Sunday, April 1, 2007

आयुष्यावर बोलू काही..

नमस्कार,
बर्याच कालावधीनंतर आज थोडावॆळ काढता आला इथे लिहायला, कधी कधी माझ्यासारखाच हा ब्लॊग अनियमित होतोय इतकचं. शिवाय भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव आणि मुख्य म्हणजे त्यांचा निरुत्साही, आत्मविश्वासशून्य खेळ ह्यातून आलेली अगतिकता आणि संताप ह्यामुळे काही लिहायचा मूडच नव्हता. आता पुन्हा चार वर्षे वाट बघणे आणि मग त्याच भोळ्या आशा आणि हम होंगे कामयाब म्हणून जोशपूर्ण आवाज हे ही आलंच. आशा अमर आहे, मरतोय तो आपल्या टीमचा उत्साह आणि हो बॊब.. असो!

वर्षानुवर्षे आपण वाट पाहूनही एखादी गोष्ट होत नाही आणि आपल्या आयुष्याला वळण देणारी घट्ना काहीशी अनपेक्षितरीत्या अगदी थोड्यावेळात घडते हे जवळजवळ प्रत्येकानेच कमी अधिक प्रमाणात अनुभवले असेल. तर ह्यावेळच्या भारतवारीत जरी कामासाठीच गेलॊ होतो तरी काही योग इतके छान जुळून आले की विचारता सोय नाही. बरं तर सांगायचं हे की दिनांक १८ मार्च २००७ रोजी माझ्या निघण्याचा दिवशी सकाळी माझा आणि यशश्रीचा (यशश्री काळे, रा. दादर) साखरपुडा झाला. :-)

साखरपुड्याचे फोटो इथे ठेवले आहेत : http://photos.yahoo.com/upasanip

काही दिवसांपूर्वी मायबोलीवर वैभव जोशी ह्यांच्या पुढाकाराने गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बरंच काही शिकायला मिळालं त्याद्वारे. "त्रुतू येत होते त्रुतू जात होते' ह्या ओळीने सुरुवात करून भुजंगप्रयात वृत्तात 'लगागा लगागा लगागा लगागा' (समर्थांनी मनाचे श्लोक ह्या वृत्तात लिहिले आहेत.) ह्या मात्रांमधे गझल लिहिण्याचे आव्हान करण्यात आले होते. मी हया ओळीकडे तीन अतिशय भिन्न दृष्टींनी बघून विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला सखेद नमूद करावेसे वाटते की व्यक्तीशः मला ह्यातील एकही गझल अपील झालेली नाही. एकाही गझलेत हवी तशी खोली मला मिळालेली नाही. ह्यापेक्षा खूप चांगलं लिहिता आलं असतं असं वाटत राहतेय. तरीही, वैभवने केलेल्या काही सूचनांचा स्वीकार करून व्याकरणदृष्ट्या त्यातल्या त्यात निर्दोष गझल इथे ठेवतोय.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
१. ती..
त्रुतू येत हॊते त्रुतू जात होते
प्रियेला कसे ते कुठे द्न्यात होते?

तिच्या नेत्रपंक्ती खुणावीत आम्हा
मुखे पाखरू इष्क पाशात होते..

तिला काय ठावे मनाच्या व्यथा ह्या
तिचे भास प्रत्येक श्वासात होते..

प्रियेच्या कटाक्षात घायाळ आम्ही
धिटाई नुरे ठेच ह्रुद्यात होते

कितीही जरी मी तिचा हट्ट केला
न ठावे कुणा काय दैवात होते..

खुळ्या त्या दिवाण्या पतंगाप्रमाणे
कधी प्रेम साफल्य त्यागात होते!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

२.स्वार्थी
त्रुतू येत हॊते त्रुतू जात होते
धुके दाट स्वार्थांध डोळ्यात होते

गुरे माणसे ही सुनामीत जाती
अहोरात्र कामी किती हात होते?

मलाही हवी तूपरोटी पुढ्यासी
गळफास कोण्या नशीबात होते

मनाच्या कवाडांस जाळीत जाती
असे हाय कार्पार धर्मात होते

कुण्या राखण्या कारणे देह सांडी
तयाशी कुठे बंध रक्त्तात होते?

अहो काय त्याचे कुणी का मरेना
मला फक्त स्वारस्य रोख्यात होते!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

३. भज गोविंदं..
त्रुतू येत हॊते त्रुतू जात होते
तुझे लक्ष्य सारे विषयात होते

तुला मानवाचा जरी जन्म आला
प्रभू नाम ओठी न ह्रुद्यात होते

तुझे बाल्य तारुण्य संसारतापी
हरीच्या जपावीण रंगात होते

तरीही सदा आठवी रामराया
जरी कापरे हातपायात होते

करी मानसी प्रार्थना राघवाची
तयाच्या प्रसादे क्षुधाशांत होते

असे साधु बैराग मोक्षास गेले
अखंडीत देवास जे गात होते!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

वेळेची गुंतवणूक आता फ्यामिली पातळीवर जास्त होणार असली तरी इथे नियमितपणे लिहीण्याचा मनापासून प्रयत्न राहील.

पु.ल. नी भाच्यास लिहिलेले पत्र सगळ्यांनी वाचलेले असेल, त्यालाच अनुसरून लग्न झालेल्याच काय पण लग्न ठरलेल्या व्यक्तीचा (बहुमोल) वेळ (अर्थात केळवणाव्यतिरीक्त) घेता कामा नये हे सूद्न्यांनी ओळखले असेलच! :-)