"पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. " - नंदन
स्वातीने टॆग केलं आणि नेमकं काय निवडावं ह्यासाठी द्वंद्वच नाही तर मनात युद्धधच सुरु झालं. सुनिताबाईंचं आहे मनोहर तरी, मुग्यांची रांग बघणारा म्याड लंपन, एक शून्य मी मधले परखड पु लं. , बारोमासमधला भुकेने कासावीस शेतकरी, एक एक पान गळावया, कृष्णकिनारा, चौघीजणी, बाबसाहेंबांनी जिवंत केलेला शिवराज्याभिषेक अगदी दासबोधातली मुर्खांची लक्षणे अशी कैक लिखाणे लगेचच डोळ्यासमोर आली. माझ्या भटक्या प्रवृत्तीमुळे आणि कामाच्या स्वरुपामुळे बरीचशी असंग्रह वृत्ती बळावल्याचं जाणवतय. त्यामुळे खूप पुस्तक, कॆसेटस घेउन फिरणं अशक्यच होतं. उतारा देण्यासाठी जवळच्या पुस्तकांपैकीच काहीतरी निवडणं गरजेच झालं, शिवाय ह्या पुस्तकाचं गारूड उतरलं नाहीये अजून! ह्या पुस्तकातला अजून एक उत्तारा लिहायचं केव्हापासून डोक्यात घोळतय ते स्वतंत्रपणे लिहीनच.
-------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातले दुर्ग आणि महाराष्ट्राबाहेरचे, यांत मनस्वी अंतर आहे - उंचीच्या दृष्टीनं, अवशेषांच्या दृष्टीनं. दिल्लीला लालकिल्ला पाहात हींडत होतो. दिल्लीलाच राहाणारा एक समानशील मित्र तो किल्ला दाखवायला मज बरोबर होता, किल्ला दाखवून झाल्यावर तो क्षण थांबून म्हणाला,
"दांडेकरजी, एक सवाल पूंछू?"
"जी हां, विना संकोचसे!"
"आप दुर्गभरे देशसे आ रहे है! यह हमारा किल्ला भी आपने देखा! क्या इनकी तुलना कर सकेंगे?"
"क्यों नही?"
"तब फिर शुरु किजिये!"
"पहले आपके इए किले के बारे मे बताउं! जैसा कोई अमीर हाथों मे चमेली की मालाए पहने, आंखोमे सुरमा लगाए, तकियेसे सटकर किसी तवायफ का मदभरा गाना सुनने बैठा हो - आपका यह किला वैसा सुहावना है!"
प्रसन्न होऊन तो म्हणाला,
"क्या कही, दांडेकरजी! वाकई आप उपन्यासकार है! ही अब इसके साथ आपके किलोंके बारे मे ---"
"अजी जाने दिजीये! मेरे देशके किलोंकी तुलना इस लाल किलेके साथ नही की जा सकती!"
"भई क्यो?"
"सारे बदनमे अरंडी का तेल लगाये कोई दो तगडे मल्ल हाथमे वज्रमुष्टी लिये एक एकेक साथ झूंज रहे हो, सारा बदन लहुलूहान हो गया हो, मेरे देश के गिरीदुर्ग देखनेपर इस दृश्य का स्मरण होता है!"
उत्तरेतले बहुतेक सगळे किल्ले -- त्यातील अवशेषांवर दुर्लक्षांमुळं काळाची पावलं उमटली, ती वगळता अजून जसेच्या तसे आहेत. त्यातले कक्ष, अट्टालिका, प्रासाद, गुसलखाने, दीवान-इ-आम, दीवान-इ-खास, कारंजी, इमामखाने - सगळं सगळं अजून दाखवता येतं. आमच्या गिरिदुर्गांची मूळ बांधणीच काळ्या कुळकळीत दगडांची. उपयुक्ततेकडे लक्ष अधिक, सौंदर्याकडे कमी. त्यांत आद्न्यापत्रामध्ये मुद्दाम आदेशच देवून ठेवला आहे.
---गडाची इमारत गरजेची करू नये. गडावरी राजमंदिराविरहीत थोर इमारतीचे घर बांधो नये.
कारण कुणालाही कळू शकतं. सगळा बेभरवशाचा काळ. केव्हा किल्ला शत्रूच्या हाती जाईल, त्याचा भरवसा नाही. तेव्हा विनाकारण खर्च करून महाल उठविले, अन उद्या ते शत्रूनं जिंकून घेतले, म्हणजे?
एकतर बहुतेक सगळ्या इमारती गरजेपुरत्याच बांधलेल्या. कुण्या इंग्रज वकिलानं शिवकाळी रायगड पाहिल्यावर लिहून ठेवलं आहे, की गडावरील घरं राजवाडा वगळता सुमार बांधणीची, केवळ छपरीच आहेत.
- आणि त्यात लढायांमधून झालेला विध्वंस! मुख्यतः सन अठराशे अठरा मध्ये इंग्रज - मराठे यांचं तुंबळ युद्ध झालं. मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रजी तोफखान्याची तुकडी तोफांच्या भडीमाराने सगळे किल्ले उद्ध्वस्त करत महाराष्ट्रभर हिंडत होती. एक इमारत काही त्यांनी धड राहून दिली नाही.
या किल्ल्यांच्या आंग्रेजी तोफांच्या महिन्याभराच्या काही तारखा अन त्या भडिमाराचे नायक सांगतो :
पांडवगड : एप्रिल १८१८, मेजर थॆकर
केंजळगड : २६ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
वसंतगड : १३ मे १८१८१, मनरो
जीवधन : ३ मे १८१८, मेजर एलड्रिज
चाकण : २५ फेब्रुवारी १८१८, लेफ्टनंट कर्नल डिफन
विसापूर : ४ मार्च १८१८, जनरल प्रॊथर
सिंहगड : २ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
रायगड : १० मे १८१८, मेजर प्रॊथर
येणेप्रमाणे मराठ्यांच्या किल्ल्यांची अक्षरशः धूळधाण झाली! सिंहगडाच्या भवताली कुण्या टेपावर किती
पाउंडी तोफा रोवल्या होत्या आणि त्यांचे गोळे कुठं पडणार होते, याचं मानचित्र त्यावेळी कुण्या इंग्रज इंजिनिय्रनं काढलं होतं त्याची प्रतच मजपाशी आहे!
उत्तरेत मात्र हे झालं नाही. बहुधा सगळ्या किल्ल्यांचे तट, बुरुज, दरवाजे, आतील इमारती हे जसच्या तसं आहे. काय त्यावर काळाची पावलं उठली असतील तेवढीच!
पुस्तक: दुर्गभ्रमणगाथा
लेखक: गोपाळ नीलकठण दांडेकर
प्रकाशन: मॆजेस्टीक, गिरगांव
-------------------------------------------------------------------------------------
खालील व्यक्तींना खो देईन म्हणतो :
मृदुला गोरे
रचना बर्वे
तात्या अभ्यंकर
जयश्री अंबास्कर
टॆगिंगचा दुहेरी उद्देश असा की, ह्यातून ब्लॊगर्सना लिहीण्यासाठी नवी उभारी मिळेल आणि आपण काय वाचतोय, काय आवडतय ह्याची ओळख करून देण्याची, ह्या ह्रुद्यीचे त्या ह्रुद्यी घालण्याची संधीही!
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते...
Monday, October 8, 2007
Subscribe to:
Posts (Atom)