बयाच दिवसांनी लिहितोय, घरात लहान मूल असलं की वेळ कसा जातो कळत नाही, ह्याचा प्रत्यय घेतोय, ’बाप’ होण्याचा सुखद अनुभव आणि वाढत्या जबाबदायाही.. :-)
तसे बरेच विषय डोक्यात आहेत लिहिण्यासाठी पण सद्ध्या सगळ्यात जोरात विचार चाल्लेत ते "For here or to go?" चे :-) अपर्णा वेलणकर च्या ह्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी ह्या ब्लॊगवर लिहिलं होतं आणि त्यातलं नेमकं पुढे कुठे जायचं त्या दृष्टीने पावलं टाकायची वेळ आता आली आहे असं वाटायला लागलय, आम्हाला सगळ्यांनाच. योगायोगाने हे डोक्यात घोळत असतानाच मायबोलीवर रैनाने ’परतोनि पाहे’ हा बीबी सुरु केला आणि मग ह्या प्रत्येक भारतीय इमिग्रेंट्सच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सखोल लिहावसं वाटलं. ह्या अनुषंगाने येणारे मुद्दे, उपमुद्दे ह्यांची सविस्तर चर्चा घरातील सगळ्यांबरोबर बरेचदा झालेय शिवाय समकालीन, समवयीन आणि समस्थितीतिल मित्रमंडळींमध्येही झालेय. प्रत्येकाने आपापल्या परिने "For here or to go?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलय, शोधायला घेतलय किंवा नंतर बघू म्हणून चक्क पुढे ढकल्लय. तर ह्या ब्लॊग मध्ये माझ्या मायबोलीवरच्या लेखातले मुद्दे उचलून ’अमेरिकेत थांबायचं कि भारतात परतायचं?’ ह्याचं उत्तर शोधताना एखाद्यास कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो आणि कशी तयारी करावी लागते ह्याबद्दल लिहीणार आहे. हे वाचणायास अमेरिकेतल्या आयुष्याची कल्पना नसेल तर थोडी माहिती मिळेल पण माझ्यासारख्याच X = X + 1 सिंड्रोम (ह्या बद्दल पुढे लिहीलय) मधल्या कुटुंबास मुद्देसूद विचार करण्यास चालना मिळेल.
हे लिहिताना माझी थोडक्यात पार्श्वभूमी अशी की मी सध्या अमेरिकेत आयटी मध्ये आहे, व्यावसायिक आयुष्याला भारतात सुरुवात केली मग दोन वर्षे भारतीय कंपनीतर्फे अमेरिकेत काम केले, पुन्हा भारतात जाऊन भारतीय़ कंपनीत वर्षभर काम केले. त्यानंतर पुन्हा अमेरिकेत येऊन गेले पाच वर्ष इथे काम करतोय. हे सगळं सांगायचा उद्देश असा की, भारतात तसेच अमेरिकेत (प्रॊग्रेमर लेव्हलपासून प्रॊजेक्ट मॆनेजर, आर्कीटेक्ट लेव्हलवर) काम करण्याची आणि करुन घेण्याची पद्धत, दोन्हीकडचे बदलते जीवनमान, राहाणीमान, सामाजिक प्रश्न अशा संक्रमणातून एकापेक्षा अधिक वेळा गेल्यामुळे काही गोष्टी खूप जवळून अनुभवल्यात. एक महत्त्वाचे म्हणजे माझे व्यावसायिक अनुभव अमेरिका आणि भारत ह्या दोन देशांपर्यंतच आणि सांसारिक अनुभव फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादीत आहेत. तसेच सुदैवाने भाषा हया महत्वाच्या माध्यमाचा मोठा प्रश्न (जो जपान, चायना मध्ये काम करणायांना अपरिहार्यपणे येतो) आपोआपच नाहीये.
