Saturday, March 8, 2008

आपले खरेखुरे आयडॊल्स..

आयुष्याला उधळीत जावे, केवळ दुसयापायी
या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे....

आजकालच्या जगात अशी समर्पित जीवनशैली असलेली माणसे विरळीच. पण तरीही आपल्याला आजूबाजूला अशी काही माणसं दिसतात की त्यांच कर्तुत्व समाज, देश, मानवता अशा कुठल्याना कुठल्या पातळीवर अतुलनीय कामगिरी करतं, इतकं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यातून स्फूर्ती, दिशा तर मिळू शकतेच पण अजूनही ध्येयवादी माणसं आपल्यात आहेत आणि आपणही मनात आणलं तर बरच काही करू शकतो, असा दिलासा त्यांच्याकार्याकडे बघता सहज मिळू शकतो. आज मी अशाच काही मला आवडलेल्या महाराष्ट्रातील आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीबद्दल थोडं लिहिणार आहे, संदर्भ आहे नुकतंच वाचलेलं युनिक फीचर्सचं ’खरेखुरे आयडॊल’ आणि हो, अत्यंत घाईगडबडीत असूनही मला हे पुस्तक आवर्जून भेट देणार्या सौ. शर्मिला फडके यांचे विशेष आभार.
आयडॊल, हा शब्द गेल्या काही वर्षात कानावर पडू लागला तो म्हणजे इंडीयन आयडॊल सारख्या टॆलंट सर्चला वाहिलेल्या कार्यक्रमांच्या भडीमारामुळे. माझ्या नेहमी मनात यायचं, की इथे लहान वयातले गायक मेहनतीने पुढे येतात आणि विख्यात गायकांनी गायलेली गाणी अतिशय मेहनतीने आणि प्रचंड व्यावसायिक स्पर्धेत सादर करतात. त्यांच्या स्पर्धात्मक आणि गुणात्मक मूल्याविषयी दष्टीकोन वेगळा पण त्यांना आयडॊल म्हणून संबोधणं मला तरी खटकलच. लताचं गाणं किंवा मुकेशच गाणं, जगजीतची गझल एखादा कलाकार छान गात असू शकेलही पण शेवटी त्यात कलाकारच स्वतःचं काही नवीन असंण्याला जास्त वाव नाहीच, म्हणजे केवळ अनुकरणात्मक गुणमूल्यांवर कोणाला ’आदर्श’ कसं म्हणाव? नेमका हाच सूर मला खरेखुरे आयडॊल्सच्या प्रस्तावनेत सापडला आणि तेथूनच त्या पुस्तकाच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली. आपण जे शोधत होतो ते हेच असं पहाता क्षणी वाटून गेलं.

आपल्या आधीच्या पिढीत खरेच ध्य्वेयवादी लोक होवून गेले, दुर्देवाने आपली पिढी तितकी संस्कारक्षमही राहिल्याचे वाटत नाही आणि मुख्य म्हणजे कोणाच्या पावलावर पाउल टाकाव, घर संसार ओवाळून टाकावा असा एकही विचारवंत, नेता राजकारणात किंवा समाजकारणात तळ्पताना दिसत नाही. ऐंशी ते पन्नासवर्षांपूर्वी स्वातंत्र्य आणि मग सुराज्य ह्या प्रेरणेने झपाटलेले अनेक नेते आपल्या देशाला मिळाले. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर काही जणानी गांधीवादाचे अनुकरण केले तर काही जणांनी आंबेड्करांचे. काही जण स्वातंत्र्यवीर तात्यारांवांच्या हिंदुत्ववादी तर काहीजण कॊ. डांगेंसारख्या समाजवादी विचारधारेत ओढले गेले. ह्या प्रत्येक नेत्याची अशी स्वतंत्र शैली, विचारधारा आणि व्यक्तीमत्वाची धार होती की त्यांच्या कर्तुत्वाकडे सहजच आकर्षले जाऊन सामान्य माणसांचे आदर्शस्थान ह्या व्यक्तीना आपोआपच मिळाले. दुसरे म्हणजे एखाद्या विचाराचे, सुधारणेचे चळवळीत रुपांतर करण्याचे महनीय काम ह्यांनी करून दाखवले म्हणून ते आयडॊल. आता असे आयडॊल होऊ न शकण्याची दोन कारण म्हणजे एखाद्या विचारधारेला सर्वसमावेशक बनवून त्याला बहुजनसमाजाचा पाठींबा मिळण्याइतपत आणि चळवळ उभारण्याइतपत कसलेलं नेतृत्व हल्ली बघायलाच मिळत नाही. दुसरं त्याहून अधिक महत्त्वाच म्हणजे सुशिक्षित पांढरपेशा वर्गात आलेली कमालीची सामाजिक अनासक्ती. मी, माझं आणि मला ह्यापलिकडे विचारशक्तीचा अभाव. खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा ह्या वर्गाला बर्याच प्रमाणात झाल्याने वाढलेले उत्पन्न, चैनीच्या बदलत्या सवयी, परदेशातील संधी, जागतिक स्तरावर विस्तारलेल्या दृष्टीबरोबर आलेला निकटदृष्टीता दोष, जास्त पैसा मिळवायचा हे एकच ध्येय आणि ते करताना हरपलेलं सामजिक भान, आनंद आणि मनोरंजनांच्या कल्पनांच बदलतं स्वरूप तसंच एकंदरच ’आहे रे’ आणि ’नाही रे’ वर्गात पडत चाल्लेल अंतर. व्यक्तीचा आर्थिक विकास होतोय पण त्यांमागे मूल्य नसतील तर समाजाचा, राष्ट्राचा विकास होणार नाही. एका गटाचा उत्कर्ष होत राहून दुसर्या गटाची मात्र फरफट होत राहील. शिवाय राजकीय अनभिद्न्यता, त्यातल्या वाईट गोष्टी बदलता येणार नाहीत असा चुकीचा अनुग्रह तसेच आपण काही चांगलं करू शकू ह्या आत्मविशासाच अभाव आणि मुख्यत्वे काहीतरी करायला हवं अशा अस्वस्थेचा अभाव त्यामुळे ह्या समाजाच मन दगड होतय. शेतकर्यांच्या आत्महत्या, कुपोषणाचे बळी ह्यातून ही वाढत असलेली दरी जाणवते आहेच. हे चित्र विदारक आहेच, पण मूठभर का होईना काही लोक तन मन धन अर्पून दिवसरात्र झटत आहेत, थोडेसे प्रकाशकिरण नक्कीच आहेत बोगद्याच्या शेवटी!


वैयक्तीक आणि मर्यादित स्वरुपातील सामाजिक पातळीवर असे काम करत असलेल्या बर्याच व्यक्तीची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख हे पुस्तक वाचताना झाली. ह्यातली बहुतेक नावं पेपर मधून किंवा टी. व्हीवर आपण बरेचदा पहातो, पण ह्या पुस्तकातून त्यांच्या जास्त जवळ जायला नक्कीच मदत होईल. अवचटांच कार्यरत वाचताना अशा अनेक व्यक्ती आपल्यलाला भेटल्या अगदी तशाच. श्री. सुहास कुलकर्णी यांनी पुस्तकाची प्रस्तावना इतकी समतोल आणि अचूक लिहिलेय की सगळेच मुद्दे तंतोतंत पटतात आणि विचार करायलाही भाग पाडतात.
पुस्तकाचा उद्देश विषद करताना लेखक म्हणतो, की नाचगाणी करून मनोरंजन करणायांना डोक्यावर घेण्यापेक्षा तळाच्या माणसांसाठी जे लोक काम करत आहेत त्या खयाखुया व्यक्तींकडे लक्ष देणे आज आवश्यक आहे. ’खरेखुरे’ आयडॊल्स कुणी असतील तर हे लोक आहेत. मला स्वतःला तरी हे पटलय.

कुणी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटतय तर कुणी संशोधन करून शेती उत्पन्न वाढवायला मदत करतय. कुणी रोंगांवर उपाय शोधून गोरगरीवांच्या आरोग्याची काळजी घेतय तर कुणी नियोजन आणि निधी यांची योग्य सांगड घालून प्रशासकीय व्यवस्थेवर ठसा उमटवत आहे. कुणी गावपातळीवर काम करताहेत तर कुणी राज्यपातळीवर तर काहींच्या कामाची जागतिक दखल घेतली जातेय. ही प्रत्येक व्यक्ती तुमच्या आमच्यासारख्याच परिस्थितीत वाढली असून संघर्षातूनच वर आली आहे.
हे सगळं इथे विषद करण्याचा उद्देश इतकाच, की ह्या काम करणाया व्यकींच्या प्रती आपण कृतद्न्य राहायला हवच शिवाय जमेल तसा त्यांच्या सामाजिक कार्याला हातभारसुद्धा लावता आला तर उत्तमच!

पुस्तकातल्या सगळ्या आयडॊल्सची नावं लिहून त्यांच्या कामाची एका वाकयात ओळख करून देतोय. त्यांचे पत्ते पुस्तकात दिले आहेत, कोणाला हवे असतील तर मी जरूर देईन.

१. डॊ. अभय आणि डॊ. राणी बंग - गडचिरोलीतील शोधग्राम, वैद्यकीय संशोधनाचा आदिवासींना फायदा. बालमृत्यूंचा अभ्यास व उपाययोजना. आरोग्यदूत प्रशिक्षण कार्यक्रम.

२. डॊ. आनंद कर्वे - हाडाचे संशोधक, शेतकी शास्त्रद्न्य, ग्रामीण विकासासाठी कार्यरत ’आरती’ (ऎप्रोप्रिएट रुरल टेक्नॊलॊजी इन्स्टीट्यूट) संस्थेचे सर्वेसर्वा.

३. डॊ. विकास आमटे - आनंदवनातलं पुढचं पाऊल, नियोजन आणि संवर्धन.

४. डॊ. हिंमतराव बावस्कर - जागतिक मान्यताप्राप्त विंचूदंशावरील संशोधन. हजारॊ विंचू दंश रुग्णांचा प्राणदाता.

५. मेधा पाटकर - नर्मदा बचाव आंदोलन, धरणांमुळे विस्थापित भूमीपुत्रांच्या प्रश्नाला वाचा आणि सामाजिक न्यायासाठी शासनावर दबाव. कुशल संघटक.

६. अण्णा हजारे - राळेगणसिद्धी आदर्श गाव. माहितीचा हक्क मिळवण्यासाठी सामजिक जन आंदोलन. त्यातील उणीवा दूर करण्यासाठी सत्याग्रह, उपोषण यांद्वारे सरकारवर दबाव.

७. डॊ. शशिकांत अहंकारी - हेल्थ ऎंड ऒटॊ लर्निंग ओर्गनायझेशन (हॆलो). मराठवाड्याच्या दुष्काळी भागात भरीव कार्य.

८. नसिमा हुरजूक - स्वतःच्या अपंगत्वावर मात करीत लाखो अपंगांसाठी भरीव सामाजिक कार्य, ’दिलासा’ हा मतिमंद मुलांसाठी निवासी प्रकल्प, ’स्वप्ननगरी’ हे अपंगांसाठी पुनर्वसन केंद्र. ’चाकाची खुर्ची’ हे त्यांनी लिहिलेंलं पुस्तक खूप यशस्वी. आजपर्यंत जवळजवळ ३२ पुरस्कारांनी सन्मानित.

९. सुरेश खोपडे - आय पी एस कॆडरमधील ज्येष्ठ पोलिस अधिकारी. समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन शास्राने अनेक जटील प्रकरणांची उकल आणि पोलिसदलात आमुलाग्र बदल. समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यावर भर. मोहल्ला कमिटी योजना आणि दंगलीवर प्रभावी उपाययोजना.

१०. सी. ए. जामगडे - गरीब आणि पिडित वर्गाला महिला बचत गटांद्वारे क्रांतिकारी मदत. प्रचंड जनसंपर्क. सूक्श्म त्रृण विभागाचे स्टेट बॆंकेचे प्रबंधक.

११. डॊ. नरेंद्र दाभोळकर- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नाजूक सामाजिक विषयांवर चर्चा, संघर्ष, आंदोलन ह्यांद्वारे जनजागृती.

१२. मनिषा म्हैसकर - रोजगार हमी योजना आणि जलसंवर्धनाची सांगड घालून दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात मोलाचं कार्य. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य यांची मोट बांधून अनेक अडचणींवर मात. कुशल प्रशास्कीय अधिकारी म्हणून कर्तुत्वाचा ठसा.

१३. वसंतराव टाकळकर - वनीकरण, जलसंवर्धन क्षेत्रांत अतुलनिय कामगिरी. माथा ते पायथा ह्या धोरणाच अवलंब करून पाणी अडवा, पाणी जिरवा ह्या सूत्रानुसार अनेक सलग समतल चर बांधण्यात आणि सुमारे पाच कोटी झाडे लावण्यात यश.

१४. डॊ. भारत पाटणकर - चळवळींद्वारे शेतकर्यांना समान पाणी वाटप मिळावे ह्यांसाठी प्रयत्न. शासनावर पाणी वाटपाच्या पुनर्नियोजनासाठी दबाव. धरणग्रस्तांच पुनर्वसन करण्यासाठी उभारलेल्या चळवळीच नेतृत्व.

१५. डॊ. माधव चव्हाण - मुंबईतील गरीब वस्त्यातं बालवाड्या सुरु करून ’प्रथम’ संस्थेद्वारे वस्तीतल्याच दहावी-बारावी शिकलेल्या मुलीस प्रशिक्षण देऊन शिक्षक बनवण्यास प्रोत्साहन. केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न रहाता, निधी मिळवण्यासाठी उद्योजक आणि आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मदतीचा ओघ मिळवण्याचं कसब.

१६. गणपतराव पाटील - कोंडिग्रे ग्रामपंचायत, परदेशापर्यंत किर्ती पोहोचलेल्या श्रीवर्धन ग्रीन हाउसचेसचे सर्वेसर्वा. प्रयोगशील, जागतिक आणि व्यावसायिक दृष्टीकोन असलेले शेतकरी. शेतीनिष्ठ शेतकरी, विद्न्याननिष्ठ शेतकरी, कृषिसम्राट पुरस्कारांनी सन्मानित. ७०% गुलाबांची परदेशात निर्यात. इंटरनेटद्वारा विक्री करणारा शेतकरी.

१७. आमदार नरसय्या आडाम - आडाम मास्तरांचा सोलापूरात दीड कोटी विडी कामगारांसाठी लढा. त्यांना हक्काच संकुल मिळवून देण्याचं मोलाचं काम. यंत्रमाग कामगारांसाठी दिलेल्या लढ्यात उल्लेखनीय कामगिरी. कार्यकुशल जनसेवक आणि लोकप्रतिनिधी.

१८.आमदार राजू शेट्टी - बड्या साखरसम्राटांविरुदध शेतकयांच्या न्याय्य संघर्षाचे नेतृत्व. जिगरबाज प्रवृत्ती आणि जनजागरणाद्वारे लोकांच्या मनात आपुलकीचे स्थान.

१९. पॊपटराव पवार - हिवरे बाजार गावाचे सरपंच. आदर्श गाव योजनेद्वारा हिवरे बाजारचा कायापालट. नशाबंदी, चराईबंदी, कुर्हाडबंदी, नसबंदी आणि श्रमदान ह्या सूत्राचा अवलंब. पाणलोट विकास कार्यक्रम आणि सुनियोजनाद्वारे झालेल्या हिवरे बाजाराच्या ग्रामविकासाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल.

२०. चंद्रकांत पाठक - अपारंपारिक उर्जा स्रोत आणि त्याचा शेतीसाठी वापर करण्यासंबंधी मोलाचं संशोधन. नवनवीन उपकरणांचा शोध लावून शेतीसाठी आधुनिक उर्जाय़ंत्राची निर्मिती.

२१.अशोक बंग - स्वावलंबी शेतीचा प्रयोग विकसित करण्यात मोलाचे योगदान. संशोधन आणि वैद्न्यानिक शेती करतानाच शेतकर्यांना पाण्याचे नियोजन आणि शास्त्रीय मार्गदर्शना करण्यात यशस्वी भूमिका.

२२. तीस्ता सेटलवाड - मुंबई दंगल, श्रीकॄष्ण आयोग, गुजराथ दंगल केसेस, झहिरा प्रकरण ह्यांसारख्या विषयांत जनजागरण. निर्भिड पत्रकार.

२३. उल्का महाजन - रायगड जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींसाठी मोलाचे कार्य. सर्वहारा संघटेनेद्वारे कातकर्यांच्या दळी जमिनिच्या प्रश्नाची शासनदरबारी सोडवणूक. दारुबंदी, शिक्षण, आरोग्य यांविषयी कातकर्यांमध्ये जाणीव जागृती.

२४. अविनाश पोळ - ग्रामीण भागात शेतकीविषयक सुधारणा राबवून गाव तन मन धनाने एकत्र ठेवून आदर्श बनवण्यात यश. निर्मल ग्राम पुरस्काराने साताया जिल्ह्यातील त्यांची गावे राष्ट्रपतींद्वारा सन्मानित.

२५. डॊ. बी. आर. बारवाले - संकरीत बियांणांवर यशस्वी संशोधन. कपाशीच वाण निर्माण करणारया सर्वात मोठ्या कंपनीच महिकोचं नाव आंतरराष्ट्रिय स्तरावर पोहोचवण्यात मोलाच योगदान.

No comments: