Sunday, August 9, 2009
भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ४
दिवस सहावा (सॆनफ्रान्सिस्को डाऊनटाऊन, पिअर ३९, मूर वूड्स, ससॆलिटो, गोल्डन गेट ब्रिज)
सकाळी थोडं लवकर उठून आम्ही फोस्टर सिटीवरुन सॆनफ्रान्सिस्को डाऊनटाऊन मधे जाणारी बस पकडली. पूर्व किनायावरच्या न्यूयॊर्कला तोडीस तोड असं हे पश्चिम किनायावरच सॆनफ्रासिस्को. बरचं वाचलं आणि ऐकलं होतं ह्या शहराबद्दल. दोघांचा मुंबईचा पिंड असल्याने अशा शहरांच्या डाऊनटाऊन मध्ये बिझनेस डे मध्ये फिरण्याची ईच्छा आणि उत्सुकता आम्हाला नेहमीच असते. साधारण पाऊण तास प्रवास करून आम्ही डाऊनटाऊन मध्ये पोहोचलो. आमच्या बरोबरचे सगळेच जण फोस्टर सिटी मध्ये राहून रोज सॆन फ्रान्सिस्कोमध्ये कामासाठी अपडाऊन करणारे चाकरमानी असल्याच दिसून आलं. उतरल्यावर पहिलं काही जाणवलं असेल तर चढ उतार असलेले रस्ते. इतके की त्यावर सलग चालण कठीण व्हावं. आम्ही सिटी टूरच्या ऒफीस पर्यंत टॆक्सी केली आणि बरोबर ९ च्या दरम्यान आमची मिनी बस गोल्डन गेट च्या व्हिस्टा पॊईंटच्या दिशेने निघाली. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हलकीशी थंडी अशी सुंदर हवा पसरली होती.
व्हिस्टा पॊईंटवर पंधरा मिनिटं थांबून आम्ही तो प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पाहिला, वेगवेगळ्या कोनातून त्याचे फोटो घेतले. सोन्याच्या शोधार्थ जेव्हा धंदेवाईक लोकं आणि खाण कामगार, कॆलिफोर्नियामध्ये आले तेव्हा फेरीचा म्हणजे बोटींचा वापर बंदरात ये-जा करण्यासाठी होत असे. कडाक्याची थंडी, खाया पाण्याच्या प्रवाहाचा, वायाचा तसेच लाटांचा प्रचंड जोर, मिलीटरीचा सुरक्षिततेच्या कारणाने विरोध, त्यातच आलेली सगळ्यात मोठी आर्थिक मंदी ह्यांना तोंड देत १९३२ ते १९३७ दरम्यान हा ब्रिज बांधला गेला. त्याचा रंग कोणता ठेवायचा ह्याविषयी सुद्धा खूप वाद झाले आणि शेवटी आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला लाल रंग ठरवण्यात आला. अनेकानेक चित्रकारांना, छायाचित्रकारांना आणि सिनेमावाल्यांना खुणावया ह्या गोल्डन गेट ची नजाकत, अदा नजरेत साठवत आम्ही मूर वूड्स च्या दिशेने निघालो.
साधारण अर्धा तास वळवळण्याच्या घाटातून जात आम्ही मूर वूड्स मध्ये पोहोचलो. प्रसिद्ध पर्यावरणवादी जॊन मूर ह्याच्या स्मृती प्रित्यर्थ ह्या संरक्षित जंगलांना मूर वूड्स नाव देण्यात आले. १९०८ मध्ये तत्कालिन अध्यक्ष रुझवेल्ट ह्यांनी जुनी जंगले जपण्यासंबंधिचा कायदा करुन आणि मूर वूड्स ना राष्ट्रीय मालमत्ता जाहीर करून अधिकृत संरक्षण दिले. आज कोस्टल रेडवूड्स बघण्याचे मूर वूड्स हे एकमेव ठिकाण उरले आहे. अतिशय जाणीवपूर्वक नवनवीन तंत्रद्न्यानाचा वापर करून ह्या जंगलांची काळजी घेतली गेली आहे. आत शिरल्यावर सुमारे दीड तास गर्द जंगलातून रेड वूड्स झाडे, वेगवेगळे पक्षी, ढोली, ओहोळ बघत आम्ही भटकत होतो.
तिथून परतून आम्ही मिनी व्हॆनमधून सॊसेलिटॊ ह्या छोटेखानी समुद्र किनायावरच्या आखीव रेखीव शहरात आलो. समोर पसरलेला शांत समुद्र, बंदराला उभी असलेली गलबत, लाटांचा खळाळता बारीकसा आवाज अतिशय प्रसन्न वातावरण. आपलं वेगळेपण ह्या ठिकाणाने जपलेलं लग्गेच जाणवत. खास सी फूडसाठी जमलेली खव्वयांची गर्दि, एखाद्या पर्यटन स्थळी असावं असं उत्सवी वातावरण आणि रस्त्याने निवांत फिरत विंडो शॊपिंग करणारी माणसं, भान हरपून जातं बघताना. ह्या शहराच्या परिसरात कुठल्याही वॊलमार्ट, केमार्ट, मॆक डी, स्टार बक्स सारख्या ब्रॆंडेड आणि साखळी दुकानांना, हॊटेलांना परवानगी नाही. जे काही असेल ते छोटेखानी स्थानिक दुकान. तिथेच साधारण अर्धा तास फिरून आम्ही पिअर ३९ वर नेणारी ओपन रुफ बस पकडली. येताना बसमध्ये सॊसेलिटो शहराची तसेच सॆनफ्रान्सिस्कोची बरीच माहिती मिळाली. ’पर्सूट ऒफ हॆप्पीनेस’ ह्या सिनेमामधून ह्या शहराची पूर्वी ओळख झाली होतीच. गेली तीन शतक लोकांना आकर्षित करणाया, कामाची कधीही कमी नसलेल्या ह्या शहराबद्दल, तिथली म्युझियम्स, संशोधन केंद्रे तसेच शहरावर असलेली आर्थिक उलाढालींची जबाबदारी, वाढणारी लोकसंख्या त्यातून निर्माण होत असलेल्या समस्या सगळ्यांच उहापोह त्या थोड्यावेळात बसमधील समालोचकाने केला. थोड्याच वेळात आमची बस गोल्डन गेट ब्रिजवर आली आणि घोंघावणारा वारा कापत गोल्डन गेट ब्रिजवरून जातानाचा आनंद उपभोगता आला.
तेथूनच समुद्रात दिसणारं अल्कार्टाझ चं बेटही आम्ही पाहिलं, कैद्यांना डांबण्याचं हे ठिकाण. इथून अत्तापर्यंत झालेले कैद्यांचे पलायनाचे कित्येक प्रयत्न फसले आहेत त्ते ह्याच्या भौगोलिक स्थानामुळे. कडाक्याची थंडी आणि बर्फासारखे थंड पाणी पोहून बेटापासून समुद्र किनारी येणे अगदी उन्हाळ्यात सुद्धा अशक्य , थंडीत आणि धुक्यात तर शक्यच नाही.
पिअर ३९ जवळ आम्ही बस मधून उतरलो आणि चालत समुद्र किनायावर फिरू लागलो. पर्यटकांनी सदाबहार असा हा परिसर. सॆन फ्रान्सिस्को शहरात येणारा प्रत्येक जण इथे येतोच येतो. समुद्रकिनार्यालगतच्या हॊटेलांमध्ये सी फूड खाणायांची तर चंगळच पण उत्तम प्रतिची कॊफी तसेच आईस्क्रीमही येते मिळते. प्रत्यक्ष पिअर ३९ वर इकडून तिकडे रमत गमत जाणारी माणसे, मुले, जोडपी, जथ्थे सगळे कसे निवांत सुट्टी उपभोगायच्या मूड मध्ये. बाजूला एखादा रस्त्यावर स्टॊल लावून सूर आळवतोय, बॆंड वाजवतोय आपल्या सिडीज विकतोय तर कुठे फ्ळवाले थेट शेतातून आणलेली फ्ळे विकत आहेत, काही जण फोटोच्या नेमक्या जागा शोधत क्षण कॆमेयात पकडत आहेत तर काही नुसते उडते समुद्रपक्षी पहात उभे आहेत असं निर्मळ आणि निवांत दृश्य. हवेत खारेपणा थोडासा पण थंडावाही त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. तिथेच थोडं खाऊन आम्हीही थोडं विंडो शॊपिंग केलं, पिअर ३९ चा तो प्रसिद्ध, शिंपल्यातला मोती उघडून विकत घेतला. अजून एक चांगलं ठिकाण बघायला मिळालं ह्याच्या आनंदात बस पकडून आम्ही फॊस्टर सिटी गाठली.