मूळातून विचार करण्यासाठी ’जाओनी किंवा राहोनी पाहे’ या अनुषंगाने आधी मुद्दे माडतोय म्हणजे परतण्याचा विचार त्या त्या गटात वेगळा कसा हे लक्षात येईल. आपले प्रश्न त्याची उत्तर वैयक्तीक पातळीवर बदलतात पण मग जी कारण असतात निर्णय प्रक्रीयेमागे (परतण्याच्या किंवा न परतण्याच्या) ती कोणती ह्यांच्या अभ्यासाचा (analysis) जेव्हा विचार होतो तेव्हा ज्या मुद्द्यांवर एखादा निर्णय घेतला जाईल ते मुद्दे कोणते, प्रत्येक मुद्द्याचं (त्या व्यक्ती/कुटुंबसापेक्ष) महत्त्व काय [म्हणजे तो मुद्दा घडेल ह्याची शक्यता (probability) किती आणि त्याचा परिणाम (impact) किती] ह्या सगळ्यांचा आपल्या अनुभव आणि सदसदविवेकबुद्धीला अनुसरून एकत्रित विचार केला गेला पाहिजे. हे एकदा समजलं की मग उकल काढण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय बैठक मिळू शकते.
असो, तर अमेरिकेत येणारा प्रत्येक जण एकाच सारख्या मार्गाने येत नाही, शिवाय येणाया प्रत्येकाचे उद्दीष्ट ’अमेरीकन ड्रीम’ हेच असते, असेही नाही उलट बरेचदा ते बदलत असते मृगजळासारखे, तर ढोबळमानाने इथे भारतातून आलेल्यांपैकी काही महत्त्वाचे गट -
१. अमरिकेत एम एस किंवा एम बी ए किंवा पीएचडी करू म्हणून उच्च शिक्षणासाठी आलेले लोक
२. भारतात शिकून अमेरिकेत नोकरीसाठी म्हणजे पैसा कमवण्यासाठी आलेले लोक
२.अ. एल १ म्हणजे कंपनी ट्रान्सफर वर आलेले जे इथे नोकरी बदलू शकत नाहीत आणि कंपनीच्या इशायावर केव्हाही परत जावे लागू शकते
२.ब. एच १ म्हणजे जे इथे नोकरी बदलू शकतात आणि नोकरी सुटल्यास व दुसरी न मिळाल्यास काही एक दिवसात परत जावे लागण्याची शक्यता असते
३. भारतातून येनकेनप्रकारेण नातेसंबंधातून इथे ग्रीनकार्ड घेऊन आलेले लोक (उदा. बरेचसे पटेल आपण बघतो..)
४. अमेरिकेत असणाया वरील पहिल्या दोन प्रकारच्या भारतीयांबरोबर लग्न करून आलेले डीपेंन्ड्ट व्हिसावरचे लोक
५. इमिग्रेशनची अडथळा शर्यत पार करून आलेले लोक - जीसी किंवा सिटीझनशिप असलेले
आता ह्या गटांच्या ढोबळ आर्थिक स्थैर्य आणि साधारण अपेक्षांचा आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर (कौटुंबिक पातळीवर थोडं नंतर पाहू) परतीच्या शक्यतेवर होणाया परिणामाचा थोडक्यात विचार करु -
गट १.
ह्यातील बयाचशा लोकांनी इथे येऊन शिकण्यासाठी पदरमोड केलेय अगदी स्कॊलरशिपवर आला असाल तरी किमान दोन वर्षे वेळेची गुंतवणूक केलेय. शिवाय, स्टुडंट लाईफ मधे कॊलेज फुटबॊलपासून एक वेगळी अमेरिका अनुभवलेय, त्यांची अमेरिकेशी थोडी वेगळीच नाळ जुळलेय. शिवाय, वैयक्तीक पातळीवर व्यावसायिक आयुष्यात त्यांना अमेरिकेत शिकल्याने प्रचंड संधी आहे, मागणी आहे. त्यामुळे रीटर्न ऒन इन्व्हेस्ट्मेंट तसेच ऒनर ऒफ टेलेंट ह्या दोन्हीवर विचार करता अशी लोक अमेरिकेत पटकन स्थिरावू शकतात, बरेचदा ह्याच गटातला जोडीदार ते निवडतात. आर्थिक प्रॊब्लेम सुटलेले असतील तर परतण्याचे विचार मनात येऊ शकतात किंवा अमेरिकन ड्रीमच्या दिशेने वेगात वाटचाल तरी करू शकतात. अर्थात, इथे शिकूनही नोकरी मिळत नसेल, ओपीटी नंतर एच वन आणि एच वन नंतर जीसी होत नसेल तर शिक्षणावरचा खर्च, लग्नाचे वय ह्यातून बरीच ओढाताण होऊन परतीच्या शक्यता सक्तीच्या होऊ शकतात. अर्थात ह्या गटातील लोकही गट २ बच्या माध्यमातूनच इमिग्रेशन मधून जात असल्याने त्यांना बयाच सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
गट २.
