Sunday, December 31, 2006

माझा ब्लॊग आणि मी..

नमस्कार,

तुमचं माझ्या ब्लॊगवर मनापासून स्वागत!

कित्येक दिवसांपासून जे मनात होतं ते आज मार्गी लागलं म्हणून बरं वाटतय हे नक्की. असो!
तर माझ्या ब्लॊगविषयी थोडंसं... 'आमचा बाप आणि आम्ही' ह्या जाधवांच्या चालीवर माझा 'ब्लॊग आणि मी' हे प्रकरण लिहिताना मला आज विशेष आनंद होतोय. दुसरं असं की मावळत्या वर्षाच्या मावळत्या सायंकाळी असं नविन काही करताना वेगळं वाटतय. म्हटलं लोक नविन वर्षाचा(चे) अल्पकालीन संकल्प करतात पण आपण ह्या संकल्पाला तरी असं काळात बांधायल नको. दुसरं म्हणजे 'थ्रर्टी फ़र्स्ट' नंतर 'थस्र्टी फ़स्ट' उजाडे पर्यंत माझा ब्लॊग वर्षाने जुना झाला असेल :-)

असो, तर मी इथे काय करणार आहे? एका शब्दात पटकन सांगायचं तर "गप्पा", मारणार आहे, ठोकणार आहे काहीही म्हणा. ब्लॊग लिहावसं वाटण्यामागे ज्या गोष्टी आहेत त्यात माझ्या बोलक्या स्वभावाची भूक भागवत, विचारांना वाट करुन देण्याचा माझा प्रयत्न राहील इथे. तसेच विषयानुरुप इंग्रजी मध्ये सुद्धा लिहिन म्हणतो. आता थोडंसं विश्लेषण ब्लॊगच्या नावाविषयी. उपास हे नाव पडलं शाळेत असल्यापासून आणि मग ते मी ही उचलून धरलं. "उपास, मार आणि उपासमार" ह्या "रोटी, कपडा मकान" छाप नावात बरंच काही आहे. प्रत्येक विषयावर माझं म्हणंण येथे मी मांडणार असल्याने उपास थोडाफार डोकावणारच लिहिताना. त्याचबरोबर हाच उपास शब्द सुचवतो शरीरावर आणि मनावर ताबा मिळवण्याचा एक मार्ग, त्यामुळे कधी कधी अध्यात्म येईलच विषयानुरुप. नाथांनी सांगितलेल्या नाठाळाचे माथी हाणू काठी प्रमाणे अपप्रवृत्ती, कालबाह्य रीती, समाज आणि मानवी प्रगती आड येणार्या संतापजनक कृत्यांवर वेळोवेळी (अर्थात माझ्या कुवतीचे भान ठेवून) समिक्षा करण्याचा माझा प्रयत्न राहील. शेवटी उपासमार ह्या विषयाद्वारे समाजातील शोषित, पिडीत आणि मागासलेल्या समुदायाच्या दुःखांना समजून घेणे, वाचा फॊडणे आणि आपल्यापरीने आपण सामाजिक जबाबदारी कशी पार पाडु शकतो ह्याचा विचार करण्याचा माझा नियमित प्रयत्न राहील. उपासमार हा शब्द माझ्या ब्लॊगच्या नावात ठेवण्याचा उद्देश हाच की मी कुठेही असलो तरी जगातल्या (मग त्यात महाराष्ट्रातला शेतकरीही आला!) उपेक्षितांची मला कायम आठवण राहावी.
बरं आणि जन्मभूमिश्च स्वर्गादsपि गरीयसी, त्यामुळे माझ्या लाडक्या मुंबईचा आणि गिरगावचा उल्लेख येत राहिलच.

असो, तूर्त इतकेच, महिन्याकाठी किमान दोनदा लिहिण्याचा प्रयत्न असेल. शेवटी असा मी असामीतल्या धोंडोंपंतांनी म्हटलेल्या आर्येच्या चालीवर म्हणावेसे वाटते, "असतीलही किती अत्युच्च ब्लॊग लिहिणारे, पण म्हणून ह्या उपासाने ब्लॊग लिहू नयेचि काय!!!" :-)

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! २००७ सगळ्यांना सुखाचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे जावो!