Saturday, March 26, 2011

एदिऒस अमेरिका..

गेले कित्येक दिवसांच्या धावपळीनंतर आज प्रवास करताना निवांतपणा मिळालाय, म्हटलं नुवार्क इंटरनॆशनल एअरपोर्टवर बसलोय शांत तर मन मोकळं करावं. काही वर्षांपूर्वी डॆलस सोडून कोलंबियाला येताना मी इथेच ’ऎदिऒस डॆलस’ असा ब्लॊग लिहिला होता, आज काहीसं तसच वाटतय ’ऎदिऒस अमेरिका’ म्हणताना. ’कुण्या देशांचं पाखरु.. ’ ह्या माझ्या ब्लॊग मध्ये अमेरिकेत राहायचं की ती सोडायची ह्याचा उहापोह मी मागे केला होता, आणि त्याचीच परिणिती आज अमेरिका सोडून ’स्चेच्छेने स्वदेश’ स्विकारताना झालेय. अमेरिका सोडून भारतात परतलोय म्हणजे काही तीर मारले नाहियेत हे नक्कीच आणि अमेरिकेने व्यक्तिश: मला इतकं दिलय की ह्या देशाविषयी मला कायम आदरच आहे.

’या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या..’ हे कायम लक्षात होतंच, आपल्या आईवडलांच्या आयुष्यातल्या ’जाहल्या तिन्हीसांजा’ ना, कातरवेळी त्यांच्या बरोबर राहायची इच्छा हे एक महत्त्वाचं कारण असलं तरीही कुटूंबाचा विचार करता मुलाचं शिक्षण भारतात करणं, बायकोच्या करिअरचा विचार करणं ह्या ही गोष्टींचा विचार केला होताच. त्यामुळे इथलं सगळं सोडून परत जायचं हे नक्की होतंच, प्रश्न होता की परत जाण्याची योग्य वेळ कोणती.. आणि आता तो ही प्र्श्न सोडवला. ’Point of no return’ ला पोहोचण्यापूर्वी, इथल्या इमिग्रेशनच्या चक्रातून बाहेर पडलोय ह्याचं आज समाधान आहे. ह्या निर्णयाच्या दोन्ही बाजूंनी संमिश्र प्रतिक्रिया आम्हाला मित्र-मैत्रिणींकडून मिळाल्यात, त्यामुळे बघू तिकडे गेल्यावर कसं रुळतोय ते, सध्या काही विचार करत नाहीये. दोन बॆग्स घेऊन आलोय आणि दोन बॆग्स घेऊन परत जायचं हे कायम डोक्यात असल्याने आवराआवरी करताना तसं सोप्पं गेलं. गाडी विकताना, भांडीकुंडी देऊन टाकताना किंवा चक्क फेकून देताना थोडं जड झालचं पण तिकडचे वेध लागल्याने निर्मोही वृत्तीने मोकळंही होता आलं.

बरं, पण मग असं निवांत बसलो की काय दिलं अमेरिकेने इतक्या वर्षात हा विचार मनात येतोच आणि मग अगदी लहान सहान गोष्टींचा जमाखर्च मांडणारी वृत्ती डोकं वर काढते. काही महिन्यांसाठी, केवळ व्यावसायिक अनुभवासाठी इथे अमेरिकेत येण्याचं खूप वर्षांपूर्वी जे ठरवलं ते इथे आल्यावर लगेचचं पुसलं गेलं. जगाच्या दुसया टोकावर लोकं कशी राहतात, वागतात, विचार करतात हे पाहून खूप काही शिकायला मिळणार इथे, आचार - विचार बदल होणारच हे लगेच कळून चुकलं. स्वावलंबन, हिशोबी वृत्ती, पैशाची किंमत ह्यांच महत्त्व लगेच लक्षात आलं. बघता बघता आर्थिक उद्दीष्टे वाढत गेली आणि ती साध्य करण्यासाठी वेग वाढवला गेला, स्वत:त सुधारणा होत गेली, अगदी न कळतच. आपल्यातलं चांगलं बाहेर येण्यासाठी अमेरिका कशी मदत करते हे इथेच जाणवलं. अमेरिका एक पर्यटक म्हणून काना-कोपयांतून फिरुन झालीच पण अमेरिकन मित्र मैत्रिणीही झाल्या खूप आणि त्यातून सांस्कृतिक देवाण-घेवाणसुद्धा. बॆचलर तसच मॆरिड लाईफ अमेरिकेत पुरेपुर जगल्याने दोन्ही प्रकारच्या आयुष्याचा अनुभव इथे मिळाला. एकमेकाला धरुन असलेली भारतीय माणसे, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून एकत्र जोडली गेलेली मराठी मने आणि मग (विकेडला का होई ना) साजरे होणारे सण-वार आणि पुढच्या पिढीकडे मराठी भाषा, भारतिय संस्कृती पोहोचवण्याची धडपड सगळं सगळं जवळून अनुभवता आलं. विशेषत: न्यू जर्सी, डेलस मध्ये दिग्गजांच्या शास्त्रिय संगिताच्या मैफिली ऐकण्याचे जे योग आले ते सगळे कौटुंबिक सोहळेच असायचे, कायम स्मरणात राहातील असे. तारुण्याचा बराच काळ अमेरिकेत आयुष्य घडवण्यात गेलाय ह्याची जाणीव आहे आणि जी संधी मिळाली तिचा सुयोग्य वापर करता आला ह्याचं समाधानही आहे. मायबोली, मिसळपाव, माझा ब्लॊग, ठिकठिकाणची महाराष्ट मंडळे, ब्रेकफास्ट क्लब्स, नेटवर्किंग इवेंट्स ह्यांच्या माध्यमातून अमेरिकेत अनेक त्रुणानुबंध जुळले. फेसबुक, लिंक्ड-इन च्या माध्यमातून संपर्क राहाणार आहेच, मी फक्त एक इ-मेल, एक फोन कॊल किंवा एक स्क्रॆप लांब आहे इतकंच.

अमेरिकेत, साधारण आठ वर्षांच्या अनुभवाने मी ठाम सांगू शकेन की - सार्वजनिक स्वच्छता, प्रदूषण मुक्त शुद्ध हवा, सुरक्षा, सार्वजनिक सभ्यता, शिस्त, दुसयाच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची वृत्ती, धर्म/देश/भाषे पलिकडॆ व्यक्ती म्हणून तुमची इतरांना आणि इतरांची तुम्हाला असलेली ओळख, सामान्य माणसापर्यंत न पोहोचलेली लाचखोरी, कायद्याचा वचक आणि अमंलबजावणी, पुरेशी वेगवान न्यायव्यवस्था, तुमच्या शिक्षणाचा/ कौशल्याचा/ द्न्यानाचा सर्व स्तरांतून आदर आणि त्यातून मिळणाया संधी, 'Survival of the fittest' ह्या उक्तीला सार्थ ठरवणारी कठीण प्रसंगात तुमची लागणारी कसोटी आणि त्यातून मिळणारे जीवन-शिक्षण अशा हिरव्या नोटांमध्ये न मोजता येणाया बयाच गोष्टी मला अमेरिकेत मिळाल्य़ा. त्याचबरोबर कामाच्या वेळा आणि घरात तसेच स्वत:च्या आवडी निवडी साठी देता येणारा वेळ ह्याची सर्वसाधारणपणे उत्तम सांगड घालता आल्याने ’मला काय हवंय?’, ’मला काय करायचय?’ ह्या प्रश्नांचा विचार करत आत्मपरिक्षणास पुरेसा वेळ मिळत गेला. ह्या मिळालेल्या वेळात अतिरीक्त वाचन, लिखाण, थोडीशी आध्यात्मिक साधना करता आल्याने वेळेचा सदुपयोग केल्याचं समाधान नक्कीच आहे.

मग इथून पुढे काय? आयुष्याच्या ह्या वळणावर अमेरिकेतल्या अनुभवाची शिदोरी वापरून भारतात संधी, रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने काही करता येईल का हे बघायचा विचार आहे. ’सुपंथ’ च्या माध्यमातून गेले दोन वर्षे सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचं काम आम्ही करतोय त्याबाबतीत पुढे काय करता येईल हे बघायचय. एका नव्या जीवनशैलीला सुरुवात करताना मी ह्याक्षणी प्रचंड उत्सुक आहे हे नक्की.. शुभं भवतु !! :-)

Sunday, February 6, 2011

आठवणीतला पाऊस..

गेले चार दिवस इथे पाऊस कोसळतोय, अगदी लागूनच राहिलाय. वर्षातले फक्त नेमके चार महिने मोसमी पाऊस बघण्याची सवय असणाया माझ्यासारख्या पक्क्या मुंबईकराला इथला बारमाही पाऊस कायम औत्स्युकाचा विषय. काल थोडा निवांतपणा होता तर खिडकीसमोर खुर्ची टाकून पावसाचा तो हैदोस बघत बसलो एकटक. समोर तलाव आहे त्यावर आदळ आपट करीत झाडांशी झोंबत मस्त चिंब कोसळत होता. खिडकी उघडली पावसाचे दोन थेंब अंगावर घ्यावेत म्हणून आणि अशी काही थंड झुळूक आत आली की माझ्या सकट खुर्चीही शहारली. म्हणजे पावसासकट थंडी आणि ती सुद्धा सुसाट आहे तर, गाराच पडत असणार म्हणजे असं पुटपुटत पुन्हा खिडकी लावून घेतली. दंगा करायचाय पण आईने दटावलेलं शहाणं मुल कसं निपचित घरात बसून निरागस डोळ्यांनी लांबच्या खेळाकडे बघत राहील, तसा कित्येक वेळ बघत होतो. हेच आवडत नाही मला इथल्या पावसाचं, येतो तेव्हा अशी सणसणीत थंडी घेऊन येतो की बस्स. शिवाय फ्लू होईल, त्यात कामाचा व्याप, तब्येत सांभाळायला हवी असं काही बाही डोक्यात येतं आणि भिजण्याचा मूडच जातो यार..

मग अशावेळी करायचं काय, भज्यांचं पीठ, थालिपीठ किंवा बटाटे वडे, छे! तळणीचा कंटाळा आलाय.. मग फक्त आल्याचा फक्कड चहा केला. घोट घोट चहा घेत त्या बेभान पावसाच्या धारांबरोबर मी कधी प्रवास सुरू केला माझ्या दक्षिण मुंबईच्या पावसाच्या दिशेने कळलं सुद्धा नाही.. ’ये रे ये रे पावसा..’, ’सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?” ने सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या लहानपणात हा पाऊस आलेला असतोच.. त्यातच ’थेंबा थेंबा थांब थांब, दोरी तुझी लांब लांब.. आभाळात खोचली तिथे कशी पोचली..’, ’आला आला पाऊस आला’, ’ए आई मला पावसात जाऊ दे’ अशी बालगीते पावसाशी जवळीक वाढवतातच. जगात कुठेही आणि कितीही पाऊस पाहिला तरी माझ्या मुंबईतल्या ’पावसाची सर’ कुठे नाहीच असं मला नेहमीच वाटतं. आत्तासारखं कैक वेळा त्याने मला नोस्टेल्जिक केलय. किती प्रकार ह्याचे.. कधी वळीवाचा, कधी दडी मारुन बसणारा रगेल, कधी आषाढाचा धोधाणा, कधी नुसतीच ढगांची आरडाओरडी, कधी ऊन पावसाचा श्रावणातला इंद्रधनुषी खेळ, कधी गणपतीतल्या मांडवाच्या ताडपत्र्यांवर तडातडा वाजणारा ताशा, कधी दिवाळीतले कंदिलही भिजवणारा.. किती वैविध्य.. भरंतीची वेळ साधून आला की मुंबईत पाणी साचलच समजा. ह्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडण्यात, पावसात फुटबॊल, क्रीकेट, व्हॊलीबॊल खेळण्यात मजाच वेगळी, आणि हो, पाऊस पडत असताना पोहायची जी काही धमाल आहे ना ती कशात नाही राजा.. ह्या पावसाळ्यात मुंबईच्या आसपास धबधबे वाहू लागले की पावसात ट्रेक करण्याची एक निराळीच धमाल. कॊलेजमधल्या दिवसात आणि त्यानंतरही तुंगारेश्व्वर, पांडवलेणी, भीमाशंकर, माळशेज, पळसदरी असे कितीतरी पावसाळी ट्रेक आणि सहली केलेल्या आठवतायत. मुंबई-पुणे खंडाळ्याच्या घाटातून पावसात केलेला प्रवासही अजूनही सुखदच वाटतो. आपल्या ओल्या लाल मातीचा वास हे उत्तम टॊनिक आहेच जीवनरस प्रफुल्लित करायला हे खरंच!

मुंबईत असा पाऊस भरून आला की दोन खांबांच्या इथून मरिनलाइन्सला समुद्राकाठावर चालत जायच नरिमन पॊईंटच्या दिशेने.. खळाळता समुद्र, सोसाट्याचा वारा.. हातात भाजलेलं कणीस.. छत्री उघडायचा विचार सुद्धा आला अशावेळी मनात म्हणजे अरसिकतेचा कळसच, तसही वारा तुम्हाला ती मिटायला लावणारच.. अंगावर लाटा झेलत आणि पाऊस घेत मनसोक्त भिजायचं.. निसर्गाचं तांडव सुरु असेल तर ते रसरसून उपभोगायचं.. बस्स! मी काय म्हणतोय ह्याची थोडी तरी कल्पना हा खालचा विडीओ पाहून येईल.. माझं आवडतं गाणं तर आहेच पण माझी लाडकी मुंबई चिंबचिंब दाखवलेय म्हणून अजूनच :) मुंबईचा पाऊस हे असं अजब रसायन आहे..


रिमझिम गिरे सावन.. सुलग सुलग जाये मन..

पाडगावकरानी ह्या मुंबईच्या पावसाचं यथार्थ वर्णन केलय. मला हे त्यांच्या ’तुझे गीत गाण्यासाठी’ ह्या कॆसेट मध्ये मिळालं दहा एक वर्षापूर्वी आणि कायम स्मरणात राहिलं..





पाऊस आला..


असाही पाऊस

पाऊस आला पाऊस आला
पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर.. पाऊस आला नाचणाया मोरांवर.. पाऊस आला..

वायाच्या श्वासाचा, मातीच्या वासाचा, हिरव्या हिरव्या ध्यासाचा..
करीत आला वेड्याचा बहाणा.. पाऊस आला आतून आतून शहाणा..
पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा.. राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा..
पाऊस आला गोकुळ्यातल्या माळावर.. पाऊस आला यशोदाच्या भाळावर..

पाऊस आला उनाडणारा सोवळा.. पाऊस आला पालवीसारखा कोवळा..
येथै येथै पाऊस आला, तेथै तेथै पाऊस आला, ताथै ताथै पाऊस आला..
फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला.. झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला..
पावसाने ह्या जगण्याचा उत्सव केला.. आणि पावसाने ह्या मरण्याचाही उत्सव केला..
जगणं आणि मरणं, बुडणं आणि तरणं.. ह्याच्या पल्याड कुठेतरी हा पाऊस आला..

पाऊस आला याद घेऊन.. ओली चिंब साद घेऊन..
बाहेर जरी ढगातून पाऊस आला, खरं म्हणजे.. आतून आतून पाऊस आला.. पाऊस आला..


- मंगेश पाडगांवकर

बडबडत उनाडत पाऊस येतो धपाधपा कोसळत
सामोरा, सैरावैरा, अस्ताव्यस्त..

त्याला नाही मुळीच सोसत कोणीही त्याच्याखेरीज लक्ष कुठे दिलेले

पाऊस महासोंगाड्या.. राहतो उभा देवळापुढल्या फुटपाथवर भाविकपणे, पुटपुटत करु लागतो नाम-जप श्रद्धेने..
आणि मग अकस्मात खो खो हसत, लगट करतो एखाद्या नाजूक रंगीत छत्रीशी..

झाडांना झोंबत येतो, पारंब्याना लोंबत येतो..
डोंगराची उशी घेतो, नदीला ढुशी देतो
शाळेपुढल्या गल्लीत पाऊस, नव्यानेच सायकल शिकतोय तसा वाटतो
वैतागला मिशीदार हवालदार तसा पाऊस कधी कधी घोगया सुरात डाफरतो

मुंबईतल्या भैय्यासारखा पाऊस कधी दूर उत्तरप्रदेशातल्या बायकोची याद होऊन उदास होतो
एकसुरी आवाजात एकटा एकटा तुलसीचे रामायण गाऊ लागतो..

पाऊस माझ्या खिडकीत येतो, सपशेल नागडा.. कमीत कमी लंगोटी.. तिचा सुद्धा पत्ता नसतो
हुडहुडी भरल्यासारखी माझी खिडकी थडाथडा वाजू लागते

सपकारत खिडकीतून तो मला म्हणतो,
"उठ यार, कपडे फेक, बाहेर पड,.. आजवर जगले ते कपडेच तुझे, एकदा तरी चुकून तू जगलास काय?
बाहेर पड, कपडे फेकून बाहेर पड.. गोरख आया, चलो मछींदर गोरख आया.."


- मंगेश पाडगांवकर


गौरी-गणपती, दिवाळी, होळी, संक्रांत असे सणवार जसे दरवर्षी ठरल्याप्रमाणे, ठरल्या वेळी येतात तसाच आपल्यासाठी हा मुंबईचा पाऊस.. दरवर्षी मे च्या शेवटी येऊन उकाड्यावार उतारा देणारा.. एक वार्षिक उत्सवच.. आणि माहेरपणाला आलेल्या लेकुरवाळीसारखा चार महिने मुक्कामालाच.

हा इथला कोलंबियातला कालचा पाऊस पाहाताना पाणी पाणी झालं ह्या आठवणींच्या डुबक्यांमध्ये.. आणि अशावेळी जगजीत नेहमीसारखा धीर गंभीर आर्त स्वरात धावून आलाच..

ये दौलत भी लेलो.. ये शोहरत भी लेलो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी..
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज की कश्ती.. वो बारीश का पानी..
वो कागज की कश्ती.. वो बारीश का पानी..

Saturday, December 18, 2010

आमची शाळा, आमचे शिक्षक..

विचारांच्या तंदरीत असताना, आज एकदम काहीतरी झालं आणि शाळेचे दिवस आठवले.. आणि मग ते लहानपण, शाळा, आजी, माऊ-बाबा, शेजारच्या टिळक मामी, बंडू मामा आणि बरच काही काही... जुने दिवस आठवले की एक हुरहुर लागते, गोड नॊस्टेल्जिया सतावतोच.. मग आठवणींच्या ह्या मोहजळात किती डुबक्या मारल्या तरी समाधान होत नाहीच, दर वेळा तळाला वेगळाच मोती मिळतो. कसं अजब आहे ना हे सगळं.. कित्येक वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी बारीक तपशीलासह अशा नजरेसमोर येतात, अगदी अनलिमिटेड स्टोअरेज आणि किती जोरदार अनुक्रम लावलाय त्याचा इवल्याश्या मेंदूनं, काही क्षणात त्या मन:पटलावर येतात सुद्धा, चक्क धक्काबुक्की करत गर्दी करतात मुंबईतल्या रेल्वेच्या डब्यासारखी.

चिकीत्सक शाळेतल्या छोट्या शिशुतल्या प्रवेशाचा हा प्रसंग. मला चांगलाच आठवतोय. रांगेत उभं राहून अगदी फॊर्म वगैरे आणला होता, तेव्हा मुलाखत की काय माहित नाही पण मला आईबरोबर एका खोलीत बोलावलं आणि बाईंनी काहीतरी प्रश्न विचारला. मी आपला औत्स्युकाने सगळ्या खोलीतल्या गोष्टी न्ह्याहाळतोय. टेबलावर एक खेळण्यातला पिंजरा आणि त्यात पोपट ठेवला होता. आठवत असेल तर बयाच ठिकाणी दारावरच्या बेलसाठी तो पूर्वी वापरायचे, म्हणजे बेल वाजवली की हा पोपट ’विठू विठू’ करणार. तर त्यावेळी तो पोपट आणि पिंजरा मला इतका आवडला की मी कुठल्याही प्रश्नाच उत्तर न देता, तो पिंजरा घेऊन तेथून बाहेर जो धुम्म पळालो की बस्स! अर्थातच आमच्या व्रात्यपणामुळे पुढे काय वाढून ठेवलय हे बाईंच्या लक्षात आलं असावं आणि साहजिकच त्यावर्षी शिशु वर्गात प्रवेश मिळाला नाही. माझं वर्ष आता वाया जाणार की काय अशा चिंतेत असतानाच, गिरगावात त्याच वर्षी जयाताईंनी (रेळेकर) शिशु वर्ग सुरु केल्याचं बाबांना कळलं आणि मग त्यांच्या शिशु निकेतनचा मी पहिला विद्यार्थी झालो. तिथून मला शाळा ह्या प्रकाराची आवड निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही (श्रेय जयाताईंनाच). थोडं असही आठवतय की त्याआधी (बहुधा घरी खूप्पच त्रास देत होतो म्हणून ) मी देवभुवन मध्येही काही दिवस डबा खायला जायचो.

असो, तर पहिलीला पुन्हा प्रवेशासाठी अर्ज करुन (आणि मी मागच्यावेळसारखा पुन्हा गोंधळ करणार नाही असा सज्जड दम खाऊन) चिकित्सक समूहाच्या पोतदार प्राथमिक शाळेत प्रवेश करता झालो. पहिली, दुसरी दुपारचे वर्ग असायचे, एका सुरात आम्ही कविता म्हणताना, गाताना जो ताल असायचा तो अजून कानात घुमतोय. पुतळ्याच्या मागचाच वर्ग होता आमचा. अगदी तिसरी पर्यंत हा पुतळा कोणाचा हे तिथे नाव लिहिलेले असूनही (श्री. पोतदार) मला कळले नाही बहुतेक. पगडी घातलेले एकमेव पुरुष पुतळ्याच्या रुपात माहिती होते ते म्हणजे लोकमान्य टिळक. शाळेतल्या प्रत्येक वर्गात असलेल्या वीणाधारी, मोरावर बसलेल्या सरस्वतीचा फोटॊ हे त्याकाळातलं अतिशय आकर्षण. वर्ग सुरु होताना सुरुवातिला जी प्रतिद्न्या आणि मग जन-गण-मन म्हणायचो त्यातून जे भारलेलं वातावरण निर्माण व्हायचं त्याची तुलना फक्त सार्वजनिक गणेशोत्सवात गुरुजींनी केलेल्या सामूहिक मंत्रोच्चाराशीस होऊ शकेल. शाळा संपताना वंदे मातरम, अहाहा काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे कानांचे! त्यातला तो ’जाड्या’ शब्द मला आजपावेतो कळला नाही. पहिलीच्या वर्गात्तील ’फुलपाखरु छान किती दिसते’ हे तर अजून आठवतेय मला, गाण्याच्या आंतरकरबाईंनी शिकवलेल्य हावभावासहित. दुसरीत असताना आम्ही दिंडी काढली होती तेव्हा वारकयांच्या वेषभूषेतला फोटॊ जपून ठेवलाय अजून :) तेव्हा प्राथमिक शाळेच्या सहली नॆशनल पार्क, तानसा वैतरणा अशा गेलेल्या आठवतात. शाळेत शिरतानाच प्रवेशद्वाराजवळ एक फळा आहे. त्यावर सुविचार आणि मग प्रदर्शने, आंतरशालेय स्पर्धा, नाटके ह्यात बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे नाव लिहिले जायचे. वर्षानुवर्षे तेच वळणदार अक्षर. फळ्यावर नाव लागणे म्हणजे अटकेपार झेंडा, अगदी अभिमानास्पद गोष्टच. तिसरीमध्ये असताना ऐन परीक्षेच्या धामधुमित म्हणजे मार्च मध्ये माझी मुंज झाल्याचे आठवतेय. बयाच जणांची त्यावर्षी मुंज झाली होती, तुळतुळीत गोटे करुन शाळेत बिचकत यायचो तेव्हा वेगळंच वाटायचं. माझा वाढदिवस मे मध्ये असल्याची मला कायम बोच होती. एकतर वाढदिवसाच्या दिवशी गणवेशा व्यतिरीक्त छान छान ड्रेस घालायची चैन, मग तुमचा वेगळा ड्रेस बघून तुम्हाला त्या दिवशी असलेला स्पेशल भाव असलं काही मिळायचं नाही मला. तसच वाढदिवसाच्या दिवशी शाळेत गिफ्टपण वाटता यायची नाहीत कधी, एकेकाचे नशीब! चौथीचं शिष्यवृत्तीचं वर्ष. जयकर बाईंनी विशेष मेहनत घेतली तेव्हा आमच्यावर. सकाळी साडेसहाला मोजक्या मुलांसाठी जास्तीचे वर्ग घ्यायच्या बाई. कष्टाचं चीज झालं आणि मिळाली स्कॊलरशीप. तेव्हा पेपरात फोटो आलेला जपून ठेवलाय, त्यावेळी आजीच्या चेहयावरचं कौतुक अजून आठवतय.

प्राथमिक शाळेतली ही वर्ष भुर्रकन उडून पाचवीत आलो आणि हुशार मुलांची ’क’ तुकडी असायची त्यावेळी शाळेत, त्यात येऊन पोहोचलो. ’क’ तुकडी साठी एन.सी.आर.टी. असल्याने तेव्हाच भौतिक आणि रसायनशास्त्राशी ओळख झाली, तसच इंग्लिशही शिकणं सुरु झालं. पाचवी मध्ये प्राविण्य आणि प्रद्न्या ह्या गणिताच्या परीक्षा उत्तीर्ण झालॊ आणि सहावीला बालवैद्न्यानिकसुद्धा. ह्या दोन तीन वर्षात टीळक विद्यापीठाच्याही काही परिक्षा दिल्या, का दिल्या माहिती नाही! पाचवीपासून मी शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात (त्याला आम्ही गॆदरींग म्हणत असू) भाग घेत असे. दीड एक महिना आम्ही सराव करत असू. कधी बेडेकरांच्या गच्चीत तर कधी कुणाच्या घरी. 'डोल डोलतय वायावर बाय माझी' ह्यावर कोळी नाच, 'ए नाम रे सबसे बडा रे तेरा नाम उचे शेरोवाली' ह्यावर गरबा तसच 'डोगराचे आडून एक बाई' ह्यावर असे नाच बसवलेले आठवतायत. मयुरी पालेकर आमचे नाच बसवायची. डिसेंबर महिना आला की मग स्पोर्ट्स आणि शाळेतल्या विद्न्यान प्रदर्शनाची धामधुमही असायची. वर्गाच्या लंगडीच्या टीममध्ये मी असायचो नेहमी. माझा एखादा प्रोजेक्ट असायचाच प्रदर्शनात. बक्षिसाच्या आशेने नव्हे तर माहिती व्हावी, चौकसपणा यावा, सभाधीट पणा यावा ह्यासाठी भाग घ्यायलाच हवा असा आजीचा कटाक्ष असे. मरीन लाइन्सच्या मैदानात आमचे तीन दिवस स्पोर्ट्स असायचे. मी कधीच खेळात चमकलो नाही पण हे तीन दिवस म्हणजे धमाल असायची नुसती. एकीकडे शाळेत ही धामधुम सुरू असताना संक्रांतीचे वेध लागलेले असायचे. पतंगासाठी जीव टाकायचो अगदी.. वाईट्ट म्हणजे वाईट्ट वेड होतं (अजूनही आहे!) आणि शाळेत तिळगूळ समारंभ असायचा. मग आम्ही सगळी मुलं वर्ग सजवून तिळगूळ वाटायचॊ, खायला आणायचो, फिशपॊंड द्यायचो. मुले-मुली एकत्र असल्याने एक वेगळीच मजा असायची त्या वयांत, त्या दिवसांत..