ह्यातील २.अ. लोकांना अमेरिकेत कायम राहाणे तसे फार शक्य नसल्याने त्यांना कधी ना कधी परतायचेच आहे हे लक्षात ठेवावेच लागते.
२.ब. अमेरिकेतले मार्केट, तुमच्या व्यावसायिक निपुतणतेला इथे असलेली मागणी, तुमचा अनुभव आणि मुख्य म्हणजे इमिग्रेशनचे नियम ह्या सगळ्या कचाट्यात ही लोक व्यवस्थित भरडून निघत आहेत. लग्नाची समस्या होऊ नये किंवा नक्की काय करायचे हे ठरत नाही किंवा कंपनी तयार होत नाही अशा विविध कारणांनी जीसी लांबणीवर पडले की मग एक चक्र सुरु होते. वर्षानुवर्षे जीसीची वाट पहाणे आणि त्याअनुषंगाने येणारे निर्वासिताचे जीवन चालू होते. बद्लती प्रोजेक्ट्स, जीसी फाईल केलेल्या कंपनीकडून होणारी अडवणूक, ऒनसाईट ऒफशोअर मॊडेल असेल तर कामाचे विचित्र तास ह्याबाबींमुळे अस्थिर जीवनमान सुरु होते. प्रोजेक्ट एकाच ठिकाणी असेल ह्याची खात्री बहुधा नस्तेच शिवाय एच वन वर असल्याने घर घेऊन राहाणे ही मोठीच रीस्क बनते. ह्या मंदी मध्ये होत्याचे नव्हते झालेल्या फॆमिली आपण पाहिल्या असतीलच. शिवाय जीसी येईपर्यंत तांत्रिक दृष्ट्या तुम्ही वर्षानुवर्षे तुमचा कामाचा प्रोफाईल वाढवू शकत नाही त्यामुळे प्रसंगी व्यावसायिक हतबलताही येऊ शकते. समजा एखाद्याला वयाच्या पस्तीशी पर्यंत जरी जीसी मिळाले तरी त्यानंतर वीस वर्षांचे होमलोन, इतका वेळ नोकरी टिकवून ठेवणे आणि संसार उभा करणे म्हणजे मोठी जबाबदारी होऊ शकते. ह्याचा एकत्रित विचार करता ग्रीनकार्ड हा एक जुगार झाला आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे ग्रीनकार्ड मिळूनही सीटीझन शीप मिळेपर्यंत ह्यातून सुटका नाहीच.
गट ३.
ह्यांचा इथे येऊन राहाणे हा एकच उद्देश असल्याने परतीचा काही प्रश्न येत नाही.
गट ४.
हा एक महत्त्वाचा घटक आहे. ह्यात आपण बहुसंख्य शिकलेल्या मुली निव्वळ एच ४ वर नोकरी करणे शक्य नाही म्हणून घरी बसलेल्या बघतो. ह्यात त्यांचे करीअरचे वैयक्तिक नुकसान झाल्याची बोच असतेच पण जर अशा व्यक्तीने ड्राइव्हीग, सोशल नेटवर्कींग, इथे वेळेचा स्वत:साठी कसा सदुपयोग करता येईल ह्याचा विचार केला नसेल तर अमेरिकेचा कंटाळा येऊ शकतो आणि मग भारतात परत जाऊया असा दबाव त्यांच्याकडून येऊ शकतो किंवा उलटपक्षी इथले सांसारिक स्वातंत्र्य आवडायला लागून भारतात जायलाच नको असाही सूर आळवला जाऊ शकतो. थोडक्यात, परत जायचं का ह्या मुद्द्यावर ह्या गटाचा प्रभाव अपरिहार्यपणे असतोच.
गट ५
ह्या गटातली माणसं बहुतांश इथे पोहोचेपर्यंत आर्थिक दृष्ट्या यशस्वी, स्थिरावलेली असतात. इतके वर्ष जीसी/सिटिझनशीप साठी लढलॊ त्याचे फळं खाण्याचे दिवस असं मनात येतं असतं. कुटब सुद्धा बरच स्थिरावलेलं असतं. अशावेळी आई वडिलांसाठी इथली बसलेली घडी मोडायची असेल तर कुटुंबाला खूप विश्व्वासात घेणं गरजेच वाटतं. परत जाण्यासाठी ह्यांना थोडं जास्तच धैर्य दाखवावं लागतं., इतके वर्षात इथे चांगला जम बसला असेल तर ह्यावर्षी जाऊ पुढच्या वर्षी जाऊ म्हणत (क्ष + १ सिंड्रोम) इथेच राहातात लोकं असं बरेचदा दिसतं.
एक कुटुंब परततं म्हणजे त्यात साधारणपणे कमावणारी (एक वा क्वचित अधिक)व्यक्ति आणि अवलंबित व्यक्ती (जी इथे कमवू शकत नाही पण कमवण्याची पात्रता आहे किंवा जी शिकतेय किंवा शिकण्यायोग्य होतेय). आता परतणाया कुटुंबप्रमुखास तीन पिढ्यांचा विचार करायचाय, आधीची (म्हणजे आई वडील..), स्वत:ची म्हणजे स्वत: तसेच बायको कसा परतीचा बदल मानवू शकेल आणि पुढची पिढी म्हणजे मुलं. हल्ली बयाच वेळा ’मागच्या पिढीसाठी परत जायचं’ ह्याला सरसकट टाळ्या वाजवल्या जातात, पण ते एका चौकटीतच खरं आहे. म्हणजे वृद्ध आई वडिलांसाठी परत जात असाल पण मुलांचे नुकसान होतेय तिथे गेल्याने किंवा अमेरिकेतल्या शिक्षणाची त्यांची संधी हुकली अशी बोच असेल तर मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचे नुकसान केले असं म्हणायला वाव आहे. ह्याउलट पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी इथे थांबलं तर मागच्या पिढीवर अन्याय होण्याची शक्यताही आहेच. सगळ्यांना पटेल असं ह्याचं उत्तर काढण म्हणूनच शक्य नाही हा असा वैयक्तीक प्रश्न आहे की जिथे तुम्हाला काय हवय आणि काय नकोय हे नीट माहिती असायला हवं आणि जो निर्ण्य घेऊ तो ठामपणे तडीस नेऊन जीवनाची अपरिहार्यता समंजसपणे स्वीकारता यायला हवी.
-- ’मी इथे का आलो?’ ह्याचं उत्तर अमेरिकेत जगायला, अमेरिकन ड्रीम पूर्ण करायला असं असेल तर तुमची दिशा अमेरिकेत राहाण्याकडे झुकतेय त्यामुळे गणिताची उकल सोप्पि हॊइल. जर फक्त पैसे कमवायला, जगाच्या दुसया टोकावर काय चाल्लय पहायला हे उत्तर असेल तर अजूनही परतीची धुकधुकी व्यवस्थित आहे. तुमची आर्थिक उद्दीष्ट जेवढी सुस्पष्ट असतिल तेवढं परतीच गणित सोप्प होईल.
-- इथल्या इमिग्रेशन सिस्टीमच्या कचाट्यात २ब गटामधील बहुसंख्य लोकं मोडतात. जीसी फाईल करण्याचा उपयोग फार तर एच वन सहा वर्षांपलिकडे वाढवायला होईल पण जीसी मिळायला (इबी२ किंवा इबी३ असेल) तरी अंदाजे दहा एक वर्षे लागतील. एवढे वर्ष निर्वासितासारखे (आपण आणि कुटुम्बियांनी) आयुष्य जगायचे का हे ज्याचे त्याने ठरवायचे. स्थैर्य हे तुमचे प्रमुख उद्दीष्ट असेल तर अशा स्थितीत नोकरीत, घर खरेदी, मुलांच्या शाळा, त्यांचा कौटुंबिक सहवास ह्या सगळ्या प्रकारांत स्थैर्य मिळणे दुरापास्त आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे इमिग्रेशन लॊज. ह्या गटातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय नाही (तसं अपेक्षित आहे असं नाही, पण नाहीये हे महत्त्वाचं) कारण ग्रीन कार्ड -सिटीझन आणि एच वन ह्यांना कामाचे स्वरुप, मर्यादा, संध्या ह्यात फरक आहे.
-- जोडीदार जर नोकरी करु शकत नसेल (उदा. एच ४ किंवा मुलांना द्यावा लागणारा पूर्ण वेळ किंवा नोकरीची संधी नसणे) आणि महत्वाकांक्षी असेल तर इथे घालवलेला प्रत्येक दिवस त्याच्या व्यावसायिक आयुष्यास त्रासदायक ठरु शकतो आणि कुटुंब अस्थिर करु शकतो.
-- इथली प्राथमिक शिक्षणसंस्था एका मर्यादेपर्यंतच चांगली आहे असे वाटते. म्हणजे लॆब, हुशारीप्रमाणे शिक्षण, व्यावसायानुषंगिक शिक्षण हे सगळ छान आहेच पण इथल्या शालेय वातावरणात मुल वाढवायला तुमच्या मनाची तयारी असायला हवी. तसच तुम्ही जितक्या लवकर अमेरिकन कल्चर आत्मसात कराल तितकं मुलांना सोप्प जाईल. तिथे शिकले तर आपल्यातले पुष्कळ जण आले तसे उच्चशिक्षणासाठी मूल इथे येऊही शकेल मोठे झाल्यावर. भारताल्या प्राथमिक शिक्षणपद्धतीत मुलांवर बोजा खूप आहे, मान्य पण आता तिथेही शाळा अभ्यासक्रमांत हा मुद्दा विचारात घेत आहेत आणि घरी स्पर्धेतून मुलाचा कोंडमारा होत नाही ना ही काळजी आपण घेतली तर बराच फायदा होऊ शकतो.
-- इथे ठरलेले सणवार (बयाचदा) सोयीस्कर विकेंडला करायचे, दोन वर्षातून एकदा भारतात तीन आठवडे जाऊन ’जी ले तेरी जिंदगी’ करायचं आणि त्यावर समाधान मानायचं हे तात्पुरतं जमेल पण कायमस्वरूपी जमेल का ह्याचा नक्की विचार करायला हवा. अमेरिकेत म्हातारपण घालवायची तयारी आहे का ह्याचाही विचार करायला हवा.
--एक पालक म्हणून, मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण व्हावी असं मनापासून तुम्हाला किती वाटतं आणि ते किती गरजेचं वाटतं? वाटत असेल तर इथे राहून ते अजिबात सोप्प नाही. तुम्हाला वाटेल ते पुण्यातही शक्य नाही पण ते पटत नाही. अजूनतरी पुण्यामुंबईत मराठी मेलेली नाही उलट ’राज’कीय कारणांमुळे तिला पुन्हा बळ येतय. नुसती भाषा नाही तर मराठी संस्कृतीशी पुढच्या पिढीची (ती त्याच्या पुढच्या पिढीत्त तशीच जुळलेली राहावी असा हट्ट नाही) नाळ जुळावी असं वाटत असेल तर नीट विचार होणं आवश्यक आहे. उदा. ’पु.लं. चा नारायण’ मी मुलाला समजावू शकलो पाहिजे, ’चाफ्याच्या फुला’ त्याच्याबरोबर बसून समरसून ऐकू शकलो पाहिजे साहित्याची, वाद्मयाची गोडी त्याला लावता आली पाहिजे अशी इच्छा असेल तर ते इथून वर्षाकाठी काही पुस्तक मागवून पूर्ण होण कठीण वाटतं. शिवाय, ते तिथे (हो बदलत असले तरीही) वातावरणामुळे आपोआप घडून येईल इथे राहिलो तर मात्र नाही म्हटलं तरी मुलांवर मराठी लादावं लागेल आणि जे मराठी भाषेचं आहे तेच अभिजात हिदुस्थानी संगीताच. तिथे सवाई गंधर्व, वसंतोत्सवासारखे उत्सव आणि जर त्याला आवड असेल तर दिग्गज संगीत तन्द्न्य गुरुस्थानी मिळू शकतील, इथून ती आवडं निर्माण करणं थोडं आडवळणाच हॊईल असं वाटतं. अर्थात उदा. इथे राहून व्हायोलिन शिकता येईल तिथे जाऊन हिंदुस्थानी संगीत मुलाने शिकायलाच हवे असे नाही असे एखाद्यास वाटत असेल तर ते वावगे नाही. पालकत्व हा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. हा फक्त मराठीचा मुद्दा झाला पण जर पुढे संस्कृत, उर्दू शेरो शायरी असं काही वेगळं शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते भारतातच जास्त सोप्प आहे.
’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’, प्रत्येकाला इथे राहा किंवा तिथे राहा समस्या आहेत. आपण जगतोय म्हणजेच चांगले वाईट असे भोग भोगतोय. त्यामुळे आपल्याला येणाया समस्यांवर आणि त्यांच्या निवारण्यावर आपलं किती नियंत्रण आहे हे महत्त्वाचं. भारतात तुमच्याकडे पैसा असेल तर बयाच प्रश्नांवर चांगले नियंत्रण येऊ शकते असे म्हणतात.
कौटुंबिक पातळीवर -
इथे जोडपं काम करत असेल तर विकेंड घरकामात, पुढच्या आठवड्याच्या पूर्वतयारीत जातात, रोज सकाळ संध्याकाळ ताजं जेवण मिळतच असं नाही, मुलांना डेकेअर मध्ये ठेवणं अपरिहार्य असतं. ह्याउलट भारतात मनुष्यबळाचा अभाव नाही. तुमचं आर्थिक नियोजन नीट असेल आणि विश्व्वासू माणसं तुम्ही निवडू आणि टिकवू शकलात तर बरीच काम आऊटसोर्स करता येऊ शकतात. शिवाय, आइ वडिलांचा तसेच शेजार्यापासून इतर नातेवाईकांचा आधार मिळवू शकता, धोबी, इस्त्री, पोळ्याला बाई, स्वयंपाकाला बाई, केरवारं करायला बाई अशा अनेक पातळ्यांवर आपण आपली काम करवून घेऊ शकता आणि वेळ वाचवू शकता. नातेवाईकांबरोबर येणार्या लग्न मुंजी बारशी डोहाळेजेवणं अशा कार्यांना पैठण्या नेसून दागिने घालून मिरवणे अशा मजांबरोबरच कुत्सितपणा, भोचकपणा, चोमडेपणा अशा अवगुंणांचाही आपल्याला सामना करावा लागतो पण ते कसं परतून लावायचं की त्याचा ताण घ्यायचा हे पूर्णत: तुमच्यावर आहे. एकूणात दहीहंडी, संक्रांत, गणपती, दिवाळी, पाडवा आणि प्रत्येक सणच जोरदार उत्साहात साजया होणाया ठिकाणी (उदा. गिरगाव, दादर, ठाणे) तुमचं आयुष्य गेलं असेल तर एका उत्सवी जीवनाच आकर्षण आपल्याला असतं, अमेरिकेतलं जीवनमान त्यामुळेच कित्येकदा तेच ते आणि चाकोरीबद्ध वाटू शकतं.
