Friday, July 18, 2008

सिंग इज किंग..

सद्ध्या भारतात अणुकरार आणि महागाई ह्या दोन गोष्टीवरून प्रचंड राजकीय आणि सामाजिक उहापोह चाललाय. महागाईमुळे सामान्य माणूस होरपळतोय पण तरीही अणुकराराविषयी सजगतेने बोललं जातय हे चांगलच आहे म्हणा. शिवाय मार्केट सुद्धा पडलेलच आहे त्यामुळे समाजातल्या सगळ्याच वर्गांना अशा एकाचवेळी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्याव लागतय. त्यातच ह्या राजकीय अस्थैर्याने भर घातलेय. माझ्या अल्पमतिने मी हा अणुकरार नक्की काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पण इतकी मतमतांतरे आहेत की बस्स! पण अब्दुल कलाम, तसेच मनमोहनसिंगांवर त्यांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास आहे म्हणूनच असं वाटतय की जर हे लोक पाठींबा देत असतील तर ते नक्कीच हिताच असणार.

पंतप्रधानांनी, ज्या राजकीय मुत्सुद्दीने विश्वास ठरावास सामोरे जाण्याचा निर्णय घेताला आणि तो तडीस नेला, त्याद्वारे त्यांनी एकाच वेळी डावे पक्ष, मायावती आणि नगण्य महत्त्व असणारे पण लुडबुड करणारे प्रादेशिक पक्ष ह्यांना सणसणीत चपराक हाणली. कोटी रुपयांच्या नोटांचा जो देखावा सगळ्यांनी बघितला त्याने भारतीय लोकशाही हादरली नसेल तरच नवल. पण हल्ली आपण एकंदर इतके उदासीन झालोत की साधनशुचिता, नितीमत्ता ह्या गोष्टींचे कुणालाच काही वाटेनासे झालेय. अशावेळी मग पाडगावकरांच्या 'सलाम' ची (पाडगावकरांवरील नक्षत्रांच्या देणे मध्ये शिवाजी साटम ने त्याचं अप्रतिम सादरीकरण केलेलं डोळ्यासमोर आहे ) किंवा 'उदासबोधाची' आवर्जून आठवण येते. अडवाणीं च्या भाषणात तर अभ्यासाचा अभाव, बेजबाबदार विधाने ह्यांची परिसीमा होती. हया माणसास देशाचे पंतप्रधान म्हणून पुढच्या निवडणूकीत निवडून द्यावे काय हा प्रश्न पडावा इतपत अडवाणींनी विश्वासार्हता गमावलेय. पंतप्रधानांनी अचूक धागा पकडून आपल्या भाषणात अडवाणींना सडेतोड उत्तर दिलय. शिवाय अडवाणींचे जे आत्मचरित्र प्रकशित झालय त्यातून त्यांनी जसवंतसिंह तसेच बर्याच भाजपातील नेत्यांची मने दुखावलेयत. अगदी कारगिल युद्ध, कंदाहार प्रकरण, संसदेवर हल्ला, गुजरात दंगल ह्या सगळ्यांत गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेण्याऐवजी कोलांट्या खात केलेल्या कसरती, पाकिस्तानात जाउन जिनांवर उधळलेल्या स्तुतीसुमनांमुळे संघाचा ओढवलेला राग त्यामुळे अडवाणींची स्थिती घर का न घाट का अशी झालेय. त्यातूनच ह्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी जे क्रॉस व्होटींग झालय आणि भाजपा खासदार फुटलेत त्यावरून अडवाणींची स्वत:च्या पक्षावरची पकड सुटतेय हे स्पष्ट दिसतेय. एकूण काय तर भाजपाचं काही खरं नाही आणि मुक्त अर्थव्यवस्थेची फळं चाखायची असतील तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. शिवाय काँग्रेस कडे तरूण नेत्रुत्व आहे आणि आगामी काळात त्याचा त्यांना नक्कीच मोठा फायदा होईल. खासदार खरेदी केले हो अशी ओरड करून गळा काढणार्‍या अडवांणींना मग पत्रकार परिषदेत ह्याला नीट उत्तरे देता आली नाहीतच, शिवाय ज्या पक्षाचे खासदार लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्याने निलंबित होतात तसेच ज्या पक्षाचे प्रमुख बंगारू लक्षमण, पक्षासाठी लाच घेताना पकडले गेल्याने त्यांना हाकलावावे लागले तो भाजप नैतिकता केव्हाच गमावून बसलाय. ह्या कोटींच्या लाचेचा खरा निकाल यथावकाश (सावकाश) लागेलच पण भाजप म्हणजे सरळ सूत, प्रामाणिक आणि नैतिक पक्ष हे केव्हाच मागे पडलय. असं जर असतं तर त्यांनी अणुकराराला विरोध करत डाव्यांची साथ दिलीच नसती. सगळेच आता एकदम तोंडावर आपटल्याने कधी नव्हे ते काँग्रेस जिंकल्याच समाधान सामान्य माणसाला वाटतय असं जाणवतय. ह्या सगळ्यांत पंतप्रधानांनी दिलेलं भाषण जबाबदार तर वाटतच पण सकारात्मक आहे. अणुकरार हे एकच उद्दीष्ट नसून सरकार पुढे महागाई, चलनवाढ, गरीबी असे अनेक जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या दृष्टीने सरकारचे काम चालू आहे अशी ग्वाही त्यांनी दिलेय हे नक्कीच स्तुत्य आहे. सामान्य माणसाला खरा दिलासा मिळाला असेल तर ह्यातून. शिवाय अणुकरार झाला तर वीजनिर्मिती वाढून भारनियमन कमी होईल अशी रास्त आशा प्रत्येकाला आहेच. त्यामुळेच विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने काँग्रेसची प्रतिम उंचावलेय बघू आता ते शिबू सारेन सारख्या असंतुष्टांना कस शमवतात ते. ओमर अब्द्दुल्लांच भाषण सुद्धा सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण झाल्याच वाचलं, असं तरूण नेत्रुत्व काश्मीर कडून हवंच आहे भारताला.

मला आठवतं मी तिथे असताना, असे काही विषय समाजापुढे असले की अभ्यासपूर्ण विचार असलेल्या आणि नावजलेल्या व्यक्तिंना बोलावून व्याख्याने आयोजित केली जात असत. लोकमान्य व्याख्यनमाला, टोपीवाला व्याख्यानमाला, उद्यान व्याख्यानमाला, अमरहिंद व्याख्यानमाला ही काही नावे मला प्रकर्षाने आठवतात. ह्या श्रेष्ठ वक्त्यांचे विचार समजावून घेणे, भाषणानंतर त्यांना इतरांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर त्यांची उत्तरे ऐकणे हा एक अतिशय आनंददायी अनुभव असायचा. ह्यातूनच कुठेतरी विचारशक्ती वाढायला मदत होत असणार. आता अशा व्याख्यानमाला किती होतात आणि किती जण तिथे जातात हे माहित नाही पण तरटा च्या सतरंजीवर बसून, पिशवीत चपला ठेवून त्यावर बसून भर रस्त्यात शिवाजीराव भोसले, मिलिंद गाडगीळ, मुजफ्फ्रर हुसेन, बाळासाहेब ठाकरे, माधव गडकरी, कुमार केतकर, विजय तेंडुलकर, प्रमोद नवलकर, प्रमोद महाजन, बाबासाहेब पुरंदरे आणि कित्येक दिग्गजांची भाषणे ऐकतच आम्ही मोठे झालो. कदाचित अजूनही तिथे अशाच वैचारीक मैफीली रंगत असतील, पण ते दिवस आठवल्यावाचून राहिले नाहीत. मिलिंद गाडगीळ असते तर असं सुद्धा क्षणभर वाटून गेलं.
-------------------------------------------------------------------------------------

डॅलास डायरी
असो!.. गेल्या आठवड्यात इथे राहूल देशपांडे आला होता त्याची गाण्यांची सुरेल मैफल ऐकता आली. अगदी घरगुती स्वरुपाची अशी मैफल मला आणि कौमुदीला खूपच आवडते. त्याने आजोबांची नाट्यगीतं, भजनं गायलीच शिवाय फर्माईशी सुद्धा घेतल्या. एक तरूण कलाकार जो गाण अगदी पुढपर्यंत यशस्वीरीत्या नेउ शकतो त्याच्याशी छान संवाद साधता आला. दरवर्षी पुण्यात जानेवरी महिन्यात वसंतोत्सव सुरु केला आहे राहूल आणि त्याच्या चमूने. त्या दरम्यान भारतात असलं तर जरुर जमवायला हवं. सवाई गंधर्वानंतरचा तेथला हा अजून एक मोठा उत्सव. पुणेकरांची चंगळ आहे हेच खर..

दुसर्‍यादिवशी रविवारी आषाढी एकादशी निमित्त अमित केळकर ह्या स्थानिक कलाकाराचा भजनाचा उत्तम कार्यक्रम देवळात झाला आणि प्रसाद म्हणून अनल आपटेंनी केलेली साबुदाणा खिचडी, काकडीची कोशींबीर, चटणी, खीर तर अप्रतिम.

बरं, तर सद्ध्या हातात पुस्तक नाहीये पण इकडलं तिकडलं असं वाचन चाल्लय. काही लिंक्स --

हेमलकसाबद्दल माहितीपूर्ण लेख --
http://www.maayboli.com/node/2479

समतोल - विजय जाधव ९८९२९६११२४
http://loksatta.com/daily/20080614/ch06.htm

लेले..
http://www.maayboli.com/node/2550