आज जवळ जवळ तीन महिन्यांनी लिहितोय इथे. वेळ झाला नाही असंही नाही,पण नाही वाटलं..अगदी वेळ काढून काही लिहावं असं. उन्हाळा सुरू झाला इथे आणि प्रत्येक शनिवार रविवार कुठे ना कुठे लागलेले. खूप कार्यक्रम होते इथे काही महिने गेले. अजूनही चालू आहेत.
देवकी पंडितांची शास्त्रीय संगीताची मैफल सुरेल आणि सुरेख झाली. कौमुदी बरोबर असल्याने गाणं ऐकायचं कसं हे सुद्धा कळायला लागलय हळू हळू आता.
फयूजन ग्रुप तर्फे ह्यावेळी "सुपर ८" अशी क्रिकेटची साखळी स्पर्धा ठेवली होती. "डलास मावळाज" असं आमच्या मराठमोळ्या संघाचं नाव ठेवून आम्ही स्पर्धेत उतरलो. फारशी तयारी नव्हतीच. टेप लावलेल्या टेनिसच्या चेंडूवर आठ आठ षटकांचे सामने झाले. पस्तीस संघ उतरले होते स्पर्धेमध्ये. शनिवार आणि रविवार अश्या दोन दिवसात ही स्पर्धा झाली. बाहेर १०३ फॅ. तापमानामध्ये एका मागोमाग एक सामने खेळणे खरोखरच आव्हानात्मक होते. आमच्यातील काही चांगल्या फलंदाजांच्या जोरावर आम्ही उप्-उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचलो. एकूणच स्पर्धेचे आयोजन आणि स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. गिरगांवात निकद्वारी लेन मधे मला आठवतय ओपन बॉक्स्चे असे सामने व्हायचे पूर्वी, मी रात्री उशीरापर्यंत जागून बघत असे. एकदा तर प्रेक्षकांत असताना डोळ्याला चेंडू इतक्या जोरात लागला माझ्या की सरळ बाजूला जैन हॉस्पीटल मधे जायला लागलं होतं. अर्थात तरीही हे गल्ली क्रीकेट मी सोडलं नाहीच. तेथेच मग सचिन आला होता एक वर्ष बक्षीस वाटायला, मला वाटतं तेव्हा तो पंधरा वर्षाचा असेल, त्याच्या आंतरराष्टरीय कारकीर्दीला सुरुवात व्हायची असावी तेव्हा. त्यावेळी मी त्याची स्वाक्षरी घेतली होती ती अजून जपून ठेवलेय. ह्यावरूनच आठवलं ते १९८३ च्या विजयोत्सवाविषयी. मी पाच वर्षाचाच होतो, पण तेव्हा कपिल चा मोठ्ठा फोटो आणि त्या कपाच्या प्रतिमेसह गिरगाव रोड वर मिरवणूका निघाल्या होत्या ते आठवतय. मला तर स्पष्ट वाटतं की भारत काही करू शकतो आणि जगात ठसा उमटवू शकतो हे कपिलच्या संघाने जगाला पटवून दिलं. त्यातूनच कपिलदेव हा अगदी सामान्यातल्या सामान्याचा एक आदर्श बनला. जिद्द, लढाऊ बाणा ह्या गोष्टी कपिलच्या त्या वर्ल्डकपने भारतीयांना दिल्या. ध्येय ठेवा आणि त्या ध्येयासाठी चिवटपणे लढा हे कपिलने स्वत: लढून दाखवून दिलं. ह्यातूनच भारत जगात ठसा उमटवू शकतो असा आत्मविश्वास तरुण पिढीस मिळाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर क्रीकेटची लोकप्रियताही प्रचंड प्रमाणात वाढली भारतामध्ये, ते शास्त्रीला मिळालेल्या ऑडी मुळे आणि अर्थात चँपियन्स ऑफ दी चँपियस ह्या किताबामुळे! पुढे मग अझर आणि गांगुलीने संघास कित्येक वर्षे उपांत्य, अंतिम् फेरीत आणले ते ह्याच जिद्दीच्या जोरावर...