भारतात परतल्यावर तुमचे तसेच जोडीदाराचे आई वडील जवळ असतील, त्यांनाही बरं वाटेल, सहवासाचं प्रेम वाढेल, त्यांच्या तब्येतीची इथे राहुन जी काळजी असेल तर ती उरणार नाही. त्यांनाही मुला-नातवाबरोबर जीव रमवता येईल, नातवालाही डेकेअरची गरज भासणार नाही असं सगळं जूळून आलं तर तुमचं काम सोप्पच होईल खूप.
तिथले गड किल्ले, धार्मिक स्थळे किंवा डोंगर दया, गावं, शेतं तुम्हाला खुणावत असतील तर भारतात असाल तर निदान काही महिन्यातून रजा टाकून ह्यातलं थोडं थोडं तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. प्राजक्त, रातराणी, सोनटक्का, चाफा, मोगरा, बकुळी अशा नानाविध फूलांचे सुगंध तुम्हाला नॊस्टेल्जिक करत असतील किंवा देवगड हापूस तुम्हाला इथे अमेरिकेत कोरडे उसासे टाकायला लावत असेल तर भारतात हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना भरभरून आहे हे लक्षात असलं पाहिजे.
व्यावसायिक पातळीवर-
भारताच्या विकासाचा वेग अमेरिकेच्या विकासाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे. मान्य आहे भारतात भ्रष्टाचार आहे पण त्यामुळे अब्दुल कलाम आणि नारायण मुर्थी घडायचे थांबत नाहीत. भ्रष्टाचारामुळे, राजकारण्यांमुळे वेग कमी होत असेल पण जागतिक रेट्यामुळे, माहितीच्या स्त्रोतांमुळे बरेच फायदे होत आहेत. कोणी सांगावे. अशाच वेगात धावत राहिला तर भारत येत्या पंचवीस वर्षात अमेरिकेच्या आसपास येईलही, हे स्वप्नरंजन मुळीच नाही. शिवाय, भारत विकसनशील असल्याने आणि आपल्यासारख्यांनी विकसित देश म्हणजे काय हे अनुभवले असल्याने भारतात लघु उद्योगाच्या (विशेषत: आय टी क्षेत्रात) प्र चं ड संधी आहेत. एस एस एन सारखी सिस्टीम भारतातही येतेय. आर्थिक क्षेत्रातही सेबीने बरीच शिस्त आणलेय, आयसीआयसीआय डीरेक्ट सारखी पोर्टल्स व्यवस्थित काम करताहेत. लोकसंख्येचा बोजा भारतावर आहे हे मान्य पण हीच लोकसंख्या शिकतेय, ह्यात सुशिक्षित तरुणांचे प्रमाण वाढतेय आणि त्यांना संधी उत्पन्न करुन दिली तर खूप काही करता येईल (जे टाटा, अंबानीने केलं..). त्यामुळे परत गेल्यावर काय असा प्रश्न तूर्त तरी पडत नाही, थोडक्यात इथल्या अनुभवाला भारत बयापैकी न्याय देऊ शकेल असा विश्वास वाढतोय.
कामाच्या बाबतीत अमेरिकेतल्या लोकांना जरा जास्त सहानुभूती मिळतेय असं वाटतं. एन जे (जर्सी सिटी नव्हे) मधे राहून न्यू यॊर्कला अपडाऊन करणारे मित्र सकाळी सहाला जाणार ते रात्री आठ्ला घरी, अगदी कडाक्याच्या थंडीतही. याउलट पुण्यात बाईक वरुन मी १५ मिनिटात ऒफीसला जायचो. मला एवढच म्हणायचं की तुम्ही योग्य ठिकाणी असाल आणि तुमचा व्यावसायिक अनुभव पाठीशी असेल तर घराच्या जवळ किंवा वर्क फ्रॊम होम असा जॊब तुम्ही कुठेही मिळवू शकता नाहीतर कार पुलिंग सारखा उपाय आहेच. इथे अमेरिकेत आयबीएम मधे काम करताना आठवड्यातून चार दिवस क्लायंट कडे आणि एक दिवस घरुन काम अशी कन्स्ल्टींग जॊब मधे जबाबदारी पेलणारे पाहिलेत, त्यांच्या घरच्यांना खरच सलाम.