शाळेला खाली पटांगण, मागच्या बाजूला अंगण आणि सगळ्यात वरती मोठ्ठी गच्ची. तिसया मजल्यावर वागळे सभागृह आहे. त्यात कितीतरी जणांच्या हातून बक्षिस घेण्याचा आणि कित्येकांची भाषणं ऐकायचा योग आला. पाचवी पासून वक्तृत्व स्पर्धात भाग घ्यायचो तेही आठवतेय. टिळक पुण्यतिथीनिमित्त एक ऒगस्टला स्पर्धा असायच्या. पण एकूणात वक्तृत्वात मी मागेच असायचो (आमचे उद्योग पडद्यामागचे)! सातवी पुन्हा शिष्यवृत्तीच वर्ष, त्यात गोट्या, पतंग आणि क्रीकेट मुळे पुढे काय अशी घरच्यांना काळजी असतानाच, शिष्यवृत्ती मिळाली, नंबरही बराच वरचा आला. मिळणारी रक्कम अगदी दहा-पंधरा रुपये असायची महिन्याला पण ती घ्यायला बोलावलाय खाली ऒफिसात अशी नोटीस आली वर्गात किती एकदम ढॆंट्डढॆंड वाटायचं. मग आठवीत पुन्हा प्राविण्य आणि प्रद्न्या मिळवून बालवैद्न्यानिक उत्तीर्ण झालो. तेव्हा रुपारेल मध्ये बी.टी.एस. चे वर्ग भरायचे, त्यात मात्र मी रमलोच नाही विशेष. पण दर शनिवारी रेल्वेने माटुंग्याला जायचॊ, मजाच. त्यावेळीच मुंबईतल्या हुशार विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्या (अमित पटवर्धन, जो आमच्या ९३ च्या बॆचमध्ये गुणवत्ता यादीत पहिला आला तो इथेच मित्र बनला). बालमोहन, पार्लेटिळक, चोगले हायस्कूलच्या माझ्या बॆचच्या बयाच हुशार मुलांच्या इथे ओळखी झाल्या. आठवीत आमचा वर्ग होता त्यात सांगाडा होता कपाटात कोपयात ठेवलेला. प्रयोगशाळेच्या बाजूचा हा वर्ग, सापळ्याचा वर्ग म्हणायचो त्याला. बेफाम मस्ती, इतकी की एकदा वर्गातल्या ३० मुलांपैकी २८ जणांना शाळेतून बाहेर काढले होते, कारण काय तर कागदी रॊकेट बनवून उडवणे. तरीही, पुढे एकदा कागद दुमडून ते रबरबॆंडमध्ये अडकवून जोरात मारणे आणि त्याने बेंचवर उड्यामारत युद्ध खेळणे ह्यावरुन बराच प्रसाद खाल्लेला आठवतो. आठवीत असताना आम्ही कुमार कला केंद्रातर्फे घेण्यात येणाया आंतरशालेय स्पर्धेत ’तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटक बसवलं होतं, शिंदेबाई सर्वेसर्वा त्या नाटकामागे. अखिल मुंबईत प्रथम क्रमांक मिळवला, कौस्तुभ सावरकरनं त्यात जोतिबाचं काम केलं होतं. आठवीमध्ये आंतरशालेय विद्न्यान प्रदर्शनातही बक्षिस मिळालं होतं. परेश वैद्य (आमच्या मागच्या म्हणजे ९४ च्या बॆचमद्ये मुंबईत गुणवत्ता यादीत प्रथम) बरोबर ह्या प्रदर्शनात मांडलेल्या प्रकल्पावर आणि कुमार कला केंद्राच्या नाटकात कामही केल्याचं आठवतय. खूप शिकायला मिळालं ह्या काळात बरोबरीच्या मुलांकडून. माझ्याबरोबरची बहुतेक मुलं ह्यावेळी तबला, पेटी किंवा मग तालमीत व्यायाम असं काहीतरी शिकत असताना माझ्या मात्र सर्रास उनाडक्याच चालू होत्या ह्या दिवसांत, नाही म्हणायला वाचनाची गोडी लागली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामुळे. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही शाळेत सकाळी सहाला बॆडमिंटन खेळत असू. आठवी आणि नववी एन.सी.सी. चं वर्ष. उंची चांगली असल्याने मी एअरविंग मध्ये निवडलो गेलो पण तासन तास परेड करण्यात आणि जड बूट पायात घेऊन उन्हात फिरण्यात मला रस नसायचा. पण तरीही कडक पॊलिश असलेले बूट, स्टार्च केलेला तो निळा ड्रेस, बिल्ला असलेली टोपी असा मोठा रुबाब असायचा. ते कपडे धुवायला सुद्धा आम्हाला वॊशिंग अलाउन्स मिळायचा. नववी मध्ये आम्ही अंबरनाथला एन.सी.सी. च्या कॆंपला गेलो होता. घरापासून दूर, फक्त मित्रांसोबत आठ दिवस राहाण्याचा माझ्या (आणि बरोबरच्या जवळजवळ प्रतेकाच्या) आयुष्यातला पहिला प्रसंग. सकाळी पाच वाजता उठून आवरून परेड ते रात्री दहा पर्यंत दंगा चालूच. इतकं असूनही घरच्यांची आठवण यायचीच. विनायक पंडितने तबलावादनाने आणि मी आंतरशालेय चेस मधे अशी दोन पदक कॆंपमध्ये शाळेला मिळवून दिल्याचं आठवतय.

पुढे दहावीच वर्ष सुरु झालं आणि शाळा, क्लास ह्यांच वेळापत्रक सांभाळताना तारांबळ व्हायला लागली. गोडबोले सरांचा दादरला व्हेकेशन क्लास असायचा तेव्हा. इतरही क्लास होतेच. शाळेत सगळ्याच शिक्षकांनी मेहनत घेतली आमच्यावर. अभ्यासाच्या नादात दहावीच वर्ष कधी गेलं कळलंच नाही. तसं सेंड ऒफच्या वेळी थोडं जड वाटलं होतच पण एकतर येऊ घातलेल्या परिक्षेचं टेंशन आणि पुढच्या कॊलेज जीवनातल्या स्वातंत्र्याची ओढ त्यामुळे तेव्हा ते विशेष जाणवलं नसावं. आता मागे वळून पाहाताना, सगळं लख्ख दिसतय. इतके कसे मोकळे झालो शाळेपासून पटकन ह्याचं आश्चर्य वाटतय.

शाळेचा फोटॊ ठेवलाय माझ्या ओर्कुटवरच्या अल्बम मधे. कुणितरी म्हटलं, हे काय किती वर्षात रंग काढला नाहीये शाळेला! अरे हो खरंच की, पण मला कसं खटकलं नाही हे, कदाचित शाळेचं अंत’रंग’, तिची माया अनुभवली असल्याने तिच्या बाहेरच्या रंगाकडे, दिखाऊपणाकडे लक्षच गेलं नसावं. खरं सांगायचं तर, जगात कुठेही गेलो तरी मनाच्या कुपीत लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत आणि एखाद्या निवांत क्षणी ज्या मोराच्या पिसांर्या सारख्या फुलून समोर येतात त्यात ह्या शाळेतल्या वर्षांच्या (की भुर्रकन उडालेल्या क्षणांचा!) मोरपिसांचा मोठ्ठा वाटा आहे. ’मज आवडते मनापासूनि शाळा, जशी माऊली लळा लाविते बाळा’ ह्याचा तंतोतंत प्रत्यय.

सहज मनात आलं की शाळेतल्या प्रत्येक इयत्तेच्या वर्गशिक्षकांची नावं आठवतायत का पहावं आणि गंमत म्हणजे ती आठवली सुद्धा.. मलाच खूप प्रसन्न वाटलं अंगावरुन आठवणीची ही मोरपिसं हलकेच फिरवताना..

पहिली ’अ’ - फडणीस बाई
दुसरी ’अ’ - पेवेकर बाई
तिसरी ’अ’ - गोडबोले बाई
चौथी ’ब’ - साने बाई
प्राथमिक मुख्याध्यापिका - वालावलकर बाई/ जयकर बाई
पाचवी ’क’ - राजवाडॆ बाई
सहावी ’क’ - पाटील बाई
सातवी ’क’ - भातखंडे बाई
आठवी ’क’ - देशमुख बाई
नववी ’क’ - पाटील बाई
दहावी ’क’ - मांजरेकर बाई
उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका - केळकर बाई, पाडगावकर बाई
शिपाई - रघू काका, गायकवाड
ऒफीस स्टाफ - विचारे सर

यांखेरीज ज्या शिक्षकांच्या मुशीतून घडलो ते श्री. घरत सर, भूगोलाचे नारखेडे सर, चित्रकलेचे जोशी सर, मराठीच्या परांजपे बाई, संस्कृतच्या गारखेडकर बाई तसेच दळवी बाई, पीटीचे नलावडे सर, गणिताच्या पाठारे बाई, राणे बाई, इंग्लिशच्या प्रभू बाई, केणी बाई, मुलांवर जीव लावणारे पालकर सर तसेच पालकर बाई अजून कितीतरी नावे घेता येतील. लहानसहान प्रसंगातून ह्या सगळ्यांनी आमच्या संस्कारक्षम वयात पाठ्यपुस्तकाबाहेरचं किती तरी शिकवलं. पु.लं चे चितळेमास्तर वाचताना, बोकीलांचं शाळा वाचताना किंवा प्रकाश संतांच लंपन वाचताना मनातल्या मनात माझी शाळा आणि त्यातले कैक प्रसंग माझ्यासमोर आले ते ह्यातल्या कुण्या ना कुण्या शिक्षकाबरोबरच. विद्यार्थी हा परिक्षार्थी हवाच पण त्यापलिकडे एक चौफेर, चौकस व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आणि तेही एकावेळीस अनेक गोळ्यांवरुन हात फिरवण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलं. शिक्षकी पेशा पलिकडे जाऊन ह्या शिक्षकांनी जे काही दिलय त्याच्या त्रुणात राहाणच परम भाग्याचं. कधी मायेने गोंजारून, कधी पाठीवर शाबासकी देऊन तर कधी घणाचे घाव घालून ह्या सायांनी वर्षामागून वर्षे विद्यार्थी ’तयार’ केले, त्यांच भविष्य अक्षरश: विणलं, घडवलं. ’शीलं परम भूषणं’ हे शाळेचं ब्रीदवाक्य आम्हाला घडवत गेलं ते अशा शिक्षकांमुळेच. आज ह्या सगळ्या शिक्षकांची आठवण यायला गुरुपौर्णिमेचं निमित्त नाही आणि हा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रमही नाही. एका निवांत क्षणी, मागे वळून बघताना, शाळेतल्या क्षणांचा हा धांडॊळा आहे आणि ते क्षण उजवळवणाया ह्या शिक्षकांविषयी मनातली अपार कृतद्न्यता कागदावर उतरते आहे.

दरम्यान इतकी वर्ष उलटली शाळेतून बाहेर पडून, तर पुन्हा एकदा जमता येतय का पहावं असा उत्साही प्रयत्न मिलिंद दामले, वैशाली दळवी, प्रिया बेडेकर, स्वप्निल जोशी यांनी एक-दोनदा केलाय. ह्या फेसबुक आणि ऒरकटच्या कृपेने आम्ही बरेच जण एकमेकांच्या संपर्कात आहोत इतकच, त्यापुढे जाऊन एकत्रित भेटण्याची शक्यता आता बहुतेक म्हातारे होऊन सांसारिक जबाबदाया संपल्यावरच. नाही म्हणायला आमचा वर्गातल्या मुलांचा खास ग्रुप अजून एकत्र जमतो, कधीतरी गिरगावतल्या व्हॊइस ऒफ इंडियाच्या इराण्याकडे चार कप चहावर शाळेतल्या दिवसांच्या रम्य आठवणी अजूनही रंगतात. असंच गप्पांच्या ओघात, आम्ही वर्गातल्या मुलांची सगळी नावं त्यांच्या हजेरीपटाच्या अनुक्रमासहित आठवायचा प्रयत्नही करतो.. धम्मालच!

आता भारतात गेलो की प्रत्येक वेळी शाळेत जातो, स्टाफ रुम मध्ये ओळखीच्या बाई भेटतायत का बघतो, भेटता क्षणीच ओळख पटतेच, कुठल्या बॆचचा वगैरे सांगावं लागत नाही. शिक्षकांच्या चेहर्यावरचा आनंद, अभिमान, कौतुक ह्याचं मिश्रण सारं सारं बघून घेतो, मनोमन सुखावतो. मग खाली तळमजल्यावर येतो, घंटा आहे मोठी तासाचे टोले रघूकाका द्यायचे, जे घरपर्यंत ऐकू येतात. तिच्या खाली उभे राहून अंगणात बेफाम धावणाया मुलांकडे बघत हातात वडापाव घेऊन उभा राहतो. ह्यातलाच कोणीतरी उद्या जगाच्या दुसया टोकावर जाईल आणि ह्याच क्षणांची त्तेव्हा अशीच उजळणी करेल काय, आठवण काढेल काय असा विचार करत भरलेल्या डोळ्यांनी, डॊळे भरुन, त्या धावणाया मुलांना मी कौतुकाने पहात रहातो.. पहातच रहतो.

Sunday, December 12, 2010

दाम करी काम येड्या दाम करी काम..

सध्या ऒफिसात बराच व्यग्र असलो तरी एकीकडे वाचन चाल्लय याचं समाधान आहे. एक महत्त्वाचं म्हणजे पूर्वी सारखं एखादं पुस्तक घ्यायचं आणि मग ते डोक्यात घोळवत चवीचवीने वाचायचं किंवा एकदम तुटून पडून संपवायचं असं हल्ली होतं नाही. नेट वरच्या मुबलक लिखाणाच्या वाचनाची आता इतकी सवय आणि चटक लागलेय की निरनिराळे ब्लॊग्स, मराठी संस्थळे, दिवाळी अंक, रोजची वर्तमानपत्रे असं बरच काही डोळ्या खालून जातच. तसंच हे वाचलस का? इथे काय आहे ते पाहिलस का? अशी इ-मेल्स येऊन पडलेली असतातच. त्यामुळेच बरेच विचार घोळतायत सद्ध्या, खूप विषयही आहेत हातावेगळे करण्यासाठी जसं जमेल तसं लिहीनच.

दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांनी निवडणूक एक हाती जिंकली, ती सुद्धा अशी की लालूसह कॊंग्रेसचा सुकडा साफ. बिहारी जनतेचे अभिनंदन करायलाच हवे. भारतात लोकशाहीची मूळे घट्ट असल्याचे पुन्हा एकदा जाणवले हेच खरे. गुजराथ पाठोपाठ आता बिहारनेही जनतेला लागलेली विकासाची ओढ दाखवून दिलेय. ह्याचे दूरगामी परिणाम केंद्रातील राजकारणावर न झाले तरच नवल. जे आमचा विकास करत नाहीत त्यांना आम्ही हकलवणारच हे समीकरण जर लोक दाखवून देत असतील तर निदान जनभयास्तव इतर राज्यसरकारांना आणि केंद्र सरकारला विकास करुन दाखवावा लागणारच. अर्थात नितिशकुमार सरकारवर बिहारला पुढे न्यायची जबाबदारीही आहेच पण तूर्त तरी बिहारच्या विकासासाठी त्यांची अत्तापर्यंतची वाटचाल स्पृहणीयच आहे.

जगाच्या दुसया टोकावरुन ह्या सगळ्याकडे बघताना भारतात एकाच वेळी परस्परविरोधी राजकीय, सामाजिक बदल घडताना दिसतायत. उदाहरणच द्यायची झाली तर, बिहार आणि गुजराथ विकासाच्या रथावर घौडदौड करत असताना, तिथे दक्षिणेत आंध्र आणि कर्नाटकात तसेच आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या नाटकांचे दोन-तीन अंक झाले, राजकारणाला ऊत आला अगदी. एकीकडे भारताची वेगात होत असलेली आर्थिक प्रगती, शिक्षणाचा वाढलेला स्तर, वाढता शेअरबाजार आणि बाहेरच्या जगातून येणारा पैशांचा ओघ, ’तुम्ही ग्रेट आहात’ हे येऊन सांगणारा ओबामा, कॊमनवेल्थ मध्ये कमावलेली पदकं, भारतीय क्रीकेट संघाने मिळवलेले सलग विजय ह्यामुळे भारतीय म्हणून अभिमान वाटत असतानाच एकामागोमाग बाहेर पडणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे (राष्ट्रकूल स्पर्धेतला भ्रष्टाचार, ’आदर्श’ चा भ्रष्टाचार, २ जीस्पेक्ट्रम चा भ्रष्टाचार, कॊंग्रेसच्या महाअधिवेशनात झालेला भ्रष्टाचार, पेण अर्बन बॆंकेचा भ्रष्टाचार इ. इ.) राज्यस्तरीय आणि केद्रस्तरीय पातळीवर वर्षभर चालूच राहीली. म्हणजे करदात्यांचा पैसा ह्या लबाड आणि लुच्च्या, भ्रष्ट राजकाराण्यांनी खाऊन लोकांना हातोहात फसवलेय. जोपर्यंत एखाद्या भष्ट व्यक्तिला (आणि त्याच्या लाभार्थींनाही) तातडीने शिक्षा (प्रसंगी फाशीही) होत नाही, तोपर्यंत भष्टाचार करू पाहाणारे हात आणि मने तयार होत राहाणारच. शैक्षणिक संस्थांमध्ये निती मुल्ये शिकवण्याचे आणि त्यांची जपणूक करण्याचे महत्त्व ठसवण्याचे दिवस आता गेलेत असं निराश होऊन म्हणावसं वाटतं. भष्ट वागण्याविरोधातला शैक्षणिक आणि सामाजिक धाक कमी होत चाल्लाय, जिथे शैक्षणिक संस्थाच डोनेशनचा हट्ट करतात आणि भरमसाट फीया वसूल करतात तिथे त्या मुलांवर त्याविरोधात कसे संस्कार करतील हा प्रश्नच आहे. २०१० हे वर्ष भारतासाठी घोटाळ्यांचे वर्षच ठरावे इतके काळे धंदे एकामागोमाग उजेडात येत आहेत. अति झाले अन हसू आले, अशातला प्रकार होत असून आणि सगळेच राजकीय पक्ष ह्या भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने (आठवा साधनशुचितेच्या गप्पा मारणार्या भाजपाच्या अध्यक्षांनी पैसे घेतल्याची दिलेली कबुली) कुणालाही नैतिक पाया नाही भष्टाचाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी उभे राहाण्याचा, आणि अधिक दुर्देवाची गोष्ट म्हणजे ’हे असंच होणार.. आपण काही करु शकत नाही’ ह्या अगतिकतेपायी, वैषम्यापायी जनता अधिकाधिक उदासीन होत चाल्लेय, ह्या दाहकतेची संवेदनशीलता गमावत चाल्लेय. एकीकडे आपण म्हणतो ’यथा राजा तथा प्रजा’ तर दुसरीकडे ’People deserves the Governance’ म्हणजे लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते असेही परस्परविरोधी बुद्धीभेद करतो. होते काय की एक्मेकांवर ढकलण्यापलिकडे ह्यातून मार्ग निघत नाहीत.

हे असे विचारांचे कल्लोळ चालू असतानाच उदास वाटू लागते, आपला युद्धभूमितला अर्जुन झाल्यासारखं वाटतं आणि मग थोडं खोलात शिरल्यावर, म्हणजे, जे काही भष्टाचार उघड झालेत ह्यावर्षी ते सगळे ह्याच एका वर्षातले आहेत की वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत, मग काय वेगळं घडलं ह्यावेळी.. अशा मार्गाने विचार केला तर मग जाणवतं.. किती तरी समाजसेवकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत, ह्यातले बरेच घोटाळे बाहेर काढलेत. माहितीच्या अधिकाराबाबतची सजगता जसजशी वाढेल आणि त्याचा धाक जसजसा निर्माण होईल तसतशी भष्टाचाराची वृत्ती कमी होईल अशी आशा करायला जागा नक्कीच आहे. शिवाय, युयुआयडी (म्हणजे प्रत्येक माणसास एक क्रमांक, अमेरिकेत एसे.एस.एन. आहे तसा..) योजना जसजशी मार्गी लागेल तस तसा समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत मोजदाद (अकांऊंटिबिलिटी) वाढेल, भष्टाचारास मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.

भारतातील पिढी आता विकासाच्या वेगाला सरावतेय. महाराष्ट्र जर २०१२ पर्यंत वीजेच्या बाबतित स्वयंपूर्ण झाला तर बराच फरक पडेल. रोटी, कपडा, मकान और बॆंडविड्थ ह्यातल्या शेवटच्या उद्देशाला आपल्याला लवकरात लवकर हात घालायला हवा, टेलिकॊमचे जाळे जितक्या लवकर आणि स्वस्त पसरेल तितकी महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या कायमस्वरुपी विकासासाठी ती लाभदायी ठरेल. आमेन! त्याचबरोबर, लवासा सारखे जागतिक पातळीवर दखल घेतलेले प्रोजेक्ट्स आणि जैतापूरचा अणूउर्जा प्रकल्प हे औद्योगिक दृष्टया स्पृहणिय वाटत असले तरी सामाजिक विषमता आणि स्थैर्य अबाधित राहील हे पहाण्यातच सरकारची परीक्षा आहे. आपल्याला ’इंडिया आणि भारत’ तसेच ’भारत आणि हिंदुस्थान’ ह्यांमधले धुमशान परवडणारे नाही त्यामुळे स्थानिक, प्रादेशिक आणि प्रांतिक अस्मिता जपत जग जिंकायचं हे लक्षात ठेवायला हवं.

नुकताच काही म्युच्युअल फंड्स पाहात असताना,
http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=15774 हा लेख वाचनात आला. सद्ध्या, अमेरिकेने नोटा छापायला घेतल्याने डॊलरचं अवमूल्यन झालय. अर्थात हा प्रश्न माझ्या सारख्या अनिवासी भारतियांना अर्थकारणासाठी जिव्हाळ्याचा असल्याने जागतिक अर्थकारण आणि घडामोडींवर लक्ष असतेच. असो, तर प्रस्तुत लेखांत, चीनने जर त्यांच्या मालाला अंतर्गत बाजारपेठ निर्माण केली नाही (internal consumption वाढवले नाही) तर तो स्वत:सकट सगळ्या जगावर आर्थिक संकट ओढवू शकतो. तसेच भारताचा विकासाचा दर हा चीनच्या तुलनेत थोडा मागे असला तरी भारतातला विकास हा भांडवलशाही रुजत असल्याचे आणि पर्यायाने कायमस्वरुपी तसेच स्वयंपूर्ण विकास असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे भारतात लोकशाही असल्याने दाखवलेले आकडे हे चीनच्या आकड्यांपेक्षा विश्वासार्हच आहेत. सांगायचा मुद्दा काय, तर चीनची भीती बाळगायचं कारण नाही, इतके कोट्यावधी रुपयांचे भष्टाचार उघडकीला येऊनही जागतिक बाजार भारतात पैसे गुंतवतोय म्हणजे आज जग भारताकडे विश्वासाने, आशेने बघतय, आपण तो विश्व्वास सार्थ ठरवायलाच हवा. चीनमध्ये मानवी मूल्यांची होणारी पायमल्ली, सरकार करत असलेली सामाजिक दडपशाही, मिडीयाला नसलेले स्वातंत्र्य, इटरेनेटवर प्रतिबंध ह्यामुळे समाजवादापुढे अपारदर्शकतेचे, स्वातंत्र्याच्या गळचेपीचे प्रश्नचिन्ह. रशिया आणि इतर ठिकाणी झालेला साम्यवादाचा पाडाव. इथे अमेरिकेत अनिर्बंध भांड्वलशाही आणि Too big to fall म्हणत नंगानाच करणाया बड्या कंपन्यांनी सरकारला वाकवूवन जनतेचे पैसे TARP (Troubled Assets Relief Program) द्वारा हडप करुन वर त्यातून बोनसही घेतल्याचे आपण पाहिले, भारतात लायसन्स राज, लाल फितीचे राजकारण संपून कॊर्पोरेट स्पर्धेतून विकास सामान्य माणसापर्यंत पोहोचतोय पण ह्या भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय आणि किती खोल लागलेय वाळवी कळत नाहीये, मग काय योग्य या जगात हेच कळेनासं झालय ह्या क्षणाला, पुन्हा एकदा युद्धभूमीवरचा अर्जुन!

मिसळपावर सुधीर काळे यांनी http://www.misalpav.com/node/15799 येथे एका पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केलेय, "भारतीय - कसा मी? असा मी". वाचायला हवंच हवं असं हे पुस्तक, मूळ लेखक आहेत श्री. पवनकुमार वर्मा (भारताचे सद्ध्याचे भूतान येथील राजदूत). आजच्या घडीच्या भारताच्या प्रगतीचा वेग, भारताची जगाला असेलेली ओळख ह्याचा यथार्थ आणि अभ्यासपूर्ण उहापोह या पुस्तकात केलेला आहे असं कळतं.

एकूणच, समाजवाद की भांडवलशाही हे द्वंद्व डोक्यात सुरु झालं की लहानपणी चाळीत वासुदेव गिरक्या घेत गायचा त्याचं हटकून आठवणारं गाणं.. बाबूजींनी गायलेलं माझं अतिशय आवडतं.. लोकसंगीताचा उत्तम नमुनादेखील..

वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


पैशाची जादू लयी न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागून धाव
जल्मापासनं साधी मानसं ह्या पैशाची गुलाम रे..
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

कुनी जुगार सट्टेबाज, कुनी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुनी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखूर सुटला फेकला त्याने लगाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

या कवडी दमडी पायी कुनी राखूस ठेवी जीव
कुनी डाका दरोडा घाली कुनी जाळून टाकी गाव
बगलं मंधी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळाला फास
ठरल्यालं लगिन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं श्रीमंतिनं हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

वाड्यात पंगती बसल्या लयी अग्रव जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आगं
संसाराचं ओझं घेउन कुनी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नाचते नारीची अब्रू छन छुम्मक तालावरती
पैशानं बायको खूस पैशानं बोलते पीरती
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम..
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

आपले भ्रष्टाचारी तर हेच म्हणत नसावेत, दाम करी काम? :(

Tuesday, November 2, 2010

आली माझ्या घरी ही दिवाळी..

ह्या दिवाळीला बायको आणि मुलगा ’माझ्या माहेरी’ आहेत, त्यामुळे इथे एकटाच.. अर्थात तरी दिवाळीचा उत्साह कमी नाहीच. कंदील लावला आज आणि हो फराळ केलाय, म्हणजे बनवलाय :-))

अर्थात वैदेहीने http://www.chakali.blogspot.com/ इथे दिलेल्या आधाराशिवाय हे कठीणच होतं, म्हणजे पूर्वी कधितरी मी ओगले आजींच्या पुस्तकांचे संच आणले होते वाहून अमेरिकेत, पण मायबोली, मिसळपाव आणि मुख्यत्वे चकलीवर वैदेहीच्या रेसिपीज मुळे ती पुस्तक उघडायची आताशा गरज राहीली नाही.

शंकरपाळे करताना मैदा मस्त मळला, कणकेचा वापर कटाक्षाने टाळला. थोडं मोहन घातलं मैदा मळत असताना, त्यावरुन आठवलं - ’मोहन’ हा शब्द कुठून आला असावा ह्या स्वयंपाकात? मला शब्दांची व्युत्पत्ती शोधायला फार आवडतं, त्यातून जुन्या संस्कृतीचं एखादं रुपडं, त्या काळातील माणसांची विचार करण्याची पद्धती चटकन उडी मारुन डोळ्यासमोर येऊ शकते. असो, तर माझ्या दोन्ही आज्या पट्टीच्या सुगरणी. दोन्हींमध्ये साम्य म्हणजे स्वयंपाक करताना त्यांचं नामस्मरण तरी चालू असे किंवा अभंग, ओव्या ह्यांचा स्त्रोत गोड गळ्यातून अखंड सुरु असे. शिवाय पदार्थ तयार झाला की आधी देवापुढे ठेवणे असेच. त्यामुळे नेहमीचा स्वयंपाक करतानाही त्यांची एकतानता, तलिन्नता बघण्यासारखी असे, आणि असे दिवाळीचे पदार्थ करायचे असले तर बघायलाच नको. एकमेकीकडे जाऊन सगळ्या बायका अतिशय उत्साहाने पदार्थ करणार दिवाळीचे. तर देवाचे चिंतन करत स्वयंपाक करताना त्या मन-मोहनाचा मोह पडल्याने, तेलाच्या फोडणीला मोहन नाव पडले असेल का? असेलही, कुणास ठाऊक!!

लाडू करताना केवळ वासावरुन आणि रंगावरुन बेसन कसं आणि किती भाजलं गेलय ओळखण्याच काम जमून आलं आणि लाडू मनासारखे छान वळलेही गेलेत. शंकरपाळे तळतानासुद्धा तेल किती तापायला हवं, कोणत्या रंगावर ते तळून काढायला हवेत हे एकदा लक्षात आलं की काम सोप्प होतं. पूर्वी आजी करायची तेव्हा नाही म्हटलं तरी थोडी लुडबूड असायची स्वयंपाक घरात, बोलता बोलता आजीही स्वयंपाकातल्या खाचाखोचा सांगायची. मग नंतर स्वयंपाकघर जे सुटलं ते सुटलं. इथे एकटा असतानाही कधी तळणीचा विचार केला नाही (बॆचलरपणीचा सामूहीक आळस बहुधा) नंतर बायकोने लाड पुरवले, पण ह्यावेळी ओट्याशी उभं राहून फराळ करताना खरच मजा आली, बायकॊचाही टेलिफोनिक सपोर्ट होताच :) त्यामानाने चिवडा सरळ सोप्पा करायला, अर्थात तो खालून न जळून देता मिक्स करणं आणि पोहे कच्चे न राहाणं हे साधलं की झालं.


असो, तर शंकरपाळे, पातळ पोह्याचा चिवडा आणि बेसनाचे लाडू असा फराळ दिवाळीला तय्यार, सोबत कंदील आणि तोरणं आहेतच. फटाक्यांची अनुपस्थिती अर्थातच जाणवतेय पण फटाके न लावण्याची सवय आता अंगवळ्णी पडलेय, मुलाबरोबर पुन्हा लहान होईन तेव्हा करुच धमाल.

तमसो माSSSS ज्योतिर्गमय:
सगळ्याना शुभ-दिपावली !

Tuesday, October 19, 2010

आमचे साहेब..

खरं म्हणजे इतक्या दिवसांनी लिहितोय, इतका खंड पडेल लिखाणात असं वाटलं नाही, पण चलता है, गेले काही माहिने घर आणि नंतर कामात इतका व्यस्त होतो की वाचन तसं थंडावलच पण मनात असूनही कागदावर उतरवण्या इतका वेळ काढू शकलो नाही. लक्षमणचे ते लाजवाब डाव, सचिनने दिलेले दणके, कॊमनवेल्थ मधला भ्रष्टाचार आणि मग भारतियांनी लुटलेली पदक, बिहारच्या निवडणूकांतली रणधुमाळी, अयोध्याकांडाचा पुढचा अध्याय आणि असं बरच काही बघत, वाचत होतो.. बरेचदा मनात असूनही लिहायचं राहून गेलं, असो.. पण बाळासाहेबांची दसयाची डरकाळी ऐकली आणि अगदी उचंबळून आलं सगळं, म्हटलं लिहून मोकळं व्हायलाच हवं.

तर, परवाच्या सेनेच्या (आता सेना म्हटली कि फक्त ’शिव’सेनाच, आता ’शिव’ हा शब्द वड्यापासून उद्योगापर्य़ंत वापरून टाकलाय तो भाग सोडा!) दसयाच्या सभेचा इतिवृत्तांत वाचला आणि जुने दिवस आठवले. गिरगावात शाखा म्हणजे संघाची नाही तर सेनेचीच असं त्यावेळी वातावरण. दसयाची सभा म्हणजे घरचं कार्य असल्यासारखी तयारी असे. म्हणजे सकाळी घरोघरी पूजा करुन, उन्हातान्हात शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे विचार ऐकायला वडिल-काका आणि आजूबाजूचे सगळेच जात असू. तो भगव्याचा गजर, बाळासाहेबांचा करारी आवाज आणि मिश्कील चिमटे, परखडपणा.. त्यांच्या विचाराचं सोनं लुटत आम्ही पांगायचो एक समाधान घेऊन. एक तरी व्यक्ती आहे जी मनापासून आणि मनातलं बोलते, निर्भिडपणे आग ओकते आणि हो, मराठी माणसाचा विचार करते हे सुखावणारं होतं, निदान त्या काळात तरी. तेव्हा शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करणारी होती म्हणून असेल पण मध्यमवर्गीय तरुणांत आणि नवतरुणांत (केवळ मराठीच नाही तर गुजराथीही) बाळासाहेबांनी एक चैतन्य निर्माण केलं होतं. शिवसेनेचा बंद म्हणजे बंद (धाकामुळे किंवा केवळ साहेबांचा शब्द म्हणून) असे मंतरलेले ते दिवस. ९२-९३ च्या दंगलीत बाळासाहेबांचा निर्भीडपणा आणि वचक आम्हा गिरगावकरांना तरी सुखावूनच गेला होता. पुढे ९५ मध्ये युतीचं सरकार आलं आणि शिवशाही येणार अशा अपेक्षांच ओझं घेऊन सेना भाजपाने कारभार सुरु केला. त्याक्षणी बाळासाहेबांनी स्वत: मुख्यमंत्री पद न घेता (रिमोट कंट्रोल हातात ठेवून अर्थत) जे शुचितेचं दर्शन घडवलं (न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चारं!) ते त्यांच्याविषयी आदर द्विगुणीत करणारं ठरलं. पण हा सगळा इतिहास झाला, केव्हा.. जेव्हा सेनेचा हा वाघ, ढाण्या वाघ, स्वत:च्या कर्तुत्वावर जंगल गाजवत होता, जीवाला जीव देणाया मराठ्यांची फौज उभी करुन भिडत होता, आपल्या निर्भीड. तर्कशुद्ध वकृत्वाने सभा गाजवत होता. पण मग निसर्गनियमाप्रमाणे उतरती कळा लागली आणि गेल्या काही वर्षात जे बघायला मिळतय त्याने वाईट, विषण्ण, उद्विग्न, असहाय्य आणि हो लाजिरवाणं ही वाटतय. ज्या बाळासाहेबांववर जीवापाड प्रेम केलं, प्रसंगी, त्यांनी पु.ल. / सचिन ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मोहयांवर केलेला शाब्दिक हल्ला सुद्धा दुर्लक्षित केला, त्या बाळासाहेबांबद्द्ल आता केवळ सहानुभूतीच वाटून राहिलेय.

तर परवाच्या भाषणाच्या अनुषंगाने.. शरद पवारांनी कोलांट्या मारल्या तर आपण स्वीकारतोच हो, पण बाळासाहेबांनी तसं करावं हे कसं पचनी पडणार? आयुष्यभर, घराणेशाहीचा आरोप करत शेवटी मुलगा कार्याध्यक्ष म्ह्णून पुढे आणून वर ही घराणेशाही नाही ही मखलाशी कशासाठी ते कळलं नाही. शिवसेनेत सगळे निर्णय बाळासाहेबच घेतात ना, मग हा निर्णय कृष्णकुंजवरुन घेतला गेला ह्याला काय अर्थ आहे, जर बाळासाहेबांना तो पटला नस्ता तर तुम्ही तेव्हाच कार्याध्यक्ष पद दुसया कुणाला तरी द्यायला हवं ना! ते जाउंदेच पण आदित्यला लॊंच करताना त्याचा भाऊ म्हणजे दुसरा नातू माझ्यासारखाच हे सांगण्याचा केविलवाणा अट्टाहास कशासाठी? त्यांना (आदित्य/ तेजस) करु दे ना त्यांच्या लढाया, घेऊ देत ना केसेस अंगावर. गेले कित्येक दिवस सामन्यात पद्धतशीर पणे आदित्यला फोकस केलं जातय, त्यामुळे त्याला लॊंच करणार हे अभिप्रेत होतच पण मग प्रश्न पडतो सामान्य शिवसैनिकाचं काय? शिवाय तुम्ही घराणेशाही विरुद्ध वाजवलेल्या फुसक्या बाराचं काय? शिवसैनिकांनीच निवडून दिलं आणि त्यांच्या इच्छेखातर असं झालं हे म्हणायचं असेल तर तसच राजीव गांधी, राहूल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्याबाबतर्ही म्हणता येईल की. उलट त्यांनी घराणेशाही नको अशा घोषणा तरी दिल्या नाहीत. माझ्या मते घराणी शाही असण्यात खास चूकही नाहीच कारण घरात ज्या वातावरणात तुम्ही वाढता त्याचा तुम्हाला लहानपणापासून व्यावसायिक गोष्टी जवळून अनुभवता आल्याने फायदा होतोच (जसा इंदिरा गांधींना नेहरूंचा झाला), पण पुढच्या पिढीला त्यासाठी तयार करणं एकवेळ समजू शकतो, आदित्यला पुढे आणणं हा त्याचाच एक भाग असू शकतो हे ही बुद्धीला पटतं पण ’ही घराणेशाही नाही’ ही मखलाशी करणं, ती करावी लागणं आणि ते ही बाळासाहेबांना ह्याच वाईट वाचल्यावाचून राहत नाही. प्रबोधनकारांनी असं बाळासाहेबांना लॊंच केल्याचं ऐकीवात नाही आणि राज ठाकरेंना बाळासाहेबांनी लॊंच केल्याचं ऐकीवात नाही, असो कालाय तस्मै नम:!

साहेबांनी भाषणात म्हटलं की ज्या मुद्द्यावर सेना उभी राहीलीत्याच जुन्या मुद्द्यावर ते (राज) लढतायत. आता साहेबांच्या ह्या विधानात अनेक अर्थ निघतात, एक म्हणजे मराठी हा मुद्दा अजून इतक्या वर्षांनतरही राजकीय होऊ शकतो ह्यात नाही म्हटलं तरी सेनेचं अपयश आहेच की. दुसरं म्हणजे, मराठीचा मुद्दा सेनेने सोडलाच, त्याशिवाय राजसाहेबांना एवढा पाठींबा मिळालाच नसता. ’दोपहर का सामना’ मुंबईत काढण्याची गरज तेव्हा सेनेला का भासली? ह्यातून कुणाचं लांगुलचालन चाल्लल होत, हे मराठी माणसाला कळत नव्हतं का? सेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मजबूत होण्यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावर पसरायचा प्रयत्न केला. झाले काय की इथले बुरुज ढासळत गेले. शिवसेनेसारखी एक संघटना उभारण्यात बाळासाहेबांचे जितके यश, कौतुक आहे तितकेच खंदे शिलेदार गमवून ती एकसंध ठेवण्यात आलेले अपयशही आहे. भुजबळ, राणे, गणेश नाईक ह्यांसारखे पुढच्या फळीचे नेते तसेच बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, सदा सरवरणकर ह्यांसारखे तरुण रक्त शिवसेना एक संघटना म्हणून बांधून ठेवू शकली नाही, ह्यां सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षांचे मेळ, एक नेता म्हणून, बाळासाहेब घालू शकले नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव असं वाटल्यावाचून राहात नाही. परवाच्या भाषणात त्यांनी भुजबळांचा उल्लेख केला, मला तर हसू आले. लखोबा म्हणून एके काळी सैनिकांनी ज्याला दणका दिला, ज्याने बंडखोरी म्हणजे काय हे सेनेला पहिल्यांदा दाखवून दिले एवढेच काय तर बाळासाहेबांना अटक करण्याचे मनसुबे केले, त्यांची सदिच्छा भेट! राजकारणात सगळं क्षम्य असतं मान्य, पण बाळासाहेबांना हे शोभत नाहीच, अहो त्यापेक्षा राज आणि उद्धव एकत्र यावेत यासाठी जे शिवसैनिक प्रयत्न करतायत त्यांचा तरी उल्लेख करायचा, बरं वाटलं असतं! बाळासाहेबांच्या भाषणात प्रमुख हल्ला होता राज ठाकरेंवर ह्यातच सगळं आलं. राजसाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावर जे वातावरण पेटवलय त्याचे चटके सेनेला बसत आहेतच. मला खात्री आहे कुठेतरी मनाच्या कोपयात बाळासाहेब राजचं कौतुक करत असणारच. इतक्या छोट्या कालावधित मनसेने जे आक्रमक धोरण ठेवलय त्याची दखल बाळासाहेबांनी घेतली हीच पोचपावती.

दरम्यान, अयोध्येच्या निकालानंतर सामान्य जनतेने दाखवलेला समजूतदारपणा, प्रसार माध्यमांनी आणि राजकारण्यांनी दाखवलेली परिपक्वता (असन्माननीय अपवाद वगळता) पाहून खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. गेल्या १७ वर्षात शिक्षण वाढलेय, जागतिकरण वाढलय, जीवनाचा वेग वाढलाय, लोकांना विकासाचं वेड लागलय. आपापसात लढ्ण्यात काहीच हशील नाही, प्रगति करायला हवी असं नवी पिढी, प्रसंगी जुन्या पिढीला सांगतेय, त्यामुळेच हे शक्य झालं असं वाटतय. उदाहरणच द्यायचं झालं, तर १७ वर्षांपूर्वी माझे अयोध्येविषयी दृष्टीकोन होते ते आमूलाग्र बदलले आहेत, तेव्हा ते चूक होते असं म्हणणार नाही, त्यावेळच्या परिस्थितीत ते योग्य असतिलही, पण आता आपण एक समाज म्हणून पुढे जायला हवं हे उमगतं आणि असं एकत्रित प्रगती करण शक्य, आवश्यक आणि अपरिहार्य आहे हे ही समजतं. तर ह्यातून सांगायचा मुद्दा हा की, जसं शिक्षणाचं प्रमाण वाढतय, माहितीचा अधिकार वापरण्याचं प्रमाण वाढतय, परकीय गंगाजळी वाढतेय, उद्योगधंदे वाढताहेत तस तस लोकांना समृद्ध जीवनाचे फायदे दिसायला लागलेत, त्याची फळं चाखायला मिळालेयत. असं असताना भावनेच्या राजकारणातून विशेष काहीही होणार नाही हे आता राजकीय पक्षांनाही जाणवू लागलेय. गुजराथचे उदाहरण पाहाता तर हे अधोरेखित होतय. नरेंद्र मोदींनी केवळ ’समतोल विकास’ ह्या एका मुद्द्यावर अगदी पंचायत समित्या आणि नगरपालिकाही निर्विवाद जिंकून आणल्या. बिहार मध्ये नितिशकुमारही विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करत आहेत. दक्षिणेत चंद्राबाबूंनीही तो प्रयत्न केला पण विकासात ते समतोल साधण्यात अपयशी ठरले. केंद्रात मनमोहनसिंग सरकारही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन भारताच्या अर्यव्यवस्थेच्या वाढीच्या गतीची स्वप्ने जगाला दाखवत आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, बाळासाहेबांच्या भाषणात, ’विकास’ हा मुद्दा अभावानेच आढळला. वीस वर्षांपूर्वीचा तरूण आणि आजचा तरूण ह्याच्या विचारात बराच फरक आहे हे समजायला हवे. केवळ अर्वाच्य शब्दात इतरांची हेटाळणी करुन मने जिंकण्याचे दिवस गेले, त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेत इतके वर्ष सत्ता असताना सेनेने काय काय केले ह्यावर लक्ष वेधले असते तर नक्कीच छान वाटले असते.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, आदित्यच्या बरोबरीने आदेश बांदेकरांचे सेनेने केलेलं लॊंचिंग. गेले कित्येक दिवस त्यासाठी सामन्यात मोर्चेबांधणीसुरु होती, म्हणजे आज भाऊजींनी बाळासाहेबांची भेट घेतली, भाऊजींनी मराठी दांडीया सुरु केला वगैरे वगैरे! ज्या भाऊजींवर दादर मधून पडण्याची नामुष्की आली (कारण काहीका असेना!) त्यांना शिवसेनेत सचिवपद? म्हणजे इतके वर्ष घासलेल्या शिवसैनिकाने करायचं काय? कुठल्याही पक्षात सचिवपद म्हणजे कार्याध्यक्षाशी समन्वय साधण्यासाठी, थिंक टॆंक म्हणून तसेच लोकांकडून कामं करुन घेण्यासाठी अतिशय महत्त्वांचं, जबाबदारीचं आणि तितकच व्यस्त पद. इतर उद्योग सांभाळताना ह्या पदाला भाऊजी न्याय देऊ शकतील ? त्यांचं पहिलं ध्येय मिडीया म्हणूनच राहाणार ना मग डमी म्हणून त्यांना इथे पुढे केलय की काय अशी शंका यायला जागा आहेच, म्हणजे एखाद्या सच्चा शिवसैनिकाची ह्या पदासाठीची जागा बाहेरून आलेल्याने घेतली, हेच अगदी विधानसभा निवडणूकीत झालं दादर मतदारसंघात आणि परिणाम दिसलेच. व्यक्तिश: कुणाला विरोध नाही पण कुठेतरी चुकतय असं वाटत राहातं.

एकंदर, हे असं आहे. शिवसेनेचा प्रवास म्हणजे माझ्यासारख्या कित्येकांचा तारुण्याचा प्रवास. बाळासाहेबांचे विचार ऐकत आम्ही घडलॊ, एका दिशेने पुढे गेलो. त्यामुळे हे असं काही पाहिलं की पोटतिडकीने तितक्याच हक्काने काही सांगावसं वाटतं, चुकीचं वाटतं असलं की मन मोकळं करावसं वाटतच. असेच पुढचे दसरे मेळावे येतील, पन्नाशीही पार करतील, पिढ्यान पिढ्या वाघाची डरकाळी ऐकायला येतील पण जर आवाजातील धारचं कमी होत चालली असेल, तर न्यायालयाला डेसिबल मध्ये आवाजाची क्षमता घालायची वेळच येणार नाही हे तितकच खरं!

Sunday, July 11, 2010

If you can..

गेले काही दिवस, कामाचा वाढलेला व्याप आणि पसारा, घरात तारक बरोबर जगत असलेलो माझं बालपण, तसेच समर मधील भटकंती ह्यामुळे इच्छा असूनही इथे लिहिता आलं नाही. अकरावीच्या प्रवेशांचा खेळखंडोबा, फुटबॊलचा विश्वचषक, राज-का-रण, बेळगावप्रश्नी केंद्र सरकारने घातले वाकडे शेपूट, वाढती महागाई, त्यातून झालेले बंद, ’डबल डीप’ रिसेशनची इथे अमेरिकेत जाणवत असलेली भीती खूप काही लिहीण्यासारखं आहे, पण सद्ध्या वेळेचं गणित काही जमत नाहीये. वाचनही थांबलय म्हणावं इतपत थंडावलय.
स्पेन जिंकली आज.. मस्त झाली आजची मॆच. इतकी पिवळी कार्ड एका गेम मध्ये कधी बघितली नव्हती. खूप धुसमसळा झाला आजचा खेळ पण हॊलंडला त्याच्यामुळेच दहा खेळांडूंनी शेवटी बचाव करायला लागला आणि तिथेच स्पेनने संधी साधली. एकंदर विश्वचषकच मस्त झाला, कायम लक्षात राहील असाच.

दरम्यान एक नितांत सुंदर कविता वाचनात आली ती इथे लिहितोय -
एका वडिलांनी मुलाला उद्देशून लिहिलेली.. कसं जगावं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय करु नये ह्याची परिपूर्ण जंत्रीच जणू. एकेका ओळीत विलक्षण अर्थ भरला आहे. वाचताक्षणी भारुन टाकलं, जिंकलं ह्या ओळींनी.. कवीचे मनापासून आभार.

"If"
If you can keep your head when all about you
Are losing theirs and blaming it on you;
If you can trust yourself when all men doubt you,
But make allowance for their doubting too;
If you can wait and not be tired by waiting,
Or, being lied about, don't deal in lies,
Or, being hated, don't give way to hating,
And yet don't look too good, nor talk too wise;

If you can dream - and not make dreams your master;
If you can think - and not make thoughts your aim;
If you can meet with triumph and disaster
And treat those two imposters just the same;
If you can bear to hear the truth you've spoken
Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to broken,
And stoop and build 'em up with wornout tools;

If you can make one heap of all your winnings
And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
And never breath a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
To serve your turn long after they are gone,
And so hold on when there is nothing in you
Except the Will which says to them: "Hold on";

If you can talk with crowds and keep your virtue,
Or walk with kings - nor lose the common touch;
If neither foes nor loving friends can hurt you;
If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
With sixty seconds' worth of distance run -
Yours is the Earth and everything that's in it,
And - which is more - you'll be a Man my son!

--Rudyard Kipling