Sunday, February 6, 2011

आठवणीतला पाऊस..

गेले चार दिवस इथे पाऊस कोसळतोय, अगदी लागूनच राहिलाय. वर्षातले फक्त नेमके चार महिने मोसमी पाऊस बघण्याची सवय असणाया माझ्यासारख्या पक्क्या मुंबईकराला इथला बारमाही पाऊस कायम औत्स्युकाचा विषय. काल थोडा निवांतपणा होता तर खिडकीसमोर खुर्ची टाकून पावसाचा तो हैदोस बघत बसलो एकटक. समोर तलाव आहे त्यावर आदळ आपट करीत झाडांशी झोंबत मस्त चिंब कोसळत होता. खिडकी उघडली पावसाचे दोन थेंब अंगावर घ्यावेत म्हणून आणि अशी काही थंड झुळूक आत आली की माझ्या सकट खुर्चीही शहारली. म्हणजे पावसासकट थंडी आणि ती सुद्धा सुसाट आहे तर, गाराच पडत असणार म्हणजे असं पुटपुटत पुन्हा खिडकी लावून घेतली. दंगा करायचाय पण आईने दटावलेलं शहाणं मुल कसं निपचित घरात बसून निरागस डोळ्यांनी लांबच्या खेळाकडे बघत राहील, तसा कित्येक वेळ बघत होतो. हेच आवडत नाही मला इथल्या पावसाचं, येतो तेव्हा अशी सणसणीत थंडी घेऊन येतो की बस्स. शिवाय फ्लू होईल, त्यात कामाचा व्याप, तब्येत सांभाळायला हवी असं काही बाही डोक्यात येतं आणि भिजण्याचा मूडच जातो यार..

मग अशावेळी करायचं काय, भज्यांचं पीठ, थालिपीठ किंवा बटाटे वडे, छे! तळणीचा कंटाळा आलाय.. मग फक्त आल्याचा फक्कड चहा केला. घोट घोट चहा घेत त्या बेभान पावसाच्या धारांबरोबर मी कधी प्रवास सुरू केला माझ्या दक्षिण मुंबईच्या पावसाच्या दिशेने कळलं सुद्धा नाही.. ’ये रे ये रे पावसा..’, ’सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?” ने सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या लहानपणात हा पाऊस आलेला असतोच.. त्यातच ’थेंबा थेंबा थांब थांब, दोरी तुझी लांब लांब.. आभाळात खोचली तिथे कशी पोचली..’, ’आला आला पाऊस आला’, ’ए आई मला पावसात जाऊ दे’ अशी बालगीते पावसाशी जवळीक वाढवतातच. जगात कुठेही आणि कितीही पाऊस पाहिला तरी माझ्या मुंबईतल्या ’पावसाची सर’ कुठे नाहीच असं मला नेहमीच वाटतं. आत्तासारखं कैक वेळा त्याने मला नोस्टेल्जिक केलय. किती प्रकार ह्याचे.. कधी वळीवाचा, कधी दडी मारुन बसणारा रगेल, कधी आषाढाचा धोधाणा, कधी नुसतीच ढगांची आरडाओरडी, कधी ऊन पावसाचा श्रावणातला इंद्रधनुषी खेळ, कधी गणपतीतल्या मांडवाच्या ताडपत्र्यांवर तडातडा वाजणारा ताशा, कधी दिवाळीतले कंदिलही भिजवणारा.. किती वैविध्य.. भरंतीची वेळ साधून आला की मुंबईत पाणी साचलच समजा. ह्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडण्यात, पावसात फुटबॊल, क्रीकेट, व्हॊलीबॊल खेळण्यात मजाच वेगळी, आणि हो, पाऊस पडत असताना पोहायची जी काही धमाल आहे ना ती कशात नाही राजा.. ह्या पावसाळ्यात मुंबईच्या आसपास धबधबे वाहू लागले की पावसात ट्रेक करण्याची एक निराळीच धमाल. कॊलेजमधल्या दिवसात आणि त्यानंतरही तुंगारेश्व्वर, पांडवलेणी, भीमाशंकर, माळशेज, पळसदरी असे कितीतरी पावसाळी ट्रेक आणि सहली केलेल्या आठवतायत. मुंबई-पुणे खंडाळ्याच्या घाटातून पावसात केलेला प्रवासही अजूनही सुखदच वाटतो. आपल्या ओल्या लाल मातीचा वास हे उत्तम टॊनिक आहेच जीवनरस प्रफुल्लित करायला हे खरंच!

मुंबईत असा पाऊस भरून आला की दोन खांबांच्या इथून मरिनलाइन्सला समुद्राकाठावर चालत जायच नरिमन पॊईंटच्या दिशेने.. खळाळता समुद्र, सोसाट्याचा वारा.. हातात भाजलेलं कणीस.. छत्री उघडायचा विचार सुद्धा आला अशावेळी मनात म्हणजे अरसिकतेचा कळसच, तसही वारा तुम्हाला ती मिटायला लावणारच.. अंगावर लाटा झेलत आणि पाऊस घेत मनसोक्त भिजायचं.. निसर्गाचं तांडव सुरु असेल तर ते रसरसून उपभोगायचं.. बस्स! मी काय म्हणतोय ह्याची थोडी तरी कल्पना हा खालचा विडीओ पाहून येईल.. माझं आवडतं गाणं तर आहेच पण माझी लाडकी मुंबई चिंबचिंब दाखवलेय म्हणून अजूनच :) मुंबईचा पाऊस हे असं अजब रसायन आहे..


रिमझिम गिरे सावन.. सुलग सुलग जाये मन..

पाडगावकरानी ह्या मुंबईच्या पावसाचं यथार्थ वर्णन केलय. मला हे त्यांच्या ’तुझे गीत गाण्यासाठी’ ह्या कॆसेट मध्ये मिळालं दहा एक वर्षापूर्वी आणि कायम स्मरणात राहिलं..





पाऊस आला..


असाही पाऊस

पाऊस आला पाऊस आला
पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर.. पाऊस आला नाचणाया मोरांवर.. पाऊस आला..

वायाच्या श्वासाचा, मातीच्या वासाचा, हिरव्या हिरव्या ध्यासाचा..
करीत आला वेड्याचा बहाणा.. पाऊस आला आतून आतून शहाणा..
पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा.. राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा..
पाऊस आला गोकुळ्यातल्या माळावर.. पाऊस आला यशोदाच्या भाळावर..

पाऊस आला उनाडणारा सोवळा.. पाऊस आला पालवीसारखा कोवळा..
येथै येथै पाऊस आला, तेथै तेथै पाऊस आला, ताथै ताथै पाऊस आला..
फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला.. झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला..
पावसाने ह्या जगण्याचा उत्सव केला.. आणि पावसाने ह्या मरण्याचाही उत्सव केला..
जगणं आणि मरणं, बुडणं आणि तरणं.. ह्याच्या पल्याड कुठेतरी हा पाऊस आला..

पाऊस आला याद घेऊन.. ओली चिंब साद घेऊन..
बाहेर जरी ढगातून पाऊस आला, खरं म्हणजे.. आतून आतून पाऊस आला.. पाऊस आला..


- मंगेश पाडगांवकर

बडबडत उनाडत पाऊस येतो धपाधपा कोसळत
सामोरा, सैरावैरा, अस्ताव्यस्त..

त्याला नाही मुळीच सोसत कोणीही त्याच्याखेरीज लक्ष कुठे दिलेले

पाऊस महासोंगाड्या.. राहतो उभा देवळापुढल्या फुटपाथवर भाविकपणे, पुटपुटत करु लागतो नाम-जप श्रद्धेने..
आणि मग अकस्मात खो खो हसत, लगट करतो एखाद्या नाजूक रंगीत छत्रीशी..

झाडांना झोंबत येतो, पारंब्याना लोंबत येतो..
डोंगराची उशी घेतो, नदीला ढुशी देतो
शाळेपुढल्या गल्लीत पाऊस, नव्यानेच सायकल शिकतोय तसा वाटतो
वैतागला मिशीदार हवालदार तसा पाऊस कधी कधी घोगया सुरात डाफरतो

मुंबईतल्या भैय्यासारखा पाऊस कधी दूर उत्तरप्रदेशातल्या बायकोची याद होऊन उदास होतो
एकसुरी आवाजात एकटा एकटा तुलसीचे रामायण गाऊ लागतो..

पाऊस माझ्या खिडकीत येतो, सपशेल नागडा.. कमीत कमी लंगोटी.. तिचा सुद्धा पत्ता नसतो
हुडहुडी भरल्यासारखी माझी खिडकी थडाथडा वाजू लागते

सपकारत खिडकीतून तो मला म्हणतो,
"उठ यार, कपडे फेक, बाहेर पड,.. आजवर जगले ते कपडेच तुझे, एकदा तरी चुकून तू जगलास काय?
बाहेर पड, कपडे फेकून बाहेर पड.. गोरख आया, चलो मछींदर गोरख आया.."


- मंगेश पाडगांवकर


गौरी-गणपती, दिवाळी, होळी, संक्रांत असे सणवार जसे दरवर्षी ठरल्याप्रमाणे, ठरल्या वेळी येतात तसाच आपल्यासाठी हा मुंबईचा पाऊस.. दरवर्षी मे च्या शेवटी येऊन उकाड्यावार उतारा देणारा.. एक वार्षिक उत्सवच.. आणि माहेरपणाला आलेल्या लेकुरवाळीसारखा चार महिने मुक्कामालाच.

हा इथला कोलंबियातला कालचा पाऊस पाहाताना पाणी पाणी झालं ह्या आठवणींच्या डुबक्यांमध्ये.. आणि अशावेळी जगजीत नेहमीसारखा धीर गंभीर आर्त स्वरात धावून आलाच..

ये दौलत भी लेलो.. ये शोहरत भी लेलो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी..
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज की कश्ती.. वो बारीश का पानी..
वो कागज की कश्ती.. वो बारीश का पानी..