सामाजिक पातळीवर-
भारतातलं जीवनमान नक्की सुधारतय. प्रत्येक भारतवारीत ते प्रकर्षाने जाणवतय. आज इंटरेनेटवरुन पुण्याच्या जागेचं विजेचं बील मी भरू शकतोय. रस्ते, वाहतूक ह्या समस्या आहेत मान्य पण त्यांना कसं टाळायच हे तुमच्यावर आहे. मुंबईतल्या गर्दीला घाबरून तुम्ही मुंबईत गेलाच नाहीत तर तुम्हाला मुंबईची नशा कशी कळणार.. आणि गर्दी शिवाय मुंबई हा तुमचा हट्ट असेल तर ते शक्य नाही हे स्वीकारता यायला हवंच, कुरबूर करुन काहीच साध्य होणार नाही. एकंदर भारतातही सुविधा येत आहेत. वीज, पाणी अशा समस्या जरूर आहेत, लोकसंख्येचा बोजा आहे पण भारताने शिक्षणाबरोबर दिलेल्या इतर अनेक चांगल्या गोष्टीबरोबर ही कडू गोळीही गिळायला हवी ना. तिथेही माणसं राहात आहेत आपण नक्की ऎडजस्ट करू असा विश्वास आहे.
मग करायचं काय?
एक मात्र नक्की, भारतात जाणार असाल तर व्यवस्थित आर्थिक नियोजन करुनच (त्यात बॆंक बॆलन्स बरोबर योग्यवेळी घर घेणे आलेच) जायला हव असं मनापासून वाटतं. दुसरं म्हणजे तुम्ही योग्यवेळी निर्ण्य घेतला नाहीत किंवा तो लांबवणीवर टाकत राहिलात तर तुम्ही वेळेचा अपव्यय करण्याची शक्यता बळावते. जेथे तुम्हाला आयुष्यातील जास्त काळ राहायचे तिथे कौटुबिक जीवनास लवकर सुरुवात करणे (होमलोन, स्कूलिंग वगैरे च्या दृष्टीने) कधीही सयुक्तिक आहे. म्हणूनच मुलांना थोडे इथले आणि थोडे तिथले असे प्राथमिक शिक्शण द्यायला लागणार नाही ह्याचा जरूर विचार करायला हवा. अशावेळी मुलांना मित्रमैत्रिणी जोडणे, सोशल एक्सेप्टन्स ह्या पातळ्यांवर ताण सहन करायला लागण्याची शक्यता आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व ज्या काळात घडते त्याकाळात अस्थैर्यामुळे किंवा बदलांमुळे त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्ण अमिरेकेतले की पूर्ण भारतातले शिक्षण द्यायचे हा निर्णय मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत घेता आला तर केव्हाही उत्तमच अर्थात तुमचा ’पॊईंट ऒफ नो रीटर्न’ तुम्ही ठरवायचा.
परतीची वा न परतीची एका पेक्षा अधिक कारणं असू शकतात, ती किती सबळ आहेत हे ठरवता येण्यासाठी अशा चर्चेचा अंशत: तरी उपयोग होऊ शकेल असं वाटतं. तशी ती पुरेशी सबळ असतील तर घेतलेला निर्णय हा जाणीवपूर्वक असल्याने कुठलीही (इथे राहिलात तर इथे किंवा तिथे गेलात तर तिथे) एडजेस्टमेंट होऊ शकतेच. तर आपल्यापुरतं ती कारणं शोधणं आणि त्यांची सबळता ठरवणं महत्त्वाचं.
शुभं भवतु!
Friday, January 22, 2010
Subscribe to:
Posts (Atom)