असो, तर गेल्या काही दिवसात वाचन सुद्धा चाल्लय थोडफार, अर्थात वेग मंदावलाय हे नक्की.सद्धया व. पुं. काळेंच "आपण सारे अर्जुन" वाचतोय. हे पुस्तक वाचनीय म्हणण्यापेक्षा मननीय आणि चिंतनीय आहे. आपलं रोजच आयुष्य म्हणजे अर्जुनाच युद्धभूमीवरच संभ्रमित मनच आहे हे व. पु. नी छान मांडलय. ज्यांना व. पुं. च लिखाण अपील करतं त्यांनी जरुर जरुर वाचवं असं हे पुस्तक. दरम्यान, पी. एम. पी. ही प्रॉजेक्ट मॅनेजमेंटची परि़क्षा उत्तीर्ण झालो. त्याचा अभास चालू होता दोन महीने. कुणाला त्यासंदर्भात कुठलेही मार्गदर्शन हवे असेल तर मदत करायला नक्कीच आवडेल.
गेल्याच आठवड्यात आम्ही इथून जवळच असलेल्या केनडी म्युझियमला भेट दिली. त्याला सिक्स फ्लोअर मयुझियम असं नाव दिलय आता. १९६३ च्या नोव्हेंबर मधे अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष केनडी ह्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ते हे ठिकाण. ह्या संग्रहालयात केनडींच्या जीवनप्रवासाची संपूर्ण माहिती तसेच हत्येच्या दिवशी व नंतर कसे आणि काय काय घडले ह्याची विस्तृत माहिती चित्रफिती तसच प्रतिकृतींद्वारा देण्यात आली आहे. ज्या खिडकीतून कथित मारेकर्याने गोळी झाडली ती खिडकी अजून जशीच्या तशी जपून ठेवण्यात आली आहे. केनडी हे त्यांच्या पत्नीसह लोकांना अभिवादन करत त्यांच्या उघडया छताच्या लिंकन गाडीतून पुढे जात असताना जेव्हा त्यांची गाडी ह्या इमारती जवळून पुढे सरकली तेव्हा तीन गोळ्या त्यांच्या दिशेने आल्या आणि त्यातल्या एका गोळीने त्यांचा वेध घेतला. दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाल्याचे घोषित झाले. साधारण दीड च्या सुमारास ओस्वाड ह्या युवकास संशयित म्हणून पकड्ण्यात आले. ह्याच इमारतीत सहाव्या मजल्यावर एक रायफल सापडली आणि ओस्वाड ह्या इमारतीत काम करत असून ही त्याची असल्याचे पोलिसांनी तपासात शोधले. अर्थात ओस्वाड ने हत्येशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. ह्या कटामधे नक्की कोण आहे ह्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडे होते आणि दोनच दिवसांनी जेव्हा ओस्वाड ह्यास पोलिसांनी हस्तांतरणासाठी आणले तेव्हा काही कळायच्या आतच एका व्यक्तीने ओस्वाड वर गोळ्या झाडल्या आणि त्यास तिथेच कंठस्नान घातले. त्यांनंतर मात्र एकूणच केनडी हत्येमागचे खरे सूत्रधार कोण हे कायम अंधारात राहिले. वॉरेन कमिशनने ओस्वाड हाच खरा खुनी असल्याचा अहवाल मांडला तरीही प्रत्यक्षात केनडींची हत्या मागून येणार्या गोळीने झाली नसून त्याच दरम्यान एक गोळी पुढून आली होती असे बरेच जणांचे म्हणणे आहे. आशर्याची गोष्ट अशी की अमेरीके सारख्या देशातही, देशातील सर्वोच्च व्यक्तीला मारुन सुद्धा हत्येमागचे सूत्रधार मिळत नाहीत. एकूणच लाडक्या नेत्याची हत्या आणि त्यामागचे गणित सोडवण्यात आलेले अपयश ही अमेरीकन नागरींकाची ओली जखम आहे असे जाणवते. शेवटी कुठल्याही नवीन निकालाप्रत न येता ही केस अमेरीकन शासनाने १९८८ मध्ये म्हणजे पंचवीस वर्षांनी बंद केली. संग्रहालयाचा विचार करता, ह्या सहाव्या मजल्यावर ती खिडकी आणि आजूबाजूची परिस्थिती अतिशय व्यवस्थित जपून ठेवलेय. काहीतरी माहितीपूर्ण पाहिल्याचं समाधान मिळत हे नक्की! मनात आलच की भारताने असे दोन तीन धक्के सहन केलेत. गांधीजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांच्या हत्येसंदर्भात पण अशीच संग्रहालये उभारली तर येणार्या पिढीस बरच काही समजू शकेल. नाहीतर इतिहासाच्या पुस्तकातल्या पानावरच्या सनावळ्या आणि परीक्षेला किती मार्क असतील ह्याला, ह्याशिवय त्यांना ह्या घटनांमध्येच काहीच स्वारस्य रहाणार नाही कदाचित.....
Thursday, June 26, 2008
Subscribe to:
Posts (Atom)