दिवस सातवा (सॆन होजे, अल कमिनो रीअल, कारामेल बीच, १७ माईल्स ड्राईव्ह)
आज सकाळी थोडं निवांत उठून आम्ही सॆंताक्रूझ बीच च्या दिशेने निघालो. फॊस्टर सिटीवरुन इथे जाताना बे एरियातून जावयाचे असल्याने गूगल, सिस्को, एप्पल, इ बे अशा मोठमोठ्या कंपन्यांच्या हेड क्वार्टर्स असलेल्या सॆन ओझे मधून जावयाचे असल्याने ट्रॆफीक टाळण्यासाठी आम्ही थोडे उशिरानेच निघणे पसंद केले. साधारण दीड दोन तास प्रवास करून आम्ही १७ माईल्स ड्राईव्ह पाशी पोहोचलो. १७ मैलांचा हा ड्राईव्ह कॆलिफॊर्नियातला सगळ्यात विहंगम दृश्य असलेल्या रस्त्यांमध्ये गणला जातो. पाच ठिकाणांवरुन ह्या दोन लेनच्या १७ मैलांच्या रस्त्याला प्रवेश ठेवला आहे. ह्या ड्राईव्ह वर पोहोचतानाच गेट वर पूर्ण ड्राईव्हचा एक मॆप दिला जातो. त्यावर प्रत्येक पॊईटची सविस्तर माहिती लिहीलेली असते. एखाद्या अद्न्यात बेटावर साईन्स शोधत तुम्ही ड्राइव्ह करतानाची मजा इथे अनुभवायला मिळते. पूर्ण रूटवर २० स्टॊप्स असून प्रत्येक ठिकाणी रस्त्यालगतच्या पार्किंगची सोय आहे. इथला सूर्यास्त उत्तम आहेच पण प्रत्येक पॊईंटवरून दिसणारं निसर्ग सौंदर्य केवळ अप्रतिम आहे. मधेच डॊंगराला वळसा तर मधेच सळाळता समुद्र असं बघत बघत एकेक पॊईंट आपण पुढे सरकतो. मुख्य म्हणजे इथली टिपलेली दृश्ये तुम्ही कुठेही व्यावसायिक लाभासाठी वापरु शकत नाही. हा १७ मैलांचा पूर्ण रस्ता आणि आजूबाजूचा परिसर पेबल बीच ह्या कंपनीच्या मालकीचा असून आपण इथे फक्त गेस्ट म्हणून बघायला येतोय असं आधीच प्रवेशद्वाराजवळ फोर्ममध्ये भरून घेतलं जातं. लोन सायप्रस हे ह्या ड्राईव्हवरचं ठिकाण कॆलिफॊर्नियातल्या आघाडीच्या रोमॆंटीक ठिकाणांपैकी एक. शेफर्डस नॊल, पोईंट जो, बर्ड रॊक, फॆनशेल ओव्हरलुक, द घोस्ट ट्री, रेस्ट्लेस सी हे ह्या ड्राईव्हरचे काही ठळक पॊईंट्स. आम्ही जवळ जवळ प्रत्येक पॊईंटवर उतरून निसर्गसौंदर्याचा डॊळे भरून आणि मनसोक्त आस्वाद घेतला. एक दोन ठिकाणी तर समुद्रकिनायावरच्या खडकांत पाण्यात पाय बुडवून फेसाळत्या लाटा पायावर झेलल्या तेव्हा बॆंड्स्टॆंडची आठवण आल्यावाचून राहिली नाही, फरक इतकाच की समुद्र अतिशय स्वच्छ, आजूबाजूला झाडी आणि थोडीशी वाळू, कुठल्याही प्रकारचा कचरा नाही आणि निरव शांतता. अगदी कुणी म्हणजे कुणी माणूस नाही त्यामुळ लाटांची आणि झाडाच्या पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. जवळ जवळ दोन तास फिरून आणि ड्राईव्हचा आनंद लुटून आम्ही कारामेल बीच च्या एक्झिट ने बाहेर पडलो.
मे महिन्यातली भर दुपार असली तरी हवेत बराच गारवा होता. बीच वर गर्दी अशी नव्हतीच. पाणीही तसे थंडच असल्याने आत जाण्याचा प्रश्नच नव्हता. थोडावेळ बीच वर फिरून आम्ही सॆन ओझे मधे जाण्यासाठी परतीच्या प्रवासाला लागलो. दोन तास ड्राईव्ह करुन आम्ही सॆन ओझे मधे माझ्या आवडत्या कोमला विलास मध्ये खाऊन, अलकमिनो रीअल वर थोडं फिरून (येथेच आम्हाला पी एन गाडगीळांचे सोन्या चांदीच्या दागिन्याचे दुकानही दिसले) फॊस्टर सिटी मध्ये परतलो.
- क्रमश:
Subscribe to:
Posts (Atom)