ह्या पश्चिम किनायावरच्या प्रवासाचे नियोजन करताना, सॆन फ्रान्सिस्कोमधून खाली लॊस एंजिल्स मधे कसे यायचे याबाबत बरेच पर्याय होते. गाडी भाड्याने घेऊन सुकोया नॆशनल पार्क मधे जायचे, तिथे एक रात्र थांबून लॊस एंजिल्स मधे पोहोचायचे असाही विचार होता. पण सरतेशेवटी ऎमट्रॆक ह्या रेल्वेने येण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो किती योग्य होता हे लग्गेच जाणवलं.
सकाळी लवकर उठून आम्ही फोस्टर सिटीवरून पुन्हा सॆन फ्रान्सिस्कोच्या डाऊनटाऊन मध्ये गेलो. टॆक्सी करून पिअर २ वर एमट्रॆकच्या प्रवेशद्वारी पोहोचलो. हवेत छान गारवा होता, तिथेच कॊफी घेऊन सकाळी जॊगिंग ट्रॆक वर धावणारी माणसे, आसपासच्या शहरातून फेरीने(बोटीने) डाऊनटाऊनला कामासाठी रोज येणाया माणसांची लगबग, जगप्रसिद्ध ऒकलंड पूलावरून अव्याहत सुरू असणारी वाहनांची रहदारी बघत अर्धा तास पटकन गेला. आम्हाला घेऊन ऒकलंड स्थानकावर जाणारी बस आली आणि आम्ही तिथेच बॆग चेक इन करून बस मध्ये बसलो. त्याच भल्या मोठ्या ऒकलंड ब्रिजवरून आमची बस गेली आणि ह्या पुलावरुन प्रवास करण्याचा काही मिनिटे का होईना आनंद लुटता आला. ऒकलंड रेल्वे स्थानकावर फार थांबायला लागलं नाही, पंधरा वीस मिनिटांत गाडी आली. यापूर्वी एमट्रॆकने प्रवास करण्याचा योग आला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. आम्ही ट्रेनमध्ये स्वतंत्र खोली आरक्षित केली होती त्यामधेच सकाळची न्याहारी, डेकवर दोन्ही वेळचे जेवण अंतर्भूत होते. गाडी सुटली तेव्हा लगेचच ब्रेकफास्टची वेळ झाली होती आणि गाडीतल्या डेकवर जाऊन आम्ही कॊफी फळे घेऊन ब्रेकफास्ट केला.
थोडं ह्या ट्रेनविषयी. अमेरिकेतला सगळ्यात निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेला असा हा रेल्वे रुट. वॊशिंग्टन स्टेटमधल्या सिऎटल मध्ये सुरु होऊन ही ट्रेन ऒरेगॊन राज्य ओलांडून कॆलिफॊर्नियात येते आणि खाली सॆन डिएगो पर्यंत जाते. साधारण ३५ तासांचा एकूण प्रवास. वाटेत कॆलिफॊर्नियातल्या सॆक्रोमेंटो, ओकलंड (जिथे आम्ही चढलो), सॆन होझे, सॆंटा बार्बरा, लॊस एंजिल्स (जिथे आम्ही उतरलो) ते सॆन डियॆगो अशा अनेक निसर्गसंपन्न ठिकाणांना जोडत,कधी पॆसिफीक समुद्राला खेटून तर कधी हिरव्यागार शेतांमधून ही ट्रेन जाते.
दिवस आठवा (लोस एंजिल्स हॊलीवूड, बेव्हरली हिल्स)
लॊस एंजिल्सचं हॊलीवूड बघायला आम्ही सकाळीच बाहेर पडलो. कॊडॆक थिएटर जिथे ऒस्कर ऎवॊर्ड होतात तिथे पोहोचलो तर बाहेर रस्त्यावर बाजूच्या चायनीज थिएटरबाहेर वेगवेगळ्या वेषभूषेत कलाकार, खूप सारे प्रवासी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून (पैसे देऊन) घेण्याची झुंबड.
आणि हॊलीवूड्ची फेरी मारली. चायनिस थिएटर्वरून निघून गिटार सेंटर, द कॊमेडी स्टोर, बेव्हरली हिल्स, सॆंटा मोनिका, फार्मर्स मार्केट, सी बी एस, सायलंट मूव्ही थिएटर, पॆरामाऊंट पिक्चर्स स्टुडिओ आणि ती जगप्रसिद्ध हॊलीवूड असं मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेली डोंगरावरची खूण असं बघत शेवटी कोडॆक थिएटरपाशी उतरलो. वाटेत बसमध्ये आम्हाला लॊस एंजिल्स शहर, तिथे राहाणारी माणसे, हॊलीवूड व्यवसाय, नटनट्यांची आवडती रेस्टॊरंट्स, एखाद्या नशीब अजमवायला इथे आल्याने सामान्य कलाकाराने घेतलेली असामान्य झेप, त्यांचे अनुभव आणि एकंदर हॊलीवूडचा, इथल्या श्रीमंतीचा कॆलिफॊर्निया राज्यावर आणि पर्यायाने अमेरिकेवर असलेला ठसा तसेच प्रभाव ह्यांची सुंदर ओळख करुन दिली. थोडावेळ कोडॆक थिएटरमध्ये फिरून आम्ही पुन्हा मुक्कामी परतलो. संध्याकाळी मित्रांबरोबर फिरुन दुसया दिवशीच्या सॆन डिऎगोच्या तयारीस लागलो.
दिवस नववा (सॆन डिऎगो)
सकाळी गाडी भाड्याने घेऊन आम्ही लॊस एंजिल्सवरून सॆन डिएगोला निघालो. इथल्या रस्त्यांविषयी, बंपर टू बंपर वाहतूकी विषयी आणि तिच्या वेगाविषयी बरंच ऐकलं होतं. तो थरार, हो थरारच म्हणायला हवा, अनुभवता आला. सहा ते आठ पदरी रस्ते क्षणात बदलाव्या लागणाया लेन्स आणि डाव्या, उजव्या कुठल्याही बाजूने पुढे जाऊ पहाणाया उधाण गाड्या सगळं थोडं नवं होतं पण लवकरच त्याचा सराव झाला आणि सुसाट वेगाने सॆन डिएगो झू पाशी येऊन पोहोचलो. लॊंग विकेंड असल्याने गर्दीही खूप होती. आम्ही पोहोचेपर्यंत पार्क सुरु झाले होते आणि नेहमीचे पार्किंग संपले होते पण सुदैवाने जवळच जास्तीच्या पार्किंगची सोय केली होती. गंमतीची गोष्ट म्हणजे तेथेच बाजूला आम्हाला ’उपास’ स्ट्रीट दिसला :-)
दिवस दहावा (कोलंबिया परत..)
सकाळीच आम्ही लॊस एंजिल्स विमानतळावर पोहोचलो. पश्चिम किनायावरून पूर्व किनायावर यायचं म्हणजे वेळेचा फरक भरून काढता प्रवासास खूप वेळ लागतो. संध्याकाळपर्यंत कोलंबियात पोहोचून नविन आठवड्यासाठी सज्ज झालो. ह्या पश्चिम किनायावरच्या प्रवासाच्या सुरम्य आठवणीं मात्र कायम स्मरणात राहतील.
- समाप्त