Tuesday, February 26, 2008

भारतीय रेल्वे - राष्ट्राची जीवनरेखा..

लालू महाराज की जय!

लालूप्रसाद यादवांनी आपल्याभोवती नेहमीच एक प्रसिद्धीचं वलय ठेवण्यात यश मिळवलय. मुरब्बी राजकारणी आहेतच पण संधीचा फायदा कसा करून घ्यायचा आणि मॆनेजमेंटच्या बरोबरीने मार्केटींग सुद्धा कसं करायचं, स्वतःचा वेगळा ब्रॆंड तयार करून तो कसा पसरवायचा ह्याचं कसब त्यांच्याकडे आहे हे मान्य करावंच लागेल.

भारतीय रेल्वे हा एक मोठ्ठा हत्तीचं. लालूने Elephants can dance!! हे दाखवून दिलय. त्यानी मांडलेल्या ह्या पाचव्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणालाही तक्रारीला जागा ठेवलेली नाही. दरवेळेस भारतात मी तीन आठ्वड्याच्या सुट्टीवर गेलो तरी रेल्वेचा पास हटकून काढतो. गर्दी वाढतेय, अगदी अंगावर येण्याइतकी वाढतेय दरवर्षी हे जाणवतं पण रेल्वेचा मोह काही सुटतं नाही. गेल्यावेळी तर मी Office time मध्ये कित्येक वेळा सकाळ संध्याकाळ प्रवास केलाय रेल्वेने, गिरगांव बोरीवली असा. कारण Office time मधे तुम्ही रस्त्याने म्हणजे बस किंवा टॆक्सीने जायचा विचार केलात तरी दोन अडीच ताशांची गच्छंती आणि वाढणारं मीटर आणि भाडं ते वेगळच. शिवाय कार पुलिंग करणारे कमीच त्यामुळे प्रदुषणात भर, वाहतुकीत भर. ह्या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे उपनगरीय रेल्वे. वेळेची बचत, इंधनाची बचत, पैशांची बचत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे हया मुंबईच्या रक्तवाहीन्या झाल्यात, लाखो कामगार आज केवळ तिच्याच सहाय्याने मीठ भाकर कमवत आहेत. मुंबईकरांच्या जीवनात म्हणूनच रेल्वेला अनन्य साधारण महत्त्व आहे. हजारो चाकरमान्यांसारखाच मी ही मग सवयीप्रमाणे दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसतो, उत्सुकता असते की पासाचे दर किती वाढले, तिकीटांचे किती वाढले आणि काही नवीन सुविधा आहेत का? बोरीवली विरार मार्गाचं चौपदरीकरण तर वर्षानुवर्ष अडकून पडलं होतं, तर काही वेगळे प्रकल्प धसास लागत आहेत का?

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, रेल्वे केवळ नफ्यातच आणून न थांबता, लालू साहेबांनी २0२५ पर्यंत रेल्वेला कुठे न्यायचय ह्याचा चक्क आराखडाच मांडलाय. सगळ्याच थरातून रेल्वेच्या अर्थसंकल्पाच स्वागत गेले चार वर्ष होतय. हे होणं शक्य नाही असं म्हणणार्या भल्या भल्या मॆनेजमेंट गुरुंना लालूने विचार करायला भाग पाडलय. मालवाहातुकीतून जबरदस्त उत्पन्न वाढवून प्रवासी वाहतूकीवर ज्याचा सामान्य माणसावर सरळ परिणाम होतो, सुविधांचा वर्षाव केलाय. सामान्य प्रवासी डोळ्यासमोर ठेवून हे बजेट बनवल जातय असं लालू म्हणत आहेत ते खरं वाटतय.

आठवतय की कॊलेज मधे असताना एक फॊर्म भरून घ्यायचो रजिस्टारकडून आणि मग तो रेल्वेचा पास काढताना द्यायचो. विद्यार्थ्यांना अर्ध्या दरात पास मिळतो. ह्यावर्षी तर मुलांना १२ वी पर्यंत तर मुलींना पदवीपर्यंत फुकट पास देण्याची योजना मांडलेली बघून कौतुक वाटलं. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे. अजून एक आवडलेली बाब म्हणजे हाय टेक लालू. चर्चगेट किंवा सी.एस.टी. येथे ठेवलेल्या मशीन मधून लांब पल्ल्याच्या गाड्य़ांची टीकीट अगदी सामान्य माणसाला विनासायास काढताना, तंत्रद्न्यानाचा अगदी निम्नस्तरावरही होणारा उपयोग पाहून मला नेहमीच कौतुक वाटायचं. योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात तसं ह्या तांत्रिक गोष्टीचा कुशलतेने वापर करून घेणं महत्त्वाचं. लालूने रेल्वेला हायटेक करायचं मनावर घेतलेय हे अतिशय स्तुत्य आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी कशी होते हे बघणे महत्त्वाचे. कूपन्स टिकीटांसारख्या सोयी आहेत पण मशिन्स चालत नाहीत अशी स्थिती दिसून येते, असं काही होऊ नये ह्यासाठी खास लक्ष द्यायला हवं. सी. एस.टी सारख्या मोठ्या स्थानकांवर पार्कींग लॊट्स, तसेच अत्याधुनिक सोयी, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यासाठी विशेष प्रयत्न, गाड्यांमधे जास्त स्वच्छता ठेवण्यासाठी चांगल्या टॊयलेट्स चा वापर, मोबाईल वरून रेल्वे टीकीट बुकींगची सोय, सरकते जिने आणि येत्या दोन वर्षांत रेल्वे टीकीटांसाठी रांग हटवण्याचा उद्देश ह्या सगळ्याच योजना स्वागतार्ह आहेतच. ह्यातून टीकीटांच्या काळाबाजाराला आळा बसेलच शिवाय सामान्य माणसाचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.
इथे परदेशात बरेच ठीकाणी बस आणि रेल्वे ह्यांचा समन्वय दिसून येतो. म्हणजे एकच टीकीट दोन्हींच्या प्रवासाला चालते आणि ते खूपच सोयीचे होते. माझ्या मनात असा विचार नेहमीच यायचा की मुंबईसारख्या ठीकाणी ते का शक्य असू नये, म्हणजे रेल्वे साठी काढलेला पास बी. एस. टी. ला चालला तर बरे नाही का? ह्यावेळी लालूसाहेबांनी ’गो मुंबई स्मार्ट कार्ड’ ची योजना मांडलेय तिचे स्वरुप काहीसे असेच दिसतेय.

आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्शिततेच्या दृष्टीने बजेट मध्ये वेगळी सोय करण्यात आली आहे. शिवाय अजून एक चांगली गोष्ट म्हणजे काही हमालांना रेल्वेत गॆंगमन म्हणून भरती केले जाणार आहे.
रेल्वे कर्मचार्यांनाही ह्यातून आपण चांगले काम करत आहोत असा आनंद, समाधान मिळतंय असं लालू म्हणतात. त्यांनी ह्या कर्मचार्यांना सुद्धा खूष ठेवायचा प्रयत्न केलाय. सगळ्यात आनंदाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या सगळ्या वर्गांच्या भाड्यात थोडी थोडी कपात केलेय. ज्येष्ठ महिला नागरीकांना तिकीटात सवलत ३० टक्क्यांवरुन ५०% वर दिलेय. एवढं सगळं करून एकंदर बजेट कोट्यावधी रुपयाच्या नफ्याचे मांडलेय.

गेले चार वर्ष आणि आता अजून पुढचे एक वर्ष उपनगरीय रेल्वेच्या टिकीटांच्या किमती स्थिर ठेवण्याचं कसब लालूने दाखवलय, लाखो उपनगरीय प्रवशांना, चाकरमान्यांना त्याने दिलास दिलाय. अर्थात पुढच्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून त्याने हे केलय हे जाणवतय पण वारेमाप उधळंपट्टी करून लोकांना खूष करायचं तंत्र आहे असंही म्हणता येणार नाही, पुढच्यावर्षी आणि २0२५ पर्यंत काय उद्दीष्टे आहेत हे त्याने मांडलय. चारा घोटाळयात अडकलेल्या लालूने रेल्वेला मार्गाला लावलं असं म्हणायला, (निदान गेले पाच रेल्वे अर्थसंकल्प बघता ) आता नक्कीच वाव आहे!

लालू-आख्यान -
http://www.youtube.com/watch?v=iVe966Rrr5c&feature=related

अर्थसंकल्प मांडल्यावर -
http://www.youtube.com/watch?v=fhequbKB-bc

लालूच्या रेल्वे अर्थसंकल्पाचं सहर्ष स्वागत!

No comments: