Thursday, February 25, 2010

विठठला....



प्रिय सचिन, काल तू द्विशतक काढलंस आणि आपल्या घरातला कोणी बोर्डात आल्यावर जसा आनंद होईल तसं झालं अगदी, अटकेपार झेंडा लावल्यावर तेव्हा मराठ्यांना वाटलं असेल ना तस्सच.. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची आणि ’सचिनने आता निवृत्त’ व्हायला हवं’ म्हणणाया ढुढ्ढाचार्यांची एकाच वेळी पिसं काढत ज्या कमालीच्या एकाग्रतेने तू २०० काढलेस नतमस्तक तुझ्यापुढे राजा. तुझी ती नजर, बॊलवर तुटून पडणं, रनिंग बिट्विन विकेट्स, फूटवर्क, टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन म्या पामराने काय बोलावं ह्या सगळ्याबद्दल. काल पुन्हा पुन्हा हायलाईट्स पाहिले आणि डोळ्यांचं पारणं फिटलं अगदी कडा ओलावल्या सुद्धा. कालचा दिवस तुझा होता असं म्हणून मी अन्याय करणार नाही तुझ्यावर, तू म्हणशील तो दिवस तुझा हे सगळ्यांनाच माहित झालय आता. २४ तारीख काल (तुझी जन्म तारीखही २४ च, संख्याशास्त्रीय अनुकूलता असणार म्हणजे :) आणि आज नुकतच वाचलं की, विनोद बरोबर शारदाश्रम मध्ये बरोबर २२ वर्षापूर्वी, म्हणजे २४ फेब्रु. १९८८ रोजी ६६४ धावांची जगप्रसिद्ध भागीदारी केली होतीस. असो, मागे ऒस्ट्रेलियाविरुद्ध १७५* काढताना तू रीटायर्ड हर्ट झालास, न्यूझीलंड विरुद्ध १८६* पेक्षा जास्त करायची संधीच मिळाली नाही पण मला माहितेय तू त्या दोन्ही खेळीतून बरच शिकलास (आणि तू असं अनुभवातून शिकत खेळाची पातळी उंचवू शकतोस म्हणून तू तू आहेस). त्यागोष्टींची तू पुनरावृत्ती होऊन दिली नाहीस हे लगेच जाणवलं. सईद अन्वरने काढलेले ते १९४ आठवतायत.. मे महिना होता आणि खोटं कशाला बोला सॊलिड जळली होती, निम्म्याहून अधिक डाव तर रनर घेऊन खेळला तो. असो, पण स्टॆमिना काय असतो हे तू काल दाखवून दिलस. तुझ्या पहिल्या शभर धावात एकही षटकार नसावा ह्यात संयम म्हणजे काय ते दाखवलस आणि इतकं करुन स्ट्राईक रेट आठ आणि नऊ? तुला महान हे विशेषणसुद्धा तोकडं पडावं. अगदी दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज सुद्धा तुझ्या वादळापुढे काल नतमस्तक झाले असतील.

तुझं कौतुक काय करावं महाराजा, स्टेनची बॊलिंग बघितली मी, कॆलिस सुद्धा जीव तोडून टाकत होता. अशा बॊलिंगची लिलया पिसं काढणं आणि समोरच्या कार्तिक, पठाण, धोनीला प्रोत्साहन देत राहाणं तुलाच जमणार. बॊलरच्या डोक्यावरुन उलट टोलवलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बायसेक्ट करत जाणारा चेंडू खासा मेजवानी होती काल. स्टेनचा ऒफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तू ऒफला शफल होत फ्लिक करुन लेग ला टोलवलास, कसं काय जमतं तुला इतकं अतर्क्य टायमिंग, स्टेन सारख्या फास्ट बॊलरपासून निघालेला चेंडू तुझ्या पर्यंत पोहोचेपर्यंत हे सगळं करायला वेळ आणतोस कुठून? इतकं पदलालित्य, ठेका तुला जमतं कस? आणि ते ही ह्या वयात?? १९९* वर असताना धोनीने तुला नॊन स्ट्रायकींग एन्ड वरुन परत पाठवलं ना तेव्हा सांगतो, ठोका चुकला होता.. अंग ठणकत असणार ना इतक्या झटपट हालचाली करत असताना.. पण २०० च्या सिंहासनावर तुलाच विराजमान झालेलं बघायचं होतं.. तू ’छ्त्रपती’ आहेस, दुसया कोणी तिथे जाण्याआधी तू तिथे जाणंच आम्ही स्विकारु शकतो. २०० हा जॆकपॊट असूच शकत नाही तो फक्त एक क्लास आहे. काल रात्री भारतातला प्रत्येक गरिब श्रीमंत ज्याची क्रिकेटवर श्रद्धा आहे, तो तृप्त झाला असेल, दोन घास जास्तीचे जेवला असेल. दिवाळी, गणपती दरवर्षी येतात पण तुझं असं येण आणि बरसणं त्यात न्हाऊन चिंब होणं ह्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं बाबा. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे!! तसं आहे हे..
असाच खेळत राहा, मनमुराद! गावस्करने घेतलेली ती १०००० वी धाव आणि तुझी २०० वी, भारत काय करु शकतो हे जगाला दिलेलं एक सणसणीत उत्तर.. आमचं भाग्य की आम्ही तुझ्या पिढीत जन्मलो आणि तू भारतात, तुझ्याबरोबर मोठं होत तुझा प्रत्येक चौकार, षटकार उपभोगण्याचा निर्भेळ आनंद दिलास, त्या आनंदाने कित्येक दु:ख, प्रसंगी एकाकीपण विसरायला लावलय.. तुझ्या आणि तुझ्या खेळाच्या त्रृणात राहाण्यातच धन्यता बाबा.. आज तुझ्या खेळाचं वर्णन इथे अमेरिकन, पाकिस्तानी आणि जमैकाच्या मित्रांमध्ये बसून करताना कसं वाटतय काय सांगणार, माझीच कॊलर ताठ. भारतीय आणि मुंबईकर असल्याचा यथार्थ अभिमान वाटतोय आणि तू.... मॆच नंतर तुझं नेहमीचच, dinesh, pathan & Dhoni played well, ball was coming on to the bat.. वगैरे वगैरे.. किती हा विनम्रपणा, बाबा रे, बॊल सगळ्यांच्या बॆटवर येत होते पण त्यांना अचूक दिशा देणं, टायमिंग साधणं, क्षेत्ररक्षकांच्या मधून किंवा डोक्यावरुन भिरकावणं आणि २०० धावा जमवणं, हे फक्त तुझ्या बॆटला आणि थंड डोक्याने खेळणाया तुलाच जमणार ना! कसे रे राहातात तुझे पाय इतके घट्ट जमिनीवर, कोणती वीट पायी घेतलेयस.. विठ्ठला.. ’तुझाच झेंडा माझ्या हाती...........’

एक साठवण:
पंधराव्यावर्षी मुंबईतल्या आझाद मैदानावर टॊम अल्टरने घेतलेली सच्च्याची कटींग पिताना घेतलेली अनौपचारीक मुलाखत..
http://www.youtube.com/watch?v=oez4TSdZvJI

- गेल्या २८ वर्षांपासूनचा तुझा भक्त