Thursday, August 28, 2008

कवितांच्या गावा..

संवेदने दिलेला खो पुढे मिनोतीने मला आणि स्वातीला दिला (ह्या ऒलिंपिकच्या वातावरणात अगदी पेटती मशाल दिल्यासारखा.. घे आणि धाव म्हणत) तेव्हा खरं तर दोन प्रश्न होते खो नेमका कुणाला द्यायचा आणि माझ्या इतक्या आवडत्या कवितांमधून नेमक्या कोणत्या लिहायच्या.. संदीप, पाडगावकर, बोरकर, गदिमा, शांताबाई, सुरेश भट, कुसुमाग्रज, केशवसूत, आरती प्रभू, ग्रेस, सुधीर मोघे कितीतरी..

मला आवडलेल्या दोन कविता ज्या मी केव्हाना केव्हातरी माझ्या ब्लॉग वर टाकल्या असत्याच त्याला हे निमित्त मिळालं इतकच :-)आणि हो असा उपक्रम चालवायचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या ज्या मित्रांचे ब्लॉग्स ह्या ना त्या कारणाने सुप्तावस्थेत गेले आहेत त्यांना पुनर्जागृती..

पहिली कविता बोरकरांची - यशस्वी जीवन म्हणजे काय हे अलगद आणि समर्थपणे उलगडवून दाखवणारी. ह्या कवितेशी माझी पहिली ओळख झाली ती पु. लं. च्या एका लेखामध्ये आणि आता जितकेवेळा वाचतो ऐकतो ती अधिक आवडत जातेय.. सुनीताबाई आणि पु.लं जो बोरकरांवर कार्यक्रम करायचे त्यात ही असायची नेहमीच.

दुसरी कविता पाडगावकरांची, इतकी चपखल लिहिलेय की वाटाव पाडगावकर नक्की एकदा प्रेमभंगातून गेले असावेत. ह्या कवितेशी माझी ओळख करून दिली क्षिप्राने, जिने मला कवितांच्या गावातल्या अशा कित्येक मातब्बर धुरणींशी खूप जवळून ओळख करून दिलेय, कवितांविषयी मला बहुश्रुत व्हायला मोलाची मदत केलेय.

अरुण आणि परागकणास् ही कवितावली पुढे चालवायला देतोय..

ह्या खॊ चे काही नियम संवेदने ठरवलेले त्याच्या ब्लॊगवरून उदधृत करतोय..
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)
----------------------------------------------------------------------------------

जीवन त्यांना कळले हो

जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो..

जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होऊनी जीवन
स्नेहासम पाजळले हो..

सिंधुसम हृद्यात जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर
घन होऊनी जे वळले हो..

दुरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने
फुलले अन परिमळले हो..

आत्मदळाने नक्षत्रांचे
वैभव ज्यांनी तुळले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
घरीच जयां आढळले हो,
उरीच जयां आढळले हो,
जीवन त्यांना क्ळले हो....

-- बा. भ. बोरकर
----------------------------------------------------------------------------------

तेव्हांची ती फुलं..
सगळं संपलं असं समजून उभे होतो
एकमेकांसमोरः आणि एकमेकांपलिकडे
पानगळतीच्या ओंजळीत होती साठवलेली
आपण एकमेकांना दिलेली तेव्हांची ती फुलं..

फुलणं ही जशी फुलाची भाषा असते
तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा
कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी
एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..

न बोलता उभे होतो एकमेकांसमोर
यापुढे भेटलो तरी आपण परके असणार
कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाहीत
हे ज्यांना क्ळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..

- मंगेश पाडगांवकर

No comments: