त्वाचे. म्हणून ह्या पार्श्वभूमीवर भारतीय चमूने विशेषतः बॊक्सिंगपटूंनी केलेली कामगिरी स्पृहणीय वाटते. खूप काही शिकायला मिळालय भारताला यातून हे नक्की.

इतर कार्यक्रमांबरोबरच आठ दिवस सुट्टी टाकून अमेरीकेच्या पूर्व किनायावर फिरायला गेलो होतो. वॊशिंग्ट्न डीसी, न्यू जर्सी, न्यू यॊर्क मनसोक्त फिरून झाले. न्यू जर्सी मध्ये ओक ट्री रोड वर फिरलो, ब्रिजवॊटरच्या देवळात गेलो होतो आणि पॊईंट प्लेजर ह्या बीच वर. न्यूयॊर्क म़धे तर एक दिवस डाऊन टाऊन, एक दिवस अप टाऊन आणि एक दिवस मिड टाऊन अस खूप फिरणं झालं. आम्ही दोघही पक्के मुंबईकर असल्याने न्यू यॊर्क विशेषच आवडलं. प्रचंड महाग असलं तरी तितकच प्रेमळ शहर. न्यूयॊर्क म्युझियम मधून शहराचा पूर्ण इतिहास तसेच टाईम स्क्वेअर, युनियन स्क्वेअर, ब्रॊड वे वरचे शोज (ब्रॊड वे, ऒफ ब्रॊड वे, ऒफ ऒफ ब्रॊड वे) ह्यांची इत्यंभूत माहिती मिळाली. मोमा ह्या आर्ट गॆलरी मधेही पिकासो तसेच इतर जगद्विख्यात चित्रकारांच्या तसेच शिल्पकरांच्या कलाकृती बघता आल्या. अत्तापर्यंत कैक वेळा गेलोय न्यू यॊर्क मधे पण बरेचदा मित्रांना फिरवायलाच आणि मग इंपिरीयल टॊवर, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, टाईम स्केवर, ट्वीन टॊवर्सचा ग्राउंड झीरो, सेंट्रल पार्क ह्याच गोष्टी मुख्यत्वे बघून व्हायच्या. पण ह्यावेळी ह्या गोष्टींव्यतिरीक्त बरंच काही बघता आलं, एखाद शहर समजून घेण्याचा आनंद मिळाला. काहीतरी जागतिक (वल्र्ड क्लास) बघितल्याच समाधान मिळतच मिळतं न्यूयॊर्क फिरताना. शिवाय बस टूर घेतली होती आम्ही त्यामुळे बर्याच गोष्टी समजण्यास मदत झाली. एक अचानक मिळालेलं आणि अतिशय आवडलेल हे नाचो सॆंडविच - http://midtownlunch.com/blog/2008/07/07/off-the-menu-blimpie-sandwich/
एक दिवस संध्याकाळी ब्रुकलीन ब्रिजवर गेलो होतो, अर्ध्याहून पुढपर्यंत चालत गेलॊ आणि अचानक पाऊस आल. मग काय मस्त पैकी मनसोक्त भिजलो. ह्या अशा ठिकणी भिजणं अगदी कायम लक्षात राहील असच.पुन्हा कधीही असं न्यूयॊर्क मधे भटकायला आम्ही दोघेही तयार आहोत बघू कधी संधी मिळतेय का..

सद्ध्या थोडा निवांत झाल्याने पुन्हा वाचनाकडे वळतोय, शिवराज गोर्लेंच ’मजेत जगावं कसं’ हातात घेतलय. पुस्तक वाचायच्या आधीच मला प्रश्न पडला होता की, काय असेल इतकं ह्या पुस्तकात, आणि मजेत जगा हे सांगण्यासाठी आणि कसं ते सांगण्यासाठी पुस्तक कशाला वेगळं, दासबोधात सांगितलय की रामदासांनी, जे बरचस कालातीत आहे म्हणजे इतक्या वर्षांनंतरही समाजाला लागू आहे. पण पहिली काही पाने वाचल्यावर आवडायला लागलय. ह्या माणसाच वाचन चांगलं आहे आणि वेगवेगळ्या घटना, पाश्चात्य लेखकांचे लेखन तसेच पौराणिक दाख्ले उधृत करून बयाच गोष्टी समजावून दिल्यात. पाश्चात्य जग हे भोगवादी आहे तर आपली संस्कृती त्यागवादी. ह्या दोहोंमधे मेळ कसा घालता येईल ह्याचा अभ्यासपूर्ण उहापोह आहे, आवडतय..

आणि हो, मुंबईत पाट्या लागत आहेत बरं का मराठीत असं ऐकलं.. कोणी काही म्हणा हा विषय ढवळून काढायच बरंच श्रेय जातय राजला आणि सरकार सुद्धा ते तसं होऊन देतय थोड्या प्रमाणात कारण मूळ शिवसेनेचा हा मुद्दा नवनिर्माणाने ओढून घेतलाय. एकंदर काय कोणी कितीही भांडा श्रेयासाठी पण काम करा म्हणजे झालं आणि हो आता थोडी विधायक काम सुद्धा येउंदेत.

ठाण्यात ९ थरांचा गोविंदा लावला माजगाव वाल्यांनी असं ऐकलं. कौतुक वाटलं खूप. मी गिरगावतल्या अखिल खोताची वाडीबरोबर जायचो. व्यायामशाळेतली मुल असायचॊ सगळी. २ महिने कचून तयारी करायचो, वजनाचा तसाच तोलाचा सराव चालायचा. दमून भागून ऒफीसमधून आलो की रात्री १० वाजता सराव सुरु. आता बरच व्यावसायिक झालय पण. शिट्टीवर व्यवस्थित थर लावतात, उतरतानाही सांभाळून उतरतात. शिवाय गोविंदांचा विमा उतरवला जातोय. चांगलं वाटलं हे वाचून. माझ्या २००१ च्या गोविंदाच्या व्ही. सी. डी. करून ठेवल्यात त्या रविवारी बघून समाधान मानलं. दहीकाल्याचा आणि काकडीच्या कोशींबीरीचा प्रसाद केला होता.

अजूनही संक्रात, गोकुळाष्टमी आणि गणपती आले की कालवाकालव होते. गणपतीची तयारी सुरु झाली असेल आता, मांडव घातले गेले असतील. मग मांडवातले खेळ, लंगडी, टे टे, वगैरे. शिवाय आरत्या, आवर्तने, प्रसाद, फुले, आरास सगळ्याची तयारी. अगदी उत्सवी वातावरण असेल. दादर, लालबाग तर फुलून गेले असतील गर्दीने. खूपच नॊस्टेलजिक आणि भकास वाटतं इधे ह्यादिवसात.. तरीही इथे मित्रांकडे ग्णपती आहेत आणि महाराष्ट्र मंडळात देखील कायक्रम आहेत म्हणून बरं.

नवलाख विजेचे दीप तळपती येथ
तारकादळे उतरली जणू नगरात
परि स्मरते आणिक व्याकूळ करते केव्हा
ती माजघरातील मंद दिव्याची वात...
(- कुसुमाग्रज)

मिनोतीने नुकतच टॆग केलय, आवडीच्या कविता लिही म्हणून.. त्यामुळे पुढच्या पोष्टमधे ते..

No